प्रिय मित्र / मैत्रिणी,
आपण सर्वांनी अल्पावधीतच “पेन” ला जो उत्स्फूर्त
प्रतिसाद दिला आहे, त्याचा मी मनापासून ऋणी आहे. “पेन” सुरू करून अवघे ५ महिनेच
झाले असताना, कोणत्याही पब्लिसिटीशिवाय (सोशल मिडीया इ.) आठवड्यागणिक जे हिट्स
मिळताहेत त्यांनी खरंच भारावून जायला होत आहे. आपणा सर्वांच्या याच प्रतिसाद आणि
पाठींब्यामुळे मला लिहायला बळ-प्रेरणा मिळत आहे. गेल्या १० वर्षात पटकथांव्यतिरिक्त
इतर लिखाण जवळ-जवळ बंद केलं असताना, आपणांमुळेच मी पुन्हा लिखाणाकडे वळलो, याचं
सर्व श्रेय फक्त तुम्हां सर्वांना !
वाचकहो, आपल्या लिखाणाची कोण-कधी-कुठे-कशी दखल घेईल याची आपण कल्पनाच करू शकत
नाही. असाच कांहीसा प्रकार “रक्षक” कथेच्याबाबतीत झाला आहे. “रक्षक” ही १० भागांची
कथा होती...आहे. खूप मजेदार वळण घेत कथा वर्तमानात येते आणि रहस्याचा उलघडा करते,
असा थोडासा वेगळा आणि इंट्रेस्टिंग प्लॉट डोक्यात होता. “रक्षक” लिहायला सुरू केल्यापासूनच
खूप उत्तेजीत झालो होतो, याला कारणही तसेच होते. मूळात माझे आवडते कॅरॅक्टर “कर्ण”
यावर लिहीत होतो आणि त्याचा संबंध २० व्या शतकातील एका घटनेशी जोडून त्याला
ट्विस्ट द्यायचे ठरवले होते. काल्पनिकता आणि वास्तव यांच्या उंबरठ्यावर कथा
हिंदोळे घेत रहाते. आजवर फक्त या दीर्घकथेचे केवळ २ भागच प्रकाशित झाले असताना,
आपणा सर्वांची माफी मागून ही कथा मी इथंच थांबवत आहे आणि मागील दोन भागही “पेन”
मधून काढून टाकत आहे.
याचे कारणही तसेच आहे. कथा लिहीताना ती कुणाला आवडेल का ? वगैरे प्रश्नांच्या जंजाळात न फसता, जी कथा मला भावते, सांगावीशी वाटते तिच कथा मी सांगतो, मांडतो आणि प्रसंगी जगतोही ! “रक्षक” च्या बाबतीतही तेच !! मला सांगायला आनंद आणि अभिमान वाटतोय की, “रक्षक” या दीर्घकथेचे हक्क एका चित्रपट निर्मीती संस्थेने घेतले असून, त्या कथानकावर त्यांना चित्रपट निर्मीती करावयाची आहे आणि याच कारणामुळे, कथानकाची गोपनियता राखण्यासाठी सदर कथा यापुढे (निदान पुढील कांही काळासाठी) प्रकाशित केली जाणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी. आपली सर्वांची माफी मागून “रक्षक” दीर्घकथा बंद करत आहे आणि मागील २ भागही काढून टाकत आहे.
वाचकहो, रविवारी पुन्हा भेटू, “कंकाली” या लघुकथेसह.
धन्यवाद !
- AJ