NEWS 1 : ए.जे.एम.पी. संस्थेच्या

18/11/2017

“अनुप जत्राटकर मल्टिमिडीया प्रोडक्शन” ही संस्था १० जून २००५ रोजी, चित्रपट, लघुपट, रंगमंच मुख्यत्वे या क्षेत्रात काम करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आली. सुरूवातीला अगदीच हौशी आणि अननुभवी असणार्‍या आणि महाविद्यालयात शिक्षण घेणार्‍या ४-५ मित्रांनी एकत्र येवून या संस्थेला आणि संस्थेच्या पहिल्या “शिकार” या लघुपटाला सुरूवात केली. अथक वर्षभराच्या प्रयत्नांनंतर, कित्येक “ट्रायल एण्ड एरर” नंतर अखेर हा लघुपट १२ ऑगस्ट २००६ रोजी प्रदर्शित करण्यात आला. गेल्या १२ वर्षांच्या काळात सदर संस्थेने ३०हून अधिक लघुपटांची निर्मीती, दिग्दर्शन आणि तब्बल ५० हून अधिक लघुपटांसाठी लेखन, तितकेच माहितीपट, जाहिरातपट करून लघुपट क्षेत्रात आपले नाव आणि स्थान अधोरेखित केले. सलग १० लघुपटांना पुरस्कार मिळविण्याचा विक्रमही प्रस्थापित केला. ऑक्टोबर २०१३ साली आलेला “द प्रॉमिस” हा लघुपट संस्थेच्या कारकिर्दीतील मैलाचा दगड ठरला. हा लघुपट केला नसता तर संस्था बंद करण्याचा निर्णय संस्थेचे सर्वेसर्वा अनुप जत्राटकर यांनी घेतला होता. एक शेवटची फिल्म म्हणून तयार केलेल्या या लघुपटाने इतिहास घडवला. लघुपटांच्या विश्वात ३०० हून अधिक डिमांड शो पहाण्याचं आणि ३५ हून अधिक पुरस्कार मिळवण्याचं श्रेय या लघुपटाला मिळालं. याच लघुपटामुळे लघुपटांचे हक्क विकले जायला सुरूवात झाली. याचेच फलित म्हणून अनुप जत्राटकर यांच्या पुढील “स्मोकिंग झोन” लघुपटाचे हक्क लेखन अवस्थेत असतानाच विकले गेले. “द प्रॉमिस” नंतर संस्थेने मागे वळून पाहिले नाही आणि स्मोकिंग झोन, हुलड, ओंकार, येस आय ब्लिड, आणखी किती दिवस ?, मारीश आणि मक्तुब यांसारखे वेगवेगळ्या विषयांवरचे आणि सरस लघुपट दिले आणि या प्रत्येक लघुपटाने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महोत्सनांतून विविध पुरस्कारांवर आपली मोहोर उमटवली.

२०१५ साली मुंबई इथे संपन्न झालेल्या आंतरराष्ट्रीय महोत्सवात याच कार्याची दखल घेत संस्थेस, “बेस्ट इमर्जिंग प्रोडक्शन हाऊस ईन इंडिया २०१५” चा पुरस्कार देवून गौरवण्यात आले तसेच २०१६ साली दिल्ली येथील आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवात “बेस्ट प्रोडक्शन हाऊस ईन इंडिया २०१६” या किताबाने सन्मानित करण्यात आले.

२०१६ नंतर मात्र संस्थेने लघुपट, माहितीपट यांवरील लक्ष कमी करून चित्रपटांकडे मोर्चा वळवला. अनुप जत्राटकर यांनी गेल्या २-३ वर्षात साधारण ६ चित्रपटांसाठी पटकथा-संवाद लिखाणाचे काम केले असून सध्या ते आणि त्यांची टिम “किक ऑफ” आणि “शिकार” या चित्रपटाच्या निर्मीतीत व्यग्र आहेत. “शिकार” या त्यांच्या सर्वात महत्वाकांक्षी चित्रपटासाठी गेल्या ४ वर्षात ३० हून अधिक ड्राफ्ट्सवर काम केले असून सध्या या चित्रपटाचे प्री-प्रोडक्शनचे काम सुरू आहे. याच चित्रपटाचा भाग म्हणून सदर संस्थेने एक पाऊल पुढे टाकत निपाणी येथे “प्रियदर्शन पोस्ट-प्रोडक्शन स्टुडियो” ची निर्मीती केली आहे. जिथे चित्रपटांचे एडिटींग, रेकॉर्डिंग, डबिंग, मिक्सिंग, साऊंड ईंजिनिअरिंग यासारखी कामे तसेच “स्क्रिप्ट टू स्क्रिन” सर्व सुविधा एकाच ठिकाणी मिळण्यासाठीचा अद्ययावत स्टुडियो तयार केला असून याचा उद्घाटन समारंभ उद्या रविवार दि. १९ नोव्हेंबर २०१७ रोजी आयोजित करण्यात आला आहे.

सदर कार्यक्रमास लघुपट, चित्रपट क्षेत्रातील विविध मान्यवर या निमीत्ताने उपस्थित रहाणार आहेत.

News / Updates