Pen


PEN 22 : लघुकथा ९ : कंकाली

ईमाम मोहल्ला, जुन्या लखनऊची शान होता. बडे-बडे खानदानी लोक, राजे-रजवाडे, उमराव-सरदार, व्यापारी रोज संध्याकाळी गाण्याची मैफिली ऐकण्यासाठी येत असत. इथं कलेला मान असायचा. ज्याचा आवाज चांगला, त्याला दाद आणि पैसा मिळायचा. याच मोहल्ल्यात तीन-चार घराणी होती, जी पिढ्यानपिढ्या गायनाचा वारसा जपत आली होती. ज्यांना गाणं शिकायची मनापासून ईच्छा असायची ती मुलं-मुली, त्यांच्या आवडीनुसार घराणी निवडायची आणि जोवर गळा तयार होत नाही, तोवर तिथंच राहून गायनाचा सराव करायची. हळू-हळू दिस पालटू लागले. एक-एक घराणं संपून जावू लागलं. चित्रपटाच्या गाण्यांनी जोर धरू लागला. चंदेरी पडद्याच्या चकाचौंद समोर ईमाम मोहल्ला फिका-फिका वाटू लागला जसा लालटेन फिका वाटला होता, जेंव्हा पहिल्यांदा गोर्‍या साहेबानं रस्त्यांवर आर्का लाईटी लावल्या होत्या ! गोरा साहेब गेला तसा ईमाम मोहल्ल्याचा पार चेहरा-मोहरा बदलून गेला.

            सुस्मिता सेन मिस. युनिव्हर्स आणि ऐश्वर्या राय मिस. वर्ल्ड झाली आणि भारतात “ग्लोबलायझेशन" का काय ते, त्याला सुरूवात झाली, निदान अशी समजूत ईमाम मोहल्ल्यानं करून घेतली. खर्‍या अर्थानं भारताचं प्रतिनिधित्व करणारा हा मोहल्ला जिथं हिंदू, मुस्लिम, ईसाई, शीख सगळ्या जाती-पातीची लोकं एकत्र गुण्या-गोविंदानं रहायची. शहरात कुणीही परगावचा माणूस नोकरीनिमीत्त शहरात आला तर तो आवर्जून ईमाम मोहल्ल्यात एखादं मकान किरायानं मिळेल का ? म्हणून विचारत फिरायचा. कारण, सगळ्यांना आपुलकी वाटायची, प्रेम वाटायचं, आपलं-हक्काचं ठिकाण वाटायचा हा ईमाम मोहल्ला ! पण असं असलं तरी, ग्लोबलायझेशननं ईमाम मोहल्ल्याची मात्र अजिबातच दखल घेतली नव्हती आणि मोहल्ल्यानंही याच गोबलायझेशनला फाट्यावर मारून आपल्या दुडक्या चालीतच जगायला सुरूवात केली होती.

            बघावं तेंव्हा चहल-पहल, चेष्टा-मस्करी, रोज सकाळी नळावर न चुकता ठरलेला दंगा, कोपर्‍यावरच्या सार्वजनिक संडासच्या रांगेतल्या हाणामार्‍या, फेरीवाल्यांचा गलका, केसावर आणि भंगारावर भांडी विकणार्‍या बायकांचा चिरका आवाज, गल्ली-बोळांतून आरडत-ओरडत शिव्या हाणत पळणारी उघडी-नागडी बारकी पोरं, चौकात गोणपाट अंथरूण वस्तार्‍याला धार लावून हाजामत करता करता “उसकी मॉं का...” असं मोठ्यानं म्हणून राजकारण्यांना शिव्या घालणार्‍या न्हाव्याचा आवाज ही या वस्तीची कांही खास वैशिष्ठ्य ! असाच आणखी एक आवाज होता...आहे पण, माहित नाही त्याला मोहल्ल्याचं वैशिष्ठ्य म्हणता येईल की नाही. तो आवाज होता...सपना आपा चा आवाज ! सगळ्यांना आपल्यात सामावून घेणार्‍या या मोहल्ल्यानं मात्र सपना आपाला कधीच आपलं मानलं नाही !

            मोहल्ल्याचा टोकाला असलेल्या एका जुन्या दुमजली घरात सपना आपा जुनैद आणि राधिका या आपल्या पसबॉंसोबत रहायची. जुन्या लखनऊमध्ये जी कांही एक-दोन घराणी होती त्यापैकी उस्ताद हयाद खॉं यांच्या घराण्याची वारस होती सपना आपा. सारं आयुष्य गाण्यासाठी कुर्बां करणारी आपा आता ‘महशर’ ची वाट पहात होती. आणि वाट पाहून दमली की, पायरीवर बसून शून्यात नजर लावून स्वत:चा शेर गुणगुणायची. तिचा आवडता शेर होता तो-

“खौस-ओ-खुझा बित गया,

बर्क भी उर्यानी जलाकर बुझ गया ।

पर्वाझ अभी तो किया था,

इमरोज तखय्युल फुर्कत में इरूसु हो गया ॥”

            जुनैद आणि राधिका, लहानपणापासून सपना आपाच्या घरातच लहानाचे मोठे झाले होते. दोघांनाही गाण्याचं वेड पण घरच्यांच्या विरोधामुळं दोघांनीही ऐकण्यापलिकडं गाण्याशी संबंध ठेवला नव्हता. सपना आपाचं एकाकीपण कमी करण्यासाठी जुनैद आणि राधिका पाळीपाळीनं आपासोबत येवून रहायचे. याबदल्यात रोज रात्री गच्चीत शुभ्र आसमॉंखाली बसून आपाला गाणं ऐकवावं लागे. उगाच आढेवेढे घेणारी आपा याच गाण्याच्या जीवावर तर तग धरून होती.

            सपना आपा. अफगाणी रक्ताची आणि सौंदर्याची खाण होती...एकेकाळी. पाणीदार तपकिरी डोळे, सरळ टोकदार नाक, सुरईदार मान, ऊंचापुरा आणि कमनिय देह, डोक्यावर नेहमी ओढणी, पायात पैंजण, गळ्यात गोडवा आणि गाण्यावर असीम भक्ती. आपाचे वडिल व्यापारी. व्यापार करत एके दिवशी लखनऊमधे आले आणि इथलेच होवून गेले. आपा पहिल्यांदा इथं आली तेंव्हा तिचं वय अवघं ९ वर्षांचं होतं. याच लखनऊ शहरानं तिला उमलताना, बहरताना, मोहरताना वखवखल्या नजरेनं पाहिलं होतं आणि आता गळून पडताना कुणी साधं ढुंकूनही पहाण्याचं कष्ट घेत नव्हता. आपाला याचा खूप त्रास व्हायचा. गच्चीवर गाणं म्हणताना मधेच थांबून ती म्हणायचीही,

“शबाब वो कहर था,

जो जुस्तजू ना पाया, छलक गया ।

पयमाने क्या करें कासिद ?

ईक कत्रा थी रंजीश, खुल्द गया ॥”

            वक्त निघून चालला होता. उमर पण चढतीला होती आणि ऐन बहरात असतानाच वडिलांचा इंतकाल झाला आणि याच धक्क्यानं अम्मीही जग सोडून निघून गेली. आपा मोहल्ल्यात आली तेंव्हा रोज पहाटे उस्ताद हताद खॉं साहेबांच्या गच्चीवरून ऐकू येणार्‍या गाण्याच्या हरकतींनी आपा जागी व्हायची आणि तडक त्यांच्या हवेलीच्या दारात जावून बसायची. सकाळी ऐकलेल्या हरकती आपा काम करताना गुणगुणायची. सतत ६ वर्षं दारात उभं राहूनही त्या दाराची पायरी आजवर कधी ओलांडायला मिळाली नव्हती की, बाहेर येवून खॉं साहेबांनी कधी तिची विचारपूस केली नव्हती. पण आपाचा दिनक्रम मात्र कधीच चुकला नव्हता. आताशा तिला सवयच होवून गेली होती. खॉं साहेबांचा आवाज ऐकू यायच्या आधीच आपा उठून बसू लागली होती. एक दिवस सवयीप्रमाणं आपा उठून बसली पण साहेबांचा आवाज तिला ऐकू आला नाही. दोन दिवस झाले...तीन दिवस झाले पण आवाज कानावर पडला नाही. आपा अस्वस्थ झाली. नोकर तिला आत सोडेनात. भल्या-बुर्‍या विचारांनी आपा गांगरून जावू लागली. चौथ्या दिवशी भल्या पहाटे ती साहेबांच्या दारात हजर झाली आणि स्वत: रचलेला शेर ती साहेबांसारख्याच हरकती घेवून म्हणू लागली.

“मजिम-ए-ईश्क आशना मिला दे,

ईखतिय्यार मराजिम मयस्सर बना दे ।

रुहानियत कायनात तुम्हारी,

हबाब उन्स का लिहाज बना दे ॥”

            मोजझा !!! आपल्याच नियमांना तोडून खॉं साहेब स्वत: तरातरा दारात येवून उभे राहिले. ३८-४० ची उमर, डोक्यावर फरची टोपी, अंगाभोवती मखमली शाल, पायात मोजड्या, हातात मोत्यांची माळ आणि तोंडाने कुराणमधील आयतांचं स्मरण करताना होणारी ओठांची अस्पष्ट हालचाल, उभ्या चेहर्‍याला शोभणारी दाढी आणि विस्फारलेले डोळे. आपाला झालेलं खॉं साहेबांचं हे पहिलं दर्शन ! दोघेही एकमेकांच्या नजरेत बराच वेळ पहात राहिले. आणि बर्‍याच वेळानं भानावर येवून त्यांनी आपाला जवळ बोलावलं.

“नाम क्या है आप का ?”

“जी...सपना !”

“वाकई ??”

 “जी...”

“ईस खुबसूरत सेहर में वाकई सपना हो...”

खॉं साहेबांच्या तारिफने आपा लाजून लाल झाली होती. गोर्‍या-सरळ नाकाचा शेंडा तांबडा झाला होता. पायाचा अंगठा मातीत रुतवून आणि त्यांच्या पायाशी आपल्या नजरा रोखून अधिर झालेल्या आपाचे ओठ थरथरू लागले होते. छातीत धडधड वाढली होती. श्वास जडावले होते.

“किस घराणे से हो ? कहॉं सिखा ??”

“किसी घराणे ने नहीं पर सिखा आप ही से है !”-नजर वर न घेताच आपानं उत्तर दिलं.

“आफरिन ! सुभान अल्लाह !! आप मेरे घराणे में शामिल होना चाहेंगी ?”

इतका प्रश्न आपाला भोवळ येण्यासाठी पुरेसा होता !

            साल-दरसाल निघून गेले. आपाच्या गळ्याला बैठक आली होती. येणारा प्रत्येकजण आपाचं कौतुक करत निघून जायचा. आपाला मोठमोठ्या कार्यक्रमांची निमंत्रणं येवू लागली. अनेक गाण्याच्या कार्यक्रमांना आपा असेल तर लोकांच्या उड्या पडू लागल्या. खॉं साहेब आपल्या या शिष्येच्या कर्तृत्वाने भारावून गेले होते. लोक जेंव्हा म्हणत,

“खॉंसाब, ये तो आप से एक कदम आगे है..!”  

तेंव्हा खॉंसाहेब आदबीने कानावर हात ठेवून वर अल्लाहकडे नजर टाकून म्हणत,

“खुशी है...उसकी मेहेर है !”

त्या दिवसापर्यंत सारं नीट सुरू होतं, ज्या दिवशी खॉं साहेबांनी विचारलं,

“बताईये, क्या तोहफा चाहिए आपको ?”

आणि कोणताही पुढचा मागचा विचार न करता आपा म्हणाली होती,

“मैं आप से निकाह करना चाहती हूं..”

त्या दिवसापासून आपाला हवेलीची दारं कायमची बंद झाली. त्यानंतर कधीही तिला खॉं साहेबांचं दर्शन झालं नाही. आपानं स्वत:लाही आपल्या दुमजली घरात कोंडून घेतलं. आपल्याच दु:खात बुडून राहू लागली. एक दिवस...खॉं साहेब सारं सोडून निघून गेले. सार्‍या मोहल्ल्यानं मातम पाळला होता. सारे विधी पार पडल्यावर हवेलीचा नोकर आपाच्या घरी आला आणि खॉं साहेबांनी, आपण मेल्यावर द्यायला सांगितलेली चिठ्ठी, देवून तो निघून गेला. चिठ्ठी वाचून, धायमोकलून रडून, चिठ्ठीला छातीशी कवटाळून कितीतरी वेळ विलाप केला होता आपानं. खॉं साहेबांनी त्या चिठ्ठीत लिहीलं होतं,

“अगर मुझे जिंदा रखना चाहती हो, तो गाणे से रुसवाईयॉं मत करो !”

            बरीच वर्षं झाली पण आपाचं गाणं थांबलं नाही. हवेली सरकारी कार्यालयासाठी सरकारनं ताब्यात घेतली. गाण्यांच्या मैफिलींवर बंधनं आली. शास्त्रीय गायनाचे कार्यक्रम लोकांना आवडेनासे झाले आणि कधी काळी दररोज ईद साजरी करणारी आपाची दुमजली ईमारत आज भकास झाली होती. चुकूनच कुणाची तरी पावलं दारावरून जात असत. पण आज गर्दी झाली होती. तोबा गर्दी झाली होती. बुढी आपा सकाळी-सकाळी हवेलीच्या दारात मरून पडली होती. आजही तिचा आंगठा मातीत रुतलेला स्पष्ट दिसत होता. लोकांनी वर्गणी काढून तिच्या विधीची सारी तयारी केली. आता पुन्हा मोहल्ल्यात आपाचा आवाज घुमणार नव्हता. जुन्या कथेच्या पुस्तकाचे शेवटचे पानही गळून पडावे, अशीच आपा निघून गेली होती, गुपचूप ! तिच्या जाण्यानं ना कुणाला दु:ख झालं, ना कुणाला वाईट वाटला, ना कुणाला हळहळ वाटली. यंत्राप्रमाणं सार्‍यांनी तिला उचललं. कब्रस्तानमध्ये नेलं. शेवटची नमाज केली आणि माती टाकून सारे परतू लागले. कब्रस्तानच्या बाहेर एक बिहारी भिकारीण पेटी घेवून बसायची, नेहमी. आणि भसाड्या आवाजात कंकाली म्हणून पैसे गोळा करायची. तसं आजवर कुणाचंच तिच्याकडं लक्ष गेलं नव्हतं. गर्दी पांगली. जुनैद एकटाच कब्रस्तानच्या दारात उभा राहून त्या भिकारणीकडे आश्चर्याने पाहू लागला. कुणीतरी आपली कंकाली ऐकतंय म्हणून तीही मोठमोठ्याने म्हणू लागली...

 “मजिम-ए-ईश्क आशना मिला दे,

ईखतिय्यार मराजिम मयस्सर बना दे ।

रुहानियत कायनात तुम्हारी,

हबाब उन्स का लिहाज बना दे ॥”

तो आपाचा सुरेल आवाज नव्हता, भले आपाचाच शेर असला तरी ! ती होती आता हात पसरून भीक मागणारी...कंकाली !!!

 

-अनुप

 

COGNIZANCE: All written creative material is the solemn property of “An Anup Jatratkar Multi-Media Production”. If anyone wanted to use it for his/her own personal purpose (i.e. short film, projects, blogs, articles, scripts, FB posts etc.) then, have to take proper permission from, Mr. Anup Jatratkar. If it will be found that, anyone involved in such activities without prior permission, then, we are able to take certain charge on him/her.

 

 

Pen Image

Pen Index