Pen


PEN 9 : लघुकथा ४ : क्वास्टाक

मारत्यानं आपल्या नातवाला, खंड्याला एक जोरदार थोबाडात लगावली. त्याचा आवाज त्या माळावर आणि धनगरवाड्यावर घुमला. म्हातारी-कोतारी, बायका-पोरी, पोरं-ढोरं हातातली काम-उद्दोग सोडून आवाजाच्या रोखानं पाहू लागली. सगळ्यांचे डोळे विस्फारले गेले.

“काय म्हणायचं ह्ये व्हईक !” एक म्हातारी आपल्या केसांना खोबरेल तेल लावत मोठ्यानं म्हणाली. खंड्या गालावर हात धरून मान खाली घालून उभा होता. त्याला अपराधी असल्यासारखं वाटू लागलं होतं. भर वस्तीसमोर खावा लागलेला मार त्याला मेल्याहून मेला करून गेला होता. त्यानं खाल मानेनंच आजूबाजूला नजर टाकली. बारकी पोरं त्याच्याकडं पाहून हसत होती. त्याच्याच वारगीचं तरणी पोरं त्याची चेष्टा करत होती. 

            मारत्या एकेकाळचा पैलवान गडी. त्याच्या नजरेला नजर देवून बोलण्याची बिशाद कुणाच्याच औलादीत नव्हती. वयाची ७० ओलांडली असली तरी पैलवानकीची खुमखुमी अजूनबी त्याच्या नसानसात भिनली होती. खंड्या मारत्याच्या मुलीचा लेक. एकदा त्याची पोरगी आणि जावयी जितराबं घेवून सातारचा डोंगर ओलांडून गेलेली आणि वळवाच्या पावसात वीज पडून दोघं नवरा-बायको आणि ३०-३५ जितराबं मरून गेली होती. वेळ बरी म्हणून खंड्या मारत्याकडंच होता त्यावेळी ! त्यावेळपासून खंड्याला मारत्यानं आपल्या पोरागत वाढवलं होतं. आई-बा दोघांची कमी त्यानं त्याला कधीच जाणवू दिली नव्हती. मारत्यानं खंड्यालाबी पैलवानकीची आवड लावली होती. आजूबाजूच्या वाड्या-वस्त्यांवरच्या कुस्त्या खंड्या मारू लागला होता. घरात मानाच्या फेट्यांचा ढिग पडला होता. मारत्यासारखाच खंड्याचा पण बोलबाला सुरू होता. धनगरवाड्यावरच्या कवळ्या पोरी खंड्यानं एक डाव बघावं म्हणून झटायच्या !

            आज्जा-नातवाची ही जोडी पंचक्रोशीत प्रसिध्द होती. पण, आज आयुष्यात पयल्यांदा मारत्यानं खंड्यावर हात उगारला होता ! त्याचं कारणही तसंच जबरदस्त आणि मारत्याची मान खाली घालणारं होतं. उभ्या आयुष्यात कुणाचा अंगाला हात लावून न घेतलेल्या खंड्यानं बाजूच्या धनगरवाडीवरच्या बायजाकडनं थोबाडात खाल्ली होती आणि त्यानंबी गपगुमान ती खावून घेतली होती ! ती थोबाडीत खंड्यानं खाल्ली असली तरी, जिव्हारी मात्र मारत्याच्या लागली होती.

“एकाच बाची अवलाद अश्शील तर, तूबी त्या पोरीला थोबाडात मारून येशील...न्हायतर तुजा आज्जा तुला मेला म्हणूनशान समजायचं !” थरथरत्या आवाजात, आपल्या पांढर्‍या मिशांवरून पालथी मूठ फिरवत मारत्या म्हणाला.

“आज्जा...असं काय बोलताईसा ? पोरगीवर हात उगारायचा म्हंजी ? आदीच त्येंच्या संगट आपली दुश्मनी...त्यात कशाला उगाच भर ?” एक वयस्कर माणूस समजूतदारपणानं म्हणाला.

“अय फुकणीच्या...माजा नातू मेला मरूंदे त्या दुस्मनीत ! पर ह्ये असलं बेअब्रूचं जगायचं कशाला ?” मारत्या आपली जळजळीत नजर त्याच्याकडं फिरवत म्हणाला. आता या उत्तरावर काय बोलावं त्ये त्याला समजंना. जाता-जाता ते बिचारं बोलून गेलं,

“काशी कराजावा...आमाला काय !”

त्याच्या उत्तरानं आदीच खवळलेला मारत्या परत भडकला. चवताळलेल्या सापानं फणा काडावा तसा मारत्या त्याच्यावर धावून जावू लागला. बाजूला जमल्याली माणसं पुढं झाली आणि त्येनी मारत्याला पकडलं. खंड्याचा एक मैतर मगापास्नं त्ये बगत हुबा होता. वैतागून खंड्याकडं बगून त्यो म्हणला, “व्हय म्हन आणि सोड की ईशय मर्दा...”

  “अय आडनाडा...कुणाला सांगतईस ईशय सोडायला ? खंड्या परत ह्येच्या बरूबर फिरताना दिसलास तर गाठ माझ्याशी हाय !” मारत्या दात-ओठ खात म्हणाला.

तापत जाणारं वातावरण बघून खंड्याच्या लक्षात वेळेचं गांभीर्य आलं. तो पुढं झाला आणि म्हणाला,

“आज्जा, त्या पोरीला थोबाडातच हाणायची न्हवं ? मारतो, खरं पण थांबिव ह्यो गोमगाला पयले...!” खंड्याच्या वाक्यानं योग्य तो परिणाम साधला गेला आणि मारत्या हात झटकून, दोन्ही हात पाठीमागं एकमेकात गुंफून माळावरनं खाली उतरू लागला. त्याला गेलेलं पहात कपाळावर हात मारून घेत खंड्या तिथंच मटकन खाली बसला.

            गर्दी पांगली. प्रत्येकजण आपापल्या कामाला निघून गेला. एक बारीक अंगकाठीचा तरुण त्याच्याजवळ येवून बसला.

“खंड्या...काय गा...काय ह्ये क्वास्टाक (भानगड) केलंईस म्हणायचं ?”

खंड्यानं त्याच्याकडं पाहीलं.

“जन्या...सकाळपास्नंच कालवा चाल्लाय अन आत्ता ईचारतईस व्हय, काय क्वास्टाक म्हणून ?”

“आगा...त्या बायजाकडनं थोबाडात खाल्लीस अन आता तू परतफेड करणार एवडच कळ्ळंय मला. पर नेमकं झालं काय म्हणायचं ?”

रागानं त्येच्याकडं बगत खंड्या उटला आणि त्योबी आज्जावानीच हात पाठीमागं टाकून, एकमेकात गुंफून चालू लागला.

            वाघरात जगताच्या मधोमध खंड्या आकाशाकडं बगत जमिनीवर पडला होता. एक पोरगं पळत वाघराकडं आलं-

“खंड्यादा...खंड्यादा...आज्जा ज्येवायला बुलिवतोय...”

“भूक न्हाई म्हणून सांग...”

“बग...नक्की !?”

“आरं जा की....”

पोरगं आलं तसं निघून गेलं. खंड्यानं पडल्या-पडल्या आपल्या जगताकडं नजर फिरवली.

“काय होयालंय काय बी कळंना जालंय. भूक लागीना...कशात मन रमीना...देवा बिरदेवा, काय क्वास्टाक करून ठिवलाईस ह्ये !? तुमी समदी साक्षीच हायसा की...त्या पोरीची काय बी चूक न्हाई...! काय आगळीक जाली असल तर माज्याकडनं जाली ! कुटल्या पोरीला आवडल एका अनोळकी पोरानं सारकं मागं-मागं फिरणं...आणि ते बी दुस्मन वस्तीवरच्या ! आयला ह्येंचा ह्येंचा जितराबांचा वाद आणि आमाला मदी वडत्यात बेनी ! आमच्या आज्जाला बी काय कळत न्हाई...एवड्या गोड पोरीला सून म्हणून घरात आणायचं र्‍हायलं...म्हणतूय कसा...तिच्याबी थोबाडात हान ! म्हातारपण डोचक्यात गेलंय त्येच्या...” खंड्या बोलता-बोलता स्वत:शीच हसला आणि त्याचवेळी अचानक त्याच्या कानावर मारत्याची हाक पडली, “अय उंडग्या...कुणाला म्हणतूयस म्हातारपण डोचक्यात गेलंय म्हणून !” आज्जाला अचानक तिथं पाहून खंड्या वाघरावरनं उडी मारून अंधारात पसार झाला.  

            अंगावर घोंगडं पांघरूण, रात्रीच्या काळोखाचा फायदा घेवून खंड्या बाजूच्या धनगरवाड्यावर आला. त्याला दुरूनच एका मुलीच्या आरडा-ओरड्याचा, रडण्याचा आवाज ऐकू येवू लागला. दबकत-दबकत, आजूबाजूचा कानोसा घेत तो, जिथं गोंधळ सुरू होता तिथं पोहोचला आणि एका आडोशाला उभं राहून पाहू लागला. ती रडणारी पोरगी बायजा होती. एका गोंडस कोकराला उराशी कवटाळून ती रडत होती. २-३ लोकं ते कोकरू तिच्याकडून सोडवून घ्यायला बघत होती. खंड्याला सुरू असलेला प्रकार समजायला बराच वेळ गेला. मागाहून लोकांच्या बोलण्यातून त्याला सगळ्याचा उलघडा झाला. गावात एक कार्यक्रम होता आणि रिवाज म्हणून धनगरांच्या जितराबातनं १-२ पालवी जेवणासाठी द्यावी लागायची. हे कोकरू बायजाचं लाडकं होतं. त्याला कापायला द्यायचं या विचारानं तिला भरून आलं होतं. बायजाला असं गळा काढून रडताना बघून खंड्याच्याबी डोळ्यात पाणी आलं. अखेर ती लोकं ते कोकरू हिसकावून घेवून निघून गेली. थोडावेळ थांबून खंड्याही निघून गेला.

            खंड्या सकाळी आवरून घराबाहेर पडत असताना आज्जानं त्याला थांबवलं, “जमादारच्या शेतात जगताला बसवायचं ठरलंय आज. म्हाईत हाय का कुटाय शेत त्येचं?”

“जी, नदीच्या बाजूला...”

खंड्या वाघरातनं आपली जगत घेवून माळावरनं खाली उतरू लागला. सुर्य माथ्यावर आला तसा त्याला जमादार उभा असलेला दिसला. खंड्या पळत त्याच्या दिशेनं गेला. दोघांची बोला-बोली झाल्यावर जगतला त्याच्या शेतात त्यानं बसवलं आणि स्वत:ही झाडाच्या सावलीत नदीकडं तोंड करून बसला. गार वार्‍याच्या झुळुकीनं त्याचा डोळा लागला. आणि अचानक थोड्यावेळानं कुणाच्या तरी बांगड्यांच्या आवाजानं त्याला जाग आली. त्यानं डोळे उघडून बाजूला बघितलं. बायजा त्याच्या शेजारी बसली होती. आपण स्वप्नात तर नाही ना ? अशा विचारनं त्यानं आपलं डोकं गदागदा हलवलं. त्यावर बायजा हसली आणि लाजली. काय बोलायचं दोघांनाही सुचत नव्हतं.

“काल राती देवागत कुणीतरी आल्तं अन माजं कोकरू सोडवून परत दाराम्होरं आणून ठिवलं...” बायजानंच बोलायला सुरूवात केली. खंड्याला ओशाळल्यासारखं झालं. पण तसं न दाखवता त्यानं विचारलं, “मी न्हाई समजलो...?”

            बायजा हसली आणि पदराच्या टोकाला बांधलेली गाठ सोडली. तिच्या हातात एक बांगडी होती.

“दारात पडल्याली ही बांगडी ! त्या दिवशी तुज्यावर हात उगारला तवा, ही बांगडी तुज्या हातात बगितल्याली मी...! कुणासाटी घितल्यालीस ?”

“जिच्यासाटी घितल्याली...तिच्यापर्यंत पोचली !” खंड्यानं लाजत उत्तर दिलं. बायजानं ती बांगडी त्याच्याकडं परत दिली आणि आपला उजवा हात पुढं केला. खंड्यानं ती बांगडी आपल्या हातात घेवून, तिच्या हातात चढवली. दोघंही एकमेकाकडं पाहून हसली. दोघंही लाजली. बायजा त्याच्याजवळ सरकली आणि तिनं त्याच्या खांद्यावर आपलं डोकं टेकलं. खंड्या अजूनही स्वत:ला सावरू शकला नव्हता. त्यानं वर आभाळाकडं बघितलं आणि मनातल्या मनात म्हणाला,

“देवा बिरदेवा...आज नव्यानं येगळंच आक्रित घडलं ! जिला मनाच्या गाबार्‍यात बशिवलं, तिनं तर मलाच देव मानलं !!!”

 

अनुप  

Pen Image

Pen Index