काळ : इ.स.पूर्व ५०० वर्षे.
रंगमंच
व्यवस्था : एका बाजूला मोठाली गवाक्षं आहेत. त्यावर झिरमिरीत पडदे
लावले आहेत. मंद वार्यासवे ते पडदे हलत आहेत. दुसर्या बाजूने विंगेतून मंद
पिवळसर प्रकाशझोत आत येत आहे. मेणबत्त्यांचा तो उजेड वाटावा. मंचावर
निळ्या-पिवळ्या रंगाची योजना करावी. मागे दोन बाजूस दोन मोठाल्या समयांची किंवा
दिपमाळांची आरास असावी. सर्वत्र मंद प्रकाश ठेवावा. दिपमाळेची वास्तवता त्यातून
दिसावी. फक्त चेहरे आणि हाव-भाव नीट दिसतील यांची काळजी घ्यावी. मधोमध एक मंचक
आहे.
पात्रे :
१. सिध्दार्थ
(२९ वर्षे)
२. यशोधरा (२४
वर्षे)
३. छंद (४८-५५
वर्षे)
पार्श्वभूमी :
सिध्दार्थ अर्थात गौतम बुध्द यांचा जन्म इ.स.पू. ६२३ साली झाला आणि परिनिब्बान इ.स.पू. ५४३ साली झाले. कांही संशोधकांच्या मते हा काळ ६३ वर्षे अलिकडे मानला जातो. बौध्द धर्माचा पाया रचण्याचे कार्य सिध्दार्थाने केले, हे आपण सारेच जाणतो. २९ व्या वर्षी घर सोडल्यानंतर पुढील कांही वर्षे सिध्दार्थाने तप केले आणि त्याला द्न्यानप्राप्ती झाली. सिध्दार्थाच्या आयुष्यातील १० वर्षांबद्दल आपणांस कुठेही, कसलीच माहिती उपलब्ध होत नाही. हा काळ म्हणजे, त्याचे १९ व्या वर्षी यशोधरेसोबत विवाह झाल्यापासून ते २९ व्या वर्षी घर सोडल्या दरम्यानचा काळ ! सिध्दार्थ घर सोडण्यासाठी जी कारणे दिली जातात, ती अतार्किक वाटतात. मुळात रोहिणी नदीच्या पाणी वाटपाबाबत शाक्य आणि कोलिय यांच्यात जो वाद होवून हिंसा झाली होती, ती सिध्दार्थाला अस्वस्थ करत होती. त्याच्या घर सोडण्यामागे त्याचे दीर्घकाळचे सूक्ष्म चिंतन असले पाहीजे. सुत्तनिपातीमधील अत्तदंडसुत्त (अट्टकवग्ग, सुक्त १५, खंड ४८, गाथा ९४१-९४४, पृष्ठ २१९-२२० / सर्वोत्तम भूमिपुत्र-डॉ. आ.ह.साळुंखे, प्रकरण २, पृ. ६३), मज्जिमनिकाय (मूलपण्णासपाळी, महायमकवग्ग, सुक्त ६- महासच्चकसुक्त, खंड १२, परि. ३७१, पृष्ठ ३०६, हिं. पृ. १४८ / सर्वोत्तम भूमिपुत्र-डॉ. आ.ह.साळुंखे, प्रकरण २, पृ. ६४) यांवरून उपदेश करतेवेळी स्वत: बुध्दाने आपल्या अनुयायांना जे सांगितले आहे, त्यात ते म्हणतात, “...पब्बज्जा हे खुले आकाश आहे. घरामध्ये वास्तव्य करीत असताना अगदी परिपूर्ण, परिशुध्द शंखासारख्या ब्रम्हचर्याचे आचरण करणे सोपे नाही. मग मी मुंडन करून, दाढीमिशा काढून, काषाय वस्त्रे परिधान करून घराचा त्याग करून, अनगारिक बनून पब्बज्जा का बरे घेवू नये ?, असा विचार मनात आल्यानंतर आपण आई-वडिलांच्या इच्छेविरुध्द, ते अश्रू ढाळत असताना, रडत असताना पब्बज्जा घेतली.” हे स्वत: भगवान बुध्दाचे विधान आहे, यावरून असे मानने ऊचित होईल की, गृहत्यागाच्या विषयावरून त्यांची घरच्यांसोबत चर्चा होत असणार, झाली असणार पण, घरच्यांचा विरोध गृहीत धरून त्यांनी कोणासही कल्पना न देता रातोरात गृहत्याग केला. पण कोणालाच याची पूर्व-कल्पना आलेली नसणे हे योग्य वाटत नाही. म्हणूनच सदर एकांकीकेत बुध्दाचे स्व-विधान ग्राह्य मानून, रोहिणी नदीचे कारण मुळाशी ठेवून सिध्दार्थाच्या गृहत्यागाची रात्र चित्रीत करण्याचा हा एक प्रयत्न आहे.
-
लेखक
१. गौतम
बुध्दाचे चरित्र : कृष्णराव अर्जुन केळुस्कर
२. सर्वोत्तम
भूमिपुत्र : गोतम बुध्द : डॉ. आ.ह. साळुंखे
३. बुध्द आणि
त्याचा धम्म : डॉ. बाबासाहेब आंबेडकर
४. त्रिपिटक
(मज्जिमनिकाय / दीघ-निकाय / सुत्तपिटक)
५. मिलिंद
प्रश्न
६. यशोधरा जीत
गई : रांगेय राघव
७. धम्मदीप : दिनकर कोलते
८. अग्रपाल
राजवैद्य जीवक : विपश्यना विशोधन विन्यास
९. लोकगुरू
बुध्द : आचार्य सत्यनारायण गोयंका
१०. महामाया : बौध्दाचार्य शांतिस्वरूप बौध्द
११. बौध्द
महिलाओं के प्रेरणा-प्रसंग : मधुकर पिपलायन
१२. बुध्दाचा
पुनर्जन्म : अशोक राणा
१३. वोल्गा ते
गंगा : राहुल सांस्कृत्यायन
१४. तिपिटक
परिचय : मधुकर पिपलायन
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
पडदा बाजूला
होतो. मंच समईच्या पिवळसर-भगव्या प्रकाशाने व्यापून गेला आहे. कमरेच्यावर उघडा,
केस मानेपर्यंत रुळणारे, उजव्या दंडावर सुवर्णालंकार, कमरेला रेशमी-पांढर्या रंगाच्या
धोतराप्रमाणे वस्त्र नेसलेला सिध्दार्थ गवाक्षातून बाहेर पहात उभा आहे. बाहेरून
येणार्या वार्याच्या झुळूकीसोबत त्याचे केस आणि गवाक्षाला लावलेला झिरझिरीत पडदा
हेलकावे घेत आहे. कांही क्षण कसलीच हलचाल नाही. कसलाच आवाज नाही. कांही क्षणांनी
कंचुकी-पायघोळ अधोवस्त्र आणि सुवर्णालंकारांनी नटलेली यशोधरा पैंजणांचा आवाज करत
प्रवेश करते. तिने आपले केस मोकळे सोडले आहेत. ती आत येते. सिध्दार्थाकडे पहाते.
तो बाहेर पहात आहे. ती त्याच्याजवळ जाते आणि आपल्या बाहूंचा पाश त्याच्याभोवती
टाकते. आपले डोके ती त्याच्या पाठीवर टेकवते. दीर्घ श्वास घेते. सिध्दार्थ तसाच
अविचल बाहेर पहात आहे.
सिध्दार्थ : यशोधरे,
ते रोहिणीचे पात्र पहा...! या पूनव-तेजात कसे उजळून निघाले आहे...
वाटताहे,
आभाळानेच सर्पिलाकार धारण करून कपिलवस्तूला विळखा घातला
आहे ! पण
किती विचित्र पहा...हा सर्पिलाकार भितीदायक नाही...क्लेशकारक
नाही...!
शितल, मिठीत घट्ट घ्यावासा वाटणारा....
यशोधरा : (मिठी
सोडवत त्याच्या बाजूला बाहेर पहात उभी रहाते-) मला तर ती, मातेच्या
दुधासारखी
दुधाळ, नितळ, वात्सल्याने भरलेली, आपल्या पुत्रांना ममतेने
पोसणारी
वाटते...सतत !
सिध्दार्थ : (तिच्याकडे
पहात, तिची हनुवटी आपल्या अंगुलीने स्वत:कडे करत-) यशोधरे,
तुझ्यातील हे
मातेचे रूप पाहून धन्य व्हायला होते. मज आता खात्री झाली आहे,
राहुलला तू
अतिव ममतेने अन मातेस योग्य धाकाने कपिलवस्तूचा सुजाण-सक्षम
नागरिक
बनवशील !
यशोधरा : (चिंतीत-)
पण ही अवघड जबाबदारी एकटीने पेलवणे कठीण ! आपण सोबत
असाल, तर
निश्चित आपली मनोरथे पूर्ण करण्याजोगे राहुलला घडवू !
सिध्दार्थ : (दूर
जातो. मंचकावर बसतो-) तात-माता निजले ?
यशोधरा : (वळते-)
हो. गेल्या कांही दिवसांपासून दोघांनाही रातीला नीज आली नव्हती..
म्हणून मघाशी
राजवैद्यांनी झोपेचे चुर्ण दिले आहे. झोप न झाल्याने दोघांनाही
ज्वर चढला
होता !
सिध्दार्थ : (दीर्घ
श्वास घेतो-) सखे...तुलाही असेच वाटते ना की, आम्ही चूक करतो
आहोत...!
यशोधरा : उत्तर
द्यायलाच हवे का ?
सिध्दार्थ : तुझे
उत्तर आम्ही जाणतोच...! तरिही, मनात जे असेल ते बोलून रिकामी
हो..! भावना
जितक्या दाबून टाकू तितक्याच त्या तीव्र होतात प्रिये...! आणि
अचानक मग
कधीतरी चवताळलेल्या भुजंगाप्रमाणे समोर दिसेल त्याला दंश
करून
रिकाम्या होतात. या दंशात सहसा आप्तच जास्त दुखावले जातात.
यशोधरे, ये
बैस माझ्याशेजारी...आणि बोल तुझ्या जे मनात असेल ते..!
यशोधरा : (शांतपणे
त्याच्या शेजारी जावून बसते. सुरूवातीला काय बोलावे तिला सुचत
नाही.
त्याच्याकडे पाहून कसंनुसं हसते-) का कोण जाणे पण आज प्रात:काळा-
-पासूनच मला
आपल्या विवाहाचा दिन स्मरतो आहे...
त्या
सुवर्ण-वस्त्रांमधील तुझी छबी आजही माझ्या नेत्रांना गारवा देते प्रिये...
यशोधरा : (प्रसन्न
होत-) सिध्दार्थ...तुम्हांला आठवतो आहे तो दिन ?
सिध्दार्थ : का
? विश्वास नाही बसत ? आम्हीही तुझ्यासारखेच हाडा-मांसाचे, सर्व व्याधींनी
-सर्व
वासनांनी-भावनांनी युक्त असे सर्व-साधारण मानवच आहोत !
यशोधरा : आपण
बोलताहात ते जर तथ्य असेल तर मग आपल्या तात आणि मातेचा आक्रोश
पाहून आपले
मन जराही विचलीत कसे बरे होत नाही ?
सिध्दार्थ : कारण
यशोधरे, विचलीत न व्हायचे आम्ही ठरविले आहे. गेली कित्येक वर्षे आम्ही
हा निव्वळ
विचारच करत आलो होतो पण आज आम्हांस ते साध्य करता आले !
यशोधरा : पण
एक कळत नाही, तुम्ही हे साध्य करून नेमके कोणते ईप्सित पूर्ण करू
ईच्छीता ?
सिध्दार्थ : (हसतो.
उठतो आणि बाजूला जातो-) कधी नव्हे ते आज बरेच प्रश्न पडताहेत
तुला, यशोधरे
!
यशोधरा : हो...कारण
आपल्याच एका वाक्याची स्मृती जागी झाली आहे...
सिध्दार्थ : कोणते
वाक्य..?
यशोधरा : मागे
विपस्सीकुमार यांची कथा ऐकल्यावर मी विचारले होते...”ही सर्वसाधारण
दृष्ये पाहून
प्रश्न पडायलाच हवेत का ?” यावर आपण म्हणाला होता...”दृष्ये
कोणतीही असोत
यशोधरे, ज्याला प्रश्न पडतच नाहीत तो मनुष्य कसा बरे असू
शकेल ?”
सिध्दार्थ : (मोठ्याने
हसत-) आणि नेमका आजच तुझ्यातील मनुष्यसुलभ स्वभाव जागा
झाला आहे तर
! (हसू आवरत-) सखे...कोणत्या का निमीत्ताने असेना पण
आजच तुलाही
विपस्सीकुमारांची स्मृती उत्पन्न व्हावी...हाही एक योगायोगच
असावा !
यशोधरा : (त्याच्याकडे
पहाते. गंभीर होते. लगबगीने त्याच्या दिशेने जाते. त्याच्या
ओठांवरती
आपला हात ठेवते-) पुढचे बोलायचेही नाही...शपथ आहे माझी !
माझ्या बाई
ध्यानातच नाही आलं...आणि विपस्सीकुमारांचं नाव तोंडून निघालं..!
सिध्दार्थ : (तिचा
हात हातात घेत-) तुझा हात हातात घेतला की, मला विवाहावेळी
झालेला तुझा प्रथम
स्पर्शच स्मरतो ! हाच हात आयुष्यभर हाती ठेवण्यासाठी
आपल्या
पिताजींचा पण पूर्ण करण्याची वेळ आली होती आम्हावर !
यशोधरा : (त्याच्या
छातीवर डोके टेकत-) आणि तो पण तुम्ही पूर्ण करून मला वरलं होतंत !
राज्यातील
कित्येक वीरांना अश्वरोहण, तिरंदाजी, बाहूबल, तलवारबाजीत
क्षणात हरवलं
होतंत ! त्याक्षणी तुम्हाला लढताना पाहून माझे मन किती
हर्षोल्हासित
झाले होते, याची तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही !
सिध्दार्थ : (गंभीर
होतो. तिला बाजूला करतो आणि दूर जातो-) त्याक्षणी सारं जिंकूनही
हरलो होतो...खूप
यातना झाल्या होत्या मनात...याचीही तू कल्पना करू
शकणार नाहीस
यशोधरे..!!
यशोधरा : का
? माझ्याशी विवाह...
सिध्दार्थ : (तिचे
वाक्य तोडत-) अंहं...यशोधरे...माझ्या आयुष्याला लाभलेलं तू एकमेव
सुंदर स्वप्न
आहेस...पुढचे शब्द उच्चारण्याचे धैर्यही करू नको...
यशोधरा : मग, आपल्या यातनेचे कारण समजू शकेल..?
सिध्दार्थ : प्रिये,
आठवते आहे तुला...तू सर्वात प्रथम आमच्या राजप्रासादात आपल्या
मैत्रिणींसमवेत
आली होतीस ?
यशोधरा : हो
! आपल्या तातांनी..राजा शुध्दोदनांनी आपल्या राज्यातील सरदारांच्या
कन्यांना
प्रासादात बोलावून खेळाच्या स्पर्धां आयोजित केल्या होत्या !
आणि आपल्या
हस्ते जिंकणार्या कन्यांना बक्षिसे दिली गेली होती...
सिध्दार्थ : (स्मित-)
ती स्पर्धा नव्हतीच मुळी !
यशोधरा : मग
?
सिध्दार्थ : तातांना
माझा स्वभाव पटत नव्हता..माझा एकलकोंडेपणा..अनेक प्रसंगी
माझा
युध्दापेक्षा शांततेचा सल्ला त्यांना वेदना द्यायचा ! मंत्रीमंडळातील
विद्वानांनी
यावर तोडगा म्हणून माझा विवाह लावून देण्याचा सल्ला दिला.
त्यावर उपाय
म्हणून (हसत-) हा खेळाचा बनाव रचला गेला..! आलेल्या
कन्यांमध्ये
मी कोणाकडे जास्त पहातो अथवा माझ्या मनाला कोणती
युवती भावते,
हे पहाण्यासाठी कांही लोक तातांनी नेमले होते. आणि खरंच
त्यांच्या
निरीक्षणक्षमतेला दाद देतो...कारण, त्या स्पर्धेत मी निव्वळ तुझ्याकडेच
पहात होतो
यशोधरे..! (ती लाजते-) आणि म्हणूनच जेंव्हा माझ्या तातांनी
तुझ्या
पिताजींना हा निरोप पाठविला तेंव्हा त्यांनी माझी कठोर शब्दात
निर्भत्सना
केली. म्हणाले, “जो पुरूष युध्दापासून-हिंसेपासून दूर पळतो...
पुरूषार्थापासून
दूर पळतो...त्याला पुरूष म्हणणे कितपत योग्य आहे..?
याउपर माझ्या
कन्येचा विवाह नाही झाला तरी चालेल पण, मी ती
आपल्या मुलास
देवू ईच्छीत नाही...”
कांही काळ
शांतता. यशोधरेच्या चेहर्यावर अपराधीपणाची भावना आहे. ती नजर देण्याचे टाळत आहे.
सिध्दार्थ तसाच गवाक्षातून बाहेर पहात उभा आहे.
यशोधरा : पिताजींच्यावतीने
मी आपली माफी मागते. मला खरंच यातील कांहीच
कल्पना
नव्हती !
सिध्दार्थ : सखे...तू
माफी मागण्याची कांहीच गरज नाही...आणि माझा रोष तुझ्या
पिताजींवरही
नाही...! माझा रोष स्वत:वरच आहे...सारं जिंकून मी
स्वत:कडूनच
हरलो होतो...माझ्याच तत्वांना मीच पायदळी तुडवलं
होतं..याची
सर्वात जास्त खंत लागून राहिली होती मला...आणि आजही
ती आहे !
(दीर्घ श्वास घेतो-) प्रिये...माझ्या मनात हजारो प्रश्नांचा गुंता
झाला आहे.
हजारो प्रश्न आपापले डंख सरसावून हैराण करून सोडताहेत !
मला मदत
करशील ?
यशोधरा : मी
आपल्या प्रश्नांची उत्तरे देण्यास योग्य व्यक्ती आहे असे मला वाटत नाही !
सिध्दार्थ : प्रश्न
मुळी योग्य-अयोग्यतेचा नसतोच कधी...असतो तो, धीराने सामोरे
जाण्याचा..योग्यता
आपोआप सिध्द होत जाते सखे...
यशोधरा : (भावनिक होत-) प्रासादाची पायरी ओलांडायची परवाणगी सोडून इतर
कांहीही
विचारा...!
सिध्दार्थ : (स्मित-)
शोभतेस ! आणि म्हणूनच तुझा अभिमान वाटतो, यशोधरे...!
(शांतता-)
यशोधरे....
छंद : (आतून आवाज ऐकू येतो-) राजकुमार....
सिध्दार्थ : कोण
आहे ? आत या...
छंद : (आत येत-) मी..छंद...
यशोधरा : छंद...अवेळी
कसं काय येणं केलंत ?
सिध्दार्थ : मीच
बोलावलं होतं...पण इतक्या लवकर येईल असं वाटलं नव्हतं...(स्मित-)
यशोधरा : आपण
बोलावलं होतं ?
सिध्दार्थ : हो..
यशोधरा : कारण
विचारू शकते...?
सिध्दार्थ : आताशा
राती नीज येत नाही...बोलावेसे वाटते म्हणून छंदाला बोलावणे
पाठवले...तो
बिचारा ऐकून घेतो...
यशोधरा : म्हणजे,
आम्ही ऐकून घेत नाही...असेच ना ? छंद...बाहेर थांब...बोलावणे आले
की ये...
छंद : जी...(निघून जातो-)
सिध्दार्थ : छंदासमोर
असे बोलणे ऊचित दिसते का ? काय वाटेल त्यास ?
यशोधरा : जे
वाटायचे ते वाटू दे...आम्ही आपल्या अर्धांगिनी आहोत...तो अधिकार आम्हांस
आहेच !
सिध्दार्थ
हसतो. मंचकावर बसतो. विचारात रमतो. यशोधरा कांहीवेळ त्याचे निरीक्षण करते.
त्याच्या जवळ जावून बसते.
यशोधरा : कसला
विचार करताहात ?
सिध्दार्थ : आपल्या
उद्यानातील तो निष्पर्ण पिंपळ पाहीला आहेस ?
यशोधरा : हो.
सिध्दार्थ : त्याच्या
छायेत जावून पाहीलं आहेस कधी ?
यशोधरा : (हसू
लागते-) सख्या...काय हे विपरीत बोलणे ! जर ते निष्पर्ण असेल तर त्याला
छाया कशी बरे
असू शकेल ?
सिध्दार्थ : (मंद
स्मित-) देवदत्त मागे एकदा म्हणाला होता...”जो हिंसेने एखादी गोष्ट
मिळवतो, त्याचाच
त्या समोरच्या गोष्टीवर अधिकार असतो...त्या गोष्टीला
वाचवणार्या
किंवा काळजी घेणार्यापेक्षा जास्त !”
यशोधरा : (गंभीर
होते-) माफ करा पण मला मतितार्थ कळला नाही !
सिध्दार्थ : प्रिये..हिंसा
ती हिंसाच ना ! भले मग ती शारिरीक असो वा एखाद्याचे मनोधैर्य
खच्ची करणे
असो..!! मनाच्या हिंसेचा आपण कधीच विचार करत नाही...
यशोधरा : म्हणजे
आपणांस असे म्हणावयाचे आहे की, वृक्षांना-पाना-फुला-वेलींनाही मन असते ?
सिध्दार्थ : अर्थात
!!! निसर्ग निर्मीत प्रत्येक वस्तू...गोष्ट अतिसूक्ष्म कणांनी बनलेली आहे.. अगदी आपणही त्याच
अतिसूक्ष्म कणांनी बनलेलो आहोत आणि मग जर आपण
ठराविक
भावनांच्या विचारांनी भारून प्रतिक्रीया देत असू तर मग इतरही
नक्कीच देत
असतील...! (उठतो. गवाक्षात जातो-) मी बर्याचदा त्या निष्पर्ण
पिंपळाखाली जावून बसतो आणि
डोळे बंद करून त्याच्या गर्द छायेचा
अनुभव घेतो. आणि कांहीच
क्षणात तो वृक्षही मला तोच अनुभव देतो जो
मला हवासा आहे. सखे...येत्या कांही दिवसांत बघ...येथे कशी
गर्द दाटी होते ते !! (वळतो-) हां...फक्त त्याच्या छायेवर आणि त्याच्या क्षमतेवर
अविश्वास दाखवू नको...(स्मित-)
यशोधरा : (आश्चर्याने-)
कोठे शिकलात हे सारं ?
सिध्दार्थ : एखादं
बी जसं जमिनीवर पडतं, रुजतं, अंकुरतं, फोफावतं आणि फळा-
फुलांनी
लगडतं, अगदी तसंच निसर्गानं प्रत्येक सजीवाला सगळ्या गुणांनी,
द्न्यानानी
युक्त करून पाठवलंय...अं...जशी, एखादी बंद संदूक ! एक अशी संदूक ज्यात जीवनावश्यक सार्या गोष्टी असतात फक्त योग्य वेळी
योग्य ती सापडायला हवी
! प्रिये, मनुष्यही एका बीजामधूनच अंकुरतो...आणि तो शरीर नामक संदूक घेवूनच जन्माला येतो
! निसर्गातील सर्व सजीव आपापल्या संदूकीतून त्यांना जे-जे लागेल ते घेतात कारण ते स्वत:मध्ये
शोधतात..!! (स्मित-) मानव मात्र स्वत:मध्ये शोधण्याचे
सोडून इतरत्र सगळीकडे शोध घेतो ! मी फक्त बाहेर शोध घेण्याचं टाळतो यशोधरे ! (मंद
स्मित-)
यशोधरा : मला
मी सापडू शकेन सिध्दार्था...?
सिध्दार्थ : (दीर्घ
श्वास-) माहित नाही ! कारण अजून माझा मीच मला गवसलो नाहीये प्रिये! ज्या दिवशी माझा
मी मलाच सापडेन त्या दिवशी खात्रीने सांगण्यालायक मजकडे उत्तर असेल त्यावेळी ! मघाशी विपस्सीकुमारांचा
विषय काढलास म्हणून सांगतो, विपस्सीकुमारांना
स्वत:चा शोध घेण्यासाठी, बोधिसत्व होण्यासाठी चार दृश्यांनी
झपाटून टाकले
होते... //१//
यशोधरा : हो,
माहिती आहेत ! पण, पुन्हा ऐकावेसे वाटताहे...
सिध्दार्थ : म्हातारपण,
आजारपण, मृत्यू आणि चिंता ! असं नाही की, ही चार दृश्ये ते
पहिल्यांदाच
पहात होते पण, ज्याक्षणी ते एका विशिष्ठ मन:स्थितीत होते
तेंव्हा या
चार दृश्यांवर त्यांनी खोलवर विचार केला...! मी लहान असताना
तातांनी,
राजा शुध्दोदनांनी ही कथा मला ऐकवली होती आणि तेंव्हापासूनच
विपस्सीकुमारांनी
माझ्यावर मोहीनी घातली
//१// = दीघनिकाय
महापदानसुत्तानुसार, सुत्त १४, विप. खंड २, परि. ५३, पृ. २२, हिंपृ. १०३
= सर्वोत्तम
भूमिपुत्र, डॉ.आ.ह.साळुंखे, प्र. २, पृ. ६१-६५
= बोधिराजकुमारसुत्त,
मज्जिमपण्णासपाळी, राजवग्ग, सु.५, विप. खं. १३, परि.३२४-३४६, पृ. २८७-३०७,
हि.पृ.३४७-३५५
= सुत्तनिपात,
अत्तदंदसुत्त, अट्टकवग्ग, सु. १५, विप. खं. ४८
= मज्जिमनिकाय
यशोधरा : काय
झाले विपस्सीकुमारांचे पुढे ?
सिध्दार्थ : ठाऊक
नाही...! यशोधरे, ज्या मनुष्यप्राण्याने म्हातारपण, वृध्दत्व, मरण आणि
चिंता
पाहील्या नाहीत...अनुभवल्या नाहीत असा एखादा तरी असू शकेल का ?
(स्मित-) याच
कथेचा धसका घेवून आणि माझे वैचित्र्यपूर्ण वागणे पाहून
तातांनी अशी
कोणतीही दृष्ये माझ्या नजरेस पडू नयेत म्हणून काटेकोर
काळजी घेतली
! पण एक मात्र विसरले...त्यांचे आणि माता प्रजापतीचे
वृध्दत्व
माझ्या नजरेपासून लपवू शकले नाहीत ! (हसतो, गंभीर होतो-)
माता
महामायेचे आजारपण-मृत्यू लपवू शकले नाहीत आणि त्यांच्याच
चेहर्यावरील
चिंता तर, नाहीच नाही !!!
हे एक चक्र
आहे प्रिये...कधीही बदलता न येणारे आणि टाळता न येणारा
निसर्ग-नियम
! याला कोण कसा बरे अपवाद असू शकेल ?
यशोधरा : हे
सत्य जरी असले तरी भीति वाटणे, यात गैर काय ?
सिध्दार्थ : भीति
! कसली भीति प्रिये ? बालपण-यौवन हे जसे तसेच आजारपण, वृध्दत्व
आणि मृत्यू !
आणि यांच्या विचारातून निर्माण होते ती चिंता ! इतकं सारं
सरळ आहे ! या
गोष्टी स्विकारायच्या म्हंटल्या तरी खूप सोप्या-सहज आहेत ! पण
एक अशी गोष्ट
आहे जिच्या बंधनातून सुटायचं म्हंटलं तरी महाकठीण !
यशोधरा : कोणती
?
सिध्दार्थ : मोह
!!! मोह...शरीराचा, नात्यांचा, वासनांचा, संपत्तीचा, राज्याचा, सत्तेचा,
हिंसेचा,
जीवनाचा ! (दीर्घ श्वास-) गेली १० वर्षे आम्ही स्वत:च तो त्यागण्याचा प्रयत्न करतो आहोत पण, आजवर तरी आम्हांस यश आलं नाही !
यशोधरा : इतकं
का ते कठीण आहे ?
सिध्दार्थ : मी-मला-माझे,
हे शब्द वापरणं ज्याक्षणी बंद होईल, त्याक्षणी कोणताही
मनुष्यप्राणी
मोहापासून सहज दूर होवू शकतो ! “मी”त्व, हा “स्व”त्व
शोधण्यामधला
सर्वात मोठा अडसर आहे सखे !
यशोधरा : (भावनिक
होते-) आम्ही सारे...मी, तात, माता, राहुल आपल्या शोधामध्ये
अडसर झालो
आहोत...असंच ना...?
सिध्दार्थ : होय
यशोधरे ! (ती भावनिक होवून डोळ्यांना पदर लावते-) कितीही कटू असले
तरी सत्य
बदलणार नाही प्रिये !
यशोधरा : (रडवेल्या
सुरात-) पण का ? तुम्हीच का हा शोध घ्यायला हवा ?
सिध्दार्थ : (गंभीर
होत-) कारण, देवदत्ताने त्या कबुतराला मारलेला बाण अजूनही माझ्या
शरीरात सलतो
आहे...दाहतो आहे ! ती वेदना मला आजही सुखाने श्वास घेवू देत
नाही ! कारण,
विपस्सीकुमारांनी पाहीलेली दृष्ये माझ्या मन:पटलांवर सतत
दौडत
असतात...अस्वस्थ करत असतात...! कारण रोहीणीच्या पाण्यात आप्तांचे
मिसळलेले
रक्त माझ्या नावाने टाहो फोडताना, कानांना ऐकू येत रहाते !
मनात सतत
टोचणी लागून राहिलेली असते...आत खोलवर भडका उठतोय !
आणि तो अग्नि
शमवल्याशिवाय चित्तास थारा लाभणार नाही, म्हणून यशोधरे...
म्हणून !
यशोधरा : पण
सिध्दार्थ...रोहीणी नदीच्या पाणी वाटपावरून शाक्य आणि कोलिय
यांच्यात जो
संघर्ष झाला त्यात इतरही बरेच जण होरपळले गेले आहेत !
सिध्दार्थ : पण म्हणून यशोधरे, त्यापैकी एकाच्याही मनात हा अग्नि भडकला नाही !
यशोधरा : पण
हा संघर्ष तर अटळ होता...
सिध्दार्थ : चुकतीयेस
तू यशोधरे...हा संघर्ष आपण सारेच टाळू शकलो असतो...युध्द
सुरू
होण्यापूर्वी मी सार्यांना संबोधून सांगितले होते...”हिंसेने हा प्रश्न
सुटणार
नाही...हाच काय कोणताही प्रश्न सुटणार नाही ! सामोपचाराने,
चर्चेने
हिंसा टाळता येवू शकेल ! “ पण माझे बोलणे कुणीच ऐकून घेतले
नाही !
दोन्हीकडचे कित्येक लोक मारले गेले...!! काय साध्य झालं यशोधरे ?
(शांतता-)
संघर्ष टाळण्याची नियत असावी लागते सखे ! आणि एखाद्याने
ठरवलेच...आपण
कांही समजूनच घ्यावयाचे नाही..तर समजावणाराच
मूर्ख ठरतो !
यशोधरा : इतके
का मनास लावून घेण्याजोगा हा विषय आहे !?
सिध्दार्थ : होय
यशोधरे...आसक्त जीवनाचे मूलतत्व शोधण्याची हीच खरी वेळ आहे...
यशोधरा : मग,
आमचे आपल्या आयुष्यातील स्थान काय ?
सिध्दार्थ : जे
रोहीणीच्या पाण्याचे स्थान आहे !
यशोधरा : अर्थात
?
सिध्दार्थ : पाणी...एकीकडे
जसे तहान भागवते, शीतलता देते, शेती-उद्योगांना चालना देते, अन्न शिजवते
आणि दुसरीकडे हिंसा घडवते...जिवंत प्राण्यास आत खेचते,
प्रसंगी
विध्वंस करते...तसे !
यशोधरेस
हुंदका अनावर होतो. मान फिरवून ती स्फुंदू लागते.....
(क्रमश:)
COGNIZANCE: All written creative material is the solemn property of “An Anup
Jatratkar Multi-Media Production”. If anyone wanted to use it for his/her own
personal purpose (i.e. short film, projects, blogs, articles, scripts, FB posts
etc.) then, have to take proper permission from, Mr. Anup Jatratkar. If it will
be found that, anyone involved in such activities without prior permission,
then, we are able to take certain charge on him/her.