Pen


PEN 13 : कांही ओळी मनातल्या : १ : मौन

मौन...

अथांग..निरभ्र...!

क्षणिक प्रखर...कधी ढगाळ !!

कधी पाण्यासम नितळ, कधी दगडाहूनही कठीण...

मौन उनाड वार्‍यासारखे...मौन निश्चल कड्यासारखे !

मौन असेही...मौन तसेही...

मौन माझे, मौन तुझे...

मौन मी, मौन तू...

मौनात आपण...

आपल्यात मौन...

दोघांनाही कवेत घेते...

मौन !

 

मौन...

मौनांचे संवाद आपुले !

मौन शब्द, मौन स्पर्श...

मौनांचे गीत आपुले !!

मौन भाव अन मौन गंधही !

मौन दिशा सार्‍या...

मौन बंधही !!

मौन सांज सारी, मौन झाली गात्रही !

मौन आसमंत, रंग सारे...

मौन कातरवेळही !!

मौन मी, मौन तू...

मौनाचे कोलाहलही !

मौन झाल्या ओळखी, मौन दु:ख अनोळखी !!

मौन !

 

मौन...

मौन संवेदना, भावना अन उरात लपलेल्या,

असंख्य स्मृतीही !

मौन वाटा, पायवाटा अन मौन झाला, प्रवासही !

कंपनांचे मौन, कापरांचे मौन,

कंपणार्‍या ओठांचेही मौन !

जडावणारे श्वास, हातामधले हात...

अन त्या स्पर्शांमधल्या संवादांचेही मौन !

मौन सारेच...सारेच मौन...

शब्दांचेही मौन, सूरांचेही मौन...

मौनच खरे की बनावच सारा ?

मौनाचा कावा, मौनच बावरा...

मौन !

 

मौन...

मौनाचेही प्रश्न, उत्तरांचेही मौन...

मौनालाच साकडे, मौनाचेच व्यूह !

धर्मग्रंथांचेही मौन, मौनच धर्मगुरू...

निर्माताही मौन, मौनच सदेह !

 आरंभ मौन, मौनातच अंत...

दोहोंमधला कार्यकालही मौनच !

शाप मौन, उ:शाप मौन...

स्वर्ग-नरक यांच्यामधले रहस्यही मौनच !

 मी मौन, तसा तोही मौनच...

काया मौन, तशी परकाया मौनच !

असेलच आत्मा तर तोही मौनच...

मग, परमात्माही मौनच !

मौन !

 

मौन...

कधी एका बिंदूत सामावेल इतके...

तर कधी बिंदू फोडून पसरलेल्या आकाशगंगेइतके !

कधी पोटात घेवून पुन्हा किनार्‍यावर घाणीला पसरवणार्‍या समुद्रासारखे...

तर कधी आग ओकून दमात घेणार्‍या ज्वालामुखीसारखे !

मौन घड्याळ्याच्या दोन सेकदांदरम्यानच्या शांततेत वसते...

दोन मनांच्या दुभंगलेल्या जागेमध्ये असते !

कधी प्रेमापोटी, कधी रागापोटी...

कधी सूडापोटी, कधी हिंसेपोटी, तृष्णेपोटी, कपटापोटी आणि क्वचित,

सत्यापोटी जन्म घेते...

मौन !

  

मौन...

फळाच्या बी प्रमाणे...

मनाच्याही नकळत मनामध्ये पडते, रुजते, अंकुरते, उमलते, फुलते, बहरते आणि

ऐन बहरात असतानाच, समोरच्याला खुपते !

दोष कुणाचा ?

ज्याच्यापायी रुजले त्याचा..?

ज्याच्यापोटी अंकुरले त्याचा ??

की, ज्याला खुपले त्याचा ???

पण यातून ईप्सित ते काय ????

आहे !

ते ज्याला खुपले...त्याच्यात नव्याने ते बी पडले !

तेच अंकुरणार, उमलणार, फुलणार आणि बहरणारसुध्दा...!

निर्मीती-वाढ मौनाचीही !

पण अमरत्व तेवढे शाश्वत...!

कदाचित, अमरत्व प्राप्त झालेले एकमात्र असावे...

मौन !

 

मौन...

घर मौन, भिंती-छत-उंबरा-दारं-चौकटी सारेच मौन.

नाती मौन, धागे मौन, बंधही मौन.

कुंपण मौन, गावगाडा मौन, पार-गल्ल्या-चौक सारेच मौन.

कावळे-कुत्री मौन, गाई-गुरांचेही मौन.

‘घाट’ मौन, ‘सुरा’ मौन, शेती-पिकही मौन...

चिताही मौन, शरीराचेही मौन...

सारेच मौन, अपवाद फक्त पिंडाचा !

पिंडाचेही आज...

मौन !

 

म्हणूनच...

मौन मी, मौन तू...

मौनात आपण...

आपल्यात मौन...

दोघांनाही कवेत घेते...

मौन !!!

 

-अनुप

Pen Image

Pen Index