Pen


PEN 23 : लेख १ : चित्रपट, प्रेक्षक आणि रुपेरी पडदा

(सदरचा लेख दै. तरुण भारत च्या वर्धापन दिनानिमीत्त्य, ४र्थ जनरेशन विशेषांकासाठी लिहीला असून हा लेख दि. १५ डिसेंबर रोजी प्रसिध्द होणार आहे. पेनवरील सर्व वाचकांसाठी हा प्रसिध्दीपूर्व लेख सादर करत आहे.)

चित्रपट, प्रेक्षक आणि रुपेरी पडदा

-अनुप जत्राटकर

 

माया, इन्का आणि ईजिप्शियन संस्कृतीपासून “प्रोग्रेसिव्ह पेंटिग्ज” ने सुरू झालेला प्रवास आज मल्टिप्लेक्स आणि फोर-डी.एक्स पर्यंत येवून पोहोचला आहे. पण असे असले तरी हा चित्रपटाच्या उत्क्रांतीचा प्रवास संपलेला किंवा थांबलेला तर अजिबातच नाहीये. औद्योगिक क्रांतीला सुरूवात झाल्यापासून चित्रपट हे एकमात्र क्षेत्र असावे, ज्याच्यामध्ये सुधारणा आणण्यासाठी अल्पावधीतच हजारो प्रयोग केले गेले आणि या क्षेत्राला शंभर वर्षे पूर्ण होण्यागोदरच उत्तमोत्तम अविष्कार करून “लाईफ लाईक सिनेमा” प्रदर्शित केला जावू लागला. चित्रपटांची सुरूवात नेमकी कोणती मानावी ? यावर विचारवंतांमध्ये बरेच मतभेद आहेत. हजारो वर्षांपूर्वी अस्तित्वात असणार्‍या माया, इंका आणि ईजिप्शियन सभ्यतांमध्ये “प्रोग्रेसिव्ह पेंटिग्ज” च्या माध्यमातून एखादी गोष्ट त्याच्या सुरूवातीपासून शेवटापर्यंत चितारली जात असे. कथा सादर करण्यासाठी चित्रांचा वापर केला जात असे. मग ही सुरूवात मान्य करू शकत नाही का ? कारण चित्रपटांचा उद्देशच मुळात कथा सांगणे किंवा एखादा संदेश पोहोचवणे हा असू शकत नाही का ? आणि तसंही अगदीच सुरूवातीला साधारण शतकभरामागे जेंव्हा चित्रपट निर्मीतीला सुरूवात झाली तेंव्हा त्यांना “मूव्हिंग पिक्चर्स” किंवा “हलती चित्रे” म्हणूनच संबोधले जात होते. इथे मी आपल्या सोयीसाठी चित्रपट उदय-उत्क्रांती-विकास यांचा विचार करताना ४ टप्प्यांमध्ये अर्थात जनरेशन्समध्ये मांडणी केली आहे. इथे मांडलेले टप्पे हा माझा वैयक्तिक निरीक्षणाचा भाग आहे. याबाबत विचारवंतामध्ये दुमतही असू शकते.

प्रोग्रेसिव्ह पेंटिग्ज, इ.स.पूर्व २२० सालचा झोऊबी साऊजिंग याचा सर्वात पहिला पिन-होल कॅमेरा, पोर्टाचा कॅमेरा-ऑब्स्क्युरा, केप्लर चा मॅजिक लॅंटर्न (जो भारतात महादेव गोपाल पटवर्धन यांनी शांबरिक खरोलिका नावाने नावारूपास आणला), प्लेटाव्हचा फेनाकिटोस्कोप, झिओटोप, लाईम-लाईट, फाझमास्ट्रोप, मरेचा गन-कॅमेरा, विलियम डिकसनची ईस्टमन फिल्म आणि त्याचाच किनेटोस्कोप कॅमेरा आणि ल्युमिएर ब्रदर्स यांनी वापरलेला सेकंड जनरेशन किनेटोस्कोप असे साधारण चित्रपटाच्या उत्क्रांती दरम्यानचे टप्पे सांगता येतील. चित्रपटांचा प्रवास इसवी सन पूर्वपासून सुरू झालेला असला तरी ल्युमिएर ब्रदर्स यांनाच चित्रपटाचा जनक मानण्याचं कारण होतं की, सर्वात प्रथम ल्युमिएर बंधुंनी पैसे लावून त्यांच्या फिल्म्स प्रदर्शित केल्या होत्या. त्यामुळे खर्‍या अर्थाने या माध्यमातून पैसे मिळू शकतात याची लोकांना कल्पना आली आणि चित्रपटकडे व्यवसाय म्हणून पहाण्यात येवू लागले. परदेशात खूप अगोदरपासून चित्रपटांचे प्रयोग होत असले तरी भारतातही हलती चित्रे, काच-पट्टीवरील चित्रे, शांबरिक खरोलिका यांसारखे प्रयोगही होत होतेच. पण मुळात ज्या काळात चित्रपटांवरील संशोधनाला गती आली होती त्याकाळात भारतात स्वत:चे सामाजिक, राजकिय प्रश्न ‘आ’ वासून उभे होते. स्वातंत्र्य प्राप्तीसाठीची धामधुम सुरू होती. लोकांना खाजगी आयुष्याकडे लक्ष देण्यास पुरेसा वेळ नव्हता तर, चित्रपट किंवा तत्सम गोष्टींकडे पहाण्याचा प्रश्नच येत नव्हता. पण सावेदादा, दादासाहेब तोरणे, दादासाहेब फाळके यांसारख्या मोजक्या लोकांनी या मनोरंजनाच्या साधनाचे महत्व ओळखले आणि याचा वापर लोकजागृतीसाठी, लोकांना संदेश देण्यासाठी किती प्रभावी करता येवू शकतो हे ताडले.

दादासाहेब फाळके यांना आपण जरी “भारतीय चित्रपटसृष्टीचा जनक” म्हणत असलो तरी, त्यांच्याही अगोदर भारतात चित्रपट निर्मीतीचे प्रयत्न करण्यात आलेच होते. हरिश्चंद्र सखाराम भाटवडेकर ऊर्फ सावेदादा यांना भारतीय चित्रपटसृष्टीचा आद्यप्रवर्तक म्हणून ओळखले जाते. १८९६ साली ल्युमिएर बंधूंचे जे चित्रपट मुंबई येथे प्रदर्शित झाले होते ते पाहून पेशाने फोटोग्राफर असणारे सावेदादा प्रभावित झाले आणि चित्रपटांचे तंत्र शिकून त्यांनी, “द रेस्लर” हा सर्वात पहिला चित्रपट १८९६ साली तयार केला. या चित्रपटात मुंबई येथे झालेली एक कुस्ती चित्रीत करण्यात आली होती. एका भारतीयाने चित्रीकरण आणि निर्मीती करण्याची ही पहिलीच वेळ होती. आपल्या कारकिर्दीत सावेदादांनी एकूण ७ चित्रपटांची निर्मीती केली. त्यांच्यानंतर दादासाहेब तोरणे यांनी “भक्त पुंडलिक” हे नाटक “लाईव्ह” चित्रीत करून, १८ मे १९१२ रोजी कोरोनेशन थिएटर, मुंबई इथे प्रदर्शन केले आणि त्यानंतर दादासाहेब फाळके यांनी “राजा हरिश्चंद्र” तयार करून ३ मे १९१३ रोजी प्रदर्शित केला. दादासाहेव फाळकें अगोदर चित्रपट करूनही सावेदादा आणि तोरणे यांना जनक ही ओळख न मिळता ती फाळकेंना मिळाली, असे का ? कारण मूळात चित्रपट म्हणजे, कथा, कथानक, दिग्दर्शन, संगीत, कलाकार, अभिनय, संकलन आणि पैसे लावून प्रदर्शन ! सावेदादा किंवा तोरणे यांनी घटनांचे चित्रीकरण केले होते. सावेदादांना भारतीय माहितीपटांचा किंवा न्यूज-रिल्सचा जनक म्हणू शकतो आणि तोरणे यांच्या चित्रपटात जरी अभिनय, कथा, कथानक असले तरी मूळात ते

एक नाटक होते, ज्याचे चित्रीकरण करून दाखविण्यात आले होते. त्यामुळेच भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक म्हणून हा मान दादासाहेब फाळके यांना मिळाला. पण असे असले तरी बाबूराव पेंटर यांनी याच मातीत तयार केलेला संपूर्ण देशी बनावटीचा पहिला वहिला कॅमेरा आणि त्यांचे अथक परिश्रम हेही नजरेआड करून चालणार नाही.

वरील इतिहासकालीन संदर्भांचे आपण आपल्या सोयीसाठी दोन टप्पे किंवा त्यांचे दोन पिढ्यांमध्ये विभाजन करू शकतो. पहिली पिढी अर्थात फर्स्ट जनरेशन ज्यामध्ये ते सर्व लोक येतात ज्यांनी चित्रांना पडद्यावर मूर्तरूप देण्यासाठी आपली हयात घालविली, ज्यांनी चित्रपट संकल्पनेला जन्माला घातले. मूळातच ही संकल्पना अनेक शतकांच्या निरीक्षणांनंतर आणि अनेकांच्या प्रयत्नांनी उदयास आल्याने कुणा एकास याचे श्रेय देणे अन्यायकारक ठरेल. हा कालखंड तसा खूप मोठा आहे. साधारण इ.स.पूर्व २२० ते १९ व्या शतकाचा शेवट, असा साधारण मानण्यात हरकत नसावी. दुसरी पिढी (सेकंड जनरेशन) ज्यांच्या प्रयत्नांमुळे चित्रपट बाळसं धरू लागले, रांगू लागले आणि आपल्या तेंव्हाच्या अपरिपक्व का असेना पण विचारांनी समोरच्यांच्या मनात कुतूहल निर्माण करू लागले. या पिढीतील चित्रपटांनी सर्वात महत्वाची गोष्ट कोणती केली असेल तर आपापल्या मातीतले, भाषेतले, आपल्या संस्कृतीतील, आपल्या नाळेची ओळख जपणारे चित्रपट निर्माण करून लोकांच्या मनाचा ठाव घेवून त्यांना आपल्याकडे आकृष्ठ करून घ्यायला सुरूवात केली. चित्रपटांच्या जनरेशन्सचा विचार करताना आपल्याला नाण्याच्या दुसर्‍या बाजूचाही विचार करणं तितकंच महत्वाचं आहे. जेंव्हा आपण चित्रपटांचा उदय, विकास वगैरे गप्पा मारतो तेंव्हा आपण दुसरी बाजू दुर्लक्षित करतो. ज्याक्षणी चित्रपटांचा उदय झाला त्याक्षणी आणखी एका संकल्पनेचा उदय झाला, तो म्हणजे, “प्रेक्षक”.

आपण आता निव्वळ भारतीय चित्रपटसृष्टी, त्याच्या चार जनरेशन्स यांच्याबाबातच बोलू. भारतीय संस्कृतीमध्ये पुराणकाळापासून मनोरंजनाला महत्व आहे. ज्या-त्या काळात, त्या-त्या काळाची ओळख सांगणारे काव्य-नाट्य आपल्या आजूबाजूला अस्तित्वात असलेले आपण पाहिले आहे. मुळात भारतीय परंपरा ही मौखिक पध्दतीने एका पिढीपासून दुसर्‍या पिढीपर्यंत द्न्यान पोहोचवत आली आहे. याचाच प्रभाव इथल्या रचनांवर, गीतांवर आणि नाटकांवर दिसतो. भजन, किर्तन, संगीत-नाटक ही सामाजिक मनोरंजनाची पूर्वापार माध्यमं. नाटकांचा प्रभाव आजही आपल्यावर दिसून येतो. त्याकाळी मशालींच्या किंवा कंदीलाच्या उजेडात नाटकं सादर व्हायची. शेवटच्या व्यक्तीपर्यंत आवाज ऐकू जावा म्हणून मोठ्याने संवाद म्हणावे लागायचे, चेहर्‍यावरचे हावभाव ठळकपणे शेवटपर्यंत दिसावेत म्हणून “लाऊड एक्सप्रेशन्स” चा वापर केला जायचा. याचा प्रभाव इथल्या जनमाणसांवर खूप होता, आहे. शतकानुशतके यांचा पगडा कायम होता, आहे. आणि जेंव्हा पहिल्यांदा १८९६ साली ल्युमिएर बंधूंची फिल्म प्रदर्शित झाली तेंव्हा ती पहायला गेलेले प्रेक्षक, “अराईव्हिंग ऑफ ट्रेन” ही आगगाडी फलाटावर येताना पाहून, ‘ही आगगाडी आपल्या अंगावरच येते की काय !’ वाटून, थिएटर सोडून बाहेर पळून गेले होते. याचदरम्यान फोटोग्राफी ही संकल्पनाही भारतात नवीनच होती. लोकं फोटो काढून घ्यायला घाबरत असत. कारण काय तर, फोटोचा लाईट आपला आत्मा काढून तो कागदावर चिकटवतो, ही समजूत ! अशी मानसिकता असणारा प्रेक्षक जेंव्हा थिएटरच्या अंधारात बसून रेल्वे येताना पाहून घाबरला असेल तर, आश्चर्य वाटायला नको. ही होती प्रेक्षक नामक संकल्पनेची पहिली जनरेशन. चित्रपट जसा मोठा होत होता तसाच प्रेक्षकही चित्रपटांचं बोट धरूनच मोठा होत होता. चित्रपटही प्रेक्षकाला काय पहायला आवडतं ? याचा विचार करूनच त्याला हवं ते देत होते, कारण खर्‍या अर्थाने चित्रपट हा प्रेक्षकांचा पालक होता. प्रेक्षकांची ही होती पहिली जनरेशन.

चित्रपट आता रांगू लागला होता. त्याच्या बालिश नजरेला, मनाला जसं चित्र दिसत होतं, तसं चित्र तो मांडत होता. आणि त्यानं मांडलेलं चित्र पाहून प्रेक्षकही प्रसंगी हसत होता, रडत होता, भावनिक होत होता, आनंदी-दु:खी होत होता. आपल्या घरी लहान मूल असतं आणि आपले आई-बाप जसं आपल्याला बोलतील, भरवतील, हाताला धरून फिरवायला नेतील त्याचीच नक्कल मूल जसं आपल्या बाहुली, टेडी-बिअरसोबत करतं अगदी तस्संच, चित्रपट निर्माते चित्रपटांची निर्मीती करायचे आणि चित्रपट आपल्या पाल्ल्याचं अर्थात प्रेक्षकांचं मनोरंजन करायचे. या पिढीतील चित्रपटकर्त्यांनी दोन पध्दतींनी चित्रपटांचा विकास आणि प्रेक्षकांचं मनोरंजन करायला सुरूवात केली होती. एक म्हणजे, आपल्या इतिहासातील गोष्टी दाखवायला सुरूवात केली. ज्या गोष्टी निव्वळ वाचून लोक कल्पना करायचे त्या गोष्टी त्यांना आता प्रत्यक्षात पहायला मिळू लागल्या होत्या. राजा हरिश्चंद्र, महाभारत, राम-सीता, नरसिंह अवतार त्यांना पहाता येवू लागले. याच पिढीच्या प्रयत्नांने चित्रपट बोलू लागला. आर्देशीर इराणी यांच्या “आलम आरा” मुळे चित्रपटाचा रूपेरी पडदा बोलू लागला. संगीताच्या ठेक्यावर नाचू लागला. चित्रपटकर्त्यांच्या दुसर्‍या पिढीने हा बदल आत्मसात केला आणि रांगणं सोडून आपलं पहिलं-वहिलं पाऊल टाकलं. आता हा बदल

स्विकारण्याची वेळ होती प्रेक्षकांची. जेंव्हा पहिल्यांदा चित्रपट बोलू लागला तेंव्हा लोकांना कळेना “आवाज येतोय कुठून ?” चित्रपटा दरम्यान बरेच शंकेखोर आणि चिकित्सक कम हौशी ‘प्रेक्षकबाळं’ पडद्याच्या मागे जावून ‘मागे कलाकार तर बसले नाहीत ना ?’ याची खात्री करून घेत असत. संगीताच्या ठेक्यावर गाणी सुरू झाली की, आजूबाजूला पहात असत, ‘कुठे बसले आहेत वाजवणारे ?’ हे पहायला. चित्रपट बोलू लागल्यावर चित्रपटकर्त्यांनीही अनेक प्रयोग करायला सुरूवात केली. संगीतप्रधान आणि संवादप्रधान चित्रपटांच्या निर्मीतीला वेग आला. आजवर फक्त पुराणकथा आणि त्यातील चमत्कार पाहून हरवून जाणारा प्रेक्षक आता चित्रपटातील गाणी गुणगुणायला आणि थिएटरबाहेर “डायलॉगबाजी” करायलाही शिकू लागला होता.

याच दरम्यान अनेक सामाजिक, देशप्रेमावर, स्त्री-पुरूष नात्यावर, जातीयतेवर भाष्य करणारे सिनेमेही तयार होवू लागले. जे बदलाचं वारं थिएटरबाहेर जोर-शोर से सुरू होतं, त्याचेच पडसाद पडद्यावर उमटले नसते तरच नवल होतं. अछुत कन्या, किसान कन्या, संत तुकाराम, सावकारी पाश, माणूस, बूट-पॉलिश, जागते रहो, दो ऑंखे बारह हाथ या आणि अशा अनेक सामाजिक चित्रपटांनी मोलाचं योगदान दिलं. कित्येक देशप्रेमावरील चित्रपटांनी तरुणांच्या देशप्रेमाला चिथावणी दिली. याच दरम्यान चित्रपटानं आपलं दुसरं पाऊल टाकलं. जो सिनेमा अगोदर कृष्ण-धवल स्वरूपात दिसायचा तो आता रंगीत स्वरूपात दिसू लागला. हा काळ आपण आपल्या सोयीसाठी असा मांडू, हा काळ होता दुसर्‍या महायुध्दाच्या सुरूवातीचा-युध्दाचा-स्वातंत्र्य युध्दाचा आणि स्वातंत्र्यापर्यंतचा. या दरम्यानच्या सिनेमावर या सार्‍या घटनांचा प्रभाव अनाहूतपणे पडलाच. आणि सिनेमा रंगीत झाल्याने या सार्‍याची तीव्रता अधिक प्रखरपणे मांडण्यासाठी चित्रपटकर्त्यांनी याच “रंगीत” पणाचा वापर केला. सर्वच पातळीवरील भडकपणा सिनेमांमधून रंगांच्या, छाया-प्रकाशाच्या सहाय्याने, कला, नेपथ्य यांच्या मदतीने दाखवला जावू लागला. उज्ज्वल भवितव्याची स्वप्ने चित्रपटांमधून दाखवली जावू लागली होती. प्रेम नामक संकल्पनेवर चित्रपटांचा भडिमार सुरू होता. पण, ही निव्वळ सुरूवात होती. या काळात चित्रपटांच्या निर्मीतीमूल्यांमध्ये अनेक प्रयोग केले गेले. चित्रपट पाहून सरावलेला प्रेक्षकही प्रत्येक बदलाला सामोरा जात होता आणि प्रत्येक बदल आपलासा करत होता. या दुसर्‍या पिढीतील प्रेक्षक संक्रमणावस्थेत होता. नाटक आणि पडदा यांच्यामधे भेद करायला तो आता शिकला होता. नाटकांपेक्षा पडदा भरून दिसणारा नायक किंवा नायिका, त्यांचा प्रेमालाप, मारामारी, रडणं, हसणं, लाजणं त्यांचेही डोळे आणि मन व्यापून टाकू लागला होता. चित्रपटांमधून दाखवलं जाणारं जग आता स्वातंत्र्यानंतर अस्तित्वात येणार असं वाटून चित्रपटांशी “रिलेट” होवू पहात होता.

स्वातंत्र्यप्राप्तीपासून साधारण सन २००० पर्यंतचा काळ चित्रपट आणि प्रेक्षक यांच्या तिसर्‍या अर्थात थर्ड जनरेशनचा पकडून विचार करू. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर पुन्हा कांही काळासाठी देशप्रेमावर आधारित किंवा लढाईवर आधारित (वॉर फिल्म्स) चित्रपटांची निर्मीती मोठ्या प्रमाणात केली जावू लागली. प्रेक्षकांच्या “संघर्षा”च्या आठवणी उजाळण्याकरिता आणि त्यांना “लार्जर दॅन लाईफ” दाखवण्याकरिता चित्रपटांचा वापर होवू लागला. संघर्षानंतर येणार्‍या सुखानैव आयुष्याची कथा मांडण्यात येवू लागली. पूर्वीच सांगितल्याप्रमाणे, चित्रपट तेच दाखवतात जे प्रेक्षक पाहू इच्छितात. कठीण संघर्ष आणि यातना यांचा विसर पडावा म्हणून याच दरम्यान विरंगुळा देण्यासाठी इतिहासपटांचीही लाट मोठ्या प्रमाणात आली. मुगल-ए-आझम हे याचेच एक उत्तम उदाहरण. भव्य सेट्स, पोषाख, अलंकार आणि तो जुना काळ पाहून प्रेक्षक स्तिमित होवून जावू लागला. चित्रपट इस्टमन कलरमधून बाहेर पडून टेक्नो कलरमध्ये आला होता. शोले ने तर “सराऊंड साऊंड” आणि “७० एम.एम.” पडदा दाखवला. प्रेक्षकांसाठीही या गोष्टी नव्या होत्या. गब्बर जेंव्हा बसंतीच्या पायात काचा फोडे तेंव्हा लोक आपसूक आपले पाय वर उचलून घेत असत. पण, जी स्वप्ने लोकांनी पाहिली होती, जी स्वप्ने चित्रपटाने दाखवली होती ती फोल होत होती. तरुणाईमध्ये प्रचंड असंतोष, राग होता. तरुणाईच्या मनातील हाच राग चित्रपटाने जाणला आणि “जब तक बैठने को ना कहा जाए, खडे रहो..” असे म्हणणारा नायक तरुणांना त्यांच्या मनातील असंतोषाचं प्रतिक वाटला.

 याच दरम्यान चित्रपटांमध्ये दोन प्रवाह तयार झाले, पहिला म्हणजे कलात्मक चित्रपट आणि दुसरा म्हणजे, व्यावसायिक चित्रपट. हा फरक जगाच्या पाठीवर कुठेही आढळत नाही. तो फक्त भारतीय चित्रपटसृष्टीतच आढळतो. आणि याच प्रवाहांबरोबर आणखी एक संकल्पना निर्माण झाली ती म्हणजे, चित्रपट समिक्षक, ज्यांनी नेहमी कलात्मक चित्रपटांची पाठराखण करायला सुरूवात केली. याचा सर्वात मोठा तोटा काय झाला असेल तर, एकसंध असणारा प्रेक्षकही आंधळेपणाने दुभागला गेला. चित्रपट हा चित्रपट असतो, तो भले कोणत्याही भाषेतील असो. प्रत्येक व्यावसायिक चित्रपटात कलात्मकता असते आणि प्रत्येक कलात्मक चित्रपटात व्यावसायिक समिकरणेही दडलेली असतात, हेच मूळात प्रेक्षकराजाला कळेनासे झाले.

या काळातील चित्रपटांनी अनेक नवनवीन तंत्रे, यंत्रे स्विकारली. चित्रपटातील प्रत्येक बाजूत प्रयोग केले जावू लागले. पाश्च्यात चित्रपट निर्मीती करणार्‍या कंपण्यांसोबत कामं केली जावू लागली. याच काळात भारतीय सिनेमाने एकापेक्षा एक अस्सल या मातीतले सिनेमे दिले, ज्यांना आजही आपण “क्लासिक सिनेमा” म्हणून ओळखतो. चित्रपटांना राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून देण्यासाठी उत्तमोत्तम निर्मीती करण्यात येत होती. कलेला खूप जास्त स्थान होतं. म्हणावी तशी, व्यावसायिकता अजून चित्रपटसृष्टीत भिनली नव्हती. त्यामुळेच वेगळं, नवं कांहीतरी करायचं म्हणून इरेला पेटून चित्रपट तयार होत होते आणि प्रेक्षकही प्रत्येक सिनेमाला प्रतिसादही देत होता. याच काळात स्टारडमलाही सुरूवात झाली. लोक आपापला आवडता नट-नटी असेल तर गर्दी करू लागले. ज्यांच्या नावावर गल्ला जमू लागला त्यांना खूपच भाव येवू लागला. आणि त्यांच्या मानधनातही आपसूक वाढ होवू लागली. चित्रपट निर्मीतीचे आकडे वाढू लागले. चित्रपट ईन-डोअरमधून बाहेर पडला आणि वेगवेगळ्या लोकेशन्सवर चित्रीत केला जावू लागला. नव्या पिढीतील यश चोप्रा सारख्या दिग्दर्शकांनी लोकेशन्सचं महत्व ओळखलं आणि परदेशात चित्रीकरणाचा पायंडा पाडला. भारतीय चित्रपट चित्रीकरणासाठी परदेशी जावू लागला. कथांना दुय्यम दर्जा प्राप्त झाला. आणि याचाच परिणाम म्हणजे परदेशात चित्रीकरण करूनही, आघाडीच्या नायकाला घेवूनही चित्रपट चालेनासे झाले. कथा हा चित्रपटांचा आत्मा असतो पण तोच आत्मा हरवू लागला होता. याच काळाच्या शेवटी-शेवटी तेच चित्रपट चालले ज्यांची, कथा उत्तम होती. ज्यामध्ये मानवी भाव-भावनांचा खेळ होता. भले ते चित्रपट परदेशात चित्रीत झाले नसतील !

कल्ट सिनेमा नावाचा प्रकार याच कालावधी लोकप्रिय झाला. डॅडी, अंकूर, सलीम लंगडे पे मत रो, सूरज का सॉंतवा घोडा, रुदाली, तेजाब, शतरंज के खिलाडी यांसारख्या चित्रपटांनी प्रेक्षकांना आंतर्मुख करायला भाग पाडले. याच दरम्यान “ग्लोबलायझेशन” नावाचा प्रकार उदयाला आला. अनेक परदेशी चित्रपट भारतात मोठ्या प्रमाणात प्रदर्शित होवू लागले. दूरचित्रवाणीचाही भारतातील शिरकाव याच काळात झाला. या दोन गोष्टींचा प्रभाव चित्रपटांवर झाला. ई.टी., स्टार वॉर्स, जॉ’ज, ज्युरासिक पार्क अशा चित्रपटांचा बोलबाला झाला. भविष्यातील गोष्टींचा वेध घेणारे चित्रपट मोठ्या प्रमाणावर येवू लागले होते. हा काळ चित्रपट निर्मात्यांसाठीचा स्थित्यंतराचा काळ होता. पाश्चात्त्य चित्रपटांप्रमाणे चित्रपट करावेत तर, साधने आणि चलन उपलब्ध नाही. बरे, जोखीम घेवून एखादी निर्मीती केलीच तर, ती चालेल की नाही याची खात्री नाही. त्यामुळे साधारण १९८६ नंतर सर्वच भारतीय भाषांतील चित्रपटांमधून संभ्रमावस्था पहायला मिळते. मराठी चित्रपट, जो कधी काळी सरस चित्रपट म्हणून ओळखला जायचा तो ग्रामीण विनोदीपटांत जखडून गेला, बंगाली सिनेमा सामाजिक सिनेमांच्या जाळ्यात गुरफटून गेला, दाक्षिणात्त्य सिनेमा मेलोड्रामाच्या आणि दैववादी कथांच्या आहारी गेला, हिंदी सिनेमा भरकटून फेर्‍या मारत होता. कधी विनोदी, कधी मारधाडपट, कधी प्रेमावर आधारित चित्रपटांची लाट याकाळात पहायला मिळू लागली. असे असले तरी, एक गोष्ट मात्र नजरेआड करून चालणार नाही ती म्हणजे, या काळात जी कांही लाट आली, त्यात सर्वच दोष चित्रपटांचा होता असे नाही तर, या दोषाचे भागीदार कांही अंशी का असेना प्रेक्षकही होतेच. या काळातील प्रेक्षकांची नाडीच निर्मात्यांना कळायला मार्ग नव्हता. मूळात प्रेक्षकही संभ्रमावस्थेत होता. आणि याला कारण म्हणजे त्यावेळची राजकिय-सामाजिक उलथापालथ.

दूरचित्रवाणीने मात्र या काळात खूप मोठी मजल घेतली. रामायण, महाभारत यांसारख्या मालिकांचा एवढा मोठा पगडा त्यांनी घातला की, आजही या मालिका आपल्या स्मृतीमधून नाहिशा झालेल्या नाहीत. याच मालिकांनी चित्रपट निर्मात्यांना विश्वास मिळवून दिला आणि या माध्यमाचे महत्व आणि प्रभावही दाखवून दिला.

 

 ९० च्या दशकात झालेले साखळी बॉम्बस्फोट यांनी जसा संपूर्ण देश ढवळून निघाला तसाच चित्रपटाचा पडदाही याच आगीने झाकोळून गेला. या स्फोटांनी कित्येक चित्रपटांसाठी कथाबीजे दिली. लोकांना अंडरवर्ल्ड आणि त्यातील काळे विश्व नवे होते, त्यामुळे लोकांनी या विषयांवर आधारित चित्रपटही पाहिले पण सर्वच चित्रपट चालले असे मात्र झाले नाही. ज्यांची कथा दमदार होती, तेच चित्रपट चालले. तिसर्‍या कालखंडाचा शेवट आला तरी चित्रपट संभ्रमावस्थेतच होता. याच काळात खान लॉबीचा उदय झाला आणि प्रेम कथांना नवा हुरूप आला. भविष्यातील वेध घेणार्‍या, साय-फाय कथांना फाटा देवून, आपल्या बजेटमध्ये चित्रपट निर्मीतीसाठी हा एक किफायतशीर पर्याय होता. शेवटच्या दशकापर्यंत तिनही खानांनी प्रेमाचे सगळे रंग उधळले आणि संपवलेही. आता काय ? लोकंही यांच्या प्रेम-प्रकरणांना कंटाळू लागले. याच काळाच्या शेवटी चित्रपटांमधून सामाजिक संदेश आणि इतर मसाला यांचा फंडा वापरायला सुरूवात केली गेली आणि तो फंडा चाललाही, अजूनही चालतोय. याच काळात “३डी (थ्री-डी)” नावाचा प्रकारही उदयाला आला पण, आपल्या इथे म्हणावे तसे प्रयोग झाले नाहीत. हा कालखंड संपता-संपता “कहो ना प्यार है” नामक चित्रपट प्रदर्शित झाला आणि तरुणाईला नवा चेहरा मिळाला. नृत्य-अभिनय-शरीरयष्टी यांना नव्याने महत्व आले. प्रेक्षकराजा नुकताच कारगिल युध्दाच्या आठवणींमधून सावरला होता आणि हृत्विक नामक चेहरा त्यांच्या सुंदर भविष्याचा चेहरा वाटत होता.

आपण आता चौथ्या आणि शेवटच्या पिढीकडे आलो आहोत. या कालखंडाच्या अगदी सुरूवातीलाच ‘लगान’ने ‘ऑस्कर’ या प्रतिष्ठित पुरस्कारांच्या अंतिम यादीत स्थान पटकावले. या गोष्टीचा सकारात्मक परिणाम चित्रपटांवर झाला. मराठीतही ‘श्वास’ सारख्या चित्रपटाची निर्मीती झाली आणि मराठीने आपली मरगळ झटकून टाकली. इतरही भाषांतील चित्रपटांवर सकारात्मक परिणाम झाला. तंत्रद्न्यानातील प्रगतीचा परिणाम निर्मीती मूल्यांवर होवू लागला. लिनीअर पध्दत जावून नॉन-लिनीअर पध्दतीने जोर धरला. रिळाचे कॅमेरे जावून त्यांची जागा डिजीटल कॅमेरे घेवू लागले. नागरा जवळ जवळ हद्दपार झाला. लाकडी क्लॅपची जागा डिजीटल क्लॅप बोर्डनी घेतली. चित्रीकरणानंतर डबिंगचा त्रास वाचवण्यासाठी मोठ्या प्रमाणात सिंक साऊंड वापरण्यात येवू लागला. जिमी जीब, टी-टू आर्म, स्लायडर, फ्लाय-कॅम, गिंबल्स, स्टेडी कॅम, रिग्ज, थ्रीडी कॅमेरे, मोशन कॅप्चर, सी.जी.आय. असे एक ना दोन प्रकार उदयाला आले. तंत्रांनी चित्रपटांवर पकड घेतली. चित्रपटांच्या प्रदर्शनाचा आवाका देशाबाहेरही वाढला. सिंगल स्क्रिन्स जावून त्यांची जागा मल्टिप्लेक्सनी घेतली. मोठ्या प्रमाणात चित्रपट निर्मीती होवू लागली. रोजगार वाढले. चित्रपटांचे बजेट वाढले. ते इतके वाढले की शंकरच्या “रोबोट २.०” ने ४५० कोटींचा आकडा गाठला आहे. पण असे असले तरी, एका गोष्टीची वाणवा जाणवते ती म्हणजे, कथा. जेंव्हा चित्रपटांना सुरूवात झाली तेंव्हाचा चित्रपटकर्ता हा सर्वसामान्य होता, तो सर्वसामान्यांशी कनेक्ट होता, तो त्यांच्यातीलच एक होता. त्यामुळे त्याला प्रेक्षकांची नाडी बरोबर माहिती होती. पण आज या दोघांमधली दरी रुंदावत चालली आहे, भले आपण सोशल मिडीयावर, चॅनेल्सवर त्यांच्याशी कनेक्ट असलो तरी ! या दोहोंमध्ये आज आभासी जग पसरले आहे.

स्मार्ट फोन्स किंवा सोशल मिडीया हे या फोर्थ जनरेशनचे महत्वाचे वैशिष्ठ्य आहे. ही तशीच फेज आहे, जशी टी.व्ही. च्या आगमनानंतर चित्रपट निर्मात्यांच्या मनात संभ्रमावस्था निर्माण झाली होती. आज प्रत्येकाच्या हातात स्मार्ट फोन्स आहेत. चित्रपट रिलीज झाल्या झाल्या (कधी कधी होण्यागोदरही) चित्रपट इंटरनेटवर उपलब्ध असतो. तरुणाई मल्टिप्लेक्सेसकडे वळण्याचे प्रमाण कमी झाले आहे. आज अनेक पर्याय प्रेक्षकांना बोटाच्या टचवर उपलब्ध आहेत. त्यामुळे आज मोठमोठ्या चित्रपट कंपण्याही वेबसिरीज काढून तरुणाईपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. मग रुपेरी पडद्याचे काय ? ज्या पडद्यासाठी कित्येकांनी अहोरात्र कष्ट घेतले, आपले घर-दार सोडले, तो पडदा बेवारस होणार की काय ? ज्या चित्रपटांमुळे प्रेक्षक जन्माला आला, तोच प्रेक्षक पडद्याकडे पाठ वळवू लागला. प्रेक्षकांना पडद्याकडे कसं आकृष्ठ करणार ? म्हणून मग, आयटम सॉंग्ज, आयटम गर्ल, कमी कपडे, उत्तान दृष्ये, चुंबन दृष्ये यांच्या आधाराची गरज वाटू लागली पण चांगली कथा शोधण्याचे कष्ट फारच मोजक्या लोकांनी घेतले !

फक्त भारतातच नव्हे तर सबंध जगभरातील चित्रपट सृष्टीसमोर हा प्रश्न ‘आ’ वासून उभा आहे. तंत्रद्न्यान आणि त्यांचा खर्च वाढला मात्र प्रेक्षक पडद्याकडे ओढलाच गेला नाही तर ? मूळात चित्रपट ही संकल्पनाच लार्जर दॅन लाईफ अनुभव देणारी आहे, जो फक्त आणि फक्त चित्रपटांचा पडदाच देवू शकतो. इंटरनेटवरून मिळणारा नफा आणि थिएटर रिलीजमधून मिळणारा नफा यांच्यात नक्कीच तफावत आहे. पण जे माध्यम पडद्याचे आहे, तेच हाताच्या तळव्यात मावणार्‍या गॅजेटमध्ये देणे, हाच मूळात त्या कलाविष्काराचा अपमान आहे. निदान असे मला तरी वाटते.

 याच भीतिपोटी पाश्च्यात चित्रपटसृष्टीत प्रयोग सुरू होते, आहेत. याचे फलस्वरूप म्हणजे “४ डी-एक्स” (फोर डि-एक्स). पाश्च्यात देशातील बर्‍याच चित्रपटगृहांमधून ही सेवा पुरविण्यास सुरूवात केली आहे. यामध्ये पडद्यावर सुरू असणार्‍या प्रसंगांचा अनुभव तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला जातो. समजा, समोर पडद्यावर आग लागली असेल तर, तुम्हालाही त्याचा दाह लागणार. एखाद्या गाडीचा अपघात झाला किंवा भूकंप झाला तर आपलीही खुर्ची हलणार, समोर पाऊस पडत असेल तर पावसाचे शिंतोडे आपल्याही अंगावर उडणार, समोर नायिका कोणतातरी खाद्य पदार्थ खात असेल तर त्याचा वास तुम्हाला जाणवणार. तरुणाईला नव्याने चित्रपटगृहांकडे आकृष्ठ करण्यासाठी सध्या सी.जी.व्ही. सिनेमाज तर्फे ४ डी-एक्स मल्टिप्लेक्सेस चे जाळे विणण्यास सुरूवात करण्यात आली आहे. लवकरच ‘४ डी-एक्स’ आपल्या शहरात उपलब्ध होईल अशी आशा करूयात. आणि जेंव्हा कधी पहिल्यांदा या चित्रपटगृहातील खुर्चीत बसून सिनेमा बघाल, आणि समोर अपघात दृष्यानंतर खुर्ची हलेल तेंव्हा पडतोय की काय म्हणून आजूबाजूला सांभाळायला जाल आणि स्वत:वर हसाल तेंव्हा आपल्यात आणि “त्या” प्रेक्षकांत काडीचेही अंतर नसेल, जो “प्रेक्षक” आगगाडी फलाटावर येतानाची फिल्म पाहून घाबरून पळून गेला होता ! आणि हीच असेल चित्रपट आणि प्रेक्षकांच्या फोर्थ जनरेशनची खर्‍या अर्थाने सुरूवात !!!

 

-       अनुप जत्राटकर

पटकथा लेखक आणि दिग्दर्शक

     contact@anupjatratkar.com   
०८२७७१८५३९३   

Pen Image

Pen Index