मागच्या भागात
काय घडले ? : कृपया ‘प्रकरण तिसरे’ वाचण्यागोदर ‘प्रकरण पहिले’ आणि ‘प्रकरण दुसरे’
वाचावे, अन्यथा या भागातील गोष्टींशी जुळवून घेता येणार नाही. ‘प्रकरण पहिले’ आणि
‘प्रकरण दुसरे’ सर्वात खाली किंवा बाजूच्या इंडेक्समध्ये उपलब्ध आहे, याची नोंद
घ्यावी.
सूचना : सदर कथानक काल्पनिक असले तरी यात उल्लेख केलेल्या कांही घटनांना ऐतिहासिक पाया आहे. सत्य आहेत. त्या घटनांचा वापर करून काल्पनिक पात्रांच्या सहाय्याने कथेला आकार देण्याचा प्रयत्न केला आहे पण असे असले तरी त्या घटनांबद्दल मत निर्माण करण्याचा किंवा विकृतीकरण करण्याचा हेतू नाही, याची वाचकांनी नोंद घ्यावी.
सदर दीर्घकथेचे ६
भाग प्रकाशित करण्यात आले असून, हा ७ वा आणि शेवटचा भाग आहे याचीही कृपया नोंद
घ्यावी. या दीर्घकथेसंदर्भातील आपली मते आपण मला कळवू शकता. वेबसाईटवरील
‘कॉन्टॅक्ट’ मेनूमध्ये जावून आपण मला मेसेज पाठवू शकता. आपल्या प्रतिक्रीया आणि
अभिप्रायाच्या प्रतिक्षेत...
-
अनुप
दीर्घकथा १ : रहस्य
प्रकरण ३ : शेवट
भाग १ : इ. स. २००४ (२१ वे शतक)
(पुढे...)
एंजलो टेरेसवर गाढ झोपला होता. विक्रम
आपल्या अभ्यासिकेत बसून अर्धवट राहिलेले संशोधन गणिताच्या सहाय्याने पूर्ण करण्यात
गुंतला होता. विनिता उठून स्वयंपाकघरात नाष्ट्याची तयारी करत होती. उत्साहीत
झालेला विक्रम किचनम्ध्ये येवून तिच्या कमरेभोवती हाताचा विळखा टाकत म्हणाला,
“मी एका खूप
मोठ्या रहस्याचा भेद केलाय विनू...! मला समजलंय आपली आहना का गेली ? तिला काय
समजलं होतं...! आजचा दिवस खूप मोठा असणारेय...आपल्यासाठी आणि संपूर्ण मानव
जातीसाठी..! मी आज संध्याकाळी प्रेस कॉन्फरन्स बोलावतोय...! तुझं आवरून लवकर
स्टडीमध्ये ये...सर्वांना ऐकवण्यागोदर तुला ऐकवायचंय मला...”-असं म्हणून विक्रम
निघूनही गेला. त्याचा अविर्भाव पाहून तिलाही हायसं वाटलं. ती गडबडीनं नाष्टा बनवू
लागली.
विक्रम खुर्चीत बसला आणि बर्याच
दिवसांनी त्यानं सिगार शिलगावली. दोन-तीन दमदार झुरके मारून त्यानं फोन उचलला आणि
रोझीचा नंबर डायल करू लागला. रिंग होवू लागली आणि अचानक विक्रमच्या छातीतून जोराने
कळा येवू लागल्या. पलिकडून रोझी “हॅलो..” म्हणत होती पण, तिला उत्तर देण्याचंही
त्याच्यात त्राण नव्हत. त्यानं विनिताला हाक मारायचा प्रयत्न केला पण, दार पुढं
केलं असल्यानं त्याचा आवाज बाहेर जात नव्हता. तो कळवळून पडला. त्याच्या हातातील
सिगार टेबलवरच पडली. तिथंच बाजूला त्याच्या सार्या चार वर्षातील संशोधनाची कागदं
होती. सिगारची ठिणगी एका टिश्यू पेपरला लागली आणि बघता-बघता सार्या टेबलला आगीनं
घेरलं होतं. डोळ्यात पाणी आणून विक्रम पहात होता. त्याच अवस्थेत त्याला
अर्धांगवायूचाही झटका आला आणि क्षणातच विक्रम मरण पावला. खोलीतील कागदपत्रांचा धूर
बाहेर पडू लागला. जळक्या वासानं विनिता खोलीच्या दिशेनं आली आणि घाबरून ओरडू
लागली. यासार्या आरडा-ओरडीनं एंजलोला जाग आली. तो गडबडीनं खाली आला. त्यानं आणि
विनितानं मिळून पाणी मारून ती आग आटोक्यात आणली. दोघं खोलीत आले. विक्रम मरून पडला
होता.
*****
भाग २ : इ. स. ४३० (५ वे शतक)
(पुढे...)
पंडीत धर्मपाल आपल्या कुटीत सायंकाळची
प्रार्थना करत होते. वर्मन आचार्यांच्या लिखाणासाठीची पूर्वतयारी करत होता. आचार्य
प्रसन्नपणे त्याच्या शेजारी आले. वर्मनने त्यांच्या पायावर डोकं टेकवलं.
आचार्यांनी त्याच्या हातावर तीर्थ दिलं.
“वर्मन,
तुझ्यामुळेच हा क्षण माझ्या आयुष्यात आला आहे. आजचा दिवस खरेच
माझ्यासाठी..आपल्यासाठी विशेष होता...आहे, हे नक्की ! मला खात्री आहे, माझे लिखाण
पुढच्या कित्येक पिढ्यांसाठी पथदर्शक म्हणून उपयोगी पडेल. माझे लिखाण होईस्तोवर तू
इथेच रहा, म्हणजे मला तुझ्याशी गरज भासेल तेंव्हा चर्चा करता येईल...”
“जशी आद्न्या
आचार्य !”
“वर्मन, कुटीमधील
पिण्याचे पाणी संपले आहे...तेवढे घेवून ये..! तोवर मी लिखाणाची सारी तयारी करतो.
तू आलास की, दोघे मिळूनच सुरूवात करू...”
वर्मन पाणी आणण्यासाठी सरोवराच्या
दिशेने निघून गेला आणि आचार्य लिखाणासाठीची जुळवा-जुळव करून शांत चित्ताने बसले.
बराच वेळ विचार करून, मनात शब्द योजना करून ते लिखाणाला सुरूवात करणार पण
त्यापूर्वी, नेहमीप्रमाणे झटक्याने मान मोडून, मान हलकी करून लिहायला सुरूवात
करावी, या हेतूने त्यांनी मानेला हिसडा मारला पण, जोरदार झटक्याने मानेची शीर
अडकून ते समोरच्या लोडावर कोलमडले. नाकातून रक्ताची धार लागली. आचार्य उचक्या देवू
लागले आणि त्यातच त्यांचा अंत झाला.
वर्मन सरोवरापाशी जावून जरावेळ
चांदण्यांचे प्रतिबिंब पहाण्यात रमला. सकाळपासूनच्या चर्चेवर त्यानं मनातल्या मनात
उजळणी केली आणि आपणही आपल्याला जमेल तसे लिखाण करून आचार्यांना दाखवून शाबासकी
मिळवावी, असाही विचार केला. गार वारा जास्तच अंगाला झोंबू लागला तसा, तो उठला आणि
ताम्र-कळशी घेवून सरोवराच्या काठाशी जावून उभा राहिला. गुडघ्यावर बसून ताम्र-कळशीत
तो पाणी भरू लागला. दूरवर सरोवराच्या मध्यभागी त्याला कांहीतरी चमकताना दिसू
लागले. कपाळ्याला आठ्या घालून तो ते पाहू लागला. या नादात भरलेल्या ताम्र-कळशीचा
हिसडा त्याच्या हाताला जाणवला आणि गुडघ्यावर बसल्याने, त्याला आपला तोल सांभाळता
आला नाही आणि वर्मन सरोवरात गटांगळ्या खावू लागला. बर्याचवेळाने पुन्हा सरोवरावर
शांतता पसरली. पाण्यात तरंग येणं बंद झालं. वर्मन पाण्यात नाहीसा झाला होता.
*****
भाग ३ : पु.व. ७३४ (१८ वे सुर्य-वर्ष)
(पुढे...)
गोविल चरफडत बाल्कनीत उतरला. फ्लोअर
४८ वर बरीच गडबड झाली असणार, हे त्याच्याकडं पाहूनच लक्षात येत होतं. गोविल आत
येवून सोफ्यावर बसला. त्यानं खिशातून निकोटसचं पाकीट काढलं आणि त्यातील रोल बाहेर
काढून पेटवला. निकोटसच्या तुरट वासानं खोली भरून गेली. इतका वेळ होवूनही अजून आहना
कशी बाहेर आली नाही, हे पहायला तो उठला आणि आतल्या खोलीत गेला. आतल्या खोलीत के-१८
निपचीप पडला होता. त्यानं आपल्या सिम्प्युटरला त्याची केबल कनेक्ट केली तसा, “Virus Infected Information”, “ERROR : FORMAT SYSTEM” असे messages blink आणि ऐकू येवू
लागले. गोविल वैतागून आहनाला शोधू लागला.
पुढचे कित्येक दिवस गोविलनं आहनाला शोधण्यात घालवले. “Missing Case” म्हणून नोंदही करण्यात आली. आहना कुठं होती ? याचं उत्तर
कुणाकडेच नव्हतं. ती जिवंत असण्याची शक्यताही नव्हती आणि असलीच तरी, कोणत्या
अवस्थेत असेल ? हे मात्र कुणीच सांगू शकत नव्हतं !!! आहना missing होती, हेच एकमात्र सत्य होतं...निदान सद्यपरिस्थितीत तरी !
(समाप्त)
COGNIZANCE: All written creative material is the solemn property of “An Anup
Jatratkar Multi-Media Production”. If anyone wanted to use it for his/her own
personal purpose (i.e. short film, projects, blogs, articles, scripts, FB posts
etc.) then, have to take proper permission from, Mr. Anup Jatratkar. If it will
be found that, anyone involved in such activities without prior permission,
then, we are able to take certain charge on him/her.