Pen


PEN 15-2 : दीर्घकथा १ : रहस्य : प्रकरण १ : भाग २

सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या लाख लाख शुभेच्छा...!!!

 

मागच्या भागात काय घडले ? : कृपया दुसरा भाग वाचण्यागोदर पहिला भाग वाचावा, जेणेकरून या भागातील गोष्टींशी जुळवून घेता येईल. पहिला भाग सर्वात खाली इंडेक्समध्ये उपलब्ध आहे, याची नोंद घ्यावी.

 

सूचना : सदर कथानक काल्पनिक असले तरी यात उल्लेख केलेल्या कांही घटनांना ऐतिहासिक पाया आहे. सत्य आहेत. त्या घटनांचा वापर करून काल्पनिक पात्रांच्या सहाय्याने कथेला आकार देण्याचा प्रयत्न केला आहे पण असे असले तरी त्या घटनांबद्दल मत निर्माण करण्याचा किंवा विकृतीकरण करण्याचा हेतू नाही, याची वाचकांनी नोंद घ्यावी. सदर दीर्घकथा ७ भागांमध्ये प्रकाशित केली जाईल याचीही कृपया नोंद घ्यावी.

 

 

दीर्घकथा १ : रहस्य

 

प्रकरण १

भाग २ : इ. स. ४३० (५ वे शतक)

(पुढे...)

 

            भगव्या रंगाचे उत्तरीय, त्याच रंगाचे अंतर्वस्त्र, त्यावर अधोवस्त्र पट्ट्याने बांधलेले अधोवस्त्र व डोक्यावर आचार्य दिन्नागांनी प्रचलित केलेली कोनाकृती टोपी घातलेला वर्मन खूपच घाईत दिसत होता. नालंदा विद्यापीठाच्या चार मजली संघारामात (गुरूकुल किंवा रेसिडेन्शियल स्कूल) तो शिक्षणासाठी रहात होता. नालंदा विद्यापीठ जगातील प्रमुख शैक्षणिक केंद्रापैकी एक महत्वाचे केंद्र होते. १००० आचार्य व ४००० विद्यार्थी असा हा परिवार होता. (*उत्खननात सापडलेल्या शिलालेखांमधून ही माहिती सापडते.) विद्यापीठाचे आवारही खूप मोठे होते. विद्यापीठाच्या आवारातच वेगवेगळे शिक्षण देणारे सहा संघाराम आणि त्यांच्या एकूण ३०० खोल्या असा आवाका होता. प्रत्येक संघारामात किमान ४० खोल्या असत.

(* ही माहिती चिनी प्रवासी ‘इत्सिंग’ याच्या ‘चुल्लवग्ग’ या ग्रंथात सापडते) विद्यापीठाचे ग्रंथालयही प्रचंड होते. ग्रंथालयाच्या ३ इमारती होत्या. ‘रत्नसागर’, ’रत्नोदधी’, आणि ‘रत्नरंजक’. यापैकी ‘रत्नोदधी’ ही ९ मजली इमारत विद्यापीठाची शोभा होती. (*ह्यू-एन-त्संग आणि इत्सिंग या दोघांनीही आपापल्या ग्रंथात ही माहिती लिहून ठेवली आहे.) विद्यापीठाच्या वेधशाळा तर त्यांचा जीव होत्या. प्रत्येक इमारत ही १० मजल्यांपेक्षाही ऊंच होती. इथे लावलेले जलघटीकापात्र जगातील अनेक विद्वानांसाठी कुतूहलाचा विषय होता.. (*इत्सिंग लिखित ‘चुल्लवग्ग’)

            वर्मन यवदीप (*आजचे बाली) इथला रहिवासी होता. त्याला नालंदा इथे शिक्षण घेण्याची इच्छा होती. मात्र यवदीपहून तिथे जाणे...तेही समुद्र पार करून, त्याला ते शक्य नव्हते. वर्मनला यवदीपचा राजा बालपुत्रदेव आणि बंगालचा पाल राजा देवपाल यांची मैत्री ठाऊक होती. तसेच देवपालने नालंदासाठी पाच गावे दान दिल्याचे आणि एक मोठा संघारम बांधून दिल्याचेही ऐकिवात होते. (*उत्खननात सापडलेल्या विहारांच्या भिंतीवर हा उल्लेख सापडतो.) वर्मनने बालपुत्रदेवाच्या मदतीने नालंदा इथे शिक्षणासाठी प्रवेश मिळवला. शब्दविद्या, अधात्मविद्या, शिल्पविद्या (*आर्किटेक्चर), चिकित्सविद्या (*आयुर्वेद), हेतुविद्या (*तर्कशास्त्र) हे विषय त्यानं विशेष म्हणून निवडले होते.

            आज सकाळी वर्मन लवकर उठला होता. दातवण करून भाताची पेज भरपूर प्यायला होता. न्याहारी आटोपताच तो पंडीत धर्मपालांना शोधण्यासाठी बाहेर पडला. ‘पंडीत’ ही नालंदातील सर्वोच्च्य पदवी होती. आणि ही पदवी मिळवणार्‍या व्यक्तीला नालंदा, तक्षशिला (*हल्ली पाकिस्तानात), विक्रमशिला (*बिहारमधील भागलपूरजवळ), वलभी या चार प्रमुख विद्यापीठांचा प्रमुख म्हणून नियुक्ती केली जात असे. (हा उल्लेख ‘शांतीदेव’ (इ.स.६९७-इ.स.७४३) या थोर पंडीताच्या ‘शिक्षासमुच्चय’ या ग्रंथात सापडतो.)

दरवर्षी ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षात येथील पंडीतांना त्यांच्या नव्या संशोधनावर व्याख्यान द्यावे लागे. कालच तो समारोह संपन्न झाला होता. पंडीत धर्मपालांनी एका कलाकृतीवरील आपले संशोधन सर्वांसमोर मांडले होते. ती कलाकृती शुक्रादित्य राजा अर्थात गुत्प राजवंशातील कुमारगुप्त यांना नालंदाच्या मुख्य संघारामासाठी पाया खणताना सापडली होती. पाया खणताना त्याच्या हातून एक नाग मारला गेला होता. ज्योतिषांच्या म्हणण्यानुसार हा अपशकुन होता पण, बांधकाम इथेच करावे कारण...इथे बांधलेला संघाराम जगभर प्रसिध्द पावेल व पुढची हजारो वर्षे भरभराटीस येईल. मात्र नागाला ईजा झाल्याने अखेरीस रक्तपात होईल कारण, ‘नालंदा’ नावाचा नाग इथे पूर्वी रहात होता. त्याच्याच नावावरून या जागेला नालंदा नाव मिळाले व हा नाग त्याच पवित्र नावाचा वंशज होता ! 

 

(*या घटनेला नालंदाच्या इतिहासात अनन्यसाधारण महत्व दिलं गेलं आहे. पाया खणण्याचा व त्याच्याशी निगडीत नाग मारला गेल्याचा प्रसंग इतिहासात नमूद आहे. त्याकाळी ज्योतिषांनी वर्तवलेले भाकित खरे ठरल्याचे दिसून येते. शुक्रादित्य अर्थात कुमारगुप्ताचा मुलगा स्कंदगुप्त (इ.स.४५५-६७) याच्या कारकिर्दीत हूणांची स्वारी झाली. ‘हूण’ ही मध्य आशियातील वाळवंती प्रदेशातील एक भटकी जमात. त्यांचा पुढारी ‘तोरमाण’ याने भारतावर स्वारी केली. त्याच्यासोबत त्याचा मुलगा मिहीरकूल हाही होता. त्यांनी संघाराम उध्वस्त केले. नालंदातील सर्व संघाराम जाळले. पुढे बालादित्य अर्थात नरसिंहगुप्त याने नालंदाची नव्याने स्थापणा केली. इथून पुढे म्हणजे इ.स.१२०५ पर्यंत, सुमारे ८०० वर्षे नालंदाची भरभराट झाली.)

 

              आणि याच उत्खननात सापडलेल्या कलाकृतीवर पंडीत धर्मपालांनी आपले संशोधन प्रस्तुत केले होते. काय होती ही कलाकृती...? एका गोलावर एक मोर आपल्या एका पायावर पिसारा फुलवून उभा होता. त्याच्या पायाला एका नागाने विळखा घातला होता आणि तरिही तो मोर आनंदी दिसत होता ! पंडीत धर्मपालांनी जे कांही सांगितले ते ऐकून वर्मन आचंबित झाला होता. ती कलाकृती तर त्याच्या नजरेसमोरून हटतच नव्हती. रात्रभर जागरण करून हेतुविद्येच्या सहाय्यानं त्यानं आपलं मत तयार केलं होतं आणि ते आपल्या गुरूंना दाखवून त्यांच्याकडून त्याला योग्य मार्गदर्शन मिळवायचं होतं.

            वर्मनने ईशान्येकडील संघारामात प्रवेश केला. पायातील सपाता त्याने बाहेरच ठेवल्या. नम्रतापूर्वक पायरीवर डोकं टेकवून त्यानं अभिवादन केलं. आचार्य नव्हते मात्र तिथे बाला कसलंसं वाचन करत बसला होता. वर्मनने बालाला आचार्यांविषयी विचारलं. तेंव्हा त्याला आचार्य रत्नरंजकमध्ये अभ्यासासाठी गेल्याचं समजलं. त्यानं लगेच आपला मोर्चा रत्नरंजकच्या दिशेने वळवला. आचार्य रत्नरंजकमध्ये बसून कालच्या त्यांच्या संशोधनाविषयीचं लिखाण करत होते.

“अभिवादन आचार्य...” मान झुकवून वर्मन म्हणाला.

 “वर्मन ? तू यावेळी इथे काय करतोयेस ? तू शब्दविद्येवरील महंतांच्या चर्चेस गेला नाहीस ?”

“आचार्य, याची सबब मजजवळ आहे. किंतु आपण जर मजसोबत याल तर मी योग्यप्रकारे तुमचं समाधान करू शकेन !” वर्मन मान वर न उचलताच म्हणाला.

“कुठं जायचं आहे वर्मन ?” आचार्यांनी आपलं लिखाण थांबवत विचारलं.

“शिल्पविद्येच्या प्रांगणात आचार्य...”

“आत्ताच जाणं खरंच गरजेचं आहे का ? मी माझ्या संशोधनाविषयी लिखाण करत आहे...”

“आचार्य आपण जर मजसोबत आलात तर त्याचा फायदा आपल्या संशोधनालाच होईल, याची मी खात्री देतो...”

“ठिक ! चल....” दीर्घ श्वास घेवून आचार्य म्हणाले.

            धर्मपाल वर्मनसोबत शिल्पविद्येच्या संघारामाकडे चालू लागले. वर्मन त्यांना एका खोलीत घेवून आला.

“वर्मन, तू इथं का आणलं आहेस मला...?” खोलीवरून नजर टाकत आचार्यांनी विचारलं.

“आचार्य, ही वास्तू कमलशिल रहाण्यासाठी वापरतो...”

“बरं मग...?”

“मी आचार्यांना त्यानं बनवलेली एक कलाकृती दाखवू ईच्छितो, जी त्यानं तीन मासांपूर्वी बनवली आहे. तेंव्हा त्याला किंवा आमच्यापैकी कुणालाच आपल्या संशोधनाविषयी ठाऊक नव्हतं !”

“दाखव...” आचार्य कपाळावर आठ्या घालत म्हणाले.

वर्मन आतील खोलीत जावून ती कलाकृती घेवून आला. आचार्यांना ती कलाकृती पाहून धक्का बसला...

गोल, त्यावर नाचणारा मोर आणि मोराच्या पायाला विळखा घातलेला साप !

(क्रमश:)

Pen Image

Pen Index