सदरची लेखन पुरस्करप्राप्त एकांकिका दोन भागात प्रकाशित
केली गेली. उत्तरार्ध वाचण्यागोदर पूर्वार्ध वाचावा. आपणांपैकी कुणास सदरच्या एकांकिकेचे प्रयोग सादर करावयाचे असतील तर आपण
प्रयोग करू शकता मात्र यासाठी लेखी पूर्वपरवानगी बंधनकारक आहे.
-लेखक
निष्पर्ण पिंपळाच्या छायेत (उत्तरार्ध)
सिध्दार्थ : पाणी...एकीकडे
जसे तहान भागवते, शीतलता देते, शेती-उद्योगांना चालना देते, अन्न शिजवते
आणि दुसरीकडे हिंसा घडवते...जिवंत प्राण्यास आत खेचते,
प्रसंगी
विध्वंस करते...तसे !
यशोधरेस
हुंदका अनावर होतो. मान फिरवून ती स्फुंदू लागते.
सिध्दार्थ : यशोधरे,
तुला दु:खी करण्याचा उद्देश मुळीच नव्हता ! हेतु इतकाच होता की,
सत्य तू
स्विकारावेस आणि मनाची तयारी करावीस...
यशोधरा : (झटक्याने
वळते-) मनाची तयारी ! कशासाठी ?
सिध्दार्थ : येणार्या
भविष्यकाळासाठी...चिरंजीव राहुल यांस त्याजोगे मोठे करण्याकरिता !
यशोधरा : आपण
सोबत असालच ना !...असालच ना ?
सिध्दार्थ : रात
बरीच झाली आहे ! तू जावून झोपावेस हे उत्तम !
यशोधरा : आणि
आपण..?
सिध्दार्थ : आणखी
कांही वेळ बसावे म्हणतो...अजून नाही नीज आली !
यशोधरा : मी
थांबते तोवर !
सिध्दार्थ : (गूढपणे-)
नीज यायचीच नाही आता...! किती वेळ तिष्ठत रहाणार ?
यशोधरा
त्याच्या शेजारी येवून बसते. त्याच्या हात हातात घेते आणि त्याच्या खांद्यावर डोके
टेकवते. ती आपले डोळे मिटून घेते. कांही क्षण कुणीच बोलत नाही. शांतता. बाहेरून
घोड्यांचा आवाज ऐकू येतो. त्या आवाजाने यशोधरा भानावर येते. गडबडीने उठते आणि
गवाक्षात जावून बाहेर डोकावून पहाते. वळते. तिच्या कपाळावर आठ्या आहेत. ती
सिध्दार्थाकडे पहात आहे. तो तसाच डोळे मिटून प्रसन्न चेहर्याने बसला आहे. यशोधरा
त्याच्या दिशेने येते-
यशोधरा : राजकुमार...(सिध्दार्थ
डोळे उघडून तिच्याकडे पहातो-) खाली छंद आपला
लाडका अश्व
कंथक यास खरारा करतो आहे. अशा अवेळी खरारा
करण्याचे
प्रयोजन ?
सिध्दार्थ : (आश्चर्याने,
प्रसन्नपणे-) खरंच ?
यशोधरा : म्हणजे
?
सिध्दार्थ : मनी,
रपेटीला जावे असे आले होते पण, छंदाला त्याचा सुगावा लागेल असे
वाटले नव्हते
! (स्मित-)
यशोधरा : असे
शक्य आहे ? कांहीच न बोलता मनातील दुसर्याला कळने खरंच शक्य
आहे ?
सिध्दार्थ : का
नाही यशोधरे ? मघाशीच म्हणालो ना तुला...आपण सारे एकाच तत्वाने
जोडलेलो आहोत...!
पिंपळ निष्पर्ण असतानाही जर गर्द छाया लाभू शकते
तर, हेही
शक्य होण्यास कोणतीच अडचण नसावी !
यशोधरा : (उद्वेगाने-)
पण मग छंदालाच का ?
सिध्दार्थ : तो
माझे नेहमीच सारथ्य करत आला आहे आणि म्हणूनच कदाचित, मला कोठे
जावयाचे आहे,
हे त्याला निव्वळ अंगुली निदर्शनानेच समजत असावे !
(गूढ हसतो-)
कदाचित अमानवीय पातळीवर आम्ही दोघे जोडले गेले असू !
यशोधरा
बोलण्याचा प्रयत्न करत आहे पण, काय बोलावे हे तिला उमगत नाही. ती तशीच
गवाक्षापर्यंत जावून डोकावून पहाते आणि परत येते. सिध्दार्थ तिच्याकडे पहात आहे.
ती त्याच्याकडे रागाने पहाते. पुन्हा गवाक्षाच्या दिशेने जाते. खाली डोकावून पाहू
लागते.
यशोधरा : (हाक
मारते-) छंदा...वरती ये !
यशोधरा
सिध्दार्थाच्या दिशेने येते आणि त्याच्या मंचकाच्या अवती-भोवती घुटमळू लागते.
सिध्दार्थ तिची अस्वस्थता पाहून हसू लागतो. छंद गडबडीने आत येतो-
छंद : राजकुमारी, बोलावलंत !
यशोधरा : राजकुमारांनी
आपणांस बोलावलं, पण तुमचं लक्ष नव्हतं !
छंद : (आठ्या घालत-) राजकुमारी, तसे होणे नाही, पण झाले असल्यास
आपली
माफी मागतो.
राजकुमार क्षमा असावी !
यशोधरा : (जिंकल्याच्या
अविर्भावात-) पहा...छंदाला कळलेच नाही !
सिध्दार्थ : (लटक्या
रागाने-) छंदा...काय हे ! (छंद मान खाली घालतो. यशोधरा हसते.
तिच्या
दिशेने पहात-) झाले समाधान !!
यशोधरा हसता-हसता
गंभीर होते. भावनिक होते. तिच्या म्लान चेहर्याकडे पाहून सिध्दार्थही गंभीर होतो.
उठतो आणि तिच्याजवळ जातो.
सिध्दार्थ : काय
झाले यशोधरे ?
यशोधरा : सिध्दार्थ...माझ्या
बालिशपणावर ओरडा मला...रागे भरा...! इतकाही हक्क नाही
का तुमचा
माझ्यावर ?
सिध्दार्थ : राजकुमारी
! तुम्हाला माहित असूनही की, तुम्ही बालिशपणे वागताहात, तुम्ही
तशा
वागलात...! त्याक्षणाला जसे वागणे योग्य वाटले तशा तुम्ही वागलात...
कोणताही
मुखवटा चेहर्यावर न लावता...!!! इतका तुमच्या मनाचा निर्मळपणा
असताना...उगाच
का बरे रागे भरावेसे वाटेल ?
यशोधरा : तुमचे
मन निर्मळ आहे म्हणून तुम्हाला इतरांचा निर्मळपणा दिसतो !
सिध्दार्थ : छंदा...अर्धांगिनीच्या
इतक्या कौतुकानंतर तिला कांहीतरी खास भेट द्यावीच
लागेल ना ?
काय म्हणतोस ??
छंद फक्त
स्मित करतो.
यशोधरा : देणारच
असाल तर एक वचन देता ?
सिध्दार्थ : सखे,
आता शब्दात गुंतवू नको...! (छंदाकडे पहात-) छंदा...थांब तू बाहेर !
छंद मान
झुकवून अभिवादन करतो आणि निघून जातो.
यशोधरा : राजपुत्रा,
माझा प्रेमयुक्त बाहुपाशही तुला बंधनात अडकवू शकत नाही का रे ?
सिध्दार्थ : यशोधरे...
यशोधरा : आपल्या
प्रेमाचे प्रतिक असलेला राहुलही तुझ्या मनाला भुरळ घालू शकत
नाही का रे ?
राजा शुध्दोदनाचे अश्रू, माता प्रजापतीचे ममत्व यापैकी
कशानेही तुला
बधावे असे वाटत नाही का रे ?
सिध्दार्थ : नाही
यशोधरे...कारण येथे सारेच क्षणभंगुर आहे...! चिरकाल असे कांहीच
या भूतलावर नाही
! मग, तूच सांग प्रिये...जे क्षणभंगुर आहे त्याच्यात
आपले प्राण
कशासाठी गुंतवून ठेवावेत ? तुझी माझ्यावरील प्रिती चिरकाल
टिकेलही पण
ते पहाण्यासाठी, अनुभवण्यासाठी आपण थोडेच असणार
आहोत ?
तातांचे मजवरील निस्सीम प्रेम, काळजी...माता महामाया जन्म
देवून निघून
गेल्या परंतु त्यांच्या पश्च्यात त्याच अतिव प्रेमाने ज्या मातेने
सांभाळ केला
त्या माता प्रजापतीचे वात्सल्य...तुझी मजवरील प्रिती आणि
बाळ राहुल
याची अनामिक ओढ अंतरी घेवूनच आम्ही “स्व” चा शोध घेणार
आहोत...आणि
आम्हांस खात्री आहे, त्या वाटेवर याच सार्या गोष्टी आम्हांला
पुढे
जाण्याचे बळ देत रहातील...
यशोधरा : (रडवेली
होत-) तात आणि मातेसमोरही आपण असेच बोलता...! निदान
त्यांना
दुखवू नये असेही नाही का वाटत ?
सिध्दार्थ : ते दुखावले जातील याच भीतिने तर आजवर मी श्रमण होण्याचे टाळत आलो,
पब्बजा
घेण्याचे टाळत आलो...! (उद्वेगाने-) पण यशोधरे अगदी खरं सांगतो,
तातांनी
मजसाठी बांधलेल्या या भव्य आणि सार्या सोयींनी युक्त प्रासादात
माझा जीव
कधीच रमला नाही ! उद्यानातील पुष्करणी...सतत दिमतीला
असणार्या
सुंदर युवती यांचे कधीच अप्रूप वाटले नाही ! माझा जीव रमला तो
उद्यानाच्या
एका कोपर्यात असणार्या जंबुवृक्षाखालीच ! त्याच जंबुवृक्षाखाली सर्वात पहिल्यांदा मला
आयुष्याचे गमक कळले....जगात कोणताच प्राणी
वरकरणी वाटतो तितका सुखी नाही...! याच जंबुवृक्षाखाली मी मुंग्यांना
मृत किटकांना
खाताना पाहिलं,मुंग्यांना किटक, किटकांना पक्षी, पक्षांना बहिरी
ससाणे खाताना
पाहिलं ! किती मोठी ही विपत्ती !!! असेच सर्वसाधारणपणे
मनुष्याच्या
बाबतही घडते..जो बलवान तो इतरांनावर हुकुमत गाजवतो !
पण
निसर्गाबाबत थोडे वेगळे आहे...तो गरजेपुरते आणि गरजेसाठी विचार
करतो ! मानव
फक्त हव्यासापोटी सारं करतो...! किती हा विरोधाभास !
यशोधरे...हे
सारं पाहून उद्विग्नता येईल नाही तर काय ? मला या हव्यासाचे
कारण शोधायचे
आहे यशोधरे...
यशोधरा : (व्याकुळ
होवून-) म्हणजे पब्बज्जा घेवून श्रमण बनण्याचा निर्णय तुम्ही घेतला
आहे तर ? भले
मग...तात-मातेच्या विनंतीला धुडकावून जायला लागले तरी ?
सिध्दार्थ : प्रिये...पुन्हा
पुन्हा त्याच त्या गोष्टी बोलण्यात काय अर्थ आहे ?
यशोधरा : आहे...आहे
अर्थ ! माझ्या बापडीची भोळी आशा...माझ्या पुन:पुन्हा केलेल्या
विधानाचा
थोडातरी परिणाम तुमच्या मनावर होवून तुम्ही तुमचा निर्णय
बदलाल !
रोहीणी युध्द होवून तीन मास उलटून गेले मात्र तेंव्हापासून घरात
सुतकाची
स्थिती आहे...प्रत्येकाच्या मनात सतत भीति तरळत असते...
कोणत्या
क्षणी “ती” वेळ येईल याची ! सिध्दार्था...आपण हा विषय सोडून
नीट कधी बोललोय...कधी
हास्यविनोदात रंगलोय...हेच आठवत नाहीये मला !
सिध्दार्थ : सखे...आम्ही
तुला कधी बोललो नाही..अशी एक गोष्ट आहे...
यशोधरा : कोणती
?
सिध्दार्थ : जंबुवृक्षाखाली
एकदा मी विचार करीत बसलो असताना एक काषायवस्त्रधारी
श्रमण तिथे
आला बराच वेळ आम्ही गप्पा मारल्या निघताना मी त्याला म्हणालो,
“सत मार्गाचा
शोध मलाही घ्यायचा आहे...स्वत:चा शोध घ्यायचा आहे पण
माझ्या
अवती-भोवती मोहपाशांनी जाळे विणले आहे आणि ते तसेच रहावे
याची माझ्या
आप्तांनीच जबाबदारी घेतली आहे ! त्यांच्या मते मी अजून
मध्य-ज्वानीत
आहे...सत-मार्गाच्या शोधासाठी ही योग्य वेळ नाही !”
यावर तो
श्रमण म्हणाला, “सिध्दार्था, ज्याप्रमाणे एखाद्याला सत मार्ग
शोधायचा
असतो, तसाच सत मार्गालाही एक प्रामाणिक पांथर हवाच असतो.
तोही तेच
शोधत असतो. हा प्रवास दोनही बाजूंनी होत असतो...ज्याक्षणी तुझ्या
सतसतविवेकाला
जाणीव होईल की, सत-मार्गाने तुला शोधले आहे तेंव्हा
आपोआप सार्या
मोहपाशातून तू विलग होशील !”. मी त्याला विचारले,
“की
बाबा...मला कसे कळणार हा मार्ग सतचा आहे की असत चा की कोणता
वेगळाच ?”
यावर तो श्रमण खूप गूढ हसला आणि म्हणाला,
“सिध्दार्था, ज्याक्षणी
गोतावळ्यात असूनही तुला परके वाटेल...
ज्याक्षणी, गर्दीत असूनही
तुला एकटे वाटेल...
ज्याक्षणी हिंसा पाहून
तुला ती निंदनीय वाटेल...
ज्याक्षणी श्वास जड होवून,
काळजावर मणा-मणाचे ओझे जाणवेल..
त्यादिवशी...अगदी
त्यादिवशी...सत-मार्गाने तुला निवडले असेल !”
यशोधरे...यशोधरे...चारी
दिशांनी मला माझ्याच नावाच्या हाका ऐकू
येताहेत...! लोकांच्या
नजरा पाहिल्या की, त्या नजरांमधील आर्तता काळीज
पिळवटून टाकत आहे..!
दु:खाने भरलेल्या जगात श्वास घेणे कठीण होत आहे...!
भावी पिढ्यांना या दु:खाचे
चटके बसू नयेत म्हणून चित्ताला स्वस्थता लाभत
नाहीये..यशोधरे !
यशोधरा : (डोळे
पुसत, त्राग्याने-) राजकुमारा...दु:खाची व्याख्या काय ? कोण ठरविणार
ती ? तू ???
तुला कोणी दिला अधिकार ?
सिध्दार्थ : यशोधरे,
प्रत्येकवेळी इतरांनी अधिकार देण्याची वाट का पहावी ? आणि त्यांना
कोण अधिकार
देणार...मी काय करायचे ते ठरविण्याचा ? त्यांनीच का ठरवावं ?
यशोधरा : (भावनावश
होवून-) तुझ्याशी मी प्रतिवाद नाही करू शकत गोतम कुलोप्तन्न
सिध्दार्था !
(हात जोडत-) हे शाक्यांमधील सर्वश्रेष्ठ राजकुमारा...मी थकले आहे
रे...तुझी
मनधरणी करून ! माझ्यापरिने मी सारे प्रयत्न करून पाहिले सख्या !
(स्फुंदत-)
आयुष्य तुझे आहे सिध्दार्था...त्याचे काय करायचे ते तूच ठरंव...
यशोधरा निघून
जावू लागते.
सिध्दार्थ : (हाक
मारत-) यशोधरे...संवाद असा अर्धवट टाकून जावू नकोस...
यशोधरा : (डोळे
पुसते, नजरेत नजर रोखून-) आणि आपण साथ अर्धवट टाकून जाण्याचा
विचार करत
आहात, त्याचं काय राजकुमार ?
सिध्दार्थ
शांत होतो. दीर्घ श्वास घेतो. तिच्याकडे पाठ करतो. यशोधरा खोचक स्मित करते. वळते
आणि निघून जाते. सिध्दार्थ पुन्हा गवाक्षांजवळ जावून उभा रहातो. कांही क्षणात छंद
येतो आणि उभा रहातो.
छंद : राजकुमारींनी आपणासोबत थांबण्यास सांगितलं आहे राजकुमार !
सिध्दार्थ : छंदा...आत्ता
त्या सरदार कन्येची आठवण झाली...आपण मागे एका अंत्ययात्रेहून
परतत
असता...माझा चिंतातूर चेहरा पाहून मला प्रसन्न करण्याकरिता ती
कितीतरी
मोठ्याने म्हणाली होती...”ज्या पित्याच्या पोटी तुझा जन्म झाला, तो
पिता धन्य
होय; ज्या मातेने तुझे संगोपन करून तुला लहानाचा मोठा बनवला,
ती माता धन्य
होय; अन तुजसारखा वैभवशाली पुरूष ज्या स्त्रीस प्राप्त झाला आहे
ती स्त्री
धन्य होय !” तुला आठवतेय छंदा...मी तिच्या दिशेने माझ्या गळ्यातील
सुवर्णहार
काढून फेकला होता ?
सिध्दार्थ : त्या
क्षणाची आठवण आज अशी अचानक यावेळी का व्हावी ? हे उमगत
नाहीये
छंदा...!
छंदा...विचारान्ती
केलेले वर्तन चूक की बरोबर हेच कित्येकदा ठरविता येत
नाही...!
आजचा निर्णय भविष्यात योग्य ठरेल की अयोग्य...याचा होरा
बांधता येत
नाही...
छंद : आपण जे ठरवाल ते योग्यच असेल राजकुमार !
सिध्दार्थ : इतकं
खात्रीनं कसं काय बरं सांगू शकतोस तू हे छंदा...?
छंद : विश्वास आहे तुमच्यावर राजकुमार !
सिध्दार्थ : (खेदाने-)
मग असा विश्वास आमचे आप्त का ठेवू शकत नाहीत आमच्यावर ?
छंद : त्यांनाही आपल्यावर अतिव विश्वास आहे राजकुमार पण,
आपल्यावरील
प्रेमापोटी
त्यांचे तसे वर्तन होत असावे !
सिध्दार्थ : प्रेम
मानवाला दुर्बल बनवत असावे का छंदा...?
छंद : अगदी तसेच कांही नाही राजकुमार ! बर्याचदा आपल्या
आप्तांचे-स्वकियांचे प्रेम खडतर परिस्थितीतही पुढे जाण्याचे बळ
देते !
सिध्दार्थ : मलाही
असेच वाटते छंदा...! म्हणून तर आम्ही एक निर्णय घेतला आहे..
छंद : कोणता राजकुमार ?
सिध्दार्थ : छंदा...तुला
नीज आली आहे का ?
छंद : नाही राजकुमार...
सिध्दार्थ : रोहीणीपर्यंत
एक रपेट घेवून येवूयात ?
छंद : चालेल राजकुमार...
सिध्दार्थ : ठिक
! तू हो पुढे...मी आलोच...
छंद निघून
जातो. सिध्दार्थ गवाक्षांच्या विरुध्द दिशेने कांही पाऊले जातो. थांबतो. वळतो.
सिध्दार्थ : यशोधरा
निजली असेल का ? पहावे का एकदा..? (तो हळूवार पावलांनी बाजूला
जातो आणि आत
डोकावून पहातो. हसतो-) वेडी सखी ! आपल्या तान्हुल्याला
मिठीत घेवून
निद्राधीन झालीये...! त्या गोंडस तान्हुल्याचा मुका घ्यावा का ?
नको...नकोच...!
कुणासही कसलीच वार्ता लागू न देता निघावे, हे ईष्ठ !
गेल्या कांही दिवसांपासूनचा
तातांचा आक्रोश, मातेच्या आर्त हाका मला
माझ्या ध्येयापासून दूर
लोटण्याचा प्रयत्न करताहेत पण, मला जावेच लागेल !
देवदत्ताने कबुतराला
मारलेला बाण मलाच का वेदना देतो ? विपस्सीकुमारांची
कथा मलाच का अस्वस्थ करते
? जंबुवृक्षाखाली भेटलेला श्रमण का आपलासा
वाटतो ? हिंसा करून
मिळविलेल्या पुरूषी अहंकाराचा मलाच का तिटकारा
वाटतो ? चिंतेचे मूळ कारण
शोधण्याची मलाच का आस लागली आहे ?
वृध्दत्व, आजार आणि मृत्यू
यांच्याविषयी भीति वाटण्यापेक्षा कुतूहल का
वाटताहे ? दु:ख-चिंता
शाश्वत असतील तर सुखाचे-समाधानाचे स्थान काय ?
सुख मिळविणे की स्थैर्य
प्रदान करून अमानवीय पातळीवरील आत्यंतिक
ऊर्जेने, समाधानाने भारून जाणे ? या आणि अशा असंख्य
प्रश्नांची उत्तरे मला शोधायची आहेत. प्रत्येक मानवीय कृतीमागील कारणमीमांसा
करावयाची आहे. जन्माला येण्यामागचे मूळ कारण आणि जीवनाचे अंतिम ध्येय यांच्यामधील
दुवा शोधायचा आहे....(दीर्घ श्वास-) पण मीच का...? (आत्मविश्वासाने-) मग दुसरे कोण
? गोतमकुलोत्पन्न शाक्यवंशीय सिध्दार्था, तुझे अभिनाम सार्थ करण्याची हिच योग्य
वेळ आहे...(थांबतो-)
सिध्दार्था,
योग्य
वागतोयेस ना तू ? हो...योग्यच आहे ते...! तात...माता...सखे...हे राजस
तान्हुल्या...तुम्हा
सर्वांचा मी गुन्हेगार आहे...तुम्हा सर्वांची माफी मागतो...
माते
रोहिणी...तुला माझा प्रणाम...!
हात जोडतो आणि
निघून जातो.
रंगमंचावरील
प्रकाशयोजना बदलते. गवाक्षातून स्वच्छ प्रकाश येवू लागतो. निळसर-पिवळा प्रकाश
नाहीसा होतो. आपल्या तान्हुल्याला छातीशी कवटाळून यशोधरा प्रवेश करते. ती येवून
गवाक्षात उभी रहाते. मागून छंद रडत प्रवेश करतो आणि येवून जमिनीवर बसतो.
छंद : (रडणे आवरत-) राजकुमारी...तलवारीने त्याने आपले केस कापून
टाकले..
एका
वन-मानवास आपले कपडे देवून त्याचे कपडे परिधान करून, हात
जोडून
म्हणाले, “छंदा...खूप प्रेम केलेस तू माझ्यावर ! याच प्रेमाखातर विनंती
करतो...तू
माघारी जा आणि सारा वृत्तांत कथन करून राजकुमारीच्या सेवेत
दाखल हो...”
राजकुमारी त्यांनी आपल्या सर्वांची माफी मागितली आहे...
यशोधरा : छंद...तातांना
ही वार्ता दिलीत ?
छंद : जी ! त्यांच्या अश्रूंचा तर हिशोबच नाही राजकुमारी...
यशोधरा : (सावरत-)
छंद..दुपारचा प्रहर होत आला आहे...तशी आरोळी देण्याची
नगारखान्याला
आद्न्या द्या...
छंद : (आश्चर्याने-) राजकुमारी !!??
यशोधरा : (दीर्घ
श्वास घेते-) सार्यांनीच जबाबदारी झटकून कसे चालेल छंदा...?
कुणाला तरी
ती पुढे होवून घ्यावीच लागेल ना...? पुढे जाणारे मागचा
विचार करत
नाहीत आणि मागे राहिलेल्यांनी पुढे गेलेल्यांचा विचार
करून गती
खुंटवून घेण्यापेक्षा आपली कर्तव्ये पार पाडणे योग्य नव्हे का ? निदान...त्या निष्पर्ण पिंपळाला पालवी
फुटूपर्यंत तरी ! ऊठ छंदा...शोक
करू नको...जे
आपले असेल ते आपल्या वाट्यास येईल आणि जे नाही ते,
आपले नव्हतेच
मुळी कधी...!!!
छंद उठून उभा
रहातो. यशोधरा गवाक्षातून बाहेर पहात उभी आहे. राहुलला तिने छातीशी पकडले आहे.
यशोधरा : बाळा,
ती पहा...निष्पर्ण पिंपळाची छाया...
छंद
यशोधरेच्या पाठमोर्या आकृतीस प्रणाम करतो. रंगमंचावर अंधार पसरतो. गवाक्षातून
वारा वाहत आहे. यशोधरेचे केस उडताहेत. गवाक्षातून प्रखर प्रकाश पडू लागतो. ती तशीच
समोर निश्चलपणे पहात उभी आहे.
पडदा पडतो.
समाप्त
COGNIZANCE: All written creative material is the solemn
property of “An Anup Jatratkar Multi-Media Production”. If anyone wanted to use
it for his/her own personal purpose (i.e. short film, projects, blogs,
articles, scripts, FB posts etc.) then, have to take proper permission from,
Mr. Anup Jatratkar. If it will be found that, anyone involved in such
activities without prior permission, then, we are able to take certain charge
on him/her.