१. गंध अन काळोख
अंधार्या खोलीत तेवणारा दिवा,
क्षणभर थरथरला...विझून गेला.
अंधारी खोली गडद काळोखानं झाकून गेली.
फडताळाबाजूची गवाक्षं,
अनामिक चाहुलीनं उघडली गेली.
वार्याच्या झोतासोबत, परिचित गंधाने...
सारी खोली भरून जाते.
ऊर भरेस्तोवर मग मी,
पिऊन घेतो...
तो गंध न काळोख...!
अगदी आवाज न
करता...!!
चार भिंतींचं मोठं कुंपण,
घराच्या चार भिंती.
कोपर्यातल्या त्या खोलीच्याही चारच भिंती.
त्या खोलीच्या कोनाड्यात,
चेहर्यावर पदर ओढून फुंकणीने,
धुमसणार्या त्या चुलीमधला,
विस्तव पेटवण्याच्या प्रयत्नात होती ती.
पण, तिच्या मनातला विस्तव मात्र,
कुंपण, घर, खोली यांच्या, चार चार भिंतींआड,
पदराखाली झाकून ठेवत होती ती !
३. हितशत्रू
त्याला तसा सराव होताच...
पाण्यात सूर मारून,
सावज पकडण्याचा.
आत्ताही तो सूर मारण्याच्या तयारीत.
पण त्याला ठाऊक नव्हतं...
एक अक्राळ विक्राळ जबडा,
त्याचीच वाट पाहातोय..!
४. नकळत...
समजेनाच काय लिहावं....!
एकवटलेलं मनी, कागदावर कसं मांडावं...?
चिन्हांमागून चिन्हं...
उभी आडवी मांडत गेलो.
अस्ताव्यस्त ओळींमधून व्यक्त होत गेलो.
अन नकळत शेवटाला प्रश्नचिन्ह देऊन गेलो.
५. जातं
जातं फिरून जसं, त्याच ठिकाणी परत येतं...
तसंच काहीसं तुझ्या आठवणींचं होतं.
सारं तेच तेच आणि तसंच आठवत रहातो.
विखुरलेलं गोळा करून, पुन्हा जात्यात सोडतो.
जातं फिरवणारा हात थांबायला तयार नसतो.
त्यांना काय गं...!
पण, त्यात भरडत तर आपणच रहातो.
६. सरशी
रात्रीसोबत वाढत जाणारी
घड्याळाची टिक टिक...हृदयाची धड धड,
आणि या दोहोंसाठी, छतावर गरगर फिरणारा पंखा !
या तिघांमध्ये सरशी नेहमी,
पंखा-घड्याळाचीच होते.
कारण...
नको असतील तेव्हा,
ते बंद करता येतात...सुरूही करता येतात !
७. सूत
शर्टाच्या बाहीवरचं सूत निघालं, ते खेचलं.
पण सालं, ते निघताना...
इतर दोघा-तिघांची व्यवस्था करतं...नि:शब्दपणे !
८. कोण म्हणतं..?
कोण म्हणतं..?
भर उन्हात, नुसत्या उन्हानेच...
चिता पेटत नाही म्हणून..?
डोळ्यातलं पाणी आटलेल्या,
कोणालाही उन्हात उभं करा...
आणि,
फक्त आकडे मोजा...
एक, दोन, तीन....
९. भिंत
गंमत म्हणून,
एका भिंतीच्या विटा काढल्या...
एक..दोन..सत्तर...शंभर...दिडशे..!
फरक इतकाच,
अगोदर भिंतीपलिकडे उभा होतो.
आता...अलिकडे !
१०. लेखणी
कित्येक दिवसांपासून मी लिहीत होतो.
शब्दांमागून शब्द...
ओळींमागून ओळी...अन
पानांमागून पानं.
सार्यांमधून व्यक्त झालो.
भावनेच्या भरात रिता झालो.
पण शब्द ऐन भरात असताना,
लक्षात नव्हतं आलं...
पानावर जसा मी रिता होत होतो,
तशीच रिती होत होती,
लेखणी !
-
अनुप
COGNIZANCE: All written
creative material is the solemn property of “An Anup Jatratkar Multi-Media
Production”. If anyone wanted to use it for his/her own personal purpose (i.e.
short film, projects, blogs, articles, scripts, FB posts etc.) then, have to take
proper permission from, Mr. Anup Jatratkar. If it will be found that, anyone
involved in such activities without prior permission, then, we are able to take
certain charge on him/her.