मागच्या भागात
काय घडले ? : कृपया, प्रकरण पहिल्यातील तिसरा भाग वाचण्यागोदर प्रकरण पहिल्यातील
पहिला आणि दुसरा भाग वाचावा, अन्यथा या भागातील गोष्टींशी जुळवून घेता येणार नाही.
पहिला-दुसरा भाग सर्वात खाली इंडेक्समध्ये उपलब्ध आहे, याची नोंद घ्यावी.
सूचना : सदर
कथानक काल्पनिक असले तरी यात उल्लेख केलेल्या कांही घटनांना शास्त्रीय पाया
आहे. त्या घटनांचा वापर करून काल्पनिक
पात्रांच्या सहाय्याने कथेला आकार देण्याचा प्रयत्न केला आहे पण असे असले तरी त्या
घटनांबद्दल मत निर्माण करण्याचा किंवा विकृतीकरण करण्याचा हेतू नाही, याची
वाचकांनी नोंद घ्यावी. सदर दीर्घकथा ७ भागांमध्ये प्रकाशित केली जाईल याचीही कृपया
नोंद घ्यावी.
-
अनुप
दीर्घकथा १ : रहस्य
प्रकरण १
भाग ३ : पु.व. ७३४ (१८ वे सुर्य-वर्ष)
(पुढे...)
आहना ईलिव्हेटरमधून बाहेर आली आणि
बाहेर तिची वाट पहात उभ्या असणार्या पत्रकारांनी तिच्याभोवती गलका केला. आताशा आहनाला
या सार्याची सवय होवून गेली होती. आहना एक नामवंत आर्किओलॉजिस्ट प्रसिध्द होती. “दी
आर्किओलॉजिकल स्टडी ऑफ अवर प्लॅनेट : केप्लर ४५२-बी.”, या तिच्या पहिल्याच
पुस्तकानं तिला तिची स्वत:ची ओळख मिळवून दिली होती. आणि आजही तिचं अशाच एका
विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं. आयोजक गर्दीतून वाट काढत तिला
मंचापर्यंत घेवून गेले. स्वागत वगैरे सोपस्कार पूर्ण झाल्यावर आहना बोलायला उभी
राहिली, “कोण आहोत आपण? का आहोत आपण? कशासाठी आहोत आपण? मानवाचं या विश्वाच्या
पसार्यात काय स्थान आहे? का मानव आपला वंश टिकविण्यासाठी युगानुयुगे या ग्रहावरून
त्या ग्रहावर वस्तीयोग्य जागा आणि आपल्यासारखा दुसरा सजीव शोधत फिरतोय? कदाचित हेच
त्याच्या अस्तित्वात येण्याचं गुपित असू शकेल का? मूळात आपण सारे अर्थात मानव वंश ‘बंजारे’
आहोत...एका ग्रहावरून दुसर्या ग्रहावर फिरणारे ! पहिल्या ग्रहावरील मानव, दुसर्या
ग्रहावरील अविकसित मानव सजीवांसाठी किंवा सुरूवातीच्या पिढीसाठी देव असतो !! या आपल्या
ग्रहावर अर्थात, अर्थ-२ वर रहायला येवून आपल्याला साधारण १७ सुर्य वर्षं पूर्ण
झालीयेत....पूनर्वसन वर्ष (रिहॅबिलीटेशन ईयर) ७३४ आपल्या सर्वांसाठी, जिथून आपण
इथं आलो...ती पृथ्वी “मदर अर्थ”, दुसर्या भाषेत “स्वर्ग” आहे आणि हा ग्रह, अर्थ-२
! भविष्यातील पिढ्यांसाठी हा ग्रह “मदर अर्थ” असेल आणि नवीन ग्रह, पृथ्वी-२ !!
थोडंस बोजड वाटतंय ना ? आपल्या पूर्वजांनी जी माहिती मागे ठेवली आहे, त्यावरून एक
लक्षात येतं की, आपल्या त्या ग्रहावर, जो सध्या ओसाड बनला आहे, तिथेही “एलियन
थेअरी” अस्तित्वात होती पण धर्माचा पगडा एवढा होता की, ते सत्य स्विकारण्याची
हिम्मत नव्हती कुणामध्ये किंवा असलीच तर त्याचा आवाज दाबून टाकला जायचा ! याचा
परिणाम व्हायचा तोच झाला, तिसरं महायुध्द पाणी किंवा ऑक्सिजनसाठी नव्हे तर,
धर्मासाठी, वंशश्रेष्ठत्वासाठी झालं आणि पृथ्वीचा विनाश झाला ! याचा फायदा
म्हणा...जी शहाणी पिढी या ग्रहावर आली त्यांना एक गोष्ट फार लवकर समजली, ती
म्हणजे, “भूतदयेपेक्षा धर्माला अधिक महत्व प्राप्त झालं की, विनाश अटळ असतो...!”
आणि म्हणूनच आपल्या पूर्वजांनी धर्माला या ग्रहावर थारा दिला नाही !
इ.स. २११६ सालची धूमकेतूसोबतची
पृथ्वीची टक्कर अटळ आहे, हे सर्वांच्याच लक्षात आलं होतं आणि म्हणूनच नासा (नॅशनल
एरोनॉटिक्स एण्ड स्पेस एडमिनिस्ट्रेशन), इस्रो (इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायजेशन),
रॉसकॉसमॉस (रशियन एव्हिएशन एण्ड स्पेस एजन्सी), इएसए (युरोपियन स्पेस एजन्सी),
एएसआरआय (ऑस्ट्रेलियन स्पेस रिसर्च इन्स्टिट्यूट), जॅक्सा (जपान एरोस्पेस
एक्सप्लोरेशन एजन्सी) यांच्या संयुक्त उपक्रमातून प्रत्येक उपखंडांतून
शास्त्रद्न्य, इंजिनिअर, लेखक, आय.टी. तद्न्य, वकिल, सी.ए., वेगवेगळ्या विषयातील
तद्न्य डॉक्टर्स यांच्या परिक्षा घेवून सर्वात जास्त आय.क्यू. असणार्या सर्व
क्षेत्रातील तद्न्य लोकांना निवडून केप्लरवर घेवून जाण्याची योजना राबवण्यात आली.
यामागचा उद्देश एवढाच होता की, मानववंश अस्तित्वात रहावा आणि पुन्हा शून्यातून
सुरूवात करण्याऐवजी जिथे थांबलो तिथून पुढे उत्क्रांती घडावी ! पण प्रश्न हा होता
की, पृथ्वीपासूनचं केप्लरचं अंतर १,४०० प्रकाशवर्ष इतकं होतं. एक प्रकाशवर्ष
साधारण ५.८८ ट्रिलियन मैल इतका पकडला तर हे अंतर खूप जास्त होतं पण असं असलं तरी
इ.स. २००५ साली सापडलेला हा वस्तीयोग्य ग्रह पृथ्वीपासून सर्वात जवळ होता आणि
ज्याचं परिवलन-परिभ्रमण सर्वसाधारणपणे पृथ्वी इतकंच होतं. पृथ्वीला सुर्याभोवती
फिरायला ३६५ दिवस लागायचे तर केप्लरला ३८५ दिवस. ०.६ पटीने केप्लर पृथ्वीपेक्षा
मोठा होता. पाण्याचा साठाही पृथीपेक्षा जास्त होता. आपल्या सुर्यमालेतील पृथ्वीच्या
स्थानाप्रमाणच केप्लरचं स्थान होतं. पण प्रश्न होता तिथवर पोहोचण्याचा !
प्रकाशाच्या वेगानं जायचं म्हंटलं तरी १,४०० वर्षं लागणार हे उघड होतं. त्यामुळंच
अनेक अयशस्वी प्रयत्नांनंतर वेगवेगळ्या वयोगटातील आणि कांही अनफर्टिलाईज्ड एग्जना
“हायबरनेशन स्टेट” मध्ये ठेवून त्यांची वाढ-विकास ७० ते १०० पटीने कमी करून तिथवर
पोहोचवणं हा एकच पर्याय उपलब्ध होता पण त्यातही रिस्क होतीच ! “चोजन वन” ना घेवून
२१०४ साली ८ स्पेस-बस वेगवेगळ्या स्टेशन्सवरून एकाच वेळी सोडण्यात आल्या, ज्यात
विविध तद्न्य, सर्वसाधारण लोक, जनावरं, फळांच्या-फुलांच्या बिया, उपकरणं, उपकरणं
बनवण्याची पध्दत आणि आजवरची सर्व माहिती-बिग बॅंगपासून पृथ्वीचा विकास, विविध
प्रजाती, वंश, प्राचीन सभ्यता, आर्किटेक्चर यांची कोडींग केलेली सर्व माहिती ठेवण्यात
आली होती.
१,४०० वर्षांनंतर जेंव्हा पृथ्वीवरचा
मानव केप्लरवर उतरला तेंव्हा निसर्गाने चमत्कार केला होता. इथेही जीव अंकूरू लागले
होते. इथला अविकसित मानव गुफांमधून रहात होता. पहिल्यांदा आगीचे गोळे जमिनीवर
येताना पाहून, आकाशातून देवदूतच आले की काय समजून त्यांनी गुहेच्या छतांवर
हेल्मेटधारी देवांची चित्रे कोरली. पृथ्वीवरील सुंदर ललनांना देवी समजलं जावू
लागलं. पृथ्वीवासीय या मागास जमातींना शिकवण्यासाठी अथक प्रयत्न करत होते. जी लेखन
शिकवत होती ती त्यांच्यासाठी ‘सरस्वती’ होती, जो शल्यविद्या शिकवत होता तो
त्यांच्यासाठी ‘जीवक/हिप्पोक्रेटिस’ होता, जो आर्किटेक्चर शिकवायचा तो
त्यांच्यासाठी ‘विश्वकर्मा/इमहोतेप’ होता. ज्यानं “हायबरनेशन” मधील गर्भांना
आपलं
व्याख्यान संपवून, ठरल्याप्रमाणे आहना आपलं पक्षीयान घेवून सेंट्रल लायब्ररीच्या
३१४ व्या मजल्यावर आली. पार्किंगमध्ये गोविल तिचीच वाट पहात आपल्या पक्षीयानाभोवती
फेर्या मारत होता. आहनाला उतरताना पाहून तो उत्तेजीत होवून तिच्या दिशेनं धावला
आणि तिला आपल्या मिठीत घेवून अभिवादन म्हणून तिच्या ओठांचं हळूवार चुंबन घेतलं.
गोविलला पाहून आहनाच्या चेहर्यावर समाधान पसरलं. गोविल हा आहनाचा सामंजस्य सोबती
होता. लग्न ही संकल्पना केप्लरवर अस्तित्वात नव्हती. दोन भिन्न लिंगीय व्यक्ती
सामंजस्याने भावनिक पातळीवर एकत्र येवून एकाच छ्ताखाली राहू शकत होत्या, अपत्यांना
जन्म देवू शकत होत्या. अपत्य १० वर्षांचे झाल्यावर त्याला आई-वडिलांपासून अलग करून
बोर्डींगमध्ये ठेवलं जाई आणि त्याचा आय.क्यू. आणि कल पाहून तशाच पध्दतीचे शिक्षण
देवून त्याला रोजगारयोग्य बनवले जाई. अपत्य झाल्यावर ते १० वर्षांचे होवूपर्यंत
मात्र त्या पालकांना विभक्त होण्यास सक्त मनाई होती तसेच एका जोडप्याकडून एकच
अपत्य हा नियम सर्वांनाच पाळावा लागे. दोघे विभक्त झाल्यावर नवीन जोडीदारासोबत ते
नव्या अपत्याला जन्म देवू शकत होते. विचारांमध्ये, व्यक्तींमध्ये विविधता यावी, हा
त्यामागचा हेतू होता !
“या हवाई
ट्रॅफिकने वैताग आणलाय नुसता !” आहना त्याचा हात हातात घेत सरकत्या रस्त्यांवर पाय
ठेवत म्हणाली.
“त्याला
पर्याय नाही स्विटहार्ट...” तिच्या कमरेला हाताचा विळखा घालत गोविल म्हणाला.
सरकत्या
रस्त्यांनी दोघांना त्यांच्या केबिनसमोर आणलं. दोघे उतरून व्हर्च्युअल स्कॅनिंग
करून आत निघून गेले.
आहना आर्किओलॉजीची अभ्यासक होती आणि
गोविल सेंट्रल लायब्ररीमधील आर्किओलॉजी विभागाचा प्रमुख म्हणून काम पहात होता.
यातूनच दोघांची ओळख झाली आणि ओळखीचं रूपांतर प्रेमात आणि मग सामंजस्य सोबतीत झालं
होतं. आहना पृथ्वीवरील भारतीय वंशाची होती आणि गोविल हा आफ्रिकन वंशाचा होता. पण
आता त्यांनाच या गोष्टीची माहिती नव्हती. खर्या अर्थाने ते आता केप्लरवासीय होते.
दोघे एका गोलाकार व्हर्च्युअल डेस्कसमोर येवून उभे राहिले.
“हनी, काय
माहिती मिळाली...?”-आहनानं आठ्या घालत विचारलं.
“बरीच माहिती
मिळालीये पण, हे सारं के-१८ शिवाय शक्य नव्हतं....”-गोविल एका कोपर्यात बोट करत
म्हणाला. आहनानं त्या कोपर्यात प्रसन्नपणे पाहिलं. विजेच्या सॉकेट्समध्ये बोटं
खुपसून के-१८ हा अद्ययावत सेल्फ कमांडवर काम करणारा रोबोट बसला होता. त्याच्या
नजरेनं आहनाच्या चेहर्यावरचं स्मित ओळखलं आणि त्यानंही तिच्याकडं पाहून स्मित
केलं. के-१८ हा रोबोट असला तरी वर-वर त्याला मानवाप्रमाणेच हात-पाय, डोळे, नाक,
कान, तोंड होते. यामुळे तो जोवर बोलत नसे तोवर तो रोबोट आहे, हे कुणालाच कळणं शक्य
नव्हतं.
“मला एक कळत
नाहिये, काल रात्रीपासून तू इतकी का एक्साईट झालीयेस या संदर्भात माहिती
मिळवण्यासाठी ?”-गोविल
“आहे...तसंच
एक खास कारण आहे ! पण मी ते तुला नंतर सांगेन.....”-आहना
गोविल आणखी
कांहीतरी बोलणार तोच समोरच्या व्हर्च्युअल स्क्रिनवर इंटरकॉलचे बटन व्हायब्रेट
होताना दिसू लागलं. गोविलने पुढे होवून ते बटन प्रेस केलं तसं, लायब्ररीच्या हेड
मिस ज्युलियन पडद्यावर डोळे
वटारून बघताना
दिसू लागल्या. गोविलला अत्यंत तातडीने ४८ व्या मजल्यावर मिटींगसाठी यायला
सांगितलं
होतं. फ्लोअर ४८ म्हंटल्यावर तिघांनीही आश्चर्यानं एकमेकांकडं पाहिलं. गोविलनं
काळजीनं के-१८ कडं पाहिलं.
“डोन्ट वरी
गोविल...नको काळजी करू...कांही होणार नाही मला...”-के-१८ नं आपल्या रोबोटीक आवाजात
सांगितलं.
फ्लोअर ४८ हा अत्यंत गोपनिय कागदपत्रांचा मजला होता, जिथे पृथ्वीवरील कोडेड
माहिती आजही जपून ठेवली होती आणि कोणत्याही कायदेशीर परवाणगीशिवाय कुणालाही तिथं
प्रवेश करणं शक्य नव्हतं.
“कांही झालंय
का ?”-आहनानं के-१८ कडं पहात काळजीनं विचारलं.
गोविलनं पुढं
होवून तिच्या कपाळाचं चुंबन घेतलं,
“ईट्स ओके.
आल्यावर बोलू...तू जितक्या लवकर शक्य होईल, तितक्या लवकर घरी जा. मी येतोच.” गोविल
तिच्या उत्तराची वाट न पहाताच सरकत्या जिन्यावर उभा राहून ईलिव्हेटरच्या दिशेने
निघाला होता. आहनानं आपला मोर्चा के-१८ च्या दिशेनं वळवला तसा तो तिची नजर चुकवू
लागला. के-१८ तिच्या जवळ आला आणि तिच्या कानाजवळ आपलं तोंड नेत पुटपुटला, “तुला जी
एडिशनल माहिती हवी होती, ती मिळवण्यासाठी मला फ्लोअर ४८ चा डाटा-स्लॅब हॅक करावा
लागला !”
आहनाच्या
भुवया विस्फारल्या गेल्या. तिच्या चेहर्यावर भिती उमटली.
“तुझा विचार
योग्य असावा बहुधा..”-के-१८
“म्हणजे..?”-आहना
“तुला जी
कलाकृती शोधायची होती, तशाच कलाकृतीशी साधर्म्य असणार्या २ कलाकृती केप्लरवरही
अस्तित्वात आहेत आणि साधारण तशाच ३ कलाकृती पृथ्वीवरही अस्तित्वात होत्या, शिवाय
ज्यांच्याजवळ अशा कलाकृती होत्या, त्यांचा गूढ मृत्यू झाल्याचीही माहिती उपलब्ध
आहे. ज्यांच्याजवळ ह्या कलाकृती सापडल्याचा उल्लेख आहे, त्यात एक ईजिप्शियन
कारागिर होता जो आकस्मितपणे उलट्या होवून मरण पावला. दुसरा होता नालंदा
विद्यापीठातील एक गुरू...पंडीत धर्मपाल, जो मानेची शीर आडकून मरण पावला आणि त्याचा
शिष्य वर्मन, त्याच रात्री नदीच्या प्रवाहात वाहून गेला. तिसरा गणितद्न्य होता, डॉ. विक्रम, जो
हृदयविकाराच्या झटक्यानं मरण पावला. विशेष म्हणजे, त्याच्याही कन्येचं नाव आहनाच
होतं...! डॉ. विक्रमसोबत आणखी एका व्यक्तिचा मृत्यू झाला पण “बेवारस” एवढीच त्याची
ओळख आहे. त्या व्यक्तिसंदर्भात इतर कोणताच तपशील उपलब्ध नाहीये !! पण मला एक कळत
नाहीये...तुला त्यांच्यात इतका का इंट्रेस्ट आहे ?”-के-१८ नं उत्सुकतेनं विचारलं.
“कारण, काल
रात्री मी टी.व्ही.वर न्यूज ऐकली की, १२,००० वर्षांपूर्वीची एक कलाकृती उत्खननात
सापडली आहे, जिचे ६००० वर्षांपूर्वीच्या विलोडीयन राज्याच्या राज्यप्रतिमेशी
साधर्म्य आहे !”-आहना
“मग ?”-के-१८
“तुला
माहितीये...पृथ्वीवर जशा त्याच ३ कलाकृती होत्या तशाच आत्ताही ३ कलाकृती केप्लरवर
अस्तित्वात आहेत !”-आहना
आहनानं आपला
सिम्प्युटर व्हच्युअल डेस्कशी कनेक्ट केला आणि एक इमेज ओपन केली. त्या इमेजकडं
पहात आहना म्हणाली,
“मागच्या आठवड्यात
गंमत म्हणून मी हे चित्र काढत बसले होते....” आहनानं के-१८ कडं पाहिलं. तो विचित्र
नजरेनं त्या इमेजकडं पहात होता. स्क्रिनवर एक चित्र दिसत होतं....
गोल, त्यावर
नाचणारा मोर आणि मोराच्या पायाला विळखा घातलेला साप !
(क्रमश:)
COGNIZANCE: All written creative material is the solemn property of “An Anup
Jatratkar Multi-Media Production”. If anyone wanted to use it for his/her own
personal purpose (i.e. short film, projects, blogs, articles, scripts, FB posts
etc.) then, have to take proper permission from, Mr. Anup Jatratkar. If it will
be found that, anyone is involved in such activities without prior permission,
then, we are able to take certain charge on him/her.