Pen


PEN 14 : लघुकथा ६ : बिस्कूट

म्हातारीचं गावाबरूबर तसं काय रगताचं नातं नवतं पर असं असलं तरी सक्क्यापेक्षा कमीबी नवतं.....

म्हसोबाची यात्रा हुती त्या दिशी गावात. रातीला किर्तन हुतं. बक्कळ लोकं जमल्याली. धा गावची हजारबर तरी लोकं असत्याली. एवड्या गर्दीत आपला कोणचा अन दुसरा कोणचा ? त्ये कळत नाई तर, कोन आपल्या गावचं अन कोण दुसर्‍या हे कळायचं तर लई लांब ! राती लई उशीरा किर्तन सपलं. गावातली लोकं आपापल्या घरला गेली. ज्येंच्याकडं मोटारी हुत्या त्ये आपापल्या गावाला गेले अन ज्येंला वडाप, येष्टीशिवाय पर्यावच नवता त्ये, तितंच मंदीराच्या भवतीनं गोधडी, वाकळा पसरून निजले. दुसरे दिवशी दुपारपर्यंत समदी गर्दी हल्ली. पर तोवर मंदीराच्या बाजूला असलेल्या नाग्याच्या चा च्या हाटीलाट दिवाळीला अस्तू तसा दिमाक हुता. कवा न्हाई ते आज नाग्याच्या थोबाडात त्वांड भरून हसू हुतं. हाटीलाच्या बाजूलाच सरकारी बोर हुता. सकाळी लोकं उटून तोंड खंगाळून सरळ हाटीलाट चा-भजी, चा-फवे, चा-भडंग न्हायतर चा-पाव खायाला गर्दी करत हुतीत. हून तर थोबाडावरची माशीबी हलू न देणारा नाग्या आज त्वांड पसरून, खांद्यावं मळका टावेल टाकून, त्याच टावेलाच्या टोकानं पिलटा पुसत पावण्यांचं स्वागत करत हुता.

बगता-बगता दुपार जाली. गर्दी पांगली. खांद्यावरचा टावेल झटकून, त्याच टावेलानं त्वांड पुसत नाग्या भायेरच्या कट्ट्यावं बसला आणि टावेलानं वारं घ्यू लागला. समोरचं मंदीराचं आवार आता सुनं-सुनं जालं हुतं. दुपारची एष्टीबी आत्ताच गेल्ती. आता संद्याकाळ हुईस्तोवर कायच काम नव्हतं. जरा येळ टेकायचं अन पैशाचा हिसोब करून घरी जेवायला जायचं, असा ईचार नाग्याच्या मनात सुरू हुता. त्यो उटनार एवड्यात त्याची नदर मंदीराबाजूच्या झाडाखाली गेली. कोणतर मुटकुळाहून पडल्यालं. “च्या भनं ! कोण हाय त्ये ?” सोताशीच मोट्यानं बडबडून त्यो जागचा हालला अन लगबगीनं झाडाखाली जाऊन वाकून बगू लागला. बराच येळ निरकून बगितल्यावं, “च्या भनं ! कोण म्हातारी म्हणायची ? अय म्हातारे...म्हातारे...उट..” नाग्या मोट्यानं म्हण्ला. म्हातारीनं त्वांडावरचा पदर बाजूला केला. तिला उटायलाच ईत नवतं. नाग्या खाली बसला अन तिच्या मानंखाली हात घालून तिला उटवून बसवत ईचारलं, “च्या भनं ! अंग तापलंय की !! कोण गावची म्हातारे तू ? एकटीच का र्‍हायलीयास ? दुपारची गाडी गिली की...” म्हातारीच्या त्वांडातनं शबुदच भाईर पडत नवता. थरथरत बी हुती. नाग्या गडबडीनं हाटीलाच्या दिशेनं पळाला अन पेलाबर पाणी घिऊन मागारी आला.

म्हातारीनं पाणी घटाघटा पिऊन सपिवलं. लईच गडबडीनं पाणी पिल्यानं तिला धापबी लागला हुता. जरा दम घितल्यावं नाग्या तिला म्हण्ला, “म्हातारे...फवे आणि भजी शिल्लक हायती. खाणार ?” म्हातारीनं मान हलवली. नाग्या तिला हाताला धरून हाटीलात घिऊन आला. तिला बाकड्यावं बसवून तिच्या फुड्यात फवे-भजी आणून ठिवलं. म्हातारी दमानं खाऊ लागली. नाग्या तिला निरकत तिच्या बाजूला बस्ला. तिचं खाऊन जाल्यावं त्यानं उरल्याल्या दुदाचा, पाणी न घालता पेशल चा बी करून दिला. चा पिऊन म्हातारीला तरतरी आली.

“लेकरा, द्येव तुजं कल्याण करल ! पर लेकरा, तुला द्येयाला पैशे न्हाईती रे माज्याजवळ !” ती कळवळीनं म्हण्ली.

“र्‍हाऊंदे घे गं म्हातारे..तुज्या २०-३० रुप्प्यानं लई मोटा बी हुणार न्हाई अन लगीच लई वाईट बी दिस येणार न्हायती ! आशिरवाद दिलास...त्येच लई मोटं हाय माज्यासाटी...! आज त्योच मिळत न्हाई...बाकी समदं बाजारात ईकत मिळतंय...पोरांपास्नं मेल्यावं आपोप जाळणार्‍या मिशिनीपरयंत ! काय घिऊन बसलियास ! बरं..मला सांग आता हुशारी वाटतीया नव्हं ?”

“व्हय लेकरा...देवासारका आलास बग...”

 त्वांडभर हसून नाग्या म्हण्ला, “बरूबर बुल्लीस म्हातारे...माणसातला देव बगतंच न्हाई आपण...उगा दगडात, उपास-तापासात हुडकत येळ बरबाद करतू आपण...”

“तसं नव्हं लेकरा...पर तेनंच बुद्दी दिली नव्हं का तसं वागायची ?”

परत त्वांडभर हसत नाग्या म्हण्ला, “मला बुद्दी माज्या आई-बानं दिली अन त्येन्ला त्येंच्या आई-बानं ! जाऊं दे म्हातारे...आपलं काई पटायचं न्हाई..! मला सांग...कोण गावची ? हितं कशी ? कुटं जाणार ? जायाला पैशे द्यू का ?”

नाग्यानं तसं म्हणल्याबरूबर म्हातारीचं त्वांड उतरलं.

“आजापास्नं ह्येच माजं गाव...अन तूच माज्या नात्यातला...”

नाग्याच्या चेर्‍यावर आट्या पडल्या. त्येच्या मनात बी आलं फुडं कायतर ईचारायचं पर त्येनं तिला ईचारायचं र्‍हाऊंदे म्हणलं. त्योबी तिच्याकडं बगून हसला,

“म्हातारे...जिंदगी हाय...चालायचंच !”

“अशा जिंदगीचं घिऊन काय करू लेकरा ? पोरंच ईचारत न्हायती आई-बाला. ह्येनी हुतं तवर समदं मायंदळ हुतं...ह्येनी गेलं आणि आई-बाच्या मागारी पुन्यांदा पोरकी जाले....”

म्हातारीनं तोंडाला पदर लावला. नाग्याला काय बोलावं सुचंना.

“उगी म्हातारे. तुजं ठरलंय न्हवं...ह्येच गाव तुजं हून ? चल मग, उचल तुजं बोचकं अन चल माज्यासंगट...”

नाग्यानं फुडंहून दुकान बंद केलं अन तिचं बोचकं सोताच्या काकंत मारून, दुसर्‍या हातानं तिच्या हाताला धरून हळू-हळू तिच्या संगट चालू लागला.

“नाग्या...कोण म्हणायची पावनी ?” रस्त्यातनं जाताना कट्ट्यावर बिडी फुकत, तंबाकू मळत बसल्याल्या लोकांनी ईचारलं.

“लांबची मावशी हाय...पयल्यांदाच आलीया गावात...आता हितंच र्‍हाणार हाय...”

“भले शाब्बास...”

म्हातारी त्येच्याकडं बगत त्वांडभर हसली अन पदरानं गपकन डोळ्य़ातलं पाणी पुसून टाकलं.

            नाग्यानं आपल्या घराच्या मागची एक खोली म्हातारीला र्‍हायला दिली हुती. तिचं तिला येगळं दार काडून दिलं हुतं. नाग्याची बायकू अन पोरं बी सक्क्यासारकीच तिच्यासंगट वागायची. नाग्याचा बा जावून धा वरसं हुईत आल्ती अन आई जावून अजून वरीस बी झालं नवतं. नाग्याला त्येच्या आईची लई कमी वाटायची. त्यो समद्यांस्नी सांगायचा, “माज्या आईनंच धाडलंय ह्या म्हातारीला, माजी आय म्हणून !” म्हातारीनं बी बगता-बगता समद्या गावाला माया लावली हुती.

म्हातारीचं घर समद्याना कायम खुलं हुतं. घरावरनं येणारी-जाणारी जरा येळ थांबायची, बोलत बसायची, पेलाभर पाणी अन एक बिस्कूट खाऊन निगून जायचीत. म्हातारीची ती खाशियत हुती. म्हातारीचा तसा काय खर्च नव्हता मातूर तिला दर २ दिवसाला एक बिस्कूटचा आक्का पुडा लागायचा. ती सोता बिस्कूटं खायाची नाई पर घरी ईल-जाईल त्येला एक बिस्कूट आणि पेलाभर पाणी द्येयाची. म्हणायची, “तुमी आपुलकीनं माज्या खोपीत येतासा, माज्याकडं द्येयाला ह्येच्याशिवाय काय बी न्हाई...गोड मानून घेवा...” लोकं नदरत पाणी घिऊन बिस्कूट खायाची. नाग्या बी आता न चुकता दर दोन दिसाला एक बिस्कूट पुडा घिऊनच याचा.

 कदी कदी म्हातारी नाग्याच्या मदतीला हाटीलात जायाची. भांडी घासायची, झाडू मारायची अन कवा कवा हाटीलासमूर पाण्याचा सडा मारता मारता तोंडानं भैनाबाईच्या, “आरं सौंसार सौंसार, जसा तवा चुल्ह्यावर. आदी हाताले चटके मंग मियते भाकर...” ह्या दोनच वळी तासभर म्हणायची. कवा कवा तर सोताच्या मनचं बी कायतर म्हणायची,

“कोण गावचं ? कोण गावाला ?

कुटं जनिमला ? कुटं हरिवला ?

नाळ कोणची ? रगात कोणचं ?

कोणच्या जनिमाचं, जीव कुजीवला !”

ह्ये असलं काय तर म्हणत पाण्याचा सडा घालू लागली की नाग्याला प्रश्न पडायचा, ‘सोताच्या डोळ्यातनं पडणारं पाणी लपवायला तर ही सडा घालत नसल ?’

            बगता बगता वरीस हुईत आलं पर अजून बी नाग्यानं कवाच म्हातारीला तिच्या आयुकश्याबद्दल ईचारलं नवतं. ‘कवा ती सोताहून सांगल तवा सांगल...’ असा ईचार करून त्यो गप र्‍हायाचा आणि आपल्या पोरांला गोष्टी सांगत, त्येंच्या डोचक्यावरनं हात फिरवत भित्तीला टेकून बसलेल्या म्हातारीकडं कौतुकानं बगायचा. गावच्या लोकांला नाग्याचा लई अबिमान वाटाया लागला हुता. ज्यो त्यो त्येचं कौतुक करायचा अन नाग्यानं खूस होऊन दिलेला फुकटचा च्या पिऊन निगून जायाचा. त्येला कळायचं. बायकु कवातर वरडली तर म्हणायचा, “आपल्या नशिबातलं कोण न्हेनार हाय व्हय कवा? अन तसंबी वासं फिरलं तरी आबुळ पाटीशी अस्तंयच की ! मग घाबरायचं कशाला ?”

            म्हातारीलाबी लई तरास व्हयाचा प्वोटातल्या प्वोटात. ‘असं दुसर्‍याच्या जीवावं जगायचं’ तिच्या जीवावं आलं हुतं. तिनं नाग्याला असं काय बी बोलून दावलं तर नाग्या खवळायचा. नगो त्यो ईचार करू नगो हून वरडायचा. म्हातारीला नाग्याचं भारी कौतिक हुतं, त्येच्या बायकुचं बी ! तरिबी आता म्हातारीच्या मनात ईत हुतं, नाग्याला गावाकडं धाडून पोराला घिऊन जाया सांगाव काय हून ? अन एकदा नाग्या सवडीनं बस्ला अस्ताना, म्हातारीनं ईशय काडलाच. तिचं बोलणं ऐकून नाग्याला मनातनं वाईट वाटलंच जरा. नाग्याच्या नदरत आपूआपच पानी आलं. म्हातारीच्या जीवात चर्र जालं. फुडंहून त्येला जवळ वडून त्येच्या डोक्यावरनं हात फिरवत म्हातारी म्हणाली, “लेकरा, तुला दोस देत न्हाई मी ! सवताच्या रगतानं केलं न्हाई तेवडं तू करतुयास...दमतुयास. माज्यामुळं समद्या घरा-दाराला तरास व्हतुय. त्यो बगून जीव नगूसा जालाय अन त्यो भडवा यमाचा रेडा बी कोंच्या म्हशीमागनं गेलाय कुणास ठावं...माज्या वारगीची समदी गेलीत...मलाच काय हून मागं ठिवलंय काय म्हाईत !” असं म्हणून पदराला बांदल्याली गाठ सोडून त्यात ठिवल्यालं बिस्कूट हातावं देत म्हणली, “हे घे लेकरा...दमला असशील...खा ह्ये बिस्कूट...” नाग्यानं नदरंतलं पानी नदरच्या बांदाव थोपवून धरत त्वांडावरच्या देकण्या बत्तीशीला वाट करून दिली. म्हातारीनं कवतीकानं दोनी हाताची बोटं नाग्याच्या चेर्‍यावरनं फिरवून सोताच्या कानशिलावं मोडली. समदी बोटं काड-काड करत मोडली. दोगं एकमेकाकडं कवतीकानं बगत हसत व्हती अन काय बी समजायच्या आतच हसता-हसताच म्हातारीनं मान टाकली. म्हातारीची मान नाग्याच्या मांडीवं कलांडली. नाग्या तसाच बगत हुता. समुरचं टक्कुर्‍यात घुसायला लई येळ लागला पर जवा समजलं तवा बेंबीच्या टोकापास्नं त्यो बोंबलत म्हातारीला जवळ घिऊन रडाय लागला.

म्हातारी बगता-बगता व्हत्याची न्हवती जाली. त्यो रेडा बी नेमका आजच येयाचा हुता. हा-हा म्हणता म्हातारी ग्येल्याली बातमी समद्या गावात पसरली. ज्यो-त्यो हातातलं काम टाकून नाग्याच्या घराम्होरं जमत हुता अन आत नदर टाकून डोळं पुसत व्हता. नाग्या अजूनबी तसाच म्हातारीला मिट्टी मारून रडत हुता. जाणती लोकं म्होरं जाली अन नाग्याची समजूत घालाय लागली. लई मुश्किलीनं नाग्याला बाजूला केलं. म्हातारीला न्ह्येयाची तयारी केली. समदा गाव आपलंच घरचं कोणतर गेल्यावानी म्होरंहून करत हुता. कोण बी कुणाकडं एक पैसा ईचारत नव्हता. परत्येक जण खिशात हात घालून खर्च करत हुता. म्हातारीनं काय जादू केल्ती समद्यावरनं कुणास ठावक ! तयारी हूस्तवर घोळक्यानं थांबल्याली लोकं कुजबूजत हुतीत, “आता आपुलकीनं कोन साद घालणार ?”, “आई-बा च्या मागारी म्हातारी एकटीच बलवून पिरमानं बिस्कूट द्याची...!”, “आता कशाला कोन म्हनल...दमला असशील लेकरा...ह्ये घे बिस्कूट!”

म्हातारीला जाळायला घिऊन जाताना बारक्या पोरांपास्नं ते आज्ज्यांपरयंत समदी खाल मानंनं सामील जाली हुती. नाग्याची अवस्ता तर लई वाईट झाल्याली. डोळ्यातनं पान्याची धार अजाबात थांबायचं नाव घित न्हवती. म्हातारीला चितंवं ठिवलं अन लाकडावं ठिवलेल्या टायरींवं राकील टाकून नाग्यानं आग पेटिवली. आगीनं जोर पकडला तसा नाग्याच्या अंगातलं अवसान गेलं. नाग्या खाली बसून रडाय लागला. लोकं त्येच्या खांद्यावं हात ठिवून निगून जाया लागली. कवटी फुटल्याला आवाज जाला तशी उरल्याली लोकं बी चितंला नमस्कार करून जाया लागली. नाग्या एकलाच तितं उरला हुता. त्येला तितनं उटायचा धीरचं हुईत नव्हता. आता म्हातारी काय परत येवाची नाई, ह्ये म्हाईत असून बी “लेकरा...” म्हणून साद घालून उटून बसली तर, जवळ कोनतर पायजेच की ! असा ईचार करून तसाच बसून हुता. चितंकडं बगून येड्यागत रडत हुता. लई येळानं चिता ईजायला लागली हुती. चितंची ऊब कमी व्हवून थंडी लागाय लागली तसा नाग्या उटाय लागला अन अचानक उटताना हाताला कायतर लागलं तसा नाग्या गप्पकन खाली बसला. थरथरत आपला हात त्येनं सदराच्या खिशात घातला अन परत हात भाईर घितला. हातात मगाचं ठिवल्यालं बिस्कूट हुतं. नाग्याच्या नदरत परत पानी आलं अन ईजत चालल्याल्या चितंतनं म्हातारीच्या आवाजाचा त्येला भास जाला...., “लेकरा, ह्ये घे बिस्कूट...खा ! दमला अश्शील !!!”

म्हातारीचं गावाबरूबर तसं काय रगताचं नातं नवतं, पर असं असलं तरी सक्क्यापेक्षा कमीबी नवतं...!!!

 

 

-       अनुप  

Pen Image

Pen Index