Pen


PEN 18 : लघुकथा : ७ : हॅपी बर्थडे...प्रिंसेस !

दिलगिरी : 

कांही तांत्रिक कारणांमुळे या रविवारी (८ ऑक्टोबर २०१७ रोजी) ही कथा प्रकाशित होवू शकली नाही, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो.

-लेखक

 


लघुकथा : ७ : हॅपी बर्थडे...प्रिंसेस !

 

            संध्याकाळ होवू लागली होती. धुक्याची मलईदार चादर समोरच्या धरणाच्या पाण्यावर पसरू लागली होती. धरणाभोवती असलेल्या जंगलातून मोरांचे, गव्यांचे आवाज आसमंतात भरून राहिले होते. गारवा चोहोबाजूला आणि मनात पसरू लागला होता. नितळ, शांत पाणी आणि अचानक मधेच पाण्याबाहेर उडी मारून मला चिडवून पुन्हा पाण्यात गायब होणारा मासा ! सारंच प्रसन्न, सुंदर, लयीत आणि किनार्‍यावर बसलेला मी मात्र या सार्‍यांपासून अलिप्त...एकाकी !! मला जी कांही मोजकी ठिकाणं आवडतात त्यापैकी हे एक ठिकाण ! जंगलाच्या मधोमध असणारं धरण आणि वाटेवर लागणारं, गर्द झाडीत लपलेलं शंकराचं मंदीर ! आज याच माझ्या आवडत्या ठिकाणांच्या सहवासात असूनही मनातली पोकळी मात्र भरूनच निघत नव्हती. एखादी भळभळती जखम लवकर बरी व्हावी म्हणत असतानाच, नेमकं त्याचवेळी त्याच जखमेला कांहीतरी लागावं आणि ती जखम पुन्हा भळभळावी असंच कांहीसं.

            पाण्याच्या तरंगांकडं पहात असताना नेहमी एक विचार माझ्या मनात उफाळून येतो, सालं...आपलं मन हे या पाण्यासारखं आणि आठवणी तरंगांसारख्या असतात आणि विचार हे बे-लगाम वार्‍यासारखे असतात. हरामखोर स्वत: उधळतात, काळ-वेळ न पहाता आणि मुद्दाम डिवचून, दिशा बदलून पळत रहातात ! आणि मुर्ख आठवणी हिंदोळे घेत, एकामागून एक उठत रहातात आणि मनाला घुसळून काढतात. पण...पण, तरंग मुळात एकाच जागी असतात. पाण्याचा एक लहान फुगवटा वर उठतो आणि खाली जाताना पुढचा फुगवटा तयार करतो. म्हणूनच लाट किनार्‍याच्या दिशेने येत असल्याचा भास होतो ! आठवणींचंही तसंच कांहींस असू शकेल काय ? नाही...आठवणींच्या बाबतीत हे खरं नसावं बहुधा कारण त्या येवून मनाच्या किनार्‍यावर आदळतात तेंव्हा एकाच फुगवट्याचा नाही तर शेकडो टाचण्या एकाचवेळी बोचल्याची जाणीव होते...भास नाही !

पुन्हा एक मासा पाण्यावर येवून गेला. त्याक्षणी मला तो माझ्या मनात येणार्‍या तिच्या आठवणींसारखा वाटला. सतत डोकं वर काढू पाहणारा, तिचा विचाररूपी मासा ! त्याची शिकार कशी करू ? करूही शकेन कदाचित पण मग, स्वत:ला माफ मात्र कधीच करू शकणार नाही. इतरवेळी जाळ्यात सापडणारा मासा, आज मात्र मलाच जाळ्यात ओढू पहात होता आणि मीही कळत नकळत त्याच्या जाळ्यात गुरफटू लागलो होतो. वाहणारा मंद वारा मला त्याच्यासोबत लाटांवर स्वार होवून भूतकाळात नेवू पहात होता. धरणाचं पाणीही वाकुल्या दाखवू पहात होतं. खूप दूरवर वाटेवर असणार्‍या शंकराच्या मंदीरातील घंटानाद कानावर आदळू लागल्याचा भास होवू लागला. हो...हा मात्र नक्कीच भास होता. त्या घंटानादाबरोबर मी तिला दिलेल्या वचनाचाही स्वर कानावर आदळू लागला.

“तुझ्या प्रत्येक वाढदिवसाला आपण इथंच येवू...” अचानक डोळ्याच्या कडा ओलावू लागल्याचा भास झाला. मानेला झटका देवून मी आजूबाजूला कुणी नाही ना ? म्हणत डोळ्यातील पाणी शर्टाच्या बाहीनं टिपून घेतलं. सालं...जे काम सारे शब्द करू शकले नाहीत ते काम पाण्याच्या एका थेंबानं केलं आणि सारा भूतकाळातील दृष्यक्रम मन:पटलावर झरझर उतरू लागला. आता तो दृष्यक्रम शब्दात उतरवण्याशिवाय गत्यंतर नाही. ही माझी कथा आहे. अं....मी कुणीही ! हा...तो...ते...इतर... तू...तुम्ही... किंवा अगदी मीही ! मला चेहरा नाही आणि तसंही प्रेमाला चेहरा नसतोच. ती असते केवळ भावना, संवेदना, मौनाची आणि प्रसंगी डोळ्यांची भाषा, ओझरत्या स्पर्शातील स्पंदनांची भाषा ! कधी कधी आपलं आयुष्य परीकथेसारखं चितारण्यातही खूप मौज असते. उगाचच खूप भारी वाटतं. परीकथांच एक भारी असतं...एक परी असते, एक उमदा तरुण, एक खलनायक, एक चेटकीण, तरुणाच्या परिक्षा आणि मग सुखी संसार ! म्हणूनच परीकथा भारी असतात कारण, त्यांचा शेवट गोड असतो. लहानपणी आजीच्या गोधडीत शिरून परीकथा ऐकताना खूप भारी वाटायचं. कथा सांगून झाली की माझी आजी म्हणायची, “बाळा, अशी परी तुलाही हवी ना ? मग, खूप मोठा हो...खूप शाळा शिक...शहाणा हो..अभ्यास कर...”

अगदी त्याचवेळी इतर कांही समजलं की नाही माहित नाही पण, एक गोष्ट मात्र उमजली, “आपल्यालाही परी मिळायला हवी...”

            आणि एक दिवस, चक्क ती परी माझ्या आयुष्यात आली. एक मुलगा, जो त्याचं रुटीन आयुष्य जगत होता. ती आली आणि सगळंच बदलून गेलं. तो नुसताच आता जगत नव्हता...तर, जगू लागला होता ! एकमेकासोबतचा प्रत्येक क्षण दोघे वाटून घेवू लागले होते. तिनं त्याला उडण्याचं बळं दिलं, आकाशात ऊंच उडण्याचं स्वप्न दाखवलं आणि तो जेंव्हा ती स्वप्नं पहाण्यात रमला होता तेंव्हा ती मात्र एखाद्या वैराग्याप्रमाणं सन्यस्त होवून आपल्या कर्तव्यपूर्तीसाठी मार्गस्थ झाली होती. कोण चुकीचं ? तो ?? नाही ! मग, ती ??? मुळीच नाही !! चूक झालीच तर दिलेल्या वचनांची...तिने घातलेल्या शपथांची...! कधीही न भेटण्याची शपथ...ओळख न दाखवण्याची शपथ...स्वत:हून संपर्क न करण्याची शपथ ! आणि वचनं ? ती तर अजूनही पाळतोचये तो...वाट पहाण्याची...त्याच वाटेवर वाट पहात उभा रहाण्याची...तिच्या वाढदिवसाला या धरणावर आणि त्या मंदीराच्या पायरीवर जावून वाट पहात बसण्याची ! समाप्त...शेवट...दी एण्ड ! झाली परीकथा !! छोटीच होती ना ? हो ! कारण छोटीच होती ना !!!

            डोळ्यात पाण्याचा टपोरा थेंब कधी येवून उभा राहिला, कळलंच नाही. बोटाने हळूच तो थेंब टिपून बोटाच्या टोकावर घेतला आणि समोरच्या धुक्यात उडवून लावला. आणि अचानक, बघता बघता धुकं दूर होवू लागला आणि दूर क्षिताजावर तिची आकृती उभी राहिली. पसरणार्‍या धुक्याबरोबर ती वाढत गेली...पसरत गेली...मैलभर...लांबवर...क्षितीजाला कवेत घेवून क्षितीजापार ! तिच्यासमोर मी अगदीच खुजा...! नकळत त्या आकृतीच्या आधीन होत पुटपुटून गेलो...”हॅपी बर्थ-डे, प्रिंसेस !” आणि सार्‍या आसमंतात हसण्याचा नाद भरून गेला...! भास होता ना तो ? हो..नक्की भासच होता तो..!! खिशात हात घालून तिच्यासाठी लिहीलेल्या कवितेचा कागद बाहेर काढला आणि अर्घ्य द्यावं तसा ओंजळीत घेवून त्या आकृतीला लीन होवून तिच्या पायांशी सोडून दिला. कागद भिजताना पाहिला मी...पण त्यावरची अक्षरं मात्र..जिवंत होवून पळताना पाहिली, तिच्याशी लगट करताना पाहिली आणि चोहोबाजूंनी त्याच अक्षरांच्या आरोळ्या कानठळ्या बसवू लागल्या. मी उठून त्या आकृतीकडे पाठ करून चालू लागलो आणि तिच्या तोंडून माझ्या कवितेचे शब्द ऐकू येवू लागले...

 

“वृंदावनात मनाच्या कधी तू,

धुंदावून नाचताना पाहिलं आहेस स्वत:ला ?

पाहिलं आहेस मनात लपलेल्या कस्तुरीसाठी,

नाठाळपणे धावताना स्वत:ला ?

 

तू खरंच नाही पाहीलंस कधी ?

मग, आधी डोकावून बघ.

पडदा हटवून लाजेचा,

तारा मनीच्या छेडून बघ.

  

सूर जरी तेच तरी,

अर्थ नवा गवसेल तुला.

घृणेचाही नाद,

नव्याने उमगेल तुला.

 

कधीतरी डोकावून बघ,

तो लपाछपीचा डाव.

हसून स्वत:शी आठवून बघ,

त्या धब्ब्यातील ती हाव.

 

अश्व मनाचे चौखूर सोडून,

स्वार होण्याचा यत्न कर.

लगाम खेचून अबलख त्यांचा,

मांड तुझी सिध्द कर.

 

मोसमांच्या साथीने,

वृंदावन ते वृंद कर.

द्वैधातील ते इंद्रधनु,

अंगणामध्ये सिध्द कर.

 

पाहिलं नसशील मनात कधी,

तर आज खरंच डोकावून बघ.

गहिर्‍या झाल्या हर तार्‍याला,

वृंदावनात रोवून बघ.”

 

भासच असेल तोही...! धरणाच्या बांधावरून चालताना सहज बाजूला नजर गेली...माझ्या पावलांशेजारी तिची पावलं उमटत होती ! मी झटकन वळून क्षितीजाकडं पाहिलं. क्षितीज आहे तसाच गोठलेल्या सफरचंदासारखा...! धुकंही तसंच सुप्त पडलेलं आणि पाण्याचा, तरंगांचा आणि माशांचा खेळ लयीत चाललेला...रंगात आलेला ! ती तिथं कुठच नव्हती...!! ती माझ्या बाजूला असताना मी मात्र तिला वेड्यासारखा आजूबाजूला, अवती-भोवती शोधत होतो. तिचा हात हातात घेवून, तिच्या कमरेला हाताचा विळखा घालून तिच्या कानात पुन्हा एकदा कुजबुजलो, “हॅपी बर्थ-डे प्रिंसेस !” ती नेहमीसारखीच हसली आणि खांद्यावर मान टेकवून, हातात हात घेवून चालू लागली. हा भास असला तरी चालेल...उगाच खात्री करून घ्यायची नाहीये मला...


-अनुप


COGNIZANCE: All written creative material is the solemn property of “An Anup Jatratkar Multi-Media Production”. If anyone wanted to use it for his/her own personal purpose (i.e. short film, projects, blogs, articles, scripts, FB posts etc.) then, have to take proper permission from, Mr. Anup Jatratkar. If it will be found that, anyone involved in such activities without prior permission, then, we are able to take certain charge on him/her.

   

Pen Image

Pen Index