Pen


PEN 7 : लघुकथा २ : चहा, स्वप्नं आणि ईगो

आताशा एकटं रहायची सवय झाली होती...माझ्या फ्लॅटच्या भिंतींना, त्या भिंतीवरच्या जुनाट लंबकाच्या घड्याळाला, त्या घड्याळामागे रहाणार्‍या पालीला, खिडक्यांना, पडद्यांना, किचनला, शेगडीला आणि उंबर्‍यालासुध्दा ! नाईलाजानं मलाही सवय करून घेण्याशिवाय गत्यंतर नव्हतं !! नाहीतर या सर्वांनी एकत्र येवून मला वाळीतच टाकलं असतं. १४ वर्षं झालीयेत आताशा...आम्हां सर्वांना असं गुण्या-गोविंदानं रहायला लागून ! वयाची साठी कधी ओलांडून गेलो या सार्‍या गोतावळ्यात, माझं मलाही उमगत नव्हतं !

३५ वर्षांपूर्वी घर सोडलं आणि भावनेचे-नात्याचे पाशही मग आपोआपच सुटले. इमाने-इतबारे रेल्वेत स्टेशन-मास्तर म्हणून नोकरी केली आणि आता निवृत्ती जीवन जगतोय. सारं सुरळीत सुरू होतं आणि अचानक एका दुपारी भांड्यांचा, लोकांचा आणि सतत उघडल्या आणि बंद होणार्‍या लिफ्टच्या आवाजानं आम्हां सगळ्यांनाच जाग आली. दारावरच्या आय-होल मधून बाहेर नजर टाकली. बाजूच्या फ्लॅटमध्ये एक कुटुंब आपल्या वस्तू आणून ठेवत होतं.

त्या बाजूच्या फ्लॅटची गंमतच आहे. मी तसा पहिलाच व्यक्ती या अपार्टमेंटमध्ये रहायला येणारा. मी आलो तेंव्हा अजून बाथरूमात नळ पण बसवले नव्हते. सुरूवातीच्या कित्येक रात्री वॉचमनसोबत बाहेर शेकोटी पेटवून गप्पा मारण्यात घालवल्यात मी ! मुद्दा हा की...अगदी सुरूवातीपासून पहातोय, या फ्लॅटमधे रहायला आलेल्यांपैकी आजवर कुणीही ६ महिन्यांपेक्षा जास्त टिकलं नव्हतं ! इतकंच काय तर, स्वत: फ्लॅटचे मालकही तीन महिन्यातच राम-राम करून निघून गेले होते.

त्या हौशी आणि उत्साही जोडप्याला बघून माझी मलाच मज्जा वाटली. मनात असाही विचार आला, जावून सांगावं का त्यांना की, बघा...पुन्हा एकदा विचार करा किंवा आत्ताच दुसरी जागा बघा ! पण म्हंटलं, उगाच लोकांचा समज नको व्हायला, “साठी बुध्दी नाठी” आणि तसंही असा अगाऊपणा अंगाशीच येण्याची शक्यता जास्त होती.

अनायसे आता जाग आलीचये तर, चहा घ्यावा असा विचार मनात आला. चूळ भरून किचनच्या दिशेने मोर्चा वळवला. आदण ठेवत असताना विचार डोकावला, बाजूला नवी लोकं आलीयेत..सामान हलवताहेत..त्यांनाही चहा ठेवावा, तेवढीच ओळख होईल, त्यांनाही बरं वाटेल. माझा विचार संपतो न संपतो तोच आमची अप्सरा चुकचुकलीच ! अप्सरा...माझ्या घड्याळामागची पाल !! बरं का, हा माझा विरंगुळा आहे, एकटेपणा जरासा हलका करण्याचा...मी प्रत्येक गोष्टींना, वस्तूंना नाव दिलीयेत ! आत्ताच मी एकीची ओळख करून दिली, तसाच आणखी एक मला आवडणारा माझा सोबती म्हणजे...मित्र ! माझ्या घड्याळाला मी मित्र म्हणतो. का ? कारण तो माझ्या दोन्ही...चांगल्या, वाईट वेळा दाखवतो, दोन्हीमध्ये माझी साथ देतो आणि महत्वाचं म्हणजे...आयुष्याचे १२ वाजताना तो नेहमी मला सावध करतो !

मी दार उघडलं तसं बाजूला उभं राहून बॉलशी खेळणारं त्या जोडप्याचं पिल्लू बावरलं आणि गडबडीनं आत पळालं. मी वाकून आत नजर टाकली. त्या नवरा-बायकोची धांदल सुरू होती. हातातला ट्रे सावरत मी हाक मारली, “हॅलो...”, त्या दोघांनीही चमकून माझ्याकडं पाहिलं.

“हॅलो...मघापासून तुमची धांदल पहातोय. म्हंटलं तुम्ही दमला असाल, अजून किचनमधलं सामान जोडलं नसणार म्हणून चहा घेवून आलो तुमच्यासाठी.”

दोघांच्याही चेहर्‍यावर प्रसन्नता, कुतुहल, आश्चर्य आणि आनंद असं सारं येवून गेलं. समोरची मुलगी, अर्थात त्याची बायको गडबडीनं पुढं झाली आणि तिनं माझ्या हातातून चहाचा ट्रे आपल्या हातात घेतला,

“सॉरी..तुम्हाला आत बोलावलंच नाही ! या ना आत या...”

 नवर्‍यानं गडबडीनं खिशातून रुमाल काढून समोरच्या खुर्चीवरून फिरवला. “या, बसा ना...”

“नमस्कार मी सुधांशू. रिटायर्ड स्टेशन मास्टर”

त्या दोघांनीही हात जोडले, “नमस्कार..मी अमेय आणि ही अपर्णा. She is house-wife & now I’m working as pet-trainer. याअगोदर सर्कसमध्ये रिंग मास्टर म्हणून काम करायचो..आता प्राणीच बॅन झाल्यानं हे काम करतोय !”

“वा...सर्कसमध्ये रिंग मास्टर होतात !”

“हो...लहानपणापासून सर्कसचं आकर्षण होतं. करिअर करेन तर सर्कसमधेच ! असंच ठरवून, सार्‍यांचा रोष पत्करून १० वर्षं काम केलं.”

आम्ही बोलत होतो तोवर अपर्णानं कपात सर्वांसाठीच चहा ओतला.

“अनघा...ये चहा घ्यायला.” अपर्णानं तिच्या ७-८ वर्षांच्या मुलीला हाक मारली.

“आई...बिस्कीट दे ना...” अनघानं तोंड केविलवाणं करत म्हणाली.

“बाळा, नंतर आणू...आपण आत्ताच आलोय कि नै ? कोणत्या डब्यात आहेत ते नंतर शोधून देते.” अपर्णा तिला समजावत म्हणाली.

त्यांचं संभाषण सुरू असताना मी झटकन उठलो आणि माझ्या किचनमध्ये जावून परवाच आणलेली मसाला खारीची २ पाकीटं घेवून आलो. अनघाचा चेहरा खुलला. अपर्णा आणि अमेयला अवघडल्यासारखं झालं होतं.

“तुम्ही खूप करताय सर...” अमेय कळवळीनं म्हणाला

“सर नको...काका, मामा, बाबा कांहीही म्हणा...तुम्हाला योग्य वाटेल ते ! जवळच रहाणार आहोत तर उगाच फॉर्मल वागायला नको. काय?”

ते दोघेही एकमेकाकडं पाहून हसले.

“थॅंक्यू. खूप बरं वाटलं ! आजकाल फ्लॅटमध्ये अशी आपुलकी नाही पहायला मिळत.”

त्यानंतर बराच वेळ आमच्या गप्पा रंगल्या. अमेयचे सर्कसचे अनुभव, मंदीचा काळ, नव्या कामासाठीचा संघर्ष, त्यांच्या पहिल्या अपत्याचा सर्कसच्या तंबूमधला मृत्यू, अपर्णाची साथ वगैरे वगैरे गप्पा सुरू होत्या पण, यासर्वात अपर्णाचा मात्र खूप कमी सहभाग होता. खूप कमी बोलत होती ती. त्याऐवजी तिचं अनघाकडं बारीक लक्ष होतं आणि ते साहजिकच आहे म्हणा...पहिल्या अपत्याच्या मृत्यूनंतर अपर्णा जास्त पझेसिव्ह झाली होती अनघाच्याबाबतीत ! गप्पा मारत मीही त्यांना सामान लावायला मदत करू लागलो. सुरूवातीला बावरलेली अनघा नंतर मात्र, “आजोबा...आजोबा...” करत माझ्या मागे मागे करू लागली होती. रात्री ९ च्या दरम्यान बर्‍यापैकी सामान लावून झालं तेंव्हा अनघा माझ्या खांद्यावर मान टाकून झोपी गेली होती ! खरं सांगू...खूप गोड ओझं होतं ते ! नकळत माझ्या पापण्यांआड लपवलेला कित्येक वर्षांपूर्वीचा पाण्याचा थेंब बाहेर पडू पहाण्याचे धाडस करू पहात होता पण, चार पावसाळे मी जादा पाहिलेत याचा त्या बेट्याला अनुभव नसावा ! पटाईत अभिनेत्याप्रमाणं एक पाचकळ विनोद मारून त्यावर हसतोय असं दाखवून, “बापरे आज खूप हसलो...पाणी येतंय डोळ्यातून..” असं म्हणून त्याच्यावर मात केली होती.

अपर्णानं मला घरी जेवायला जावू दिलं नव्हतं. एव्हाना त्या दोघांना एवढं कळालं होतं की, मी एकटाच रहातो म्हणून ! अपर्णानंही एवढ्या कमी वेळात खूप आपलंसं करून घेतलं होतं. तिनं पानं घेतल्यावर मारलेली हाक, “बाबा...चला जेवायला...” मी आजन्म विसरणार नाही ! आम्ही एकाच कुटुंबातील असल्याप्रमाणं किंवा खूप वर्षं ओळखत असल्याप्रमाणं एकमेकांसोबत वागत होतो. खरं सांगायचं तर, एका चहाच्या कपानं हि किमया साधली होती. तसं पहाता, मी चहा ऑफर केला नसता तर

 कांहीच फरक पडला नसता. पण म्हणतात ना, नातं तयार करायला कधी कधी आपण स्वत:हून पुढाकार घ्यावा लागतो. इथं जर, “मीच का पहिल्यांदा..?” असा ईगो आणला तर मग संपलंच सगळं ! बरीचशी नाती याच ईगोपायी संपून जातात आणि मग कधी मागे पडतात, ते आपलं आपल्याच उमगत नाही ! आणि शेवटी उरतो तो एकांतवास...कायमचा !

अंथरूणात पडून २ तास उलटले तरी झोप येत नव्हती. छतावरती सतत एक चेहरा दिसत होता..अस्पष्ट, धुसर ! माझं वय वाढलं होतं...तिचंही वय वाढलं असणार पण तरी आजही ती, तेंव्हा होती तशीच माझ्या नजरेसमोर उभी होती...त्या मोरपंखी साडीमधील तिची छबी ! नकळत पाण्याचा टपोरा थेंब गालावरून ओघळला आणि ओठांतून अस्पष्ट हाक बाहेर पडली, “नेहा...”

मधमाशांच्या पोळ्यावर दगड मारल्यावर जशी त्या माशांची फौज तुटून पडावी तशा तिच्या सोबतच्या आठवणी माझ्यावर तुटून पडल्या...अगदी कॉलेजपासूनच्या ! मला आठवतंय, मी तिला पहिल्यांदा एडमिशनच्या रांगेत पाहिलं होतं. एका सरांच्या ओळखीने रांग सोडून सरळ खिडकीशी जावून ती फॉर्म-पैसे भरून निघून गेली होती ! तेंव्हा किती राग आला होता तिचा !! पण आज, याच आठवणीमुळं चेहर्‍यावर प्रसन्नता आली होती. ऊर भरून येवू लागला होता. पापणीमागे पाण्याचे थेंब शिस्तीने-ओळीत उभे असल्याचं जाणवत होतं !

मित्राने बारा वाजत असल्याचा ईशारा केला आणि अस्वस्थ होवून मी खिडकीशी जावून उभा राहिलो. मी तिला प्रिंसेस म्हणायचो...प्रिंसेस ! होतीच ती तशी राजकुमारीसारखी...अल्लड, नाजूक, हुशार, समंजस, प्रेमळ, मनमिळावू !! इतकी चांगली मुलगी माझ्यासारख्या मुलाच्या प्रेमात कशी काय पडली..हे कोडं तेंव्हाही पडलं आणि आजही ते मी उकलू शकलो नाहीये ! असो...

बघता-बघता वर्षं सरली. तिचं करिअर आकार घेवू लागलं होतं. आणि मी मात्र होतो तसाच होतो...! वय निघून चाललं होतं...लग्न करूया म्हणून ती अक्षरश: विनवणी करत होती आणि मी मात्र माझी स्वप्नं पूर्ण करण्यात गुंतलो होतो. एका गोष्टीचा तेंव्हा विसर पडला होता, तो म्हणजे-शिखरावर पोहोचल्यावर आपलीच हक्काची लोकं सोबत नसतील तर शिखरावर पोहोचल्याचा आनंद मी कुणासोबत शेअर करणार होतो ?

अखेर व्हायचं तेच झालं...तिचं लग्न झालं आणि जी मुलगी माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग होती, तिच आज माझ्यासाठी परकी झाली होती ! मला आठवतंय, तिच्या लग्नानंतर वर्ष-दिड वर्षानंतर ती माझ्या समोर आली होती. ईगो जागा झाला आणि म्हणाला, “तुला कांहीच फरक पडला नाही असं दाखव...मान फिरव आणि निघून जा...” मी इमाने-इतबारे केलंही तसंच ! मात्र ती सल आजही मला स्वस्थपणे झोपू देत नाही...! बर्‍याचदा विचार आला, तिची माफी मागूया...तिचं बाळ खूप छान आहे असं सांगूया...पण धाडस झालं नाही ! आणि तसंही, तिनंच मला तिच्या शब्दात बांधून ठेवलं होतं की, मी स्वत:हून कधी तिला फोन, मेसेज करणार नाही किंवा स्वत:हून भेटण्याचाही प्रयत्न करणार नाही !

आम्ही ठरवलं होतं...आंम्हाला मुलगी झाली की, तिचं नाव अनघाच ठेवायचं ! आज अनघाला खांद्यावर घेवून झोपवताना मनात माजलेला कल्लोळ मोठ्या मुश्किलीनं लपवला होता मी ! आज त्या छोट्या बाळासोबत, अनघासोबत एका वेगळ्याच नात्यानं बांधला गेलो होतो मी !

पहाटेचे ५.३० कधी वाजले तेच समजलं नव्हतं ! अखेर, स्टेशन मास्टर म्हणून रिटायर्ड झालो होतो आणि एकटा जगत होतो हेच सत्य होतं. नेहमीप्रमाणं फिरायला जायला तयार झालो. पायात शूज घालून बाहेर पडलो आणि अचानक बाजूच्या फ्लॅटमधून मुसमूसण्याचा आवाज येवू लागला. मी त्या दिशेनं पाहिलं, दार पुढ लोटलं होतं. आतल्या लाईटचा प्रकाश बाहेर येत होता. मी दारावर नॉक करून दरवाजा ढकलला. बाजूच्या भिंतीला टेकून अपर्णा रडत बसली होती. मला दारात बघून तिला हुंदका फुटला. मी गडबडीनं तिच्या दिशेनं गेलो, “बाळा, काय झालं ?” अपर्णा रडू लागली आणि तिनं तिच्याबद्दल मला सांगितलं. प्राण्यांची मूक भाषा समजून घेणारा अमेय, आपल्या पत्नीला, आई-वडिलांना मात्र समजून घेवू शकत नव्हता. केवढा मोठा विरोधाभास !  अमेय तिच्याशी भांडून खाली बागेत फिरायला गेला होता. तिची बाजू ऐकून, अमेयशी बोलायचं प्रॉमिस करून तिच्या शेजारून उठलो आणि अस्वस्थ मनानं पायर्‍या उतरू लागलो.

बागेत एका कट्ट्यावर अमेय शून्यात नजर लावून बसला होता. त्याच्या शेजारी जावून बसलो. माझ्या अचानक येण्यानं त्याची तंद्री भंगली. आम्ही दोघांनाही एकमेकाकडं पाहिलं आणि कसंनुसं हसलो. काय बोलायचं दोघांनाही सुचत नव्हतं. मनाचा हिय्या करून, ईगोला बाजूला सारून मीच सुरूवात केली, “मला माझ्या आवडत्या व्यक्तिसोबत संसार करायचा होता. माझ्या आयुष्यातला प्रत्येक क्षण तिच्यासोबत शेअर करायचा होता पण, वास्तव काय आहे ? मी एकटा आहे. कारण माहितीये तुला ? कारण मी माझ्या स्वप्नांना आणि ईगोला अवाजवी महत्व दिलं ! जनरली आपण तेच करतो !! आपल्याला आपल्या प्रिय व्यक्तिची तेंव्हाच किंमत कळते जेंव्हा ती आपल्याला सोडून देते. तुझ्यावर ती वेळ येवू देवू नको. एकाकीपणा खूप भयानक असतो अमेय. आपल्या दोघांत आणि दोघांच्या व्यवसायात थोडासा फरक आणि बरंच साम्य आहे !”

“ते कसं काय?” बराच वेळ गप्प असणार्‍या अमेयनं विचारलं.

“आहे. ऐक..रिंग मास्टर ईज हू, ट्रेन्स दि माईण्ड्स एण्ड स्टेशन मास्टर ईज हू, माईण्ड्स दी ट्रेन्स बट वुई बोथ फेल्स टू अंडरस्टॅण्ड ट्रेण्ड्स.” (Ring Master is who, ‘Trains’ the ‘Minds’ & Station Master is who, ‘Minds the ‘Train’, but we both fails to understand ‘Trends’)

मी त्याच्या खांद्यावर थोपाटलं, स्मित केलं आणि उठून चालू लागलो. कांही क्षणात त्याची पावलं जिन्याच्या दिशेने पळत जाताना ऐकू आली. मनात समाधान आणि कळ उठली. समाधान एवढ्यासाठी की...मी एका जोडप्याला सावरू शकलो आणि कळ एवढ्यासाठीच की, हे शहाणपण मला खूप वेळानं उमगलं होतं...ज्यासाठी मला माझ्या आयुष्यातील सर्वात प्रिय व्यक्तिला गमवावं लागलं होतं !

 

-       अनुप

 

Pen Image

Pen Index