Pen


PEN 15 : दीर्घकथा १ : रहस्य

सूचना : सदर कथानक काल्पनिक असले तरी यात उल्लेख केलेल्या कांही घटनांना ऐतिहासिक पाया आहे. सत्य आहेत. त्या घटनांचा वापर करून काल्पनिक पात्रांच्या सहाय्याने कथेला आकार देण्याचा प्रयत्न केला आहे पण असे असले तरी त्या घटनांबद्दल मत निर्माण करण्याचा किंवा विकृतीकरण करण्याचा हेतू नाही, याची वाचकांनी नोंद घ्यावी. सदर दीर्घकथा ७ भागांमध्ये प्रकाशित केली जाईल याचीही कृपया नोंद घ्यावी.

-       अनुप

 

दीर्घकथा १ : रहस्य

 

प्रकरण १

भाग १ : इ. स. २००४ (२१ वे शतक)

 

            वास्तविक रोझीवर चिडण्याचं कांही एक कारण नसताना, ऑफीसमध्ये आल्यापासूनच विक्रमची आदळ-आपट आणि आरडा-ओरडा सुरू होता. बाजूच्या ऑफीसमधला शिपाई दोनवेळा येवून आवाज कमी करण्याबद्दल सांगून गेला होता. पण कुणाच्या सांगण्याचा, समजावण्याचा काडीचाही परिणाम विक्रमवर होत नव्हता. हल्ली हे असं वागणं नेहमीचं आणि इतरांच्या सवयीचंही झालं होतं. सुरूवातीला त्याच्या ओरडण्यावर रडणारी त्याची सेक्रेटरी रोझी आता मख्खपणे उभी होती. त्याचं ओरडणं संपल्यावर, “येवू सर मी ? खूप कामं पडलीयेत !” असं म्हणून त्याच्या उत्तराची जराही वाट न पहाता ती निघून गेली होती. बस्स ! विक्रमच्या तळपायाची आग मस्तकात जायला एवढं कारण पुरेसं होतं.

            विक्रम. दिल्ली विद्यापीठात प्रख्यात गणितद्न्य म्हणून ओळखला जायचा. आजवर क्वार्कांची फोड करण्याचं काम कुणी केलं नसलं तरी “क्वार्कांचीही फोड करता येते आणि क्वार्क हा अणू मधला सर्वात लहान घटक नसून क्वार्कांच्याही आत संरचना अस्तित्वात आहेत” हे त्यानं गणिताच्या सहाय्यानं सिध्द करून दाखवलं होतं. आणि त्याला जगातील प्रमुख गणितद्न्य-संशोधकात जागा मिळविण्यासाठी एवढं निमीत्त पुरेसं होतं. एक सन्माननिय व्यक्ती म्हणून विक्रमनं नाव कमावलं होतं. असं असलं तरी त्याचं वय पस्तीशीच्या आतलंच होतं. ‘हुशारी’ ही दैवी देणगी त्याला मिळाली असल्यानं, अगदीच कमी वयात त्यानं खूप कांही कमावलं होतं. ज्या असंख्य गोष्टी त्यानं कमावल्या, त्यापैकीच एक म्हणजे त्याचा अहं...ईगो ! हल्ली विक्रम आपल्या ईगोला प्रमाणापेक्षा अधिक महत्व देवू लागला होता. किरकोळ कारणांवरून चिडचिड करू लागला होता. त्याच्या या चिडचिडी मागं कारणही तसं होतंच म्हणा !

            गेल्या ३-४ वर्षांपासून विक्रम एका संशोधनात व्यस्त होता. सुरूवातीला गंमत म्हणून सुरू केलेला एक प्रोजेक्ट, बघता बघता विक्रमच्या मनावर, मेंदूवर हावी झाला होता. रात्री अपरात्री मधेच उठून, “भयानक आहे हे...खूप भयानक !” असं कांहीतरी बरळायचा. विनिताला त्याची आता काळजी वाटू लागली होती. गेल्या सहा एक महिन्यात तर त्याच्यात खूपच फरक पडला होता. धड जेवत नव्हता, ना नीट झोपायचा. सतत तणावाखाली वावरायचा. कधीतरी धीर करून विनितानं त्याला विचारलंच तर म्हणायचा, “मी एका रहस्याच्या खूप जवळ आलोय. आणि...आणि ते जर खरं असेल तर बर्‍याच गोष्टींचा पाया निखळून पडेल...उत्पात माजेल...” एवढं बोलून तिला जवळ ओढून, तिचे दंड गच्च पकडून तो म्हणायचा, “कुणालाही आत्ताच कांहीच सांगायचं नाही...! करोडो वर्षांचं रहस्य आहे हे...आणखी कांही महिने कुणाला नाही समजलं तर कांही फरक पडणार नाही. कळलं ?” बिचारी विनिता घाबरून मान डोलवायची.

            विनिता आणि विक्रम यांचं लव्ह-मॅरेज असलं तरी बर्‍यापैकी अरेंज झाल्यातलाच प्रकार होता. दोघांच्या घरच्यांनीही अतिशय समजूतदारपणे एकत्र येवून दोघांचं लग्न लावून दिलं होतं. आता याला विनिताचा पायगुण म्हणा किंवा विक्रमच्या इतक्या वर्षांच्या धडपडीचं फळ पण, लग्नानंतर कांहीच दिवसांत त्याला दिल्ली विद्यापीठातून संशोधक म्हणून निमंत्रित करण्यात आलं. त्याच्या पीएच.डी. थिसीसला ‘बेस्ट थिसीस ऑफ इंडिया (मॅथ्स)’ चा पुरस्कार देण्यात आला आणि त्यानंतरच्या थोड्याच वर्षातील “क्वार्क थेअरी”नं तर, त्याला जागतिक ओळख मिळवून दिली होती. याचा परीणाम म्हणजे विक्रम सतत घराबाहेर रहायचा. कधी संशोधनाच्या निमीत्ताने तर कधी भाषण, लेक्चर्सच्या निमीत्ताने. हल्ली तर त्याच्या नव्या संशोधनामुळे आठ-आठ दिवस विनिता आणि विक्रमची भेट होत नव्हती. आणि विक्रमही हल्ली विनिताला जाणून-बुजून टाळत होता.

            लग्नाला ८ वर्षं होवूनही विक्रम-विनिताला मूल नव्हतं. सारे चेकऽप झाल्यावर दोष विनितात नसून विक्रममध्ये आहे हे जेंव्हा त्याला कळलं तेंव्हा तो बिथरून गेला होता. विनिताच्या समजावण्यानंतरही विक्रम आणखीनच विचित्र वागू लागला होता. विनिता त्याला खूप समजून घेण्याचा प्रयत्न करत होती. खरंतर या गोष्टी त्या दोघांमधल्या होत्या पण, नातेवाईक, मित्र-मंडळी, घरचे सतत विनिताला टोमणे मारायचे. तिला कित्येकदा वाटायचं सांगून टाकावं सारं खरं काय ते ! पण, विक्रमवरच्या प्रेमापोटी ती आतल्या आत सहन करत राहिली. अजूनही सहन करत होती. आणखीही सहन करायला तयार होती मात्र, याक्षणी आपल्या नवर्‍याने आपल्याला साथ द्यावी, समजून घ्यावं अशी माफक अपेक्षा विक्रम अजिबातच पूर्ण करू शकत नव्हता. आता त्यात भरीस भर म्हणून हे नवीन संशोधन !

            ‘काय आहे हे रहस्य, जे आपल्या नवर्‍याला दडपण देत आहे ?’ या विचारानं तिनं बर्‍याचदा त्याच्या फायली, नोट्स सारं तपासून पाहिलं पण तिला जे मिळालं ती केवळ आकडेमोड होती, जी तिच्या कुवतीबाहेरची होती. एके रात्री बर्‍याच वेळाने विक्रम घरी आला. विनिता झोपी गेली होती. विक्रम येवून तिच्याशेजारी बसला आणि विनिताच्या डोक्यावरून हात फिरवू लागला. त्या थरथरत्या स्पर्शाने विनिताला जाग आली.

“विक्रम...! काय झालं..?”

त्याच्या नजरेत पाणी पाहून विनिता घाबरून उठून बसली. त्यानंतर बराचवेळ तिचा हात हातात घेवून विक्रम नुसता रडत होता. शांत झाल्यावर, “सॉरी” एवढंच वाक्य तो कसंबसं म्हणाला. उठला. दारापर्यंत जावून थांबला. पुन्हा तिच्या शेजारी येवून बसत म्हणाला,

“विनू...एक विचारू ?”

“विचार ना...”

“विनू आपण एक मुलगी दत्तक घेवूया ?”

विनिताचा या अनपेक्षित प्रश्नाने ऊर भरून आला. भावनावेगाने दोघेही कितीतरी वेळ एकमेकाच्या मिठीत रडले होते.

             बरीच अनाथालयं फिरल्यावर त्यांना एक लहान मुलगी मिळाली. सार्‍या औपचारिकता पूर्ण करून त्यांनी तिला रितसर दत्तक घेतलं. तिच्या स्वागतासाठी सुंदर कार्यक्रमही विक्रमनं आयोजित केला होता. “आहना”, सर्वानुमते त्यांनी तिचं नामकरण केलं होतं. अडीच वर्षांची ती गोड छोकरी विनिताला घट्ट

बिलगून बसली होती. तिला आपल्या छातीशी घट्ट पकडून कुरवाळणार्‍या विनिताला पाहून विक्रमला समाधान वाटत होतं. आहना विक्रम-विनितासोबत आता चांगलीच रुळली होती. तिचा दंगा घरात भरून राहिला होता. कुठलीही गोष्ट तिच्या हाताला ठेवायची खोटी झाली होती. २ रिमोट, ३-४ फुलदाण्या, ३ चार्जर आणि २ मोबाईल यांचा आहनाने चांगलाच समाचार घेतला होता. “आई...बाबा” म्हणून तिने साद घातली की दोघांचाही राग कुठल्या कुठे पळून जायचा. आपल्या बोबड्या बोलीत ती दोघांना भंडावून सोडायची. आपल्या लुटुलुटू पावलांनी घरभर हुंदडायची. विक्रमचा बराचसा वेळ घरीच जावू लागला. रोझी ऑफीसची कागदपत्र सह्यांसाठी घरीच घेवून यायची आणि आहनासोबत खेळत बसायची. सगळ्यांनाच आहनानं वेड लावलं होतं.

            एका दिवाळीच्या सुट्टीत विक्रम, आहना आणि विनिताला घेवून ईजिप्तला गेला होता. गिझाचे पिरॅमिड्स, राजांची दरी, सुर्याचे मंदिर, वस्तू-संग्रहालय असं सारं पहाणं सुरू होतं. मात्र वस्तू-संग्रहालय पाहून आल्यापासून आहनामध्ये फरक पडला होता. फिरण्याच्या नादात सुरूवातीला तो कुणालाही जाणवला नाही मात्र, दिल्लीला परत आल्यावर तो त्यांना स्पष्टपणे जाणवू लागला. आणि खर्‍या अर्थानं इथूनच एका मोठ्या रहस्याला सुरूवात झाली.

             घर डोक्यावर घेणारी आहना अबोल बनली. कागदावर, हातावर, भिंतींवर ती एकच चित्र काढायची. एक मोठ्ठा गोल, त्यावर कसलातरी पक्षी आणि त्या पक्ष्याच्या पायाला गोल गोल वेटोळे. हे चित्र काढताना आहना हरवून जायची. कितीही ओरडलं तरी ती हे एकच चित्र सतत काढायची. विक्रम-विनिताला त्या रात्री भीति वाटली, ज्या रात्री जाग आल्यावर आहना ‘आपल्या शेजारी नाही’, हे विनिताच्या लक्षात आलं. तिनं गडबडीनं विक्रमला उठवलं. दोघं तिला शोधत हॉलमध्ये गेले तर आहना, बाहेरून येणार्‍या अंधुक उजेडात भिंतीवरील तिच्याच चित्राभोवती मोठा गोल काढत होती. विक्रम गडबडीनं तिच्या जवळ गेला आणि त्यानं तिला मिठीत घेतलं. बाबाच्या नजरेत नजर रोखून, आपल्या बोबड्या भाषेत ती त्याला म्हणाली, “बाबा...गोल आहे सगलं !!!”

            त्यानंतरचे कित्येक दिवस विचार करण्यात विक्रमनं घालवले होते. एके दिवशी मनाशी ठरवून विक्रम पुन्हा ईजिप्तला गेला. तो पुन्हा त्याच सर्व ठिकाणी गेला, जिथं त्यानं आहनाला सोबत नेलं होतं. सारं फिरून तो जेंव्हा वस्तूसंग्रहालयात आला तेंव्हा, त्याच्या नजरेला एका कोपर्‍यात ठेवलेली एक कलाकृती पडली. एक गोल, त्यावर नाचणारा मोर आणि मोराच्या पायाला विळखा घातलेला साप ! तो त्या कलाकृतीच्या जवळ जावून निरखून पाहू लागला. सापाने त्या मोराच्या पायाला विळखा घालूनही त्या मोराच्या नजरेत अजिबात भीति दिसत नव्हती. ही त्या कलाकाराची चूक म्हणावी तर इतर तपशील त्यानं बरोबर चितारले होते. आहनाचं चित्र आणि हे चित्र यातील साम्य त्यानं अचूक ओळखलं मात्र त्या रात्री आहनानं काढलेल्या मोठ्या गोलाचं रहस्य मात्र त्याला उमगत नव्हतं.

            हाच सारा विचार करत त्या रात्री विक्रम आपल्या हॉटेलरूममध्ये बसला असताना त्याचा मोबाईल वाजला. विक्रमने स्क्रिनवर नजर टाकली. विनिताचा फोन होता.

“बोल विनू...”

पलिकडून रडण्याचा आवाज आला.

“विनू...विनिता...काय झालंय...? का रडतीयेस ?”-विक्रमनं काळजीनं विचारलं.

“विक्रम...विक्रम...आहना गेली...”

“काय !!???” विक्रम मोठ्याने किंचाळलाच, “कशाने ? काय झालं..??”

 “आज सकाळी तिला ताप आला म्हणून दाखवायला दवाखान्यात गेले. इंजेक्शन, औषधं देवून घरी आणलं. दुपारनंतर इतका ताप वाढला की, अक्षरश: तिच्या अंगाचा चटका बसू लागला. झोपेतच ती बडबडू लागली. हात-पाय एकदमच ताठ करायची. तिला दवाखान्यात नेलं. डॉक्टर म्हणाले, ‘ताप मेंदूपर्यंत गेलाय’

तिला एडमिट केल्यानंतर ती कोणत्याच ट्रिटमेंटला दाद देत नव्हती. तासाभरातच ती गेली...” विनिता सांगता सांगताच रडू लागली. विक्रमच्या डोळ्यांतूनही पाणी ओघळू लागलं. त्याच्या हातातून फोन गळून पडला आणि ओक्साबोक्शी रडू लागला.

            जो विक्रम मोठ्या मुश्किलीने आपल्या कोषातून बाहेर पडला होता तोच विक्रम पुन्हा आपल्या कोषात गुरफटून गेला. आजही वास्तविक रोझीवर चिडण्याचं कांही एक कारण नसताना ऑफीसमध्ये आल्यापासूनच विक्रमची आदळ-आपट आणि आरडा-ओरडा सुरू होता. बाजूच्या ऑफीसमधला शिपाई दोनवेळा येवून आवाज कमी करण्याबद्दल सांगून गेला होता. पण कुणाच्या सांगण्याचा, समजावण्याचा काडीचाही परिणाम विक्रमवर होत नव्हता. हल्ली हे असं वागणं नेहमीचं आणि इतरांच्या सवयीचंही झालं होतं. सुरूवातीला त्याच्या ओरडण्यावर रडणारी त्याची सेक्रेटरी रोझी आता मख्खपणे उभी होती. त्याचं ओरडणं संपल्यावर, “येवू सर मी ? खूप कामं पडलीयेत !” असं म्हणून त्याच्या उत्तराची जराही वाट न पहाता ती निघून गेली होती. बस्स ! विक्रमच्या तळपायाची आग मस्तकात जायला एवढं कारण पुरेसं होतं. तो पुढं होवून कांहीतरी बोलणार तोच त्याची नजर टेबलखाली पडलेल्या एका फोटोवर गेली. याच चित्रासाठी त्याची सकाळपासून चिडचिड सुरू होती. त्यानं पुढं होवून ते चित्र उचललं आणि तो ते निरखून पाहू लागला...गोल, त्यावर नाचणारा मोर आणि मोराच्या पायाला विळखा घातलेला साप !

 

(क्रमश:)

Pen Image

Pen Index