१. बिनचेहर्याचा चेहरा...सखीचा !
चेहरा...
माझा...त्यांचा...सर्वांचा...
आणि एक
बिनचेहर्य़ाचा चेहरा...
अगदी
तुझ्यासारखा...!
एक बिनचेहर्याचा
चेहरा...
मनात
ठसलेला...
विसरू
म्हणतानाही, अजूनच मनात धसणारा...!!!
काय असतो
चेहरा ?
कसा असतो
चेहरा ??
का असतो चेहरा
???
चेहर्यामागच्या
प्रश्नांची उत्तरे शोधतोय...
कदाचित ती
उत्तरे शोधताना,
तू सापडशील
अवचित कोणत्याशा वळणावर...
वाट पहात उभी
असताना आणि मनगटावरील घड्याळात नजर टाकून,
‘वेळ झाला
तुला नेहमीप्रमाणं यायला...’ अशा खोचक नजरेनं पाहून,
गाडीच्या
मागच्या सीटवर रागाने बसशील आणि
पाठीत चिमटा
तर घेशील नाहीतर गुद्दा तर मारशील...
मी ‘आई
ग्गं...! गप ना ***** !!’ असं म्हणून खोटं-खोटं पुन्हा कळवळेन...
याच
आशेने...उत्तरे शोधतोय !
उत्तरं
सापडतीलही कदाचित...
हो, सापडायलाच
हवीत !
प्रश्न असतील
तर उत्तर असायलाच हवे आणि-
उत्तरच नसेल
तर मग प्रश्न निर्माण होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही !
पण, बिनचेहर्यामागचा
चेहरा...
तो कसा
शोधणार...?
कुठे
सापडणार...??
का शोधायचा तो
चेहरा ???
ते म्हणतात,
चेहरा ओळख
असते...
चेहरा ओळख
असतो...
चेहरा
स्वाभिमान आणि अहमही असतो कधी-कधी !
पण या
सर्वांमध्ये चेहर्याचा संबंध असतोच कुठे ?
नावामुळे
चेहरा...बिनचेहर्याचेही नाव !
नावच
सर्वस्व...
अगदीच
तुझ्याप्रमाणं...तुझ्या बिनचेहर्याप्रमाण !!
तुला
आठवतंय...
एकदा गंमत
म्हणून आपण आपापल्या नावांची आदलाबदल केली होती !
ते जसे
माझ्याशी आणि ते जसे तुझ्याशी...
तसंच आपणही
एकमेकाशी वागलो होतो..!
फक्त दहाच
मिनीटात वैतागून रुसली होतीस तू...
मला वैतागून
कसं चालेल ?
सखे..
आठवतंय,
तुझ्या घरासमोरील त्या छोट्याशा टेकडीजवळ...
पाण्याच्या
टाकीखाली आपण एकदा भेटलो होतो..!
हात हातात
घेवून, माझ्या चेहर्याची तू ओळख विचारली होतीस !
तुला ते गरम
पाण्याचं लिंबू सरबत तर नक्कीच आठवत असेल !
आत्ता, ते
आठवताना चेहर्यावर स्मित उमटलं आणि,
ओठांवर त्याच
गरम लिंबू सरबताची चव रेंगाळून गेलीये...!
स्वत:शीच लाजत
माझी नजर आरशातल्या माझ्यावर गेली...
माझा चेहरा
नव्हताच कुठे...
तिथे तर तुझा
चेहरा होता...!!!
पाकीटातला
तुझा फोटो पाहिला...तिथे ना तुझा चेहरा होता ना माझा !
काय झालं ?
कसं घडलं ?
माझ्या धडावर
तुझा चेहरा असेल, तर तुझ्या धडावर कुणाचाच चेहरा का नाही ?
आणि तुझ्या
धडावर माझा चेहराच नसेल, तर....
तर...मी तुझ्याही
धडावर नाही आणि माझ्याही !!!
२. तिनं खटला जिंकला....
तिनं, खटला जिंकला...!
त्याच्यावर बलात्काराचा आरोप सिध्द झाला...
आणि तिनं खटला जिंकला !!!
चार भिंतीतला तो बलात्कार,
आणि आजूबाजूची चार टकली !
न्यायालयात-मिडीयामध्ये,
प्रत्येकाने तिच्यावर तिरकी नजर टाकली....
भिंतीतल्या बलात्काराचा....
सर्वांसमोर बलात्कार होवून, अखेर निकाल लागला...
आणि तिनं खटला जिंकला !
बलात्काराची रसभरीत वर्णनं,
न्यायालयात थांबली पण,
मिडीया आणि स्मार्ट फोननी...
त्यांना नवी चमक आणली.
चार भिंतीतला बलात्कार,
मोबाईल-टि.व्ही.वर सुरूच राहिला...
आणि प्रत्येकाच्या तोंडी एकच वाक्य-
तिनं खटला जिंकला !
तो असेल-गावगुंड, मद्यधुंद किंवा श्रीमंत बापाचा,
पॅरोलवरती सुटेलही कदाचित !
तिच्या दारावर मात्र,
येणार्या-जाणार्या प्रत्येकाची नजर असेल,
ती रंडीच असल्याप्रमाणं,
सारेजण वळून-वळून तिच्याकडं पहातील,
अन कुजकेपणानं म्हणतील,
हं...तिनं खटला जिंकला !
कुणी कॅन्डल मार्च काढेल,
कुणी काळ्या फिती बांधून काम करेल,
कुणी,”बलात्कार एन्जॉय का केला नाही?”
असा सवाल विचारत मुलाखती देईल.
प्रत्येकजण आपलंच पोट भरून घेईल,
सहानुभूतीच्या पोस्टर्सना गावागावात पूर येईल.
चार क्षणांचा बलात्कार,
चार महिने-वर्षे सुरूच राहिल.
कारण सारे एकच देतील-
तिनं खटला जिंकला !
हळू-हळू सार्यांचा उमाळा कमी होईल,
हळू-हळू सार्यांच्या भावना निगरगट्ट होतील,
सारेच तिला विसरून चालत रहातील,
तीही विसरेल आणि जुळवून घेण्याचा प्रयत्न करेल.
पुन्हा दिसलीच ती कधी आपल्याला तर,
आपणच आपापसात कुजबूजु, टाळ्या देवू,
आणि बेफिकीरीचा आव आणत म्हणू-
अरे, तिच ती...जिच्यावर बलात्कार झाला...
आणि, जिनं खटला जिंकला !!!
-अनुप
COGNIZANCE: All written creative material is the solemn property of “An Anup
Jatratkar Multi-Media Production”. If anyone wanted to use it for his/her own
personal purpose (i.e. short film, projects, blogs, articles, scripts, FB posts
etc.) then, have to take proper permission from, Mr. Anup Jatratkar. If it will
be found that, anyone involved in such activities without prior permission,
then, we are able to take certain charge on him/her.