काव्यपंक्ती १
१.
चिंब ओल्या
मना
चिंब ओल्या मना, बजावतो तुला...
घाबरायचं नाही, जेव्हा जाशील सामोरा तिला.
हसेल पाहून तुझ्याकडं, हसणारही नाही कदाचित.
तू मात्र हास, पाहून संधी अवचित.
नखरा करेल तुझ्यासमोर, हसेल जोरजोरानं.
तू झपाट्यानं निघून जा, ती ग्रासेल वियोगानं.
पुन्हा जेव्हा भेटशील तिला,पाहील लटक्या रागानं.
नजरेला नजर भिडव, पाहतील डोळे प्रेमानं.
खूप झालं आता, हे रोजचंच झालंय.
क्षणाक्षणाला झुरणं, हेच नशीबी आलय.
सांगून टाक तिला, स्पष्टपणे सारं कांही.
भेटायला बोलव, सांगून कारण कांही बाही.
तीही जाणते, बोलावण्याचं कारण.
डोळे सुजतील, पाहून स्वप्ने अन जागरण.
तिच्या येण्याची वेळ होईल, तू अस्वस्थ होशील.
म्हणून, चिंब ओल्या मना, बजावतो तुला.
घाबरायचं नाही, जेव्हा जाशील सामोरा तिला.
२.
निमित्त
आजकाल, त्याची अन त्याच्या प्रश्नांची,
सतत चढाओढ सुरू असते.
सुरवात अन कारण तसे क्षुल्लकच असतात,
पण वाद सुरू झाल्यावर फार मोठी भासतात.
त्याचं बर्याचदा असं होतं...
तो तिच्या येण्याची वाट पहात असतो.
ती येईल कशावरून ? प्रश्न, कोडी घालत असतो.
संतापून जेव्हा तो, ती येण्याचा दावा करतो...
त्या दिवशी ती येतच नाही.
प्रश्न गालात हसत असतो.
एवढं निमित्त दोघांनाही पुरेसं असतं.
वाद सुरू असताना तिचं येवून हसणं होतं.
पाटाच्या
पाण्यात रोज संध्याकाळी पाय सोडून बसणं.
अन हातात हात
घेऊन नुसतच एकमेकांना न्याहाळणं.
तेव्हा
डोळ्यांची भाषाही...
किती अचूक
ओळखायचो आपण !
हृदयीच्या
ठोक्यांनाही सावरायचो आपण.
जडावलेले
श्वास जेव्हा...
श्वासांमध्ये
मिसळत !
शब्द बनल्या
श्वासांनाही अलगद कुरवाळायचो आपण.
हातामधले
हातही...
हितगुज करीत
असायचे !
लाली
पसरलेल्या गालांवरून नि:शब्दपणे ते झिरपायचे.
तुझ्या
ओठांवरचं हास्यही...
मला बरच कांही
सांगून जायचं !
कंपित ओठांनी
प्रत्युतरही देऊन जायचं.
आरक्त तुझे
नेत्रही...
पापण्यांआड
लपायचे !
तिरकेच पाहून
माझ्याशी ते लपाछपी खेळायचे.
दोन क्षण
सरता...सरता...
निघण्याची ती
घटका यावी !
पावलेही जड
जणू साखळदंडांनी जखडून जावी.
निघतानाही
पुढे जाऊन...
वळून तू
पाहावे !
पुन्हा उद्या
भेटण्यासाठी जणू मला तू सुचवावे.
४.
उचकी
रात आत्ता कुठे थंडीच्या दाट दुलईखाली,
शांतपणे श्वास घेते आहे.
बोचरा वारा शीळ घातल्याप्रमाणे,
एकसारखा धावतो आहे.
सुस्तावलेल्या चांदण्या, लुकलुकत्या डोळ्यांनी,
पृथ्वीकडे पाहताहेत.
ध्रुवबाळ मुश्किलीने डोळे उघडे ठेवून,
वाट चुकणार्या प्रत्येकाला वाट दावतो आहे.
चंद्र नक्षीदार चादर ओढून...
क्षितीजाच्या मांडीवर डोकं ठेवून...
केव्हाच झोपेच्या आधीन झाला आहे.
सारं शहरसुध्दा कधीचं बिछान्यात अंग झोकून,
स्वप्न रंगवत आहे.
ह्या बोचर्या राती, सारं विश्व जणू जडावून,
अंथरूणात शिरत आहे.
पण मला ठाऊक आहे,
या पसार्याच्या एका कोनाड्यात,
एक जीव माझ्याप्रमाणच, हाच सारा हिशोब करत...
एकटाच घराच्या गच्चीत उभा राहून...
जागत असेल, हसत असेल, लाजत असेल...
कदाचित चिडतही असेल !
सारंच बोलून स्वत:शी, स्वत:लाच विचारत असेल...
असेल का तो एक जीव जागा...?
असेल का काढत माझी आठवण...?
काय करत असेल...?
अन अवचितपणे आलेल्या उचकीने,
पाणी पिण्यासाठी, धाड-धाड जिना उतरत...
धाव घेत असेल स्वयंपाकघराकडे !
आणि पाणी पित वैतागल्या स्वरात म्हणेल...
कुणी काढली असेल अशा अवेळी आठवण...?
आणि माझ्या घराच्या गच्चीत उभा मी...
धाड-धाड जिना उतरत धाव घेईन...स्वयंपाकघराकडे...
पाणी पिण्यासाठी...!
५.
जाण
भिजलेल्या मातीचा धुंद सुवास...
अन मनामध्ये उठणारा तुझ्या स्मृतीचा दरवळ...
यांना चिथावण्यासाठी, पावसाचा एक थेंब पुरेसा आहे.
या तिघांपैकी मी कुणालाही अडवू शकत नाही.
खरं सांगायचं तर, मी अडवूच इच्छित नाही.
आपलं एकत्र असणं अन...
मध्येच पावसाचं टपकणं !
असं पावसाळ्यात रोजचंच.
तुझ्या गालावरचा तो थेंब...
मला पाहून हसायचा !
वाटायचं जणू तो मला वाकुल्या दाखवायचा !
तेव्हा नकळत तू तो थेंब झटकायचीस...
अन एका दामिनेसरशी मला बिलगायचीस...
याच आठवणी तर मी जतन केल्या आहेत.
तेव्हा मातीच्या वासाने तू धुंदावून जायचीस...
अन, प्रेमाचाही गंध असाच असेल का...?
म्हणून मला विचारायचीस.
तेव्हा मी तुला रागे भरायचो....
वेडे, हा कसचा सुवास...!
पण खरं सांगू...?
आज तोच सुवास माझा सोबती आहे.
तुझ्या त्या शब्दांची त्याला आजही आस आहे.
म्हणूनच...
भिजलेल्या मातीचा धुंद सुवास...
अन मनामध्ये उठणारा तुझ्या स्मृतींचा दरवळ...
यांना चिथावण्यासाठी पावसाचा एक थेंब पुरेसा आहे.
६. तांडव
काल सांज
माहेरी जाताना,
मनी उगाच
रुखरुख लागून गेली.
ती
गेल्यानंतरही मागे रेंगाळणार्या, तिच्या आठवणींना,
माझी कीव
वाटून गेली.
हळूहळू तिच्या
आठवणीही धुसर होत गेल्या.
मग, नभात आणि
मनात, सावल्या दाट होत गेल्या.
त्याच दाट
सावलीच्या पडद्यामागून,
ठळक होत जातो
तुझा चेहरा.
आणि अचानक मग,
नभातील दाट
सावली दाट वाटेनाशी होते,
मळभ दूर
होते...सावल्या दूर होतात.
मग सुरू
होते...तांडव, तुझ्या स्मृतींचे...!
मग मी ही करू
लागतो बरोबरी...
सांज माहेरी
जाण्याशी, तुझी.
पुन्हा मनावर
दाटू लागते, तीच रुखरुख.
पुन्हा सावली
दाटते...
पुन्हा तुझा
चेहरा...
पुन्हा तेच
तांडव...
असं उद्या
पहाटेपर्यंत..!
ती नवा साज
लेवून क्षितीजावर हजर.
पण, अजूनही मी
तिथेच.
नभ पुन्हा
तिला मिठीत घेईल...
दोघांचाही
प्रेमालाप सुरूच राहिल...सांजेपर्यंत !
आणि, मी असेन
कुरवाळत तसाच,
आपल्यातील
दुराव्यांना...
त्या
सावल्यांना...
अन बेताल
झाल्या तांडवाला...
७. मुर्दाड
नजर...
कधी तू आठवणींना दारात उभं राहून,
भीक मागताना पाहिलं आहेस...?
नाही ना..? पण मी पाहिलंय..!
मी पाहिलंय...
त्यांना आगतिक होऊन दारात उभं राहताना,
आर्त टाहो फोडताना...
का गं, त्या फिरून फिरून पुन्हा माझ्याच दारी येतात ?
का त्या पुन्हा पुन्हा तुझे गीत स्मरून देतात ?
त्यांना तुझ्या अंगणात येण्यास,
खरच का तू मज्जाव केला आहेस ?
किंवा कदाचित दारात-‘कुत्र्यापासून सावधान’,
अशी पाटी लावली असशील...! हो ना ?
पण त्यांना भीक देण्याइतपतही,
माझ्या झोळीत धान्य नाही गं !
म्हणून आता मीच सवय करून घेतलीये...
त्यांच्या लाचार नजरेची...
त्यांच्या भळभळणार्या जखमांची...
घोंघावणार्या माशांची...
आणि मुर्दाड बनल्या माझ्याच नजरेची...!
८. एक वेल
एका जुनाट वाड्याच्या छपरावरती...
एक वेल अंकुरली होती.
हिरव्या इवल्या पानांनी...
वार्यासवे डोलत होती.
त्या
वेलीकडं पाहून मला...
खरच तुझी
आठवण झाली.
माळलेल्या
गजर्याचा गंध पसरवणारी...
एक झुळुक
स्मरून गेली.
आयुष्यांतील रुक्ष क्षणांत...
तुझ्या हाताची ऊब मला सावरायची.
अजूनही ती ऊब तुझ्या...
आठवणींमधून जाणवायची.
तुझ्या
मिठीत सामावून...
कित्येक
क्षणांचा मेळ घातला होता.
आपली
अखेरची ती भेट...
हाती हात
अन डोळ्यांनीच समेट घडवला होता.
आज त्या वाड्यावरच्या वेलीनं...
दुसर्याच एका वेलीला खत घातलं होतं.
मनाच्या जुनाट छपरावरती...
आठवणींचं फुल उमललही होतं.
तुला मी काय
देऊ ? तूच खूप दिलंस...
आयुष्याच्या
भिंतींना सुरेख छत दिलंस...
या आडोशाला
पूर्वी काहीच नाव नव्हतं...
त्याला तू
घराचं घरपण दिलंस...
सुंदर या
स्वप्नाला तू कुंपणदेखील घातलंस...
कुलूप म्हणून
काजळ, तीटदेखील लावलंस...
पण सखे, एक
गोष्ट विसरलीस...
तू मात्र एकटी
कुंपणाबाहेर राहिलीस...
प्रेमाच्या या
राजवाड्यात तू उणे राहिलीस...
अंगणातील वृंदावनाला
तुझी आस दिलीस...
COGNIZANCE: All written creative material is the solemn property of “An Anup
Jatratkar Multi-Media Production”. If anyone wanted to use it for his/her own
personal purpose (i.e. short film, projects, blogs, articles, scripts, FB posts
etc.) then, have to take proper permission from, Mr. Anup Jatratkar. If it will
be found that, anyone involved in such activities without prior permission,
then, we are able to take certain charge on him/her.