बरीच वर्षं भाड्याच्या घरात घालवल्यानंतर स्वत:च्या जागेत रहायला आल्यावर ज्या भावना मनात दाटून येत असतील, अगदी तशाच भावना याक्षणी माझ्या मनात येत आहेत ! खरं तर यासाठी आपणा सर्व मित्र-मैत्रिणींचे खूप खूप आभार कारण आपल्या सर्वांच्या शुभेच्छा आणि आशीर्वादांच्या जोरावरच इथवर मी पोहोचू शकलो, त्याबद्दल मी आपणा सर्वांचा मनापासून ऋणी आहे. सोशल मिडीयाने किंवा फेसबुकसारख्या मिडीयाने मला काय दिले ? तर, आपणासारखे खूप चांगले पाठबळ देणारे मित्र-मैत्रिणी भेटले. मग “हा” अट्टहास कशासाठी ? कारण, प्रत्येक वेळी मी प्रत्येकाच्या प्रश्नांना उत्तरे देवू शकत नाही, भले कितीही ईच्छा असली तरी ! या वेबसाईटचे कारण एवढेच की, कुणीही आपल्याला कसलीही माहिती हवी असल्यास (माझ्याशी, माझ्या कामाशी किंवा माझ्या क्षेत्राशी संबंधीत) तुम्ही सरळ माझ्या पर्सनल मेलवर पत्रव्यवहार करू शकता. माझे सध्या कोणते नवे प्रोजेक्ट्स सुरू आहेत ?, कोणते जुने प्रोजेक्ट्स केले ? याची माहिती तुम्हाला मिळू शकते. येत्या कांही दिवसात माझ्या सर्व प्रोजेक्ट्स चे सारांश, त्यांचे प्रोमो, मेकिंग्ज, फिल्म्स माझ्या साईटवरील “चॅनेल” मधे पहायला मिळतील.
ज्यावेळी साईटचे काम सुरू होते, त्यावेळी माझ्या मनात एक भीति निर्माण झाली, ती म्हणजे- आपणा सर्वांपासून दूर जाण्याची ! आणि असे होवू नये यासाठी मी “पेन” हे सदर सुरू करण्याचे ठरवले. माझ्या साईट-डिझायनरनी “ब्लॉग” किंवा “थॉट्स” नाव सुचवले पण माझा उद्देश थोडा वेगळा होता. मित्रांनो, “पेन” किंवा “लेखणी” या सदरातून इथून पुढे मी माझ्या कविता, लेख, कथा, लघुकथा, मनातील विचार, कधी तरी एखाद्या नव्या प्रोजेक्ट्सचे फोटोज, मेकिंग्ज हे सारं तुमच्यासोबत शेअर करायचं आहे. पेन किंवा लेखणी मधून उतरणार्या कोणत्याच लिखाणाला बंधन असणार नाही आणि त्याची लिंक सोशल मिडीयावर टाकून ती आपल्यापर्यंत पोहोचवून त्याजोगे आपल्याही संपर्कात रहाणे शक्य होणार आहे ! दर रविवारी आपण माझी लेखणी वाचू शकता !
मित्रांनो, इथून पुढची वाटचाल थोडीशी वेगळी आणि खडतर असणार आहे. पण मला खात्री आहे, आपण सारे असेच माझ्यावर, माझ्या कामावर प्रेम करत रहाल आणि पुढे जाण्याचे बळ देत रहाल...
पहिल्याच भेटीत आणखी काय बोलू ? बोलायला खूप आहे...पण, शब्दांनी घोळ घालून ठेवलाय...नालायल लेकाचे आजच लपंडाव खेळतायेत ! असो...त्यांच्यावरही रोष नाही !!
मित्रांनो, लवकरच भेटू..! तोवर आपल्या शुभेच्छा आणि आशीर्वादांच्या प्रतिक्षेत...
लोभ असावा !!!- अनुप जत्राटकर