Pen


PEN 6 : कधी कधी अजूनही !

कधी कधी उगाचंच बोलावं वाटतं, लिहावं वाटतं आणि उगाचंच मुद्दा सोडून मुद्दामहून भरकटावं वाटतं !

कधी कधी मनात असतं ते ओठांवर येत नाही, ओठात असतं जे, ते कागदावर उतरत नाही आणि जे कागदावर लिहीतो ते, मनात असतंच असं नाही !

कधी कधी स्वैर वागावं वाटतं, बंधनं झुगारून टाकावीत वाटतं. एकदा...फक्त एकदा पेटून उठावं आणि घ्यावं मिठीत आपल्याच प्रतिमेला अन टाकावं श्वास गुदमरेपर्यंत जखडून स्वत:च्याच मिठीत !

कधी कधी शब्दांचीही कत्तल करून टांगावी वाटतात कत्तलखाण्यातील आकड्यांना, जनावरांप्रमाणं ! आणि स्वत:च चौकात उभं राहून बोली लावावी त्यांच्याच रक्ताची, मेंदूची अन अवयवांची ! आणि मधेच हटकावे घिरट्या घालणार्‍या कावळ्यांना अन चटावून लाचारपणे तासनतास बसून लाळ गाळणार्‍या कुत्र्यांना !

कधी कधी मौनालाही कुंटणखान्यात नेवून येथेच्छ भोगावं वाटतं, ओरबडावं वाटतं सारं अंग आणि रक्ताळलेल्या जखमांचे पुन्हा-पुन्हा चावे घ्यावे वाटतात.

कधी कधी माझ्याच जाळ्यात मीच गुरफटत जातो. माझ्याच दारात मीच उपरा ठरतो. माझ्याच आरशात मीच अनोळखी असतो.

कधी कधी वाटतं घ्यावी झेप जाती-पातीच्या पलिकडे माणुसकीच्या जंगलात अन तोडू द्यावेत लचके जंगलातील सैतान, पिशाच्च्य आणि चांडाळांना !

अजूनही...अजूनही, रात सरता सरत नाही. अजूनही मनात आहे ते ना ओठांवर येते आहे ना कागदावर उतरत आहे ! अजूनही स्वत:ला शोधण्य़ाच्या हट्टापायी कित्येकदा हरवतोय मी !!

कधी....कधी...अजूनही !!!

-       अनुप

Pen Image

Pen Index