Pen


PEN 15-6 : दीर्घकथा १ : रहस्य : प्रकरण २ भाग ३ : पु.व. ७३४ (१८ वे सुर्य-वर्ष)

मागच्या भागात काय घडले ? : कृपया ‘प्रकरण दुसरे’ वाचण्यागोदर ‘प्रकरण पहिले’ वाचावे, अन्यथा या भागातील गोष्टींशी जुळवून घेता येणार नाही. ‘प्रकरण पहिले’ सर्वात खाली इंडेक्समध्ये उपलब्ध आहे, याची नोंद घ्यावी.

 

सूचना : सदर कथानक काल्पनिक असले तरी यात उल्लेख केलेल्या कांही घटनांना ऐतिहासिक पाया आहे. सत्य आहेत. त्या घटनांचा वापर करून काल्पनिक पात्रांच्या सहाय्याने कथेला आकार देण्याचा प्रयत्न केला आहे पण असे असले तरी त्या घटनांबद्दल मत निर्माण करण्याचा किंवा विकृतीकरण करण्याचा हेतू नाही, याची वाचकांनी नोंद घ्यावी. सदर दीर्घकथा ७ भागांमध्ये प्रकाशित केली जाईल याचीही कृपया नोंद घ्यावी.

-       अनुप

 

दीर्घकथा १ : रहस्य

 

प्रकरण २

भाग ३ : पु.व. ७३४ (१८ वे सुर्य-वर्ष)

(पुढे...)

 

आहना आपल्या पक्षीयानातून घराच्या लॅंडींग-बाल्कनीत उतरली. तिच्या मागोमाग के-१८ हाही उतरला. आहना हॉलमध्ये येवून फेर्‍या मारू लागली. एवढं अस्वस्थ त्यानं तिला कधीच पाहिलं नव्हतं.

“काय झालंय तुला आहना, एवढं डिस्टर्ब व्हायला ?”-के.१८ नं तिच्याकडं पहात चिंतेनं विचारलं.

“तू चहा घेणार ?”-त्याच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचं टाळत ती म्हणाली.

“आहना, हॅव यू लॉस्ट यूवर सेंसेस ? मी असं कांही घेवू शकतो का ?”

“अरे म्हणजे, मी चहा घेणारेय...माझ्यासोबत कंपनी द्यायला तुला चहाचा प्रोग्रॅम रन करून देवू का ?”

“चालेल...”

आहना किचनमध्ये जावून ३-४ मिनीटातच हातात मग घेवून बाहेर आली. सिम्प्युटरशी के-१८ ला वाय.एस. ने कनेक्ट करून एक प्रोग्रॅम रन केला. आपल्या ओठांवरून जीभ फिरवत के-१८ म्हणाला,

“तू चहा म्हणाली होतीस ! ही तर कॉफी आहे...”

“तुला धक्का बसला का ?”

“नाही म्हणजे...मी चहाच्या चवीची वाट पहात होतो !”

Exactly !! आपण किंवा आपला मेंदू त्याच गोष्टींसाठी prepare असतो ज्या गोष्टींच्या येण्याची शक्यता असते. त्यामुळेच अटीतटीच्या प्रसंगी आपली गाळण उडते कारण, आपण दुसर्‍या शक्यतांचा विचारच केलेला नसतो !!”-आहना स्वत:च्याच प्रयोगावर खूष होत म्हणाली.

के-१८ तिच्याकडं आश्चर्यानं पहात होता. आहना शून्यात नजर रोखून बराच वेळ शांत राहिली आणि मग एकटीच वेड्यासारखी हसत सुटली.

“काय होतंय आहना ? बरीयेस ना ??”
आहना पुन्हा शांत झाली. सोफ्यावर बसून तिनं कॉफी संपवली आणि दीर्घ उसासा घेत म्हणाली,

“आपण सारं सुरूवातीपासून विचार करू...आणि योग्य-अयोग्य शक्यतांचा सुध्दा ! तर...आपल्या मदर अर्थवर अगदी सुरूवातीच्या काळात अर्थात ‘स्टोन एज’ मध्ये गुफांमधून या अशाच किंवा तत्सम साधर्म्य दाखवणार्‍या कलाकृती सापडल्याचा पुरावा सापडतो. अश्मयुगीन आदिम लोकांनी स्वत:हून कल्पना करून तशी कलाकृती तयार केली नसणार कारण तेवढं समजून घेण्याचं सामर्थ्य किंवा आकलनक्षमता विकसित

झाली नसणार. मग, त्यांनी काय केलं ? तर, त्यांनी जे पाहिलं त्याची प्रतिकृती चित्राच्या माध्यमातून गुफांमधून रेखाटली. मग प्रश्न येतो तो असा...सर्वात पहिल्यांदा त्यांनी ते कुठं पाहिलं ? उत्तर सरळ आहे, नव्या वसाहतीच्या शोधात जे लोक मदर अर्थवर आले, पृथ्वीवर आले, त्यांच्यापैकी कुणाकडे तरी तशी कलाकृती असणार आणि तिथल्या अप्रगत लोकांनी देवदूत आले समजून, त्यांची आठवण म्हणून त्यांच्याजवळ असणार्‍या वस्तूंची, गोष्टींची रेखाटनं गुफांमधून काढून ठेवली ! याचाच दुसरा अर्थ काय होतो माहितीये ? काळाला एक पॅटर्न आहे. आणि काळ किंवा टाईम, आपला तोच पॅटर्न जीवंत ठेवण्यासाठी नव-नवीन वाहकांची निर्मीती करतो. And in this case, we humans are the vehicles of TIME to carry forward his PATTERN ! पूथ्वीवर ही कलाकृती कांही हजार वर्षांच्या गॅपनंतर ३ वेळा बनवली गेली ! जेंव्हा ही कलाकृती शेवटची बनवली गेली त्यानंतर शतकभरातच मानवाला पृथ्वी सोडण्याची वेळ आली आणि आपण सारे या आपल्या नव्या केप्लर ग्रहावर आलो पण...,पण येताना आपण आपल्या अर्काईव्हजमधून ही सारी माहिती इथं घेवून आलो ! पृथ्वीवर ईजिप्शियन राजवटीत जसं ‘तूत-ऑंख-आमेन’ चा शाप आणि त्याची पेटी, त्या पेटीवरील तो ‘तूतनखामेन’ (ज्याचीच फोड ’तूत-ऑंख-आमेन’ अशी केली जाते) चा डोळा प्रसिध्द आहे, तसाच कांहीसा प्रकार आपल्या केप्लरवरही अगदीच सुरूवातीच्या काळात होता आणि ज्याला, पृथ्वीवरच्या स्मृतींना आदर म्हणून उत्खननात सापडलेल्या एका कबरीला “तूतनखामेन” ची पेटी असं नाव दिलं गेलं...”

“का...?”-मध्येच अडवत के-१८ म्हणाला

“कारण सरळ आहे, त्या पेटीवरही तसंच कांहीसं रहस्यमय चित्र कोरलं होतं पण, यावेळी डोळ्य़ाऐवजी एक गोल, त्यावर नाचणारा मोर आणि मोराच्या पायाला विळखा घातलेला साप हे चित्र होतं !”

“आहना, माझ्याकडे जी माहिती आहे, त्यानुसार त्यावेळी पृथ्वीवर ईजिप्शियन काळातील ज्या कलाकृतीचे चित्र, फोटोज डॉ. विक्रम यांच्याकडे सापडले, ती कलाकृती त्याच तूतनखामेनच्या पेटीत ‘शाण्डाएत’ (Shendyt) वस्त्रप्रावरणात गुंडाळलेल्या स्थितीत आढळली होती.”-के-१८

Shendyt ! What does it means?”-आहना

“ईजिप्शियन राजांव्यतिरिक्त अर्थात फॅरोव्ह सोडून इतर सर्वसामान्य लोकं-स्त्री आणि पुरूष, जे वस्त्र कमरेभोवती गुंडाळत त्याला शाण्डाएत वस्त्र म्हणत असत....पण हे अंतर्वस्त्र नव्हे !”

“हं...यावरून एका गोष्टीची खात्री होते की, ज्या व्यक्तीने त्या पेटीत ही कलाकृती राजाच्या शेवटच्या प्रवासासाठी शुभेच्छा म्हणून ठेवली तो सर्वसामान्य होता, त्याची इतकी ऐपत नव्हती. आणि तसंही कलाकाराकडून तशी अपेक्षा करणंही चूकच म्हणा !”-आहना स्वत:च्याच विनोदावर हसत म्हणाली.

“असो. मुद्दा काय तर, ती कलाकृती बनवण्यामागं त्याचाही विशेष असा कोणताच हेतू नसणार...जसा माझाही नव्हता ! मलाही कांहीतरी बनवावं वाटलं म्हणून मी ते चित्र बनवलं ! मग..., हे चित्र ‘मी’ बनवलं की, माझ्याकडून ‘बनवून’ घेण्यात आलं !”-आहना पुन्हा अस्वस्थ झाली. उठून ती फेर्‍या मारू लागली. फेर्‍या मारता-मारताच ती म्हणाली, “के-१८ जरा, मी जे बोलले त्याची तर्कसंगती लाव...”

“मदर अर्थच्या गुहांमधून एक कलाकृती सापडते, जी त्यांनी गुहांच्या भिंतीवर कोरली आहे. कांही हजार वर्षांनी तशीच कलाकृती ईजिप्शियन काळात आढळली. त्यानंतर कांही हजार वर्षांनी तशीच कलाकृती दुसर्‍या टोकाला नालंदा इथे सापडली. परत कांही वर्षांनी ती डॉ. विक्रम यांच्याजवळ सापडली...”

आहना त्याच्या वाक्यावर गर्रकन वळली, “डॉ. विक्रमजवळ सापडली ! You mean ईजिप्शियन कलाकृतीचे फोटोच ना ?”

 “नाही ! त्याच्या घराच्या भिंतीवर त्याच्या लहान मुलीने ईजिप्तच्या ट्रिपनंतर तेच चित्र काढलं होतं !”-के-१८

Means, she imitated it purposely ! But why...?”

“डॉ. विक्रमच्या मृत्यूनंतर जबाब देताना त्याच्या पत्नीनं विनितानं असं सांगितलं की, ते ट्रिपहून आल्यावर आहना सतत ते चित्र काढायची आणि ‘सगळं गोल आहे’ म्हणून बडबडायची ! त्यानंतर विक्रम पुन्हा ईजिप्तला जावून त्याचे फोटो घेवून आला पण, तो येण्यागोदरच आहनाचा मृत्यू झाला होता !”-के-१८ थांबला.

“अशी कोणती गोष्ट आहे, ज्याला हात घालताच माणसाचा मृत्यू होतो ? पण आहनाचा मृत्यू का झाला ? तिच्या मृत्यूशी आणि ‘सगळं गोल आहे’ असं ती जे म्हणायची यांचा कांहीतरी परस्पर संबंध असावा काय....?”-आहना आठ्या घालत म्हणाली

“शक्यता नाकारता येत नाही. ज्या कुणाला हे कोडं उमगतं तो नुकसानदेय ठरण्याच्या भीतिमुळे एक ठराविक शक्ती हे रहस्य उमगलेल्या लोकांचा अंत करत असावी आणि मुळात इ.स.२००४ साली ती कलाकृती निरागसतेतून निर्माण झालीच नव्हती ! ती आहनानं पाहून, आपल्या घरी आल्यावर imitate केली आणि कदाचित ज्याची तिला शिक्षा मिळाली ! कारण त्याचवेळी जिनिव्हामध्ये सर्नच्या प्रवेशव्दारावर तशाच कलाकृतीच्या बांधकामाचं काम सुरू होतं ! त्यांच्यापैकी कुणीच नाही मेलं !! मग प्रश्न हा आहे, डॉ. विक्रम, त्याची मुलगी आणि एक बेवारस इसम जो रस्त्यात मरून पडलेला, जो विक्रमच्या घरामधून बाहेर पडताना पाहिल्याचं २-३ लोकांचं म्हणणं होतं, तेच का मेले ?”-के-१८

“कारण...”, आहना विचार करत म्हणाली, “कारण, त्यांनी धाडस केलं...रहस्य उकलायचं...”

“आहना, मघाचा तर्कसंगतीचा मुद्दा पुरा करूयात ! २००४ नंतर पुढच्या शतकातच मानव पृथ्वी सोडून केप्लरवर आला. केप्लरवरची तूतनखामेनच्या पेटीवरची कलाकृती, त्यानंतर कांही हजार वर्षांनी उत्खननात  सापडलेली कलाकृती आणि विलोडीयन राज्य-प्रतिमा अशा एकूण ४ एकसारख्याच कलाकृती सापडल्या आहेत !”

“पहिली सोडून देवूत के-१८ ! कारण ती मूळ प्रतिमा मानली तर, पृथ्वीवासीय ‘प्लेटो’ या ग्रीकवंशीय तत्ववेत्त्याची ‘ईमिटेशन थेअरी’ या सार्‍या प्रकरणाला तंतोतंत लागू पडते. तो म्हणतो, मूळ कल्पना ही विधात्याच्या अर्थात निर्मात्याच्या मनातली मानली तर कलाकार पहिल्यांदा निर्मात्याची कलाकृती पहातो, आपल्या मनात साठवतो आणि आपली प्रतिभा वापरून ती वास्तवात आणतो म्हणजेच, कलाकाराची की कल्पना अर्थात `Idea is twice removed from reality ! त्यामुळे मूळ कल्पना विधात्याची अर्थात परग्रहावरील मानवाची पकडली तर तिथून पुढच्या ३ कलाकृती आणि त्यांच्या मधला काळ हे ठराविक ‘Rotation’ दर्शवते. के-१८, हे एक चक्र असू शकत नाही का ? ठराविक वर्षांनी पुन्हा-पुन्हा घडणारं !”-आहना त्याच्याकडं उत्तराच्या अपेक्षेनं पाहू लागली.

“पुन्हा-पुन्हा हा शब्द जरा खटकतो आहना ! कारण घटना, प्रसंग, कलाकृती पुन्हा-पुन्हा नाही तर ‘३’ वेळाच घडलेल्या दिसताहेत आणि मग विनाश, नवा शोध आणि पुन्हा नव्याने सुरूवात !”-के-१८ विचार करत म्हणाला.

“मला एक गोष्ट कळत नाहीये, एवढ्या लोकांमधून कांहीच लोकांना असं काय समजतं की ज्यानंतर त्यांचा मृत्यू होतो ? अशी कोणती गोष्टये जी निसर्गाला रहस्यच ठेवायचीये ?”-आहना वैतागून म्हणाली

“हा प्रश्न बर्‍याचदा विचारून झालाय तुझा !”

“मग काय करू ? उत्तर पण मिळत नाहीये ना !!”

 “उत्तर मिळत नाहीये कारण तू खूप लॉजिकल उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतीयेस आहना...मघाच्या चहा-कॉफीसारखं ! त्या पृथ्वीवरच्या आहनाला लहान असून ती गोष्ट कळाली कारण तिनं अगदीच निरागस, नि:स्वार्थी भावनेनं कलाकृतीकडं आणि निसर्गाकडं पाहिलं आणि म्हणूनच so called `GENIUS वगैरे नसतानाही तिला त्या प्रश्नाचं उत्तर मिळालं...‘सगळं गोल आहे’ ! निसर्ग सरळ-साधा आहे, आपण त्याला complicated बनवलंय ! तू पहिल्यांदा त्या कलाकृतीची फोड करून बघ...तुझ्या तर्क पध्दतीने !”-के-१८ तिला बळ देण्याच्या उद्देशाने म्हणाला.

It’s quite simple ! जो गोल आहे तो ग्रहांचं प्रतिनिधीत्व करतोय. साप हा मोर आणि गोल यांच्या मधे आहे, जो बायबलमधील सैतानाचं रूप किंवा विनाशाचं रूप आहे आणि आकाशाकडे पहाणारा मोर हा उज्ज्वल भविष्यासाठी आकाशाकडे पहा असं सुचवतोय ! प्रत्येक ग्रहाचा विनाश अटळ आहे आणि त्या विनाशाला मानवच कारणीभूत ठरतो पण मनुष्यस्वभावाला अनुसरून तो आकाशातील अनंत पोकळीत वास्तव्यासाठी नव-नव्या जागा शोधून काढतोच आणि ती जागा शोधली की, आपोआपच रहात्या ग्रहाचा नाश जवळ आला आहे, हे लक्षात येतं ! एका ग्रहावरचा मानव, दुसर्‍या ग्रहावर ‘देव’ ठरतो आणि पुढच्या अनेक पिढ्यांच्या मेंदूत हे देवपण घुसून, शेवट यादवी होण्यात आणि पर्यायानं विनाश होण्यात होतं ! मग मानव करतो काय ? तर पुन्हा नवी जागा शोधतो आणि ज्या देवांसाठी विनाशाचं कारण बनलो, तोच स्वत: नव्या ग्रहावर ‘देवत्वा’ला प्राप्त होतो...Isn’t it strange...???”-आहना

“मग, या सार्‍यात तुला एक `PATTERN नाही दिसला ?”-के-१८

“पॅटर्न दिसतोय पण लक्षात येत नाहीये...! पण एक आहे, ज्याला हा पॅटर्न कळला तो नाहीसा होतो !”-आहना

“कारण ?”

“कारण, या सार्‍यामागं कोणती तरी एक शक्ती आहे...”

“जशी...”

Yess !! You are right !!!”-आहना

“आलं लक्षात ? जेंव्हा एखादं `Top Secret’ असतं तेंव्हा आपण काय करतो ?”

“ते बाहेर पडू नये म्हणून त्यासाठी आपण `Defence Mechanism’ तयार करतो...”-आहना भुवया उडवत म्हणाली

There you are ! आहना, निसर्ग ही सर्वोच्च्य शक्ती आहे, आणि तिच्यासाठी defence mechanism तयार करणं अगदीच क्षुल्लक बाब आहे !”

“अगदीच बरोबर के-१८ ! निसर्गाचं स्वत:चं शक्तिशाली defence mechanism काम करतं जे, कोणी जर त्याच्या अस्तित्वावर उठला तर ते त्याचं अस्तित्वच नाहीसं करतं...जगा आणि जगू द्या...या तत्वानुसार ! तुम्ही माझं अस्तित्व नष्ट न करता माझ्या terms & conditions वर तग धरू द्या, मी तुम्हाला तुमच्या terms & conditions वर तग धरू देतो...! Isn’t it ?”-आहना उत्साहाने म्हणाली.

“आहना..आता थोडा खोलात विचार करू...,एकच कलाकृती ठराविक काळानंतर REPEAT होते पण, त्याचं स्थल, काळ, लिंग सारं वेगळं असतं. बरोबर ? आहनाचं म्हणणं होतं की, ‘सगळं गोल आहे..’ ! तिचं वाक्य आपण प्रमाण मानू कारण, अगदीच लहान वयात तिला सत्य उमगलं आणि म्हणूनच निसर्गानं किंवा पर्यायानं काळानं, तिला नाहीसं केलं. बरोबर ? आता मला सांग, या सार्‍या गोष्टी REPEAT होण्यामध्ये आणि आहनाच्या वाक्यामध्ये सुवर्णमध्य काढायचा म्हंटलं तर, कसा काढशील..?”-के-१८

आहना बराच वेळ विचार करत बसली. के-१८ तिच्याकडं मोठ्या अपेक्षेनं पहात होता.

“काळाला पॅटर्न आहे आणि काळ गोलाकार चौकटीत फिरतो...!”-आहना त्याच्या नजरेत नजर रोखत म्हणाली.

 “फायनली, तुला काळाचं रहस्य उमगलं आहना...!! काळाला चौकट असते !!!”-के-१८ च्या चेहर्‍यावर विजयाचं स्मित होतं. आहनाच्या चेहर्‍यावर मात्र भीति पसरली होती.

“काय झालं आहना..?”

“ज्यांना-ज्यांना हे रहस्य उलगडलं, त्यांचा-त्यांचा अचानक मृत्यू झाला, कारण...काळाला हे रहस्य, रहस्यच रहावं असं वाटत असावं ! कारण, एकदा का ‘हा’ काळाचा पाया समजला तर कदाचित काळच नाहीसा होईल आणि सारंच गणित कोलमडून पडेल !! Aahna was right...सगळंच गोल आहे !!!”-आहना भेदरलेल्या नजरेनं त्याच्याकडं पहात होती.

के-१८ च्या चेहर्‍यावरही भीति तरळली. दोघांनी एकाच वेळी सिम्युटरवरच्या आहनाच्या चित्राकडं नजर वळवली...

गोल, त्यावर नाचणारा मोर आणि मोराच्या पायाला विळखा घातलेला साप !

(क्रमश:)

 

COGNIZANCE: All written creative material is the solemn property of “An Anup Jatratkar Multi-Media Production”. If anyone wanted to use it for his/her own personal purpose (i.e. short film, projects, blogs, articles, scripts, FB posts etc.) then, have to take proper permission from, Mr. Anup Jatratkar. If it will be found that, anyone involved in such activities without prior permission, then, we are able to take certain charge on him/her.

 

Pen Image

Pen Index