मागच्या भागात
काय घडले ? : कृपया ‘प्रकरण दुसरे’ वाचण्यागोदर ‘प्रकरण पहिले’ वाचावे, अन्यथा या
भागातील गोष्टींशी जुळवून घेता येणार नाही. ‘प्रकरण पहिले’ सर्वात खाली
इंडेक्समध्ये उपलब्ध आहे, याची नोंद घ्यावी.
सूचना : सदर
कथानक काल्पनिक असले तरी यात उल्लेख केलेल्या कांही घटनांना ऐतिहासिक पाया आहे.
सत्य आहेत. त्या घटनांचा वापर करून काल्पनिक पात्रांच्या सहाय्याने कथेला आकार
देण्याचा प्रयत्न केला आहे. पण असे असले तरी, त्या घटनांबद्दल मत निर्माण करण्याचा
किंवा विकृतीकरण करण्याचा हेतू नाही, याची वाचकांनी नोंद घ्यावी. सदर दीर्घकथा ७
भागांमध्ये प्रकाशित केली जाईल याचीही कृपया नोंद घ्यावी.
-
अनुप
दीर्घकथा १ : रहस्य
प्रकरण २
भाग २ : इ. स. ४३० (५ वे शतक)
(पुढे...)
“आचार्य,
कमलशीलनं बनवलेली ही कलाकृती आणि राजा शुक्रादित्य यांना सापडलेली कलाकृती यात
अतुलनीय साम्य आहे. याला काय म्हणावे आचार्य ?”-वर्मन पंडीत धर्मपालांकडे पहात
विचारत होता.
धर्मपालही
कांही क्षण गहन विचारात रमले. कांही क्षण विचार केल्यावर ते वर्मनकडे वळले, दीर्घ
श्वास घेतला आणि बोलायला सुरूवात केली,
“वर्मन,
याविषयी तू इतर कोणाजवळ कांही बोललायेस का ?”
“नाही आचार्य
! आपल्या परवानगीशिवाय असे कृत्य मजकडून होणे नाही !!”
“उत्तम. चल.
आपण रत्नरंजककडे जाता-जाता चर्चा करू..”-धर्मपाल वळून कुटीबाहेर जात म्हणाले.
वर्मन त्यांच्या मागोमाग ओढल्याप्रमाणे जावू लागला.
“आचार्य, आपण
काल जे सांगितलं ते खरं असेल यात शंकाच नाही पण, ते तसंच असू शकेल का ?”
“वर्मन, योग्य
प्रश्न आहे तुझा ! मी काल जे सांगितलं ते, तसंच असू शकेल यात शंका आहे. पण मानवाला
पूर्वी घडलेल्या घटनेविषयी हेतुविद्येवर आधारितच विधानं मांडावी लागतात.
वर्मन...या झाडाखाली कांही घटका बसूत...”
धर्मपाल
झाडाभोवती असणार्या पारावर बसले. वर्मन त्यांच्या पायाशी बसून ऐकू लागला,
“वर्मन, आपण पुन्हा एकदा फेर उजळणी करूयात म्हणजे तुझ्या मनातील शंका दूर होण्यास मदत होईल ! राजा कुमारदत्त अर्थात शुक्रादित्य, एक थोर राजा होता. त्याच्या मनात एक संघाराम बांधण्याची ईच्छा होती. वर्मन, त्याने बांधलेला संघाराम, ही नालंदा विश्वविद्यालयाची आद्य वास्तू होती. संघारामासाठी पाया खणताना कुमारगुप्तांना ही कलाकृती सापडली. तुला ठाऊकच आहे...या कलाकृतीत गोल, चवताळलेला साप आणि मोराची शिल्पे आहेत. कमलशीलने चितारलेल्या शिल्पकृतीतही तेच तीन प्राणी आहेत. त्याला हेच शिल्प का चितारावे वाटले, हे कमलशीलच योग्य प्रकारे सांगू शकेल पण, त्या शिल्पाचा स्वतंत्र अर्थ लावण्याचा मी प्रयत्न केला आहे. वर्मन...मोर, साप आणि गोल यांचा भविष्यकाळ, भूतकाळ आणि वर्तमानकाळ दर्शविण्यासाठी प्रतिक म्हणून वापर केला गेला असावा. मोर भविष्याचे प्रतिक असावा. आकाशात मेघ दाटून आल्यानंतरच मोर अत्यानंदाने पिसारा फुलवतो. तो पाऊस पडून पुनरूज्जीवन मिळणार असल्याचे सुचवतो. म्हणजेच काय तर-चांगल्या भविष्याचे स्वप्न दर्शवितो. त्याच्या पायाला विळखा घातलेला साप किंवा नाग दोन अर्थ प्रतीत करत असावेत. पहिला म्हणजे-बिकट परिस्थिती. मोराच्या पायाला सापाचा विळखा असूनही तो मोर आनंदी दिसतो आहे. तात्पर्य, बिकट परिस्थितीतही आशेचे मेघ पाहून प्रफुल्लित होवून जाणे. बिकट परिस्थितीतही उज्ज्वल भविष्याचे स्वप्न पाहून सकारात्मक वाटचाल करणे. सापाचा दुसरा अर्थ जो आपल्या अनेक दंतकथांमधून किंवा पौर्वात्त्य देशांमधील कथांमधून सांगितला जातो तो म्हणजे, साप हा सैतानाचा हस्तक आहे, जो भूतकाळातला असला तरी वर्तमान आणि भविष्यावर ज्याची पकड आहे ! कलाकृतीतील गोल हा आपल्या या धरतीचे प्रतिक म्हणून वापराला असावा, जो पर्यायाने वर्तमानाकडे अंगुलीनिर्देश करतो. पण वर्मन, मी सांगितलेल्यापैकी सगळ्या गोष्टी तशाच असतील, असे मीच काय, कुणीच म्हणू शकत नाही कारण, कलाकार एखादी कलाकृती निर्माण करताना नेमका काय विचार मनात घेवून कलाकृतीची निर्मीती करत असेल, हे फक्त आणि फक्त तोच सांगू शकतो. बाकीचे लोक त्यावर निव्वळ वर-वर अंदाज बांधू शकतात. पर्यायाने ते ती कलाकृती आपल्या विचारांनी दूषित करत असतात. आणि याला सद्यपरिस्थितीत मीही अपवाद नाही !”-धर्मपाल थांबले. वर्मन लक्षपूर्वक त्यांचं म्हणणं ऐकत होता.
वर्मन कांही काळ विचार करण्यात गुंग
झाला. धर्मपाल त्याच्याकडे प्रसन्नपणे पहात होते. धर्मपालांना आपल्या या
विद्यार्थ्याप्रती उत्सुकता आणि आशावाद निर्माण झाला होता. ते त्याच्या चेहर्याचं
निरीक्षण करून मनातल्या मनात अंदाज बांधण्याचा प्रयत्न करत होते.
“आचार्य...”-वर्मनच्या
हाकेनं आचार्य भानावर आले.
“बोल
वत्सा...”
“आचार्य,
कोणत्याही कलाकृतीला घेवून ज्या-त्या परिस्थितीत वेगवेगळा विचारही केला जावू शकतोच
ना...?”
“अर्थात ! आज
आपल्याला गोल वर्तमानाचा, साप भूतकाळाचा आणि मोर भविष्याचा प्रतिक वाटतो. पण,
भविष्यातील लोकांसाठी त्यातील वेगळाच अर्थ प्रतीत होवू शकल्यास त्यात नवल नको
वाटायला ! प्रत्येक व्यक्ती विचार कसा करते ? कोणत्या दृष्टिकोणातून करते ?
कोणकोणत्या हेतूंवर लक्ष केंद्रीत करते ? यावरती बरंचसं अवलंबून असतं !”
“आचार्य, ही
कलाकृती पूर्वीही निर्माण केली गेली आहे, आजही चितारली गेली आहे ! तर मग,
भविष्यातही निर्माण केली जावू शकेल का ?”
“नक्कीच वर्मन
! वर्मन...हजारो लोकांपैकी दोघांचे विचार समान असू शकत नाहीत का ? जर दोन
वेगवेगळ्या काळातील कलाकार एकाच वैचारिक पातळीवर एकमेकांशी तादात्म्य पावू शकले तर
नक्कीच त्यांच्याकडून एकसारखीच कलाकृती निर्माण केली जावू शकते....पुन्हा-पुन्हा
निर्माण होवू शकते.”
“आचार्य, याच
कलाकृतीवर विचार करत असताना दोन विचार माझ्या मनात उद्भवले आहेत. आपली अनुमती असेल
तर, आपणांस सांगू शकतो का ?”
“अवश्य
वर्मन...मला आनंदच वाटेल !”
“आचार्य, कमलशीलची कलाकृती पाहून माझ्या मनात उत्सुकता निर्माण झाली आणि या उत्सुकतेमागे आपले संशोधनही कारणीभूत होते. काल रात्री माझ्या मनात ही कलाकृती पाहून असा विचार निर्माण झाला की, भूतकाळातील कांही चुकांमुळे या सैतानाच्या हस्तकाचा विळखा मानवाभोवती अर्थात त्यावेळच्या वर्तमानाभोवती होता. कालौघात त्यावेळच्या भविष्यातील आणि आजच्या वर्तमानातील मानवही भूतकाळातील त्याच चुकांची पुनरावृत्ती करून सैतानाच्या हस्तकाची पकड घट्ट करण्यासाठी कारणीभूत ठरत आहे. असे असले तरी मानव सुखानैव भविष्याची स्वप्ने पहात आहे, जसे भूतकाळात पाहीले असेल ! पण, वर्तमानातून भविष्यात पदार्पण करत असताना मात्र तोच हस्तक पुढील पिढ्यांमध्येही हस्तांतरीत करत आहोत. आणि ही कलाकृती ज्या कलाकारांनी निर्माण केली आहे, ती काळच त्यांच्याकडून निर्माण करून घेत असावा कारण त्याचीही तिच ईच्छा असावी की, झालेली चूक ओळखून त्याची पुनरावृत्ती टाळावी आणि जोवर असे घडत नाही तोवर अशी कलाकृती बनवली जात रहाणारच ! हा झाला पहिला विचार. आचार्य पहिला आणि दुसरा विचार यांच्यामध्ये जमिन-आस्मानाचा फरक आहे. पहिला विचार योग्य असेल तर दुसर्याला अर्थ रहात नाही आणि दुसरा बरोबर असेल तर पहिला फोल ठरतो. दुसरा विचार असा आहे आचार्य, ठराविक काळानंतर एकच कलाकृती, घटना पुन्हा-पुन्हा घडत असावी. याचाच अर्थ असा असावा की, काळाचं धावणं अनंत पण चाकोरीबध्द असावं ! आपल्याला काय वाटतं आचार्य ?”-वर्मन त्यांच्या प्रतिक्रियेसाठी थांबला.
धर्मपाल
आश्चर्याने त्याच्याकडे पहात होते. ते गडबडीने उठले आणि वर्मनला हाताशी धरून उठवत
त्याला प्रेमपूर्वक अलिंगन दिले,
“साधू:...साधू:...!!
सुरेख...अप्रतिम !!! पुढे जावून तू मोठा विचारवंत म्हणून ओळखला जाशील वर्मन, माझा
आशीर्वाद आहे...”-धर्मपालांच्या या भविष्यवाणीने प्रसन्न झालेल्या वर्मनने पुढे
होवून धर्मपालांच्या पायांना स्पर्श केला. त्याला उठवत, त्याच्या दोन्ही बाहूंना
पकडत ते पुढे म्हणाले, “वर्मन, तुझी विचार करण्याची पध्दत पाहून मला अभिमान वाटला.
माझ्या संशोधनावरील “गाथा शिल्पस्य” या ग्रंथात तुझ्या नावासहीत तुझ्या या
अनुमानाचा उल्लेख करेन ! वर्मन, तू माझ्या विचारांना उत्तम गती व दिशा दिलीस. साधू:...साधू:...”-धर्मपाल
अत्यानंदाने म्हणाले.
ते बोलत असतानाच कमलशील आपले शिल्प
घेवून तिथं हजर झाला.
“प्रणाम
आचार्य. आपण येवून गेल्याचं कळलं. म्हणून मी आपणांस भेटण्यासाठी आलो आहे.”-कलमशील
कमरेत झुकत म्हणाला.
“कमलशील, तुझे
शिल्प पहाण्यासाठीच आलो होतो. उत्कृष्ठ शिल्पकलेचा तो एक आदर्श नमुना आहे.”
“धन्यवाद
आचार्य !”
“पण वत्सा,
माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे, ते शिल्प रेखाटण्यामागं तुझा नेमका काय हेतू होता
? किंवा तुला तेच शिल्प का रेखाटावंसं वाटलं...? या अगोदर असे शिल्प, चित्र कुठे
पाहिले होतेस का ??”
“नाही आचार्य,
असे शिल्प, चित्र मी कधीच कुठेच पाहिले नाही. किंवा हे शिल्प बनवण्यामागे माझा
कोणताच उदात्त हेतू नव्हता. मनाला दोन घटका विरंगुळा मिळावा आणि वेळ काढावा
म्हणूनच मी हे शिल्प तयार केले होते !”
त्याच्या
उत्तराने धर्मपालांनी समाधानाने वर्मनकडे पाहिले आणि स्मित केले, “तुझा तर्क अगदीच
योग्य आहे वर्मन...!” वर्मनने आदराने मान झुकविली. धर्मपालांनी आपली नजर पुन्हा
त्या कलाकृतीकडे वळवली आणि म्हणाले, “कमलशील, कांही दिवसांसाठी ही कलाकृती मला
अभ्यासासाठी देशील ?”
“आचार्य, ही
कलाकृती आपणांस भेट म्हणून देण्यासाठीच बनवली होती मी !”-कमलशील ती कलाकृती
त्यांच्याकडे देत म्हणाला.
“आयुष्यमान
भव: वत्सा !”-ती कलाकृती आपल्या हातात घेत आचार्यांनी आशीर्वाद दिला आणि ते
बारकाईने त्या कलाकृतीचं निरीक्षण करू लागले. त्यांच्या मन:पटलावरही तिच कलाकृती
रेंगाळू लागली...
गोल, त्यावर
नाचणारा मोर आणि मोराच्या पायाला विळखा घातलेला साप !
(क्रमश:)
COGNIZANCE: All written creative material is the solemn property of “An Anup
Jatratkar Multi-Media Production”. If anyone wanted to use it for his/her own
personal purpose (i.e. short film, projects, blogs, articles, scripts, FB posts
etc.) then, have to take proper permission from, Mr. Anup Jatratkar. If it will
be found that, anyone involved in such activities without prior permission,
then, we are able to take certain charge on him/her.