बेळगांव दि.
२१ जानेवारी २०१८ : दि. १८ जानेवारीपासून सुरू असणार्या कॅपिटल वन आयोजित अखिल
भारतीय एकांकिका स्पर्धांचा बक्षिस वितरण समारंभ लोकमान्य रंगंदिर अर्थात रिट्झ
थिएटर येथे उत्साहात पार पडला. यावेळी अभिनेते, लेखक, दिग्दर्शक म्हणून प्रसिध्द
असणारे श्री. संजय मोने आणि दै. तरुण भारत चे सर्वेसर्वा श्री. किरण ठाकूर यावेळी
उपस्थित होते.
एकांकिकांचे
सत्र संपल्यानंतर डॉ. संध्या देशपांडे यांनी संजय मोने यांची प्रकट मुलाखत घेतली.
यावेळी बोलताना श्री. मोने म्हणाले, ‘मुंबई ही निव्वळ बाजारपेठ आहे. आपल्या
मातीतील कला आपल्याच मातीत राहून जपायला आणि जोपासायला हवी. निव्वळ ग्लॅमरच्या
मागे लागून मुंबईची वाट धरणे तसेच तिथल्याच कलाकारांना सगळं येतं वगैरे समजून
न्यूनगंड बाळगण्याचं कांही एक कारण नाही’. संहितांविषयी तळमळीने बोलताना ते पुढे
म्हणाले, ‘पूर्वीसारख्या दीर्घायुष्य आणि खोली असणार्या संहिताच आजकाल लिहील्या
जात नाहीत त्यामुळे अभिनयाची भूकही भागत नाही.’ नवीन संहिता लेखकांना त्यांनी
यावेळी उत्तमोत्तम संहिता लिहीण्याची विनंती केली.
किरण ठाकूर
यांनी आपल्या मनोगतात बेळगावचे नाटक क्षेत्रातील योगदान आणि आजची स्थिती याचा
आढावा घेतला. यावेळी मंचावर कॅपिटल वनचे अध्यक्ष श्री. शिवाजीराव हंडे हेदेखील
उपस्थित होते.
बक्षिस
वितरणावेळी प्रथम शालेय गट त्यानंतर लेखन स्पर्धा आणि शेवटी एकांकिका सादरीकरण
स्पर्धा यांचे बक्षिस वितरण करण्यात आले.
यंदाच्या
स्पर्धेत श्री. अनुप जत्राटकर लिखित “कंकाली” या एकांकिकेला प्रथम क्रमांकाचे
पारितोषिक जाहीर झाले होते. कंकाली ही संगीत एकांकिका असून यात गायन क्षेत्रातील
एका स्त्री कलाकाराची कथा असून, कलाकाराच्या वेदना आणि त्यांची त्याच वेदनांवर कलेच्या
माध्यमातूनच मात करण्याची जिद्द यावर प्रकाश टाकला आहे. या सांगितिकेत चार बंदिशी
आणि पाच चीजांचा समावेश आहे. त्यासुध्दा अनुप यांनीच लिहीलेल्या आहेत.
यावेळी अनुप
यांचा, संजय मोने आणि किरण ठाकूर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रशस्तीपत्र,
स्मृतीचिन्ह आणि रोख ११,०००/- असे या बक्षिसाचे स्वरूप आहे. गतवर्षी अनुप यांच्याच
“निष्पर्ण पिंपळाच्या छायेत” या एकांकिकेस द्वितीय पारितोषिक मिळाले होते.