Pen


PEN 8 : लघुकथा ३ : लेट-लतिफ

आकाश आज पहाटेच दिल्लीहून परतला होता. दिवसभर मिटींग, रात्री उशीरा एअरपोर्टवर वेटिंग लॉंजमधे २ तास वाट पाहून आणि मग प्रवास या सार्‍यानं थकलेल्या आकाशला अंथरूणात पडल्या-पडल्याच गाढ झोप लागली होती. आकाश...माय हबी...माझा लाडका नवरा. नेहमीप्रमाणं चहा उकळायला ठेवून मी त्याला हाक मारायला आले होते. सकाळचा चहा त्याला सोडून पिलेलं त्याला अजिबात आवडत नव्हतं. आणि मलाही तो घरात असताना त्याला सोडून चहा घेणं जीवावरच आलं होतं. मी दबक्या पावलांनी त्याच्या शेजारी जावून बसले. त्याच्या कानाजवळ माझा चेहरा नेवून त्याला हाक मारली, “आकाश...ये आकाश...”, त्याला गाढ झोप लागली होती. त्याच्या केसांवरून आणि गालांवरून हात फिरवून मी स्वत:शीच पुटपुटले, “हॅपी बर्थ डे डिअरेस्ट हबी...”

डायनिंग टेबलवर बसून चहाचे घोट घेत असताना आकाशला कांहीतरी सरप्राईज द्यावं असं वाटू लागलं. “काय देता येईल बरं?” हा प्रश्न मी त्या पाच मिनीटांत स्वत:ला कितीतरी वेळा विचारला होता. आकाश, माझ्या आयुष्याला पडलेलं सर्वात सुंदर स्वप्न. त्याच्या इतका समजूतदार जीवनसाथी मिळेल अशी कल्पनाच केली नव्हती मी ! एकच्युअली आय एम दी लकीयेस्ट गर्ल...असं म्हणून मी स्वत:चंच कौतुक केलं. आमच्या लग्नाला दोन वर्षं झाली होती. एकमेकांच्या सवयी, आवडी-निवडी, चिडाचिड हे सारं सवयीचं आणि आमच्या जगण्याचा अविभाज्य भाग बनून गेलं होतं.

आकाश एका मल्टिनॅशनल पी.आर. कंपनीत एक्झिक्युटिव्ह कन्सलटंट म्हणून काम करत होता. बर्‍याच मोठ-मोठ्या कंपण्यांचा पी.आर.सांभाळण्याची, तो डिझाईन करण्याची आणि ते एक्झिक्युट करण्याची जबाबदारी त्याच्यावर असायची. त्यामुळं तो महिन्यातील २०-२२ दिवस बाहेरच असायचा. पण उरलेले दिवस मात्र माझ्या मिठीत तो कैद असायचा ! तो घरी असला की, अगदी लहान मुलासारखा वागायचा...खूप हट्टीपणा करायचा. तूच भरव...चल कॅरम खेळूया...बस ना थोडा वेळ बोलत, होवू दे जेवायला उशीर...अशी त्याची वाक्यं ठरलेली असायची. माझ्या मांडीवर डोकं ठेवून तो तासनतास पुस्तक वाचत पडायचा. त्याचा विरंगुळा व्हायचा आणि मला मात्र शिक्षा ! खूप प्रेम करायचा माझ्यावर...

सॉरी, मी माझी ओळखच करून दिली नाही ! मी रक्षा. एम.बी.ए. करायचं स्वप्न होतं पण अखेर एम.ए. करून त्यावरच समाधान मानावं लागलं होतं. लग्नानंतर आकाश घरी नसताना वेळ घालवण्यासाठी मी यु-ट्युबवरचे व्हिडीओ पहात बसायचे आणि नंतर मग आपण स्वत:च का एक यु-ट्युब चॅनल काढू नये ? असा विचार मनात आला. आकाशला याबद्दल विचारलं. तेंव्हा तो नेमका जपानमध्ये होता. त्यानं त्यावर रिसर्च कर, खर्चाचा अंदाज तयार कर म्हणून सांगितलं आणि येताना तो सरप्राईज म्हणून एक चांगला व्हिडीओ शूटींग कॅमेरा घेवून आला.

सार्‍या गोष्टींची तयारी तर केली होती पण मूळ प्रश्न हा होता की, कोणता विषय निवडायचा ? माझ्यातील स्त्री-सुलभ स्वभाव जागा झाला आणि कुकरी शो पण वेगळ्या पध्दतीने तयार करण्याची कल्पना आली. शहरातील हॉटेल्स, टपर्‍या, रेस्टॉरंट्स यांना भेटी देवून त्यांच्या सिग्नेचर डिशेश दाखवायची कल्पना मी आकाशला बोलून दाखवली. त्यालाही ते आवडलं आणि एका होतकरू मुलाला ज्याला शूटींग, एडिटींग येत होतं त्याला माझ्यासोबत जोडून दिलं. कॉलेजमधे शिकत-शिकत काम करणारा राहुल खूप मनापासून काम करायचा. नवीन नवीन कल्पना सुचवायचा, एडिटींग, शूटींगमध्ये नाविन्य देण्याचा प्रयत्न करायचा. “दिदी...आपण असं करूया का?”, “दिदी, याचं एडिट असं करूया का?” म्हणून प्रयोग करायचा. खरं सांगायचं तर त्या बिचार्‍याच्या मेहनतीमुळेच आमचं चॅनेल बघता-बघता लोकप्रिय झालं होतं. आमच्या चॅनेलची दखल एका नॅशनल न्यूज चॅनेलनेही घेतली होती !

 कामाचा पसारा खूप वाढला होता. महिन्यातील २०-२२ दिवस काम आणि उरलेले दिवस आकाशसाठी, असं माझं शेड्यूल ठरून गेलं होतं. तोही उरलेले दिवस फक्त माझ्यासाठीच राखून ठेवायचा. दोघंही आम्ही खूप खूष होतो. इतर कोणत्याच गोष्टी आठवायला इव्हन माहेरी जायचा विचारही मनात येत नव्हता. हे आमच्या दोघांचं जग होतं !

एव्हाना कपातील चहा संपून बराच वेळ झाला होता. मी कपात नजर टाकली. चहा पाऊडर तळाला घट्ट होवून बसली होती. मी स्वत:वर पिचपिचले आणि सिंकमध्ये तो कप चहाच्या भांड्यात पाणी मारून ठेवला. पुन्हा एकदा खोलीच्या दिशेनं जावून आत डोकावून पाहिलं. आकाश चक्क घोरत होता. मला हसू येवू लागलं. जीन्सच्या खिशात हात घालून मी मोबाईल हातात घेतला आणि त्याचं शूटींग करू लागले. मोठ्या मुश्किलीनं मी स्वत:चं हसू आवरलं होतं. हॉलमध्ये आले आणि माझ्या हसण्याला वाट करून दिली. “काय घ्यावं बरं सरप्राईज म्हणून ?”

घरातच विचार करत बसण्यात अर्थ नव्हता. गडबडीने उठले. ड्रेसिंग रूममध्ये जावून टी-शर्ट काढला आणि मरून कलरचा कुर्ता चढवून, घराबाहेर पडले. निघताना आकाशला दिसेल अशी एक चिठ्ठी लावली,

“एका मिटींगसाठी निघालीये, ११ पर्यंत पोहोचते. कांही आणायचं असेल तर कॉल कर. लव्ह यू, रक्षा”

मी त्यावर मुद्दामच त्याला विश नव्हतं केलं. माझ्या या हुशारीचं राहून-राहून मलाच कौतुक वाटत होतं. आणि पोटात उकळ्या फुटत होत्या.

“ओके...एक बुके, एक चॉकलेट आणि...अं...?” गाडीवर बसता-बसताच माझा विचार सुरू झाला. गेटमधून गाडी बाहेर घेत असतानाच मला राहुलची आठवण झाली. “अरे हो ! याला तर विसरूनच गेले...!!!”

गडबडीने मी फोन घेवून राहुलला फोन लावला.

“हां, बोल ना दिदी...”

“राहुल बाळा, बिझीयेस ?”

“नाही गं बोल ना...? काम आहे का ? येवू का?”

“अरे हो, ऐकून तरी घे...! आज की नै, आकाशचा बर्थ डे आहे...”

“अरे व्वा...सॉरी मला माहित नव्हतं ! मी करतो सरांना फोन...”

“ये शहाण्या नको...! अरे मला त्याला सरप्राईज द्यायचंय. पण काय देवू ? तेच कळत नाहीये. म्हणून तुला फोन केला. सुचव ना कांहीतरी...”

“अं....शर्ट..?”

“नको..खूपयेत.”

“मग, परफ्युम?”

“त्याला एलर्जीये..”

“मग शूज?”

“वेड्या शूज कुणी देतं का?”

“पेन?”

“ढीग आहेत त्याच्याकडं आणि तो शहाणा रेनॉल्डशिवाय कुठलाच वापरत नाही...”

“घड्याळ...?”

“अं..? नको...”

“दिदी...एक काम कर...तूच ठरव..आणि तूच सांग....”

“अरे...वैतागतोयेस का..?”

 “नाहीतर काय ! सगळंच राहू दे...तात्पुरता एक पेस्ट्री केक घे आणि जा. नंतर संध्याकाळी कांहीतरी प्लॅन करतो मी...”

“हां....हे बेस्ट आहे. तसंही त्याला पेस्ट्रीज खूप आवडतात...! पण, संध्याकाळचं लक्षात ठेव हं, नाहीतर माझा पचका करशील !”

“हो गं दिदी...! ठेवू आता ? बाय”

“बाय...”

खूष होवून मी गाडी केक शॉपच्या दिशेनं वळवली. रस्त्यात एक बुके शॉप लागलं. ठरवल्याप्रमाणं एक छानसा नाजूक बुके आणि एक लाल गुलाबाचं फुल घेतलं. बाजूलाच असणार्‍या सुपरमार्केट मधून एक मस्त चॉकलेट घेतलं. तसं त्याला चॉकलेट आवडत नाही, हे माहिती होतं मला पण, त्याच्या वाढदिवसाच्या नावाखाली माझी हौस भागवून घ्यायला काय हरकत आहे ? असं म्हणून स्वत:वरच खूष होत, माझ्या आवडीचं चॉकलेट मी खरेदी केलं. गाडी पेस्ट्री शॉपसमोर उभी केली. तिथल्या सगळ्या रॅक्सवरून नजर फिरवली आणि चॉकलेट-पायनापल केक पॅक करायला सांगितला. ते पॅक करत असताना, समोरच्या आरशात उगाच स्वत:ला न्याहाळत, केस ठिक करत उभी होते आणि-

            ...आणि अचानक माझ्या हृदयानं जोरजोरानं धडधडायला सुरू केलं. मला सारंच ऐकू येणं बंद झालं. कांही सुचेनासं झालं ! “मॅडम...हा घ्या केक. ८००/- रुपये” मी गडबडीने पर्समधून पैसे काढले. काऊंटरवर पैसे ठेवले, “केक फ्रिजरमधे ठेवा...आलेच मी !” धडधडत्या मनानं मी बाहेर आले. आजूबाजूला नजर टाकली. एक मध्यम देहयष्टीचा तरुण बाजूच्या वळणाड नाहिसा होत होता. गडबडीनं गाडीवर बसले. स्टार्टर दाबला आणि नेमकं हिंदी चित्रपटातील प्रसंगाप्रमाणं स्टार्टर लागतच नव्हता. का कुणास ठाऊक पण भीति वाटत होती, पोटात गोळा उठत होता, मानेवरून घामाचा ओघळ पाठीवर सरकत होता. वेळ निघून चालला होता. “दादा प्लिज किक मारून द्याल..?” दुकानात नजर टाकून मी केक दुकानाच्या मालकाला विनंती केली. त्यानं पुढं होवून गाडी सुरू करून दिली. “थॅंक्यू...” असं कसंबसं म्हणून मी गाडीवर बसले आणि त्या वळणाच्या दिशेने जावू लागले. वळणाच्या बाजूला असलेल्या रोशनचाचाच्या टपरीवर तो तरूण चहा आणि सिगारेट पित उभा होता. त्याला सिगारेट पिताना पाहून मला माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. रोशनचाचांचं माझ्याकडं लक्ष गेलं.

“रक्षा बिटीया...आज कैसे आना हुआ? कहीं सुटींग चल रहा है क्या?”

त्या तरुणानं सुरूवातीला अनोळखी व्यक्तिला पहावं तसं माझ्याकडं वळून पाहिलं आणि पुन्हा मान फिरवून सिगारेटचा झुरका मारू लागला. आणि मग कांही क्षणांनी झटकन मान फिरवून तो माझ्याकडं पाहू लागला. त्याच्या हातातून सिगारेट गळून पडली. त्याच्या चेहर्‍यावर ओळखीचं स्मित पसरलं.

            तो माझ्याजवळ आला. तो अक्षरश: थरथरत होता. त्याच्या नजरेत पाणी होतं. माझीही त्याच्यापेक्षा वेगळी अवस्था नव्हती. काय बोलावं? कसं रिएक्ट व्हावं? कांहीच कळत नव्हतं. दोघं हसलो. आपापल्या नजरेतलं पाणी टिपून घेतलं. चाचा आश्चर्यानं पहात होते.

“चाचा, ये मेरा बचपन का दोस्त...काफी सालों बाद मिला है..!”

चाचा पण मग कौतुकानं पाहू लागले.

“कशीयेस रक्षा ?”

कित्येक वर्षांनंतर त्याच्या तोंडातून माझं नाव ऐकून अंगावर शहारा आला.

“छान. तू कसायेस ? इथं काय करतोयेस ?”

“मीही मजेत आहे. माझ्या नाटकाचा प्रयोग आहे आज रात्री इथं...”

 “क्या बात है ! म्हणजे तू तुझं पॅशन जपलंयेस तर !!”

“त्याशिवाय दुसरं कांही करू शकेन असं वाटत नाही मला. तू इथं?”

“अरे, इथंच रहाते मी !”

त्यानंतर बराच वेळ मौन. ती शांतता त्रास देत होती.

“बाकी?” दोघं एकदम म्हणालो. हसलोही एकदमच.

“लग्न केलंस की नाही ?”

“नाही अजून !”

“का?”

“जिच्यासाठी कविता लिहावी अशी कुणी भेटलीच नाही !”

“त्याला कविता नाही...महाकाव्य म्हणतात !” मी त्याला चिडवत खोचकपणे म्हणाले.

“लक्षात आहे तुझ्या?”

“विसरेन असं वाटलं?”

“नाही म्हंटलं...१०-१२ वर्षं उलटून गेलीयेत !”

पुन्हा मौन.

“असेल वेळ तर ये ना शो पहायला...पास देतो तुला.”

“पासची गरज नाही पण बघते. आकाशचं...आय मीन माझ्या नवर्‍याचं काय प्लॅनिंग आहे..., अरे आज त्याचा वाढदिवस आहे.”

“ग्रेट. शुभेच्छा. ओळख नाही...तरिही !”

पुन्हा मौन.

“चल मग...भेटू पुन्हा कधीतरी...” असं म्हणून तो वळला. तो वळल्याबरोबर मनात एक कळ उमटली.

“पियूष...” माझी हाक ऐकून तो झटकन वळला. “मी नक्की येण्याचा प्रयत्न करेन.”

त्याच्या चेहर्‍यावर स्माईल होती.

“६ ला शो सुरू होईल.” तो मान वळवून चालू लागला. मीही गाडी सुरू केली आणि केक शॉपच्या दुकानात आले. घरी येवूपर्यंत मनात पियूषचा विचार सुरू होता.

            पियूष...माझा पहिला मित्र...! पहिलं प्रेम ? माहित नाही...ते प्रेम होतं की नाही. पाचवीपासून आम्ही एकत्र होतो. दोघं एकाच एरियात रहायचो. त्यामुळं ओळख झाली. नंतर नंतर परिक्षेच्या दरम्यान तो माझ्या घरी किंवा मी त्याच्या घरी अभ्यासाला जायचे. १० वीचं पूर्ण वर्ष आम्ही एकत्रच अभ्यास केला होता. दोघांमध्ये स्पर्धा असायची. त्याला ६५% च्यावर कधी मार्क पडले नाहीत ती गोष्ट वेगळी ! ८ वी ला आम्ही एकत्र त्याच्या सायकलवरून जायचो. ९वीला बाबांनी मलाही सायकल घेवून दिली. मग एकत्र जायचो आणि यायचो. याची एक खूप वाईट सवय होती. घरातून पियूषचा पायच लवकर निघायचा नाही. सतत प्रार्थनेला १० मिनीटं कमी असली की हा निघायचा. त्याच्यामुळं मलाही रोज ओरडा खावा लागायचा. “लेट लतीफ जोडी” म्हणून शिक्षकांनी आणि इतर मुलांनीही आमचं नाव पाडलं होतं.

“लेट लतीफ..” मी स्वत:शीच पुटपुटले.

            ११वीला असताना आम्ही घर बदललं आणि कॉलेजच्या जवळच रहायला आलो. १२वी च्या उद्देशानं बाबांनी घर जवळ घेतलं होतं. वेळ वाया जावू नये, अभ्यासाला, लायब्ररीला वेळ मिळावा, प्रश्नपत्रिका सोडवून शिक्षकांना दाखवता याव्या वगैरे वगैरे. त्यामुळं पियूष आता एकटाच यायचा. त्याची लेट यायची सवय मात्र अजूनही सुटली नव्हती. माहित नाही का पण, पियूषपासून लांब गेल्यानंतर मला त्याच्याबद्दल ओढ वाटू लागली होती. तोवर मी त्याला ग्रांटेड घ्यायचे. “हा नेहमी सोबत असणार !” पण दुरावल्यानंतर मला त्याची किंमत कळू लागली होती. मला आत्ता कळायला लागलं होतं, मी अभ्यास

 स्वत:साठी करतच नव्हते. मी त्याला दाखवायला अभ्यास करायचे. मी न सांगता त्याला माझे प्रॉब्लेम्स कळायचे. आजारी असले की तो, मी न सांगता औषधं..व्हिक्सच्या गोळ्या वगैरे घेवून यायचा. मी आजारी असले की दिवसातून २-२ फेर्‍या शाळेतून घरी मारायचा. प्रत्येक ब्रेकला हा घरी धापा टाकत यायचा आणि म्हणायचा, “रक्ष्ये...टेन्शन नको घेवू ! जास्त कांही शिकवलेलं नाही मागच्या दोन तासाला...तू निवांत विश्रांती घे...” पुन्हा शाळेत जायचा आणि ओरडा खायचा.

            लहानपणापासून पियूषला नाटकांची आवड होती. शिक्षकांनी विचारलं, “मोठा होवून काय करणार...?” तर याचं उत्तर ठरलेलं असायचं..”मी नाटकात काम करणार.” आज याच गोष्टीचं समाधान वाटत होतं, जे त्यानं ठरवलं होतं, तेच तो आजही करत होता. अशी खूप कमी लोकं असतात जी आपलं स्वप्न घेवून त्या स्वप्नाच्या जगातच जगत असतात ! नाहीतर आमच्यासारखी कित्येक लोकं जी ठरवतात एक आणि करतात दुसरंच ! अशा लोकांची कमी नाही. पण पियूषसारखी विरळच !! ११ वी च्या डिसेंबर महिन्यात कंपनीनं वडिलांची तडकाफडकी प्रमोशनवर बदली केली होती. अचानक रातोरात सारं सोडून जावं लागणार होतं. रात्री पियूषला फोन केला. त्याच्याशी बोलून खूप रडले. दुसरे दिवशी कॉलेजमध्ये सार्‍यांचा निरोप घ्यायला जाणार होते. पियूषलाही आठवणीनं यायला सांगितलं. त्यानंतर रात्रभर बसून त्याच्यासाठी एक चिठ्ठी लिहीली, ज्यात मी माझ्या, त्याच्यासाठीच्या असणार्‍या सार्‍या भावना लिहून काढल्या होत्या आणि भविष्यात सेटल झाल्यावर त्याच्यासोबतच लग्न करून आयुष्य व्यतीत करण्याची ईच्छा लिहीली होती.

            दुसरे दिवशी मी गेटमध्येच थांबून त्याची वाट पहात होते. खरं तर सारे शिक्षक, प्रिन्सीपॉल, मित्र-मैत्रिणी सार्‍यांना भेटून निरोप घ्यायचं ठरवलं होतं पण माझी आत जायची ईच्छाच झाली नाही. मला माहित होतं, आमचा लेट लतीफ कधीच आपल्या नावाला बट्टा लावणार नाही ! म्हणून गेटमध्येच मी थांबून होते. तास-दोन तास झाले पण पियूष आलाच नाही. रडत चिठ्ठी फाडून टाकली आणि मागे न पहाताच मी घर गाठलं. १२ वर्षं होत आली होती. आणि आज अचानक तो माझ्या समोर उभा होता.

            घरी आले. बेल वाजवण्यापूर्वीच आकाशनं दार उघडलं. तो प्रसन्न चेहर्‍यानं माझ्याकडं पहात होता. माझ्या हातातील केक, बुके, चॉकलेट पाहून तो खूष झाला पण, माझ्याकडं पाहून त्याच्या कपाळावर आठी पसरली. त्याला पाहून मला हुंदका फुटला आणि कांही कळायच्या आत मी त्याच्या मिठीत शिरले. त्यानंतर बराच वेळ त्याला घट्ट मिठी मारून मी रडत होते. तो मला सावरत होता. त्यानं कारण विचारलं आणि कोणताही आडपडदा न ठेवता त्याला मी सारं सांगून टाकलं. आकाश खूपच वेगळ्या पध्दतीनं रिएक्ट झाला.

“अरे, मला तर त्याचे आभार मानायला हवेत...तो त्या दिवशी आला नाही म्हणून तर मला तू मिळालीस !”

त्याच्या उत्तरावर मला त्याचा खूप अभिमान वाटला. त्या दिवशी दुपारी जेवणापूर्वी आकाश बाहेरून आला. त्याच्या हातात पियूषच्या नाटकाच्या शोची दोन तिकीटं होती. मी नको म्हणत होते.

“हे बघ, रक्षा...! तो भूतकाळ होता आणि तसंही, तू त्याच्यावर प्रेम करतेस हे त्याला तरी कुठं माहित होतं? त्यानं मुद्दाम नक्कीच असं केलं नसणार ना? त्याची बाजू माहिती आहे, तो का आला नाही त्या दिवशी? आणि तसंही तुम्ही खूप चांगले मित्र होता...हे नको विसरू. तुझा मित्र आज त्याचं स्वप्न जगतोय...त्याला प्रोत्साहन देणं तुझं कर्तव्य नाही का ? तो तुला देत होताच की नै प्रोत्साहन ? मग ?? आता तुझी पाळी...”

            त्या संध्याकाळी आवरून बाहेर पडायला आम्हांला वेळ झालाच. आम्ही थिएटरमध्ये गेलो तेंव्हा शो सुरू झाला होता. पियूषनं खूपच सुंदर अभिनय केला. लोकांनी त्याच्या प्रत्येक संवादावर टाळ्या वाजवून त्याला दाद दिली. त्याला मंचावर पाहून अभिमान वाटत होता. नाकट संपलं. मागे विंगेत पियूषभोवती प्रचंड गर्दी झाली होती. मी आणि आकाश दूरून पहात होतो. बर्‍याच वेळानं त्याचं माझ्याकडं लक्ष गेलं. तो गडबडीनं पुढं झाला. मी कांही बोलण्या अगोदरच त्यानं आकाशचं अभिनंदन केलं. त्याला कसं कळालं होतं कुणास ठाऊक की, हाच आकाश आहे ते ! तो आम्हांला मेक-अप रूममध्ये घेवून गेला. तिथं १५-२० मिनीटं गप्पा मारल्या. चहा घेतला.

“चला, निघतो आम्ही...तुम्हांलाही आवरायचं असेल ना? नाहीतर एक काम करू...आपण एकत्रच डिनर घेवू..व्हॉट से..?” आकाश उत्साहानं म्हणाला

“मला आवडलं असतं पण, टिम आहे सोबत ! तसं मी एकट्यानं येणं बरोबर नाही वाटणार. पण नेक्स्ट टाईम कधी आलो तर नक्की जावू...”

“ईट्स अ डिल..” आकाश.

त्यानं माझ्याकडं नजर टाकली मी खाली मान घालून बसले होते. त्यानं माझा खांदा थोपाटला आणि म्हणाला, “रक्षा..तू बोलून ये बाहेर...मला एक-दोन फोन करायचेत ! बरेच फोन येवून गेलेत शो दरम्यान...सो, मी आहे बाहेर..”

तो उठून निघून गेला. मला आणि पियूषला खूप अवघडल्यासारखं झालं होतं. दोघां मधे मौनाचा अडसर पुन्हा उभा होता.

“निघते मी..” काय बोलावं हे न उमगल्यानं मी बोलून गेले आणि उभी राहिले.

“ठिक आहे. काळजी घे...” मला थांबण्याची गळ न घालताच किंवा इतर कांहीच न बोलता तो म्हणाला. मी वळले. दारापर्यंत गेले आणि थांबले. पुन्हा त्याच्या दिशेनं वळले,

“पियूष...त्या दिवशी रात्री मी तुला फोन करून शेवटचं भेटायला बोलावलं होतं. मला तुझ्याशी बोलायचं होतं. पण, पण तू आलाच नाहीस. का?”

“कोण म्हणालं, मी आलो नव्हतो म्हणून?”

“कोण कशाला म्हणायला हवं..? मी दोन तास गेटमध्ये थांबले होते ! पण तू तर लेट लतीफ...वेळाने आला असणार ! तुला वेळेची किंमतच नव्हती. मला त्या दिवशी तुला एक चिठ्ठी द्यायची होती. तुझी वाट पाहिली आणि फाडून तिथेच गेटमध्ये टाकून दिली. तू आलाच नाहीस !”

“मलाही तुला एक चिठ्ठी द्यायची होती !” असं म्हणून आपल्या बॅगेतून त्यानं एक घडी घालून ठेवलेली, जीर्ण झालेली चिठ्ठी बाहेर काढली. त्याकडं पहात तो म्हणाला, “यावरची अक्षरं आता जीर्ण झालीयेत...त्यांची आता कांहीच किंमत नाहीये !”

माझा श्वास जडावू लागला होता. तो पुढे म्हणाला, “लेट लतीफ असलो तरी त्या दिवशी मी खूप लवकर आलो होतो...मला माहित होतं तू लवकर येवून वाचत बसतेस. ९ वाजल्यापासून ६ पर्यंत मी वर्गात बसून होतो..पण, तू वर्गात आलीच नाहीस रक्षा....!!!”

त्याचं बोलणं ऐकून मला माझ्या पायाखालची जमिन सरकल्याचा भास झाला. सारं जग माझ्याभोवती फिरतंय की काय असं वाटू लागलं. मला हुंदका फुटला. त्याच्याही नजरेत पाणी होतं. माझं मलाच अपराधी वाटू लागलं. एक क्षणही तिथं थांबणं जड जावू लागलं. डोळ्यातील पाण्याला वाट करून देत मी मान फिरवून बाहेर पडले. वाटत होतं, एकदा...फक्त एकदा फियूषनं,  “ये रक्ष्ये...” म्हणून हाक मारावी...फक्त एकदा ! पण त्यानं हाक मारलीच नाही....!! खूपच मॅच्युअर झाला होता माझा लेट लतीफ मित्र...!!!

पण आज जाणवलं होतं...आयुष्याच्या प्रवासात तो नव्हता तर...,मी होते लेट लतीफ !!!

 

-       अनुप

 

 

Pen Image

Pen Index