Pen


PEN 15-4 : दीर्घकथा १ : रहस्य : प्रकरण २ : भाग १ : इ. स. २००४ (२१ वे शतक)

मागच्या भागात काय घडले ? : कृपया ‘प्रकरण दुसरे’ वाचण्यागोदर ‘प्रकरण पहिले’ वाचावे, अन्यथा या भागातील गोष्टींशी जुळवून घेता येणार नाही. ‘प्रकरण पहिले’ सर्वात खाली इंडेक्समध्ये उपलब्ध आहे, याची नोंद घ्यावी.

 

सूचना : सदर कथानक काल्पनिक असले तरी यात उल्लेख केलेल्या कांही घटनांना ऐतिहासिक पाया आहे. सत्य आहेत. त्या घटनांचा वापर करून काल्पनिक पात्रांच्या सहाय्याने कथेला आकार देण्याचा प्रयत्न केला आहे पण असे असले तरी त्या घटनांबद्दल मत निर्माण करण्याचा किंवा विकृतीकरण करण्याचा हेतू नाही, याची वाचकांनी नोंद घ्यावी. सदर दीर्घकथा ७ भागांमध्ये प्रकाशित केली जाईल याचीही कृपया नोंद घ्यावी.

-       अनुप

 

दीर्घकथा १ : रहस्य

 

प्रकरण २

भाग १ : इ. स. २००४ (२१ वे शतक)

(पुढे...)

 

           

            घड्याळात रात्रीचे अडीच वाजले होते. विक्रम छताकडं नजर रोखून पडला होता. विनिता त्याच्या अंगावर हात टाकून गाढ निजली होती. विक्रमनं आपली नजर तिच्याकडं वळवली. तिचा निरागस चेहरा पाहून विक्रमला स्वत:चंच आश्चर्य वाटलं. त्याच्या मनात विचार आला, “आपणच का गेली चार वर्षं वेड्यासारखा विचार करत आहोत ? का माझ्यात हिच्या चेहर्‍यावर आहे तसाच भाव येत नाही ? मीच का अस्वस्थ होतोय ? विनितानं किती मोठ्या हिमतीनं आहनाचा मृत्यू पचवला आणि मी मात्र, अजूनही स्वत:ला सावरू शकत नाहीये ? आहनाला जे समजलं तेच मलाही समजलं असेल का ? पण मग आहनालाच का समजलं ?” तो स्वत:लाच कोडी घालत होता आणि स्वत:च्या मनाने विचारलेल्या प्रश्नांनां त्याचा मेंदू उत्तर देवून मनावर मात करण्याचा प्रयत्न करत होता. बराच वेळ विचार केल्यावर त्यानं घड्याळाकडं नजर टाकली. “फक्त पाच मिनीटंच झालीयेत !!!!” तो मनातल्या मनात चरफडलाच. भुवया उडवत त्यानं आईन्स्टाईनच्या सापेक्षतावादाला शिव्याची लाखोळी वाहिली. त्याच्या शिव्या देवून संपतात न संपतात तोच, विक्रम अचानक हसू लागला. त्याला आपल्या शाळेतील एका शिक्षकांची आठवण झाली, जे त्याला सापेक्षतावाद शिकवायचे. सापेक्षतावाद शिकवताना एकदा त्यांनी एक उदाहरण दिलं होतं,

“काळ हा व्यक्तीसापेक्ष असतो मुलांनो. म्हणजे काय ? तर...व्यक्तिच्या मन:स्थितीनुसार, त्याच्या वेगानुसार काळ त्या एकाच व्यक्तीसाठी मर्यादीत असतो. समजा...समजा हं...तुम्ही तुमच्या आवडत्या मैत्रिणीसोबत असताना वेळ चटकन संपल्यासारखा वाटतो आणि नावडत्या तासाला जांभया आणि तास...दोन्ही संपता संपत नाहीत !” असं म्हणून स्वत:च्याच विनोदावर खूश होवून शिक्षक टेबलवर हात मारून मोठ्याने हसायचे. सहामाहीच्या परिक्षेत मात्र विक्रमने हेच उदाहरण लिहील्यावर मात्र त्याला त्याच शिक्षकांचा ओरडा खावा लागला होता.

            विक्रम शाळेतल्या आठवणीत रमला. गालावर मंद स्मित उमटलं होतं. गंमत म्हणून त्यानं घड्याळावर नजर टाकली. पावणेचार वाजले होते. विक्रमच्या भुवया पुन्हा उंचावल्या गेल्या आणि स्मित करत त्यानं पुन्हा आपली नजर छताकडं वळवली. विक्रमला गणित आणि विद्न्यान हे दोनच विषय आवडायचे. बाकीचे विषय कशासाठी शिकायचे ? हे कोडं त्याला आजही पडलं होतं. आहना असती तर तिला फक्त याच दोन विषयात प्राविण्य मिळवू द्यायचं, असं त्यानं कधीचं मनात ठरवलं होतं. विक्रमचा सर्वात नावडता विषय म्हणजे, ईतिहास ! राजा पहिला, दुसरा, आठवा आणि त्या सनावळ्या...विक्रमला कधीच लक्षात राहिल्या नाहीत. विचार करता करताच विक्रम गंभीर झाला. त्याच्या नजरेसमोर त्याचे ईतिहासाचे शिक्षक उभे राहिले आणि त्यांचं नेहमीचं एक वाक्य त्याच्या कानात रेंगाळू लागलं,

“स्पॅनिश-अमेरिकन तत्वद्न्य जॉर्ज सॅन्टायना (George Santayana) म्हणतो कसा...,those who cannot remember the past are condemned to repeat it ! अर्थात, ज्यांना त्यांचा भूतकाळ किंवा ईतिहास आठवत नाही ते त्याची पुनरावृत्ती करून ईतिहासाची निर्भत्सना करतात. आणि मुलांनो, त्यावरूनच एक म्हण आज अस्तित्वात आलीये...ती म्हणजे, हिस्ट्री रिपीट ईटसेल्फ (history repeat itself) !!!” शेवटचं वाक्य आठवून विक्रम अंथरूणातून ताडकन उठून बसला. तो इतक्या जोरात विनिताचा हात झटकून उठला की त्याच्या उठण्याने विनिता दचकून जागी झाली. विक्रमचे डोळे विस्फारले गेले होते. तो ट्रान्समध्ये असल्यासारखा वावरत होता.

“विक्रम...काय झालं..?”-विनिता त्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली.

विक्रमनं तिच्याकडं पाहिलं, “विनू, तू फिलॉसॉफीमध्ये मास्टरी केलीयेस ना ?”

विनितानं त्याच्याकडं आश्चर्यानं पाहिलं. तिनं घड्याळावर नजर टाकली आणि म्हणाली, “तू काय वेडायेस का रे ? हे विचारायला इतकं दचकून उठलास ?”

“सांग ना...”

“का ? तुला नाही आठवत...? तुझे लेक्चर्स बंक करून येवून बसायचास की !”-विनिता हसत म्हणाली.

“विनू...चल चहा घेवूया...तुझ्याशी बोलायचंय मला...”-असं म्हणून तिच्या उत्तराची वाट न पहाता तो खोलीबाहेर चालू लागला. विनिताला त्याचं हे असलं विचित्र वागणं सवयीचं होतं पण, आहनाच्या मृत्यूनंतर पहिल्यांदाच तो तिला स्वत:हून बोलायला बोलावत होता, हेच तिच्यासाठी खूप महत्वाचं होतं.

            पुढच्या पंधरा मिनीटांनंतर विक्रम आणि विनिता, हॉलमध्ये वाफाळत्या कॉफीचा मग हातात घेवून बसले होते. दोघांनी “चिअर्स..” म्हणून एकदमच ओठाला मग लावला. एक-एक घोट घेतल्यावर विनितानं विचारलं, “बोल...काय बोलायचंय ?”

“विनू...हिस्ट्री रिपीट ईटसेल्फ...या वाक्याभोवती बरंच लिखाण झालं असेल ना फिलॉसॉफीमध्ये ?”

“खूप...” विनिता घोट घेत म्हणाली

“मग त्याविषयी तुझं आवडतं तत्वद्न्यान कोणतं ? आणि ईन्फॅक्ट, या वाक्याभोवतीनं असणारी इतर विचारवंतांची मत ऐकायचीयेत मला...”

“अरे व्वा ! पूर्वी म्हणायचास...तत्ववेत्ते फक्त पोपटपंची करतात, ते सिध्द करू शकत नाहीत..!”

“अफकोर्स नॉट ! आणि ते सत्यही आहे !! हां, पण त्यांच्या विचारांमुळं आपल्या विचारांना चालना मिळू शकतेच की !”

“खरंय...! बरं ऐक, याबाबतीत बर्‍याच लोकानी आपापली मतं मांडली आहेत पण, ती सारी त्यांच्या त्यांच्या मूळ विषयाशी सांगड घालत त्यांनी ती मांडली आहेत. आता हेच बघ, कार्ल मार्क्स त्याच्या दृष्टीकोणाशी सांगड घालताना म्हणतो, History repeat itself, first as tragedy & second as farce !’ सिडने हॅरिस या विचारवंताच्या मताशी मी पर्सनली जास्त कनेक्ट होते. तो म्हणतो, History repeat itself, but in such cunning disguise that we never detect the resemblance until the damage is done !’ अरे याच संदर्भात एरिक कोलमनचं एक भन्नाट वाक्य आहे. तो म्हणतो, History repeat itself because nobody listens the first time !’ ”   

 “हं ! तुला काय वाटतं विनू...? घडत असेल असं ?”

“अगदीच अशक्य नाही वाटत !”

“गुड आन्सर...! काळ व्यक्तीसापेक्ष आहे हे मान्यच..काळ बेंड होतो...करता येतो ! काळ क्रंच होतो...फ्रिजही होतो...ब्लॅकहोलमध्ये तर त्याचं अस्तित्वंच नाहीसं होतं. दृश्य-दृश्यमान क्षमता आणि काळ यांच्याही पलिकडे कांहीतरी अस्तित्वात असावं !”

“नक्कीच विक्रम ! बर्‍याच गोष्टींची उकल करणं आजही शक्य नाहीये आपल्याला...! आता विषय निघालायेच म्हणून सांगते...हे जे तू म्हणालास ना हिस्ट्रीबद्दल, त्याबद्दल कॉलेजमध्ये असताना मी एक पेपर तयार केला होता, एका सेमिनारमध्ये सादर करायला...! अनफॉर्च्युनेटली तो आमच्या सरांना आवडला नाही..पटला नाही, म्हणून त्यांनी मला सेमिनारमध्ये पेपर प्रेझेंटेशन नाही करू दिलं...”

“सांग ना, काय होता विषय तुझा...”

“आता पूर्ण नाही आठवणार पण, त्यात मी असं मांडलं होतं की, हिस्ट्री रिपीट इटसेल्फ असं असलं तरी एखादा प्रसंग, घटना जरी रिपीट होत असली तरी त्या घटनेचं, प्रसंगाचं किंवा पर्यायानं हिस्ट्री...स्थल, काल, लिंग, भाषा बदलून दरवेळी नव्या रूपात तोच ढाचा घेवून रिपीट होत नसेल का ?”

विक्रमच्या हातातून मग निसटून पडला. तो “आ” वासून तिच्याकडं पाहू लागला. त्याच्या अशा अनपेक्षित वागण्यानं विनिताला, “आपण कांही वेगळं बोलून गेलोय का ?” तेच समजेना.

            विक्रम उठला आणि तिच्या जवळ जावून तिच्यापाशी झुकत त्यानं तिच्या कपाळाचं चुंबन घेतलं आणि आवेगानं तिचे दोन्ही दंड गच्च पकडत म्हणाला,

You are simply genius Vinoo...I love you so so much...

विक्रम जितक्या आवेगानं तिच्या जवळ आला होता, तो तितक्याच उत्कटनेनं आपल्या स्टडीच्या दिशेनं निघून गेला आणि दरवाजा बंद करता करता मोठ्याने ओरडला,

“मला अजिबात डिस्टर्ब करू नको...”

विनितानं मान हलवत उसासा टाकला. आता पुढचे आठ-दहा दिवस तिला घरात विक्रम असूनही एकांतवासात रहावं लागणार होतं.

“चला, पुढचे कांही दिवस किचनमध्ये जास्त काम असणार नाही...”-विनिता स्वत:शी पुटपुटत फुटक्या मगकडे नजर टाकत किचनच्या दिशेने निघून गेली.

            विक्रमनं स्वत:ला बंद करून घेवून आज पाच दिवस झाले होते. मधूनच ओरडण्याचा, किंचाळण्याचा, कधी हसण्याचा, कधी आनंदानं चित्कारण्याचा आवाज तिच्या कानावर पडायचा आणि त्यानुसार दाराबाहेर काय ठेवायचं हे ती ठरवायची.  म्हणजे, त्याच्या ओरडण्याचा आवाज कानावर आला तर सॅलड किंवा बीट ज्यूस, किंचाळू लागला तर कोणताही गोड मेनू किंवा फळांचा ज्यूस, हसू लागला तर जेवणाचं ताट आणि आनंदानं चित्कारू लागला तर मात्र पुढचा आवाज येवूपर्यंत त्याला अजिबातच कांही द्यायचं नाही, म्हणजे तो त्याच्या उद्दीष्ठाच्या जवळ पोहोचलाय इतपत तिला इतक्या वर्षांच्या संसारानंतर हे समजूही लागलं होतं आणि सवयीचंही झालं होतं. त्यानं स्वत:ला बंदीस्त करून घेतलं की त्याचे कॉल्स, मिटींग्ज हे सारं विनितालाच रोझीच्या मदतीनं ठरवावं लागायचं. ती ऑफीसला गेली की, लोकांना समजायचं की, विक्रम कोणत्यातरी संशोधनात मग्न आहे. याच दरम्यान जिनिव्हाहून डॉ. एंजलो इमॅन्युएल ही व्यक्ती अत्यंत तातडीच्या कामानिमीत्त्य भेटण्यासाठी आली होती. त्याच्यासाठी प्रत्येक सेकंद महत्वाचा होता. खरी परिस्थिती सांगूनही हा इसम विनितावर विश्वास ठेवायला तयार नव्हता. नाईलाजानं त्याला आपल्यासोबत आपल्या घरी नेलं. एंजलोनं स्वत: कितीतरी हाका मारल्या पण एक नाही, दोन नाही ! विनिताला विनंती करून रात्री इथेच रहाण्याची त्यानं परवाणगी मिळवली. रात्री विनिता झोपायला गेल्याचं पाहून, तो दबक्या पावलानं विक्रमच्या अभ्यासिकेच्या दिशेनं जावून दाराबाहेर उभा राहिला आणि त्याला ऐकू जाईल इतक्या आवाजात म्हणाला,

 “मिस्टर विक्रम...मी सर्न (CERN : European Organization for Nuclear Research) एजंट ! सर्नच्या कामानिमीत्त आलोय...तुम्हाला माहितीचये..कोणतीही माहिती आणि ओळख बाहेर जावू द्यायची नाही अशी अट आहे, त्यामुळे मी खोट्या नावानं इथं आलोय...एक्च्युअली संचालकांनीच पाठवलंय मला...सर्नसंदर्भात बोलायला...!”

त्याचं बोलून संपायच्या आधीच विक्रम दार उघडून बाहेर आला. अंगात फक्त बर्मुडा, केस पिंजारलेले, डोळे लाल आणि ताटरलेले ! झोकांड्या देत विक्रम बाहेर आला आणि त्याच्या गळ्यात पडला.

            टेरेसवर बसून पेग रिचवत बसलेल्या दोघांनाही वेळेचं भान उरलं नव्हतं. विनिता कधीच झोपायला निघून गेली होती. तिला उगाच आवाजाचा त्रास नको म्हणून दोघं वर गच्चीत येवून बसले होते.

“एंजलो इमॅन्युएल कधीपासून झालास ?” विक्रमनं त्याला डिवचत विचारलं.

“इथं येण्यागोदरच ! तुला तर माहितीचये, एजण्टला स्वत:चं नाव, गाव, देश, नाती नसतात. आम्हांला कांही झालं तरी त्याची जबाबदारी आमचा स्वत:चा देश घेत नाही. आमच्यापैकी कित्येक एजंटना बेवारस म्हणून आजवर जाळण्यात आलंय ! But it’s part & parcel of this business...and I love it !!

एवढं बोलून त्यानं ग्लासातील मद्य एका दमात रिचवलं.

“मला एक कळत नाही, सर्नमध्ये एजंट लोकांचं काय काम ?”-विक्रम

“आजकाल रिसर्च सेंटरमध्येपण दहशतवाद्यांची दहशत आहे बाबा ! त्यामुळं सर्नवर किंवा एखाद्या संशोधनावर लक्ष ठेवून असलेल्या वेब-साईट्स, लोकं यांची माहिती ठेवण्याचं, धोका दिसताच त्यांना वेळीच आवरणं यासाठी अनेक रिसर्च सेंटर्स अंडरकव्हर एजंट हायर करताहेत !”-हातातील पेला संपवून त्यानं पुढं विचारलं, “कसल्या संशोधनात गुंतलायेस एवढा ?”-त्यानं दुसरा पेग भरत विचारलं.

“माहित नाही अजून ! पण कळेल येत्या कांही दिवसात...!! मला सांग...एवढ्या गडबडीनं का पाठवलंय तुला ?”

“विक्रम तुम्हाला ती १९९९ चे `The discovery of direct CP violation in the NA48’ हे संशोधन माहित असेलच की...!”-उत्तरासाठी तो विक्रमच्या दिशेने पाहू लागला. विक्रम कपाळावर आठ्या घालून त्याच्याकडं पहात होता. आपल्याला अपेक्षित प्रतिक्रीया न मिळालेली पाहून नाराज एंजलोनं पुढं बोलायला सुरूवात केली, “केऑन्स (Kaon) बरोबर स्ट्रेन्ज क्वार्क (एण्टिक्वार्क) [Strange Quark (Anti quark)] आणि अप-डाऊन एण्टिक्वार्क (क्वार्क) यांच्या प्रयोगादरम्यान एका कॅलक्युलेशनचा घोळ असल्याचं लक्षात आलंय. कारण प्रयोगादरम्यान अचानक केऑन्सचं डिफेन्स मेकॅनिझम (Defence Mechanism) काम करायला सुरू होतं !”

“हो तर मी कधीच सांगितलं होतं...निसर्गातल्या सूक्ष्मातीत सूक्ष्म गोष्टीला अर्थात क्वार्कालाही स्वत:चं असं.....”-बोलता बोलता विक्रम थांबला. त्यानं त्याच्या नजरेत रोखून पाहिलं आणि मोठ्यानं म्हणाला, “काय म्हणालास...?”

“मी कुठं काय म्हणालो...? तूच सांगत होतास...”

“अरे मुर्खा, तू काय सांगत होतास मी बोलण्यागोदर ?”

“केऑन्स बरोबर...”-तो बोलत असताना विक्रमनं त्याचं वाक्य तोडलं, “त्याच्यानंतर...”

“त्याच्यानंतर कांही नाही...”

“तू एक स्पेसिफीक शब्द वापरलास...”

“केऑन्स ?, स्ट्रेन्ज क्वार्क ?, एण्टिक्वार्क ?”

“नाही रे...! शेवटी अगदी शेवटी...”

“डिफेन्स मेकॅनिझम....???”

“बरोब्बर....अगदी बरोब्बर...!!!!” असं म्हणून त्यानं “हुर्रे...ऽऽऽऽ“ अशी जोरदार आरोळी ठोकली. त्याच्या तशा अविर्भावानं एंजलोची पूर्ण उतरली. आपला आनंदोत्सव साजरा करून विक्रम त्याच्या शेजारी धापा टाकत बसला.

 “काय होतं हे ?”

“मित्रा, माझ्या नवीन संशोधनाला तू योग्य शब्द आणि दिशा दिलीस...”

“मी विचारू शकतो, कसलं संशोधन ?”

“हो मित्रा...आवश्य ! आत्ता तू मला नक्कीच विचारू शकतोस...”

“सांग ना मग...”

अर्धा पेला व्हिस्की ओतून ती रिचवत विक्रम सावरून बसला,

“मित्रा...असं म्हणतात, History repeat itself ! आणि ते सत्यही आहे...हेच मी गेल्या कांही दिवसांपासून

गणिताच्या सहाय्यानं प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करत होतो. पण, हा रिसर्च इथंच संपत नाही...सार्‍याच्या मूळाशी खूप मोठं रहस्य दडलं आहे...खूप मोठं ! जे मी माझ्या रिसर्च पूर्ण झाला की, थेअरीसह तुला...तुलाच काय, मी सार्‍या जगाला दाखवेन...जर....जर, निसर्गातील प्रत्येक गोष्टीला डिफेन्स मेकॅनिझम वर्क होत नसेल तर ! मित्रा, ठराविक काळानंतर एकच घटना, प्रसंग, कलाकृती निर्माण होतात. इ.स.पूर्वची एक कलाकृती आहे...एका गोलावर एक मोर पिसारा फुलवून नाचतोय, त्याच्या पायाला एका सापानं विळखा घातलाय आणि तरिही तो मोर आनंदी दिसत आहे...” बोलत असतानाच त्यानं खिशातून चुरगाळलेला एक कागद काढला. त्यावर त्याच चित्राचं कलर झेरॉक्स होतं. ते चित्र त्यानं त्याच्या दिशेनं सरकावलं आणि बोलू लागला, “ही कलाकृती ठराविक काळानंतर पुन्हा-पुन्हा बनवली जाते. आहनाला याचं गणित कदाचित कळालं होतं..आणि ईफ आय एम नॉट रॉंग, निसर्गानं आपलं डिफेन्स मेकॅनिझम वापरून आहनाला आमच्यापासून हिसकावून नेलं ! खरी मेख इथंच आहे मित्रा...एक अशी गोष्ट आहे, जी निसर्गाला सर्वांपासून लपवून ठेवायची आहे कारण ती समजली तर कित्येक गोष्टींचा पाया निखळून पडेल...निसर्गाच्या युक्त्या जगाला समजतील ! म्हणून निसर्ग...”-बोलता बोलता विक्रमची नजर एंजलोवर गेली. एंजलो डोळे फाडून त्या चित्राकडं पहात होता.

“काय झालं..?”

“तुला माहितीये..तुमच्या भारतात नालंदा विश्वविद्यालय होतं ?”

“हो...माहितीये...”

“त्याकाळातही अशाच दोन कलाकृती सापडल्याची माहिती ब्रिटीश अर्काईव्हजमध्ये आहे...हे माहितीये ?”

“एक अशीच कलाकृती होती, हे माहितीये ! पण दुसरी असल्याचं माहिती नव्हतं मला...”

“एक खूप वर्षांपूर्वीची पाया खणताना सापडली आणि एका विद्यार्थ्याने बनवली होती..तशीच ! पण, न पहाता...कसलीच पूर्वकल्पना नसताना !”

“व्वा...ग्रेट !”-विक्रम उत्साहानं म्हणाला.

“तुला माहितीये विक्रम..आत्ताही या असल्या कलाकृतींसारखीच एक कालाकृती अस्तित्वात आलीये...”

“म्हणजे...?”

“म्हणजे...तू जिनिव्हाला येवून किती दिवस झालेत ?”

“वर्ष होवून गेलं असेल..! का ?”

“तुला माहितीचये की, गेल्या कित्येक महिन्यांपासून आपल्या इथे जमिनीत “लार्ज हायड्रॉन कोलायडर” ची उपकरणं बसवण्याचं काम सुरूये ! आपल्या आर्किटेक्टनं विद्वत्तेचं प्रतिक म्हणून प्रवेशव्दारावरच नालंदातील याच कलाकृतीची प्रतिकृती तयार केलीये !” असं म्हणून एंजलोनं मोबाईल काढून त्यावरचे फोटो विक्रमला दाखवू लागला. विक्रम फोटो पहात स्वत:शीच बडबडू लागला...,History repeat itself because nobody listens the first time....! You are damn right...Mr. Erich Coleman !!!!!”-विक्रम प्रवेशव्दारावरील तेच चित्र पहाण्यात हरवून गेला....

गोल, त्यावर नाचणारा मोर आणि मोराच्या पायाला विळखा घातलेला साप !

(क्रमश:)

 

COGNIZANCE: All written creative material is the solemn property of “An Anup Jatratkar Multi-Media Production”. If anyone wanted to use it for his/her own personal purpose (i.e. short film, projects, blogs, articles, scripts, FB posts etc.) then, have to take proper permission from, Mr. Anup Jatratkar. If it will be found that, anyone involved in such activities without prior permission, then, we are able to take certain charge on him/her.  

Pen Image

Pen Index