Pen


PEN 10 : लघुकथा ५ : Carpe Diem

त्या दिवशी ऑफीसमधून घरी जायला खूप वेळ झाला होता. ८ वा. नेहमीच्या वेळी बाहेर पडत असतानाच नेमका एका क्लाएंटचा फोन आला आणि इच्छा नसतानाही त्याच्या ऑफीसला जावं लागलं. लॅच उघडून घरात आले तेंव्हा ११.३० वाजून गेले होते. मघाच्या कॉफीने जेवायची इच्छा मरून गेली होती. कसे-बसे अंगावरचे कपडे उतरवले आणि नाईट गाऊन चढवून बिछाण्यात अंग झोकून दिलं. ए.सी.चं गार वारं चेहर्‍यावर येवू लागलं आणि डोळे आपोआप जडावू लागले. साधारण १० च मिनीटं झाली असतील आणि मोबाईलची रिंग वाजू लागली. सुरूवातीला आवाज कुठून येतोय हे समजायला बराच वेळ गेला. भानावर येवून फोन घेईपर्यंत रिंग थांबली. वैतागून फोन हातात घेतला आणि फ्लाईट मोडवर ठेवून दिला.

            नेहमीप्रमाणं ६.३० वाजता अलार्म वाजला आणि पुन्हा एकदा रूटीन दिवसाची सुरूवात झाली. मला सुरूवातीला नेहमी वाटायचं, आपलं आयुष्य रुटीन असता कामा नये, रोज कामात नाविन्य हवं, रोज वेगळं चॅलेंज आणि जेंव्हा मी हे वेब-डेव्हलपिंगचं क्षेत्र निवडलं तेंव्हाही असंच वाटलं होतं की, हे खूप वेगळं आहे, रोज नवं काम ! पण नव्याचं नाविन्य संपलं आणि ते कोड, त्याच किज, तेच प्रोग्रॅमिंग त्यात नविन कांहीच नव्हतं फक्त क्लाएंटस वेगळे आणि त्यांच्या कल्पना...एवढाच काय तो फरक ! बाकी ८ वर्षांच्या अनुभवानंतर एवढं मात्र कळलं होतं की, क्षेत्र कोणतंही असू दे, ते तुमच्या अंगवळणी पडलं की त्या कामातलं नाविन्यही आपोआप संपून जातं आणि ते मग रुटीनचा फक्त भाग बनून रहातं.

            बघता-बघता घड्याळात ९ वाजले. गडबडीने आवरून बाहेर पडले. गाडीत बसले आणि मग लक्षात आलं की, काल रात्री फ्लाईट मोडवर टाकलेला फोन अजून मी ऑन केला नव्हता. गाडीला इग्निशन देता-देता फोन मोड ऑन केला आणि गाडी सुरू केली. कांही वेळनंतर बर्‍याच कॉल्सचे नोटिफिकेशन्स येवू लागले. गाडी चालवता-चालवताच मी मोबाईलवर नजर टाकली. आलेल्या मेसेजीसमधील बरेच नंबर क्लाएंट्सचे होते. मेसेजीस स्क्रोल-डाऊन केले आणि एका अन-नोन नंबरवरून २२ मिस कॉल येवून गेलेल्या मेसेजवर नजर खिळली.

“२२ मिस्ड कॉल्स !!??”, मी आश्चर्यानं स्वत:शीच म्हणाले. गाडी एका बाजूला घेतली आणि त्याच नंबरला पुन्हा कॉल केला.

Hello..? This is Namrata speaking...I have got 22 missed calls from this number from last night to till this morning ! May I know, whose number it is ?”

I don’t know actually ! I just have arrived for day shift...”

Okay...but please let me know, from where are you speaking ?”

Yes sure...It’s government hospital. But the number you are talking on is do not belongs to the hospital ! But if you can hold for a while, I could ask to my fellow colleague...”

सरकारी दवाखान्यातून फोन !? मनात प्रश्नांचं वादळ उठलं, अनेक शंकानी मनात काहूर माजलं. जवळच्या अनेक लोकांबद्दल चित्र-विचित्र कल्पना येवू लागल्या. मनाचं हे एक अजब रहस्य आहे, जेंव्हा एखादं चांगलं ऐकतो तेंव्हा नजरेसमोर कुणीच जवळचं येत नाही मात्र वाईट ऐकतो तेंव्हा सारी जवळची लोकं डोळ्यासमोर उभी रहातात. तो पलिकडचा व्यक्ती २-३ मिनीटांसाठी बाजूला गेला असेल पण मला मात्र कित्येक मिनीटं लोटल्यासारखं झालं होतं. कानात प्राण आणून पलिकडून ऐकू येणारा आवाज मी ऐकण्याचा प्रयत्न करत होते. पलिकडून दोघांच्या बोलण्याचा आवाज कानावर पडत होता.

“अरे हा कुणाचा फोन आहे ? आपल्या स्टाफपैकी कुणाचा आहे का ?”

 “हा ना ? अरे काल रात्री एक बेवारस इसमाचं प्रेत आलं होतं पोस्ट-मॉर्टमला...त्याच्या खिशात होता हा फोन ! त्या फोनमध्ये एकच नंबर सेव्ह होता...नम्रता का कोणीतरी...रात्री खूप ट्राय केला...पण नंबर लागलाच नाही...”

“अरे मग बहुतेक त्यांचाच फोन आलाय, काय सांगू ?”

“येवून बॉडी क्लेम करून घेवून जायला सांग. नाहीतर बेवारस म्हणून जाळून टाकतील !”

पलिकडचे आवाज ऐकून माझ्या घशाला कोरड पडली. कांहीच सुचेना.

“हॅलो मॅडम...हॅलो...हॅलो....”

तो मुलगा बोलत असताना मी फोन कट केला. गाडीतला ए.सी. सुरू असूनही मला घाम फुटला होता. बेवारस !? माझा एकटीचा नंबर !? कोण !?? माझं सर्वांग थरथरू लागलं. थरथरत्या हातानं मी मोबाईलवर एक नंबर सर्च करू लागले. एक नंबर दिसला, “Ex Hubby”. घाबरत घाबरत मी माझ्या एक्स नवर्‍याच्या घरी फोन केला. बराच वेळ रिंग होवूनही फोन कुणीच उचलत नव्हतं. माझ्या छातीत धडधडू लागलं. आणि अगदी शेवटी एक आवाज कानावर पडला,

“हॅलो...अजय स्पिकींग...”

“अजय...” माझ्या तोंडातून अस्फुट आवाज बाहेर पडला आणि मी हमसून रडू लागले.

“नम्रता !? नम्रता...ईज दॅट यू...? हॅलो...हॅलो...नमू...नमू....?? नमू काय झालंय...”

मी फोन कट केला मात्र कांही क्षणांनंतर मी त्याच्या दारात उभी होते. अजयनं येवून दार उघडलं. त्याला पाहून मला रहावलं नाही आणि पुढच्या क्षणी मी त्याच्या गळ्यात पडले.

अजय आणि मी एकाच कंपनीत सुरूवातीला कामाला होतो. दोघांनी बर्‍याच प्रोजेक्ट्सवर एकत्रच काम केलं. सुरूवातीची मैत्री नंतर प्रेम नंतर मग ओघानेच येणार्‍या आणाभाका ! वाटलं की, दोघांचं फिल्ड एकच आहे, एकमेकाचा उपयोग होईल, एकमेकाला नीट समजून घेता येईल. घरच्यांच्या विरोधात जावून लग्न केलं. बेंगलोरमध्ये एका मोठ्या कंपनीत जॉब बघितला पण वर्षभरानंतर दोघांच्याही लक्षात आलं की, एकाच फिल्डमधील दोन लोकं इगो मधे न आणता जगूच शकत नाहीत. कळत नकळत का असेना ते दोघं एकमेकाला कॉम्पिट करतात, तुलना करतात. एक दिवस दोघं समोरा-समोर बसलो आणि सामंजस्यानं घटस्फोट घेण्याचं ठरवलं. “Happily Divorced“ असा स्टेटस आम्ही दोघांनी आपापल्या फेसबुक आणि व्हॉट्स-एपवर कांही दिवस ठेवला होता ! पण असं असलं तरी जेंव्हा गरज पडेल तेंव्हा आम्ही एकमेकांसाठी available होतो. डोव्होर्सनंतर ना त्यानं ना मी लग्न केलं होतं किंवा कोणत्याही रिलेशनशीपमध्ये अडकलो होतो. दोघांची स्वप्न मोठी होती आणि उगाच कुठल्याही रिलेशनशीचा अडथळा नको म्हणून आम्ही दोघांनीही पुन्हा कुठेही न अडकण्याचं ठरवलं होतं. पण आयुष्यात असे कांही क्षण येतात जेंव्हा तुमाला तुमच्या जवळच्या लोकांची कमी जाणवते आणि एक क्षण का असेना पण मनात अपराधीपणाची भावना निर्माण होते.

अजय मला आवडते तशी ब्लॅक-कॉफी घेवून आला. कप हातात देत तो माझ्या शेजारी आपल्या हाताचा विळखा माझ्या खांद्यांभोवती टाकून बसला.

“बोल, काय झालं?”

कॉफीचे घोट घेत मी त्याला सारा वृत्तांत कथन केला. त्याच्याही कपाळावर आठ्या पडल्या,

“इथं बेंगलोरमधे कोण ओळखणार आपल्याला...आपल्या फिल्डव्यतिरिक्त? आणि असा कोण आहे ज्याच्या फोनलिस्टमध्ये फक्त तुझाच नंबर सेव्ह आहे!”

“तेच तर समजत नाहीये. आणि माझ्याकडेही तो नंबर सेव्ह नाहीये...”

“नमू...तुझा भूतकाळ वगैरे..?” अजय माझ्याकडे हसत मला चिडवत...मला हसवण्याच्या उद्देशाने म्हणाला.

“जस्ट शट अप अजय...! माझ्या आयुष्यातील ती एकमेव चूक तू आहेस !” मीही त्याला टोमणा लगावला.

 “हां...तेही बरोबर आहे ! पण कुणी एकतर्फी प्रियकर असेल तर?” स्वत:चं हसू आवरत तो म्हणाला.

“तू असाच वागणार असशील तर माझी मी एकटी जाते हॉस्पिटलला !”

“चेष्टा करतोय गं...! एकटी नको...चल जावू...”

            दवाखान्याच्या पायर्‍या चढत असताना मनात प्रचंड ताण आला होता. खरंतर तो येण्याचा कांहीच प्रश्न नव्हता. अजयनं माझी अवस्था जाणली आणि माझा हात पकडून तो मला आत घेवून जावू लागला. आत जावून चौकशी केली. तिथल्या एका तरुणाने बाजूच्या ड्रॉवरमधला फोन माझ्याकडे दिला आणि एका कागदावर सही घेतली. त्यानं एका शिपायाला बोलावून आम्हाला त्याच्यासोबत शवागाराच्या दिशेनं जायला सांगितलं. माझं अंग थरथरू लागलं. मी अजयच्या दंडाला घट्ट पकडलं होतं. अजयलाही टेन्शन आल्याचं माझ्या लक्षात आलं होतं. चालता-चालता अचानक एक घाणेरडा-विचित्र वास नाकाला जाणवला. त्या वासानं ओकारी येवू लागली. अजय आणि मी दोघांनीही नाकाला रुमाल लावला. शिपाई एका दाराच्या टोकाला थांबला. खिशातून दारूची छोटी बॉटल काढून त्यानं १-२ घोट घशात टाकले आणि बाटली पुन्हा खिशात ठेवून त्यानं दार उघडलं. दार उघडल्याबरोबर केमिकल आणि अवयवांच्या उग्र वासानं आम्हां दोघांनाही भडभडून आलं. तो शिपाई आत जावून एका स्ट्रेचरजवळ थांबला आणि त्यानं खुणेनं आत यायला सांगितलं. अजयला घट्ट पकडून धडधडत्या हृदयानं आत प्रवेश केला. त्या स्ट्रेचरजवळ जावून उभे राहिलो. शिपायानं त्या प्रेतावर झाकलेलं एक मळकट कापड बाजूला केलं. मी अजयच्या खांद्याडून त्या चेहर्‍याकडं पाहीलं. तो ६५-७० च्या दरम्यानचा इसम होता. दाढी वाढल्यानं चेहरा ओळखू येत नव्हता. मी बारकाईनं त्याचं निरीक्षण केलं आणि इतका जबर धक्का बसला की, माझा तोल गेला. मी फरशीवर कोसळले. मला हुंदका फुटला. अजय मला सावरायला खाली बसला. माझ्या रडण्याच्या आवाजानं दाराबाहेर लोकं जमा झाली.

“नमू...नमू...कोण आहे तो ? कुणी ओळखीचा आहे का ?” मला सावरत अजयनं विचारलं.

त्यावेळी मी त्याच्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर देण्याच्या मन:स्थितीत नव्हते. मी फक्त मान डोलावली आणि त्याला बिलगून रडू लागले.

            मला वेटिंग लाऊंजमध्ये बसवून अजय सार्‍या फॉरमॅलिटी पूर्ण करण्यात गुंतला. मोठ्या मुश्किलीने मी स्वत:वर नियंत्रण ठेवू पहात होते. सारे सोपस्कार आटोपून शववाहिका सरळ स्मशानभूमीच्या दिशेने निघाली. पाठोपाठ आम्ही होतोच. तिथं अगोदरपासून ३-४ प्रेतांचे विधी सुरू होते. सारे नातेवाईक-मित्रमंडळी यांनी ती इतर दहन ठिकाणी गजबजली होती आणि याच्या विरुध्द आम्ही ज्या ठिकाणी विधी आवरत होतो, तिथं फक्त मी, अजय आणि त्याच्या आठवणी इतकेच उपस्थित होतो. अजय आणि मी मिळून त्याला भडाग्नी दिला. वाढत जाणार्‍या त्या आगीसोबत माझ्या मनातही आठवणींचा डोंब उसळत होता. त्याच्या त्या जळणार्‍या चितेकडं पाहून पोटात कालवा-कालव झाली. आयुष्य खरंच किती क्षणभंगूर आहे, याची जाणीव झाली. जोवर तुम्ही जीवंत आहात तोवर तुम्ही जीवंत आहात, मेलात कि क्षणात तुम्ही सर्वांमधून नाहीसे होता मात्र, जगाचं रहाट गाडगं आहे तसंच सुरू रहातं ! ही गोष्ट खूप वेदनादायक आहे. एखादी व्यक्ती मेल्यावर आपण पुन्हा त्या व्यक्तीला पाहू शकणार नाही, त्याला स्पर्श करू शकणार नाही, त्याचा आवाज ऐकू शकणार नाही...किती भयानक आहे हे सारं ! मग हे असं असताना मृत्यू हेच एकमात्र सत्य नाही का ? आपण नेहमी म्हणतो, माझा जन्म या गोष्टीसाठी झालाय..त्यासाठी झालाय ! साफ खोटं !! आपल्या सर्वांचा जन्म फक्त मृत्यूसाठीच झालाय...माणूस मरण्यासाठी जन्माला येतो आणि मरण येईपर्यंत वेळ घालवण्यासाठी करिअर, इगो, रिलेशन्स, स्थावर वगैरे वगैरे गोष्टी तयार करतो आणि एक दिवस सारं मागं सोडून निघून जातो.

             अजयनं खांद्यावर हात ठेवला आणि मी दचकून भानावर आले. तिथल्याच माणसाला पैसे देवून त्याचे उत्तरविधी करण्यास सांगून आम्ही निघालो. मी गाडीत फक्त शरीराने अस्तित्वात होते. मनात त्याचेच विचार सुरू होते. त्याचं नाव....? मी नाही सांगणार. कारण आपली सर्वांचीच वाईट खोड आहे, आपण नाव ऐकून समोरच्याला एका ठराविक जातीत बांधून टाकतो आणि तिथंच थांबत नाही...तो कसा असेल ? यावर स्वत:चं मत तयार करून त्याला साचेबध्द करून टाकतो. पण सो साचेबध्द नव्हता. त्याला ठराविक असा ताळेबंददेखील नव्हता. “Carpe Diem(कार्पे डियम)” त्याचा आवडता शब्द.. Carpe Diem ! माझ्या डोळ्यांतून आपोआप पाणी गालांवरून ओघळू लागलं. मी डोळे बंद केले आणि त्या वहाणार्‍या पाण्यासोबत मीही वहाणंच पसंत केलं...त्यांच्या आठवणींमध्ये !

            अजयसोबत घटस्फोट घेतल्यानंतरचे कांही दिवस खूप अस्वस्थतेत होते मी. घेतलेला निर्णय योग्य की अयोग्य याचा माझा मलाच उलघडा होत नव्हता. घटस्फोटानंतर मी जॉबही बदलला होता मात्र त्यापूर्वी मी १५ दिवसांची सुट्टी घेतली होती. वेळ जाता जात नव्हता. डोक्याचा विचार करून भुगा व्हायची वेळ आली होती. एकदा एका कॉफी शॉपमध्ये एकटीच विचार करत बसले होते. आणि अचानक कानावर आवाज आला,

May I sit here ? You see, all seats are full and yours is the only place with extra chair, so may I...?”

६०-६५ च्या दरम्यानचा, फॉर्मल कपडे, क्लिन शेव्ह, चष्मा अगदीच किरकोळ एक इसम मोठ्या आदबीने हातात कॉफीचा ट्रे घेवून उभा होता. मी आजूबाजूला नजर टाकली आणि स्वत:शीच पुटपुटले, “काय झडतीये !” माझं बोलणं त्याला कदाचित समजलं असावं मघापासून असणारी आदब गायब होवून तो एकदम माझ्यासमोरच्या खुर्चीत दाणकन आदळलाच. माझ्या भुवया विस्फारल्या गेल्या.

What the f......!” मी वैतागून म्हणाले.

“तुम्ही महाराष्ट्रीयन आहात ?” त्याच्या चेहर्‍यावर आनंद पसरला होता. बेंगलोरमधे इतकं शुध्द मराठी ऐकून मलाही जरा बरं वाटलं.

“तुम्हीही महाराष्ट्रीयन आहात ?” मीही आश्चर्यानं विचारलं.

बस्स. आम्हां दोघांना बोलायला तेवढा एक धागा पुरेसा होता. एकमेकांची ओळख झाली. कामाविषयी बोलणं झालं. तो एका लायब्ररीमधे लायब्ररीयन म्हणून काम करायचा. ४ वर्षांपूर्वी तो रिटायर्ड झाला होता. निव्वळ वाचनाची आवड म्हणून त्यानं हे फिल्ड निवडलं होतं. खूप वाचन केलं होतं त्यानं, लिखाणही खूप केलं होतं पण ते कधी पब्लिश करावं असं वाटलं नव्हतं त्याला. त्यानं ते निव्वळ स्वत:साठी केलं होतं. बर्‍याच दिवसांनंतर मी इतकं मोकळेपणानं बोलत होते. तो कुणीच आपला नसला तरी खूपच कमी वेळात आपलासा वाटू लागला होता. तो बोलू लागला की निव्वळ ऐकत रहावसं वाटायचं. कुठलाही विषय काढा, त्याला त्या विषयाची इत्थंभूत माहिती असायची. त्याच्याकडून माहिती ऐकली की, स्वत:च्याच बुध्दीमत्तेची कीव वाटायची. तो रोज संध्याकाळी तिथं कॉफी प्यायला यायचा. नंतरचे १५ दिवस माझाही तोच नित्यक्रम होवून गेला. रोज संध्याकाळी ४ ते रात्री ८ वाजेपर्यंत आमचं बोलणं, चर्चा सुरू असायच्या. हल्ली तर कधी एकदा ४ वाजतात असं होवू लागलं होतं. त्यानं नकळत माझ्या आयुष्यातील माझ्या वडिलांची जागा भरून काढली होती पण असं असलं तरी एका मॅच्युअर लेव्हलला मी त्याच्या प्रेमात पडले होते. हो...खरंच प्रेमात पडले होते. आणि हे माझं प्रेम शारीरिक नक्कीच नव्हतं. प्लेटॉनिक की काय म्हणतात ना...तसंच कांहीसं होतं आमचं नातं...निदान माझ्याकडून तरी !

एकदा निघत असताना काय झालं कुणास ठाऊक, मी वळले आणि विचारलं, How about dinner?”

“आज असं अचानक?” तो म्हणाला

“काय हरकत आहे ? अगोदर नोटीस द्यायला हवी का ?” मी त्याला हसत विचारलं.

“अगदी लेखीच असं कांही नाही पण निदान तोंडी तरी द्यायलाच हवी...” त्यानंही हसत गुगली टाकली. त्याच्या उत्तरानं हिरमोड होवून मी वळले आणि मागून आवाज आला,

How about Bakee’s ? They serve good continental food in the city...”

मी वळले आणि हसून मान डोलावली.

            The food was actually very nice. I just loved that. जेवता-जेवता आम्ही पहिल्यांदाच आमच्या पर्सनल लाईफबद्दल बोलत होतो. त्याच्या पत्नीचं पहिल्या बाळंतपणातच निधन झालं होतं. त्यानंतर त्यानं दुसरं लग्न केलं नव्हतं. आजही तो त्याच्या पत्नीवर नितांत प्रेम करायचा. तिच्या आठवणीत आपल्या छोट्याशा खोलीत एकटा रहायचा. मला त्याच्या प्रेमाचं कौतुक वाटलं. आजच्या इंस्टंटच्या जमान्यातही अशी लोकं आहेत हे पाहून आश्चर्य तर वाटलंच पण त्याक्षणी तो मला एलियनच वाटला. मीही त्याला माझ्याबद्दल सारं सांगून रिकामी झाले. खूप रिलॅक्स फिलींग अनुभवलं होतं मी बर्‍याच दिवसांनी. ‘आम्ही एकत्रच काम करत असल्यानं, उगाच एकमेकाला uncomfortable वाटू नये म्हणून मी जुना जॉब सोडून नवीन ठिकाणी उद्यापासून जॉईन होणार’ असल्याचंही त्याला सांगितलं. त्यावर त्यानं माझ्या नजरेत रोखून पाहिलं आणि दीर्घ श्वास घेवून तो म्हणाला,

“तुम्ही आजची पिढी विचार खूप करता...तोही चुकीच्या दिशेने. Life is precious. True. Carpe Diem. It’s also true. But on what cost Namrat ?”

Sorry but, didn’t get, you & the Carpe Diem thing ?”

Carpe Diem ! It’s a Latin word, which means, seize the day. Enjoy the present. नम्रता, आयुष्य इतकंही Easy-go नाही. प्रेम...! प्रेम भांडणात असतं...वादावादीत असतं...अबोल्यात असतं...कधीतरी आणलेल्या गजर्‍यात असतं...कांहींच न बोलता तासनतास एकमेकाचा हात, हातात घेवून शांतता ऐकण्यात असतं ! आपला प्रॉब्लेम काय आहे माहित आहे...आपण समोरच्याला आहे तसं स्विकारत नाही. नम्रता रोज उगवणारा सुर्य पण दररोज बदलत असतो...आपण तर माणूस आहोत. वयानुसार, परिस्थितीनुसार बदल होणारच...आपण समोरच्यातला बदल स्विकारत नाही आणि बरीचशी नाती याच एकमेव कारणामुळं अवेळी संपतात !”

तो बोलत होता ते सगळं कळत होतं...पटत होतं...पण ! हा “पण” मधे येत होता....

            त्या रात्री झोपू शकले नाही. कित्येकदा वाटलं, उठावं आणि अजयला फोन करावा किंवा सरळ त्याचं घर गाठावं...! पण...!! दुसर्‍या दिवसापासून मी नवीन जॉबवर रुजू झाले आणि त्या वातावरणात रमूनसुध्दा गेले. सहा महिने होत आले असतील. एका कॉन्फरन्स दरम्यान एका गेस्टने आपले विचार मांडताना “कार्पे-डियम” शब्द वापरला आणि माझ्या सर्वांगावर काटा उभा राहिला. कामाच्या ओघात गेल्या सहा महिन्यात रात्री उशीरापर्यंत काम करत थांबावं लागायचं, त्यामुळं वेळही मिळत नव्हता आणि तो तसा विस्मृतीतच गेला होता पण, त्याक्षणी खूप तीव्रतेनं त्याची आठवण झाली. दुसरे दिवशी Luckily

काम लवकर संपलं आणि मी तडक ते कॉफी शॉप गाठलं. त्याची वाट पहात तीन कप कॉफी प्यायले. अखेर न रहावून काऊंटरवर जावून त्याच्याबद्दल चौकशी केली. त्यांनाही त्याच्याबद्दल कांहीच कल्पना नव्हती.

           त्याच अस्वस्थतेत दुसरे दिवशी मी त्या लायब्ररीत गेले जिथे तो काम करायचा. चौकशी केली. बराच वेळ माझी खातरजमा करून त्यांनी कोणतीही माहिती नसल्याचा खुलासा केला. त्यानंतर बरेचदा मी वेळ काढून तिथं जावून बसायचे, त्याची वाट पहायचे. अचानक कुठूनतरी येवून मोठ्याने म्हणेल, Carpe Diem !!!” आणि मी Eureka !!!” म्हणून त्याला प्रत्युत्तर देईन असं वाटायचं. पण तो आलाच नाही. आज वर्षभरानंतर तो समोर आला होता पण, तो हा असा ! कांही लोकं आयुष्यात खूप कमी वेळासाठी येतात आणि आयुष्यभरासाठी पुरेल इतकं प्रेम, आठवणी देवून जातात. जायचंच असतं तर मग येतातच कशाला ?

विचार करता करता हुंदका फुटका.

“नमू...सावर स्वत:ला...” गाडी चालवत अजय म्हणाला.

पर्समधून त्याचा फोन बाहेर काढला आणि तो चेक करू लागले. कॉन्टॅक्टमधे माझा एकटीचाच नंबर होता. गॅलरीमध्ये आम्ही तेंव्हा काढलेले एक-दोन फोटो होते. मेसेजबॉक्स रिकामा होता. ड्राफ्टमधे एक ड्राफ्ट दिसत होता. मी तो ओपन केला आणि पहिली ओळ वाचूनच पुन्हा गळा दाटून आला,

“नम्रता, मला खात्री आहे...जेंव्हा हा ड्राफ्ट तू वाचत असशील तेंव्हा मी या जगात नसेन ! आणि याची मला खात्री आहे ! Those were the golden days for me, after long time. बायकोनंतर खूप वर्षांनी कोणाशी तरी इतकं मनमोकळेपणानं बोललो आणि तूही तितक्याच आपुलकीनं ऐकलंस. You know, you are my only friend after my better half. नम्रता, I know..तू हुशार आहेस, career oriented आहेस. आठवतंय त्यावेळी (आपल्या शेवटच्या भेटीवेळी) तू प्रश्न विचारला होतास आणि मी उत्तर द्यायचं टाळलं होतं... “दरवेळी मीच का ?” आज देतो उत्तर, दरवेळी मीच का? मीच का पहिल्यांदा ?? हे दोन प्रश्नच सगळ्याच्या मुळाशी आहेत असं नाही वाटत तुला ? Namrata, carpe diem with your beloved ones because there is one hidden thing, which you don’t know, when it will come & takes you in its arms ! You know, what is that ? Its DEATH...my dear....Namrata ! So, Carpe Diem with beloved ones before death grabs you...”

            मी फोन बंद केला आणि डोळे टिपून घेतले. गाडी माझ्या अपार्टमेंटसमोर येवून उभी राहिली होती. अजय माझ्याकडं पहात होता आणि मी त्याच्याकडं. त्यानं खुणेनं “तुझं घर आलं...उतर” असं सुचवलं. मी एकवार रुक्षपणे त्या अपार्टमेंटकडं नजर टाकली. दीर्घ श्वास घेतला आणि त्याचा हात हातात घेत म्हणाले, “आपण आपल्या घरी जावूयात ?” अजयच्या चेहर्‍यावर आनंद आणि आश्चर्य दोन्ही भाव होते. त्यानं मान डोलावली आणि गाडी वळवली. माझ्या मनात अजूनही एकच वाक्य घुमत होतं...“ Carpe Diem with beloved ones before death grabs you...”

 

 

अनुप

Pen Image

Pen Index