Pen


PEN 19 : लघुकथा : ८ : दहा पाच अकरा सहा

वेळ बघता बघता निघून जातो. इतका वेळ कधी गेला ? कुठे गेला ? याचा हिशोबच लागत नाही कित्येकदा ! आणि अचानक कधीतरी आरशात डोकावून बघितल्यावर लक्षात येतं, अरे हिच...अशीच होते का मी ? मनात उभ्या राहिलेल्या तरुणपणाच्या प्रतिमेशी मग ही आत्ताची प्रतिमा उगाच तुलना करू लागते ! आत्ताही कॉलेजच्या सेमिनार हॉलमध्ये डायसवर प्रमुख अतिथी म्हणून बसले असताना, मागच्या बाकावर बसलेली मी दिसत होते. आपल्याच कॉलेजवर चीफ गेस्ट म्हणून जाणं तसं भूषणावह असलं तरी का कुणास ठाऊक उगाचच मला बुजल्यासारखं झालं होतं. तसं आता ओळखीचे कुणी शिक्षक नसले तरी, त्यांचा इमपॅक्ट एवढा मोठा होता की, दबून जायला होत होतं.

            कॉलेजचं गेट ओलांडून आत आल्यापासूनच मला माझ्या वयाचा, पदाचा विसर पडला होता. मन पुन्हा तसंच बालीश झालं होतं, कॉलेजच्या प्रत्येक कट्ट्यावरून भरार्‍या मारू पहात होतं. बागेतल्या लॉनवर अनवाणी पायांनी धावू पहात होतं, लोळू पहात होतं. कोपर्‍यातल्या कँटिनमध्ये जावून एक प्लेट शंकरपाळी आणि कटिंग चहा प्यायला मागत होतं. वर्गातल्या बाकांकडे जावून कोरून ठेवलेल्या आठवणी आजही तशाच आहेत का, हे पाहू पहात होतं. ते लेडिज हॉस्टेल, ती रूम, रूमबाहेरील छोटीशी रिकामी जागा सारं सारं नव्यानं जगू पहात होतं. याच कॉलेजच्या परिसरात कित्येक आठवणींनी जन्म घेतला, कांही मागेच उरल्या, कांहींना जाणूनबुजून मागेच ठेवावं लागलं, काहींनी आजतागायत सोबत केली, कांही काळासोबत नाहीशा झाल्या ! कांही गोड, कांही कटू, कांही रोमांचक, कांही रोमँटिक !!

            एम.एस्सी. केमिस्ट्री कम्प्लिट करून केमिकल इंजिनीअरिंग चा अभ्यासक्रम पूर्ण करून एका पेट्रोलियम कंपनीत सी.ई.ओ. म्हणून काम करू लागले होते आणि एका लहानशा गावातील मुलगी म्हणून गावी, आजूबाजूला, शाळेत सत्कार झाले होते आणि त्याचाच एक भाग म्हणून आज कॉलेजमध्येही गेस्ट म्हणून बोलावण्यात आलं होतं. पेपरमधून आलेल्या बातम्या, न्यूज चॅनेलनी दिलेलं कव्हरेज यामुळे उगाचच सेलिब्रेटी वगैरे झाल्यासारखं वाटू लागलं होतं. लोकं ओळखू लागली होती आणि त्याचाच परिपाक म्हणजे आज उपस्थित असणारी विद्यार्थी आणि शहरातील मान्यवर लोकांची उपस्थिती ! काय बोलावं ? काय सांगावं ? हा प्रश्न त्यावेळी जसं सेमिनार हॉलमध्ये उभं असताना पडायचा, तसाच तो आजही पडला होता. मनात उगाच शंका उभी राहिली, आपण इतरांना सांगण्याइतपत खरंच मोठं झालो आहोत का ? याचं उत्तर नकारात्मक असलेलं स्वत:ला जरी ठाऊक असलं, तरी जगाला दाखवण्यात अर्थ नाही, असा विचार करून स्वत:शीच हसले आणि बोलायला उभी राहिले.

            कसं सुचत गेलं, माहित नाही पण, पुढचा तास-दिड तास मी बोलत राहिले आणि समोरचा श्रोताही शांतपणे ऐकत होता. भाषण संपल्यावर पुढची दोन-तीन मिनीटं विद्यार्थ्यांनी उभं राहून टाळ्यांनी हॉल दणाणून टाकला. खूप भारावून जायला झालं होतं. सारे सोपस्कार आणि सार्‍या औपचारिकता पूर्ण झाल्या आणि माझं मन मला, माझ्या त्या हॉस्टेलच्या रूमच्या दिशेनं ओढू लागलं. दुपारचं जेवण झाल्यावर प्राचार्यांना विनंती करून हॉस्टेलची “माझी” अर्थात मी रहात असणारी रूम पहाण्याची परवागी मागितली आणि त्यांनीही मोठ्या कौतुकानं दिली. त्याक्षणापासून माझं मन आनंदानं उसळ्या मारू लागलं. गावापासून लांब रहात असताना माझ्या याच रूमनं मला घरच्या मायेचा ओलावा दिला. याच खोलीच्या कोपर्‍यात कित्येकदा एकटीनेच रडलीये, रुसलीये, चिडलीये, आदळ-आपट केलीये, एका उन्हाची कैफियत...गारवा...सांजगारवा...आयुष्यावर बोलू कांही...यासारख्या गाण्यांच्या कॅसेट्स वॉकमनला लावून एकटीनेच दिवास्वप्न पाहिलीयेत ! सारं सारं अगदी लख्ख आठवू लागलं होतं. कधी एकदा माझी खोली पाहतीये असं झालं होतं...!

             मी अधीर होवून खूपच भरभर चालत होते. बाकीच्या लोकांना माझ्यासोबत येण्यासाठी पळावंच लागत असेल बहुधा ! माहित होतं...आपला आवेग आवरायला हवा पण का कुणास ठाऊक स्वत:ला आवरावं असं अजिबातच वाटत नव्हतं. मनात खोलीविषयी आणि तिथं व्यतीत केलेल्या कित्येक क्षणांची मनात उजळणीच सुरू होती. कशी असेल रूम ? बदलली असेल का ? असतील का कोरलेल्या कांही आठवणी अजून जाग्या ? नाना विचार हटकले तरी दूर होत नव्हते. त्याच तंद्रीत होस्टेलच्या दारात पोहोचले. तिथं विद्यार्थीनी स्वागताला उभ्या होत्या. एक मुलगी पुढं झाली तिनं सुंदर बुके देवून स्वागत केलं. मी मुख्य दार ओलांडून आत आले. समोर अजूनही तुळशीकट्टा होता. त्याला नवीन रंगरंगोटी केली होती. एका फांदीवर केशरी धाग्याने गुंफलेली कापसाची माळ होती. कट्ट्याच्या मागे हॉस्टेलच्या मधोमध असणारी मोकळी जागा...जिथं आम्ही मैत्रिणी खेळायचो, गप्पा मारायचो, एकमेकींची चेष्टा करायचो, कुरघोडी करायचो आणि भांडायचोही कित्येकदा ! या मोकळ्या जागेच्या चारी बाजूला मोठाले पॅसेज होते आणि या मोकळ्या जागेच्या दिशेने तोंड करून चारी बाजूंनी खोल्या होत्या. मी तिथेच थांबून सहज मागे नजर टाकली. मुख्य दाराच्या एका बगलेत एक चौकोनी आडोसा होता, व्हिजीटर्स रूम असं म्हंटलं जायचं त्या आडोशाला ! रूम कसली !! म्हणायला रूम. चार पोलवर वरून छप्पर मारलेलं...झालं ! मी स्वत:शीच हसले. तिथं एकदा “तो” मला भेटायला आला होता...मी आजारी असताना, माझी चौकशी करायला ! कुठं असेल तो आता ? काय करत असेल ? कॉलेज संपलं तसं आयुष्यातलं खूप मोठं आणि महत्वाचं प्रकरण संपलं. कित्येकदा मोह व्हायचा, पानं पलटायाचा पण माझी काय किंवा इतरांची काय, घाण्याला जुंपलेल्या बैलासारखी अवस्था झालेली ! करिअर, घर, मुलं-बाळं यांच्यात गुरफटून गेल्यावर, कितीही सुंदर “प्रकरण” असलं तरी पुन्हा पानं पलटून ते वाचलं जाईलच याची खात्री देता येत नाही ! आणि कित्येकदा पानं पलटायलाही कित्येक दिवस, वर्षं जातात...योग्य वेळेची वाट पहाण्यात !!

            आणि आज ती वेळ आली होती. “मौका भी है...दस्तूर भी है...” अशीच कंडिशन झाली होती. “मॅडम, चला ना...” रेक्टर मॅडमनी हाताला धरून ओढलं. समोरच्या कोपर्‍यातल्या एका खोलीकडं नजर गेली. हृदय धडधडू लागलं होतं. दारात उभ्या मुलींनी बाजूला होवून वाट करून दिली.

“मॅडम, तुम्ही या खोलीत रहायचा ?”

“हो मॅडम ?”

“किती जणी होता ? कोण कोण होता ?”

“अशीच होती का रूम तेंव्हाही ?”

पोरींनी एकच गलका केला. मला मात्र कांही एक ऐकू येणं बंद झालं. आत येवून मी संपूर्ण खोलीवर नजर फिरवली. रंग बदलला होता. थोडीफार डागडुजी केली होती. जुने लोखंडी खॉट-टेबल-खुर्ची जावून त्यांची जागा नव्या फर्निचरने घेतली होती. डोक्यावर पंखा आला होता. काळानुसार मोबाईल चार्जींगसाठी एक-एक सॉकेट वाढलं होतं. मी मनातल्या मनात आमच्यावेळच्या खोलीसोबत तुलना करू लागले. त्यावेळी इतकी साधनं नसतील जी आत्ता आहेत पण आता ही खोली रूक्ष वाटत होती. सहाजिकच आहे म्हणा ! सारं डोळ्यात साठवल्यावर माझी नजर खिडकीवर खिळली आणि पुन्हा मनानं उसळ्या मारायला सुरूवात केली. मी खिडकीच्या दिशेनं जावू लागले. आवंढा गिळला आणि खिडकीतून बाहेर डोकावून पाहिलं. खिडकीतून कॉलेजच्या मागं असणारं मैदान दिसायचं. मी ते मैदान पुन्हा न्याहाळू लागले. माहित होतं, “तो” नसणारेय तिथं तरिही वेड्यासारखं माझं मन त्या मोकळ्या मैदानात त्याला शोधू पहात होतं. नकळत मी डाव्या बाजूच्या खिडकीच्या दाराला पकडलं आणि दार बंद केलं. त्याच्या मागच्या बाजूवर कोरलेल्या आकड्यांवर माझी नजर खिळली... “१० ५ ११ ६” (दहा पाच अकरा सहा)

            मी त्या अस्पष्ट होत चालल्या आकड्यांवरून हात फिरवला आणि मलाच मोठ्यानं हसू येवू लागलं.

“मॅडम, आमच्या अगोदरपासून आहे हे इथं...”

 “तुम्हाला माहितीये कोण काढलंय ते ?”

“हे ५ असं का काढलंय कुणास ठाऊक..!”

“तुमच्यावेळी कुणी काढलं होतं का..?”

मी अजूनही हसत होते. स्वत:वर ताबा मिळवत मी त्या मुलींकडं पाहिलं आणि म्हणाले,

“मी कोरलं होतं ते !”

“तुम्ही ??”

“का ?”

“काय अर्थ त्याचा..?”

पुन्हा मुलींनी प्रश्न सुरू केले. त्यांना अडवत मी वरून पाहिलं अजूनही खिडकीच्या समोर भिंतीत बसवलेला आरसा होता. मी सार्‍यांना त्या आरशाकडं नेलं,खिडकीचा डावा दरवाजा बंदच होता. आरशात पहात मी त्यांना विचारलं, “आता आरशात ते उलटे आकडे पहा, आणि सांगा काय लिहीलंय ते..?”

मुली गोळा होवून, आठ्या घालून खिडकीच्या दरवाजावर लिहीलेले आकडे पाहू लागल्या आणि अचानक एकदम ओरडल्या..., “गाढव”

            सार्‍या हसू लागल्या. मीही त्यांच्या हसण्यात सामील झाले. “पण मॅडम तुम्ही असं का लिहीलं ?” गर्दीतून एक आवाज आला. “तुमच्यासारखी असताना मी एक गाढवपणा केला होता ! म्हणून रोज सकाळी आपण पुन्हा कोणता नवा गाढवपणा करू नये म्हणून मी ते खिडकीच्या मागे लिहीलं होतं, जेणेकरून रोज सकाळी आवरताना मला दिसावं !” सार्‍या उत्तराने खूष झाल्या. मी मोबाईलवर फोटो काढून घेतले आणि सार्‍यांचा निरोप घेवून गाडीत बसले. ड्रायव्हरने मला आवडतात म्हणून गजल लावल्या होत्या. मी मागे सीटवर डोकं टेकून, डोळे मिटून बसले होते.

“दहा पाच अकरा सहा..” मी स्वत:शीच पुटपुटले आणि हसू लागले. त्या वयातील इतर मुलींसारखी मीही अल्लड होते तेंव्हा. पहिल्यांदाच घराबाहेर राहिलेली. अभ्यासात तशी हुशार होतेच पण त्या वयात येतात तसे बंडखोरीचे, बेबंदपणाचे विचारही यायचे. मैत्रिणींना मुलांविषयी बोलताना, स्वप्नांच्या दुनियेत रमताना पाहिलं की वाटायचं, आपणही एकदा पहायला हवं, कंबख्त ये प्यार किस चिडीया का नाम है ? पण धाडस व्हायचं नाही. बी.एस्ससी.च्या पहिल्या वर्षात असताना तसं एक-दोन पोरांनी प्रपोज केलं होतं पण घाबरून येवढी फे फे उडाली की, “मी तुमच्याकडं त्या नजरेनं बघत नाही ओ दादा...”, असं म्हंटल्यावर कशाला तो पोरगा पुन्हा वाट्याला जातोय ! पण खरं सांगते, तेंव्हा “भाऊ”, “दादा” हे माझे सततचे तोंडात येणारे शब्द होते...पालूपद म्हणा ना !! शब्दश: माझा तो अर्थ नसायचा...! मला अभिप्रेत असणारा अर्थ, “गड्या” वगैरे स्टाईलचा असायचा पण तो अर्थ समोरच्याला समजायचा नाही ना ! म्हणून मग हळूहळू मुलांनी माझ्याशी बोलणंच टाळलं. “ती नको राव...भाऊ म्हणते ती !”

            मीही आता स्विकारलं होतं. अभ्यास, रूम, रूममेटचं प्रेम-प्रकरण आणि घर एवढंच काय ते विश्व बनवलं होतं आणि अचानक तो गाढवपणाचा क्षण आलाच ! बी.एसस्सी.चं तिसरं वर्षं. जानेवारी महिना. परिक्षा एप्रिलमध्ये. वेळ जवळ येवू लागला होता. टॉप करायचंच म्हणून मी झटून अभ्यासाला लागले होते. अशाच एका संध्याकाळी खिडकीत उभी राहून फॉर्म्युले पाठ करत होते. सुर्य मावळायला आला होता. माझी नजर सुर्यावर स्थिर. आणि अचानक कुणीतरी त्या तांबड्या सुर्यासमोरून चालत जात होतं. मी डोळे बारिक करून पाहू लागले. तो सुर्यासमोरून जातानाच चित्र माझ्या स्मृतीत आजही जस्संच्या तस्सं आहे ! तो वळसा घालून माझ्या खिडकीच्या अगदी जवळून चालत जावू लागला. मी त्याच्याकडं पहातच राहिले. खूप भारी होता तो. आमच्या कॉलेजचा नक्कीच वाटत नव्हता तो मुलगा. कदाचित कुणीतरी सिनीअर असावा, असा विचार करून मी पुन्हा माझं चित्त फॉर्म्युलांवर केंद्रीत करायचा प्रयत्न करू लागले. पण पुन्हा पुन्हा माझी नजर त्याच्याकडेच जात होती. कानाला वॉकमन लावून तो ग्राऊंडवर फेर्‍या मारत होता. त्यानंतर हे रुटीनच होवून गेलं. या अगोदर कधीच न दिसलेला...इतर वेळी न दिसणारा तो मुलगा आता रोज संध्याकाळी मैदानात फेर्‍या मारायला येवू लागला होता. ६ ते ७ ही आता माझीही खिडकीत बसण्याची वेळ ठरून गेली होती.

            हॉस्टेलमध्ये मुलींना ६ च्या अगोदर रूममध्ये परत यावं लागे. नाहीतर पालकांना बोलावून आणावं लागे. त्यामुळे कितीही महत्वाचं काम असलं तरी ते उरकून ६ ला परतावंच लागे. इतके दिवस येणारा वैताग आता मात्र मजेशीर वाटू लागला आणि कांही दिवसांनी परत वैताग येवू लागला. वैताग अशासाठी कारण, मला त्याच्याशी बोलायचं होतं, मैदानात जावून जवळून पहायचं होतं. हल्ली कित्येकदा मी साडे-पाचपासून मैदानात थांबायचे पण कध्धी म्हणून तो बिच्चारा लवकर आला नाही. मी रूममध्ये जावून खिडकीतून डोकावून पाहिलं तर तो हजर झालेला असायचा. माझा जळफळाट होवू लागला होता. हळूहळू हॉस्टेलमधल्या पोरींना याची कुणकूण लागलीच आणि मग ज्या चिडवा-चिडवीची भीति होती, तेच होवू लागलं. कुणाच्याही नकळत तो “बेनाम” मुलगा इतर मुलींसाठी “जिजू” झाला. मी चिडायचे पण चिडले की खूप ब्लश व्हायचे आणि पुन्हा सार्‍यांच्या चिडवण्याला हुरूप यायचा.

            फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात आमच्या डिपार्टमेंटचा सेंड-ऑफ झाला आणि सेंड ऑफनंतर आमच्या एच.ओ.डीं.नी त्यांच्या घरी चहा-पाण्याचा कार्यक्रम ठेवला. आम्ही सारी वर्गातली मुलं-मुली जमलो. सारे शिक्षक आले. नव्यानेच रुजू झालेल्या एक मॅडम गडबडीने आल्या, “सॉरी..मला उशीर नाही ना झाला ?”

“नाही ओ मॅडम ! पण हे काय...तुम्ही एकट्याच...? सांगितलं होतं...जोडीनंच यायचं म्हणून...”-एच.ओ.डी.

बोलत असतानाचा “तो”..हो, तो खिडकीवाला आत आला. मॅडमनी त्याच्याकडं पाहून स्माईल केलं, “हे काय, जोडीनंच आलोय आम्ही !”

कसंसच झालं मला. या नवीन आलेल्या मॅडम मला खूप आवडायच्या. शिकवायच्या भारी. त्यांचीही मी लाडकी विद्यार्थीनी होते. कुठं जायचं असेल तर नेहमी मला सोबत घेवून जायच्या पण अचानक मला त्यांचा राग येवू लागला. समोरचा चहा, बिस्किटं, स्विट्स सारं सारं कडू लागू लागलं. सर्वात जास्त राग तेंव्हा राग आला जेंव्हा ओळख करून देताना मॅडम म्हणाल्या, “तुंम्हाला सांगत नव्हते का, माझ्या लहान बहिणीसारखी आहे...तिच ही...!” आणि वर तोही दाच विचकून म्हणाला होता, “हो का ! बरं झालं...या नव्या शहरात मलाही एक बहिण मिळली !!”

            खरं सांगू ? आत्ता, याक्षणी त्या मुलांना ज्यांना “भाऊ”, “दादा” म्हणाले...त्यांना काय आणि कसं वाटलं असेल ते लक्षात येत होतं मला ! त्यानंतर मात्र ६ ते ७ या वेळेत खिडकी कधीच उघडली नाही. एवढा जबर मानसिक धक्का बसला होता मला की, दोन दिवस कॉलेजला न जाता रूमवर रडत बसले होते. हॉस्टेलच्या पोरीही, कुणीतरी वारल्यावर आपण दबक्या पावलांनी बोलवायला जातो, चोरून बसतो आणि, “कसं झालं ?”, “खूप वाईट झालं..!” असं म्हणून हात जोडून, “येवू ? सांभाळा...” म्हणतो ना ? तशा अविर्भावात रूममध्ये यायच्या ! दोन दिवस मी कॉलेजला आले नाही हे पाहून एका संध्याकाळी दोघेही जोडीनं पहायला आले होते...वेटिंग रूममध्ये ! येताना मात्र भरपूर चॉकलेट्स आणले होते दोघांनी. १५-२० मिनीटं गप्पा मारल्यावर, खरंच माझं मन खूप हलकं झालं होतं. मनातून सारा राग निघून गेला होता. चूक त्या दोघांपैकी कुणाचीच नव्हती. तशी चूक माझीही नव्हती म्हणा ! असेलच तर तो गाढवपणा होता...माहिती न काढताच, ओळख नसतानाच प्रेमात सॉरी, आंधळ्या प्रेमात पडण्याचा !

            पर्समधून मोबाईल बाहेर काढला आणि गॅलरीतील तो खिडकीचा फोटो झूम करून पाहू लागले आणि स्वत:शीच मोठ्याने हसू लागले. ते आकडे स्क्रिनभर आणि आता मनभर झाले होते...

दहा पाच अकरा सहा !!!   

 

-अनुप

 

COGNIZANCE: All written creative material is the solemn property of “An Anup Jatratkar Multi-Media Production”. If anyone wanted to use it for his/her own personal purpose (i.e. short film, projects, blogs, articles, scripts, FB posts etc.) then, have to take proper permission from, Mr. Anup Jatratkar. If it will be found that, anyone involved in such activities without prior permission, then, we are able to take certain charge on him/her. 

Pen Image

Pen Index