Pen


PEN 25 : कांही ओळी मनातल्या ३ : नाळेबा

आणि काल अचानक रात्री-अपरात्री...

मध्यरात्रच असावी बहुतेक !

अं..., हो मध्यरात्र...किंवा कदाचित ब्रम्ह-प्रहर असावा ! कारण शक्यतो, त्याचवेळी मी गाढ झोपेत असतो !

मला आठवतंय तेंव्हापासून, मी मनाशी खूणगाठ बांधून ठेवली होती,

मध्यरात्रीपासून भूप कानावर पडेस्तोवर दारावर थाप पडू दे...

दार ठकठकू दे किंवा कुणी धडकू दे,

दार उघडणे नाही !

मनाशी खूणगाठ नक्की केली होती...

स्वत:शीच वायदा केला होता !

आणि काल अचानक रात्री-अपरात्री...

दारावर थाप ऐकू आली !

 

नक्की आठवत नाही पण, ज्या क्षणी माझ्या सुप्त-मनानं पहिल्यांदा कसलातरी आवाज ऐकला तेंव्हा,

मी म्हणे, कुठल्याशा गुलाबी थंडीत कुठल्याशा मैत्रिणीच्या किंवा प्रेयसीच्या बाहुपाशात होतो !

सुप्तमनाने घातलेल्या हाकेला म्हणे, मी प्रत्त्युत्तरही दिलं नाही !

असं होईल असं वाटत नाही पण,

शक्यताही नाकारता येत नाही. प्रेयसीच्याऐवजी दुसरंच कुणी असतं तर मात्र असं घडलं नसतं...

असं मागाहून दिलेल्या माफीनाम्यात बोल्ड-ईटालिक-अंडरलाईन असे तीनही ऑप्शन्स ऑन करून...

अरे हो, कॅप्स लॉकही ऑनच ठेवला होता कि !

तर मुद्दा काय की, मी माफीनामा दिला...! “मी” दिला...माफीनामा महत्वाचा नव्हे...

शब्दावरचा जोर लक्षात घ्या !

हाच जोर लक्षात येवून सुप्त मनानं तशी तक्रारही लगोलग जागृत-मनाकडं केली !

अशावेळी बरं साल्यांचं सूत जमतं !

हे एक कोडं मला आजवर उमगलेलं नाहीये...!

हे दिलजमाई त्या फ्रॉईड का कोण...त्याच्या लक्षात कशी आली नाही ? याचंही कुतूहल आहेच म्हणा !

पण कसंय, शेवटी तोही माणूसच ! बळी गेलाच असणार ना, एखाद्या प्रलोभनाला.....

यासार्‍यात तुमच्या लक्षात आलं का...

कोणीतरी बिचारा किंवा बिचारी...

(“बिचारीच असावी ! बिचारी असेल तर गमजा येईल...”)

मघापासून दार वाजवतीये आणि मी मुर्खासारखा स्वप्नातल्या कुणासोबत तर प्रणयाची दिवास्वप्न....

दिवास्वप्न !?

छे ! किती किळसवाणा स्वप्न...

या सिच्युएशनला कोणता बरं शब्द वापरता येईल ?

रातस्वप्न ?!

 हे म्हणजे असं झालं...मुलींची कन्याशाळा !

नाही, असा तरी कुठं नियम आहे, स्वप्नं रात्रीच पहावी म्हणून..!

जरा ईस्कटून पहावं का ?

दिवसाढवळ्या...डोळे टक्क उघडे ठेवून पहातात ती दिवास्वप्न...

रात्री झोपल्यावर पहातात ती फक्त स्वप्न !

(झोपल्यावर दुसरं पहाणार तरी काय !! खी...खी...खी....! हा आपला ठेवणीतला पी.जे. बरं का !)

आणि, स्वप्नातल्या स्वप्नाला म्हणणार तरी काय ?

स्वप्न-स्वप्नं...? स्वप्न-दिवा...? छे...

स्वप्न-रात...! आई ग्ग्ग्ग्ग...

स्वप्न-दोष !! श्शी...बकवास....स्वप्नांना तरी काय दोष देणार...बिचारे..

भरकटतोयेस !!!

पुन्हा त्याच मनाच्या खोल दरीतून आवाज...

आत्ता मात्र त्याची जरब जाणवली मला...!

बेट्या, मग याच जरबेनं तेंव्हा हाक मारली असतीस तर ?

 

तुम्हाला बॉदलेअर माहिती आहे ?

च्या-आयला...इंग्रजीत शिकून झक मारली की काय कळत नाही कधी-कधी !

छे..छे...तुम्ही गैर-अर्थ घेवू नका...

मी भाषेच्या, प्रांताच्या, राज्याच्या विरुध्द नाही आणि कोणत्याही पक्ष्याचा तर नाहीच नाही...

पक्ष्याचा...!!??

तुम्हांला गंमत सांगतो,

आमच्या आंगणात फार पूर्वीपासून किंगफिशर यायचा...

भारी वाटायचं बघायला त्याला...

पण वयात आलो...चार पयसे मिळवाय लागलो आणि...

किंगफिशर पिताही येतो हे कळायला लागल्यापासून आणि त्याचा अतिरेक झाल्यावर,

“फिशर” झाला ! हे आमच्या फॅमिली डॉक्टरांचं वाक्य ऐकल्यापासून त्या बिचार्‍या पक्ष्यानं आंगणच बदललं म्हणे !

त्या अंगणातही, एक लहान मुलगा पहात बसतो म्हणे त्याला...! थोडे दिवस !!!

तर, मघाशी शिवी देण्यामागचं प्रयोजन हे की, परकीय भाषा आणि लेखक शिकून,

आपल्या इथे, कुणीच झालं नाही की काय ? असा सवाल माझा मीच कित्येकदा विचारलाय.

तर, या बॉदलेअर महाशयांची आठवण येण्याचं कारण काय तर...

हे महाशय म्हणतात...

मानवी मनाच्या तीन प्रवृत्ती असतात...

ईन्नुई....स्प्लीन आणि डॅंडिझम !

 ईन्नुई म्हणजे...बोअरडम...रुटीन लाईफ...घाण्याच्या बैलासारखी...चाकोरीबध्द...आणि त्यातून येणारं नैराश्य, आतताईपणा, कंटाळवाणेपणा, निरसता वगैरे वगैरे...

स्प्लीन अर्थात...एक्स्ट्रिम बोअरडम....टोकाचा निराशावाद ! या फेजमध्ये म्हणे आपण, नेहमी चुकीचा किंवा टोकाचा निर्णय घेतो...आणि याच फेजमध्ये आपल्या हातून कधीही माफ न करता येणार्‍या चुका घडतात...आणि वाटतं, परत जर मला भूतकाळात जाता आलं तर मी तो क्षण बदलेन !

आणि सर्वात शेवटी डॅंडीझम...मीन्स, टू अरेंज अग्ली थिंग्ज ईन अ ब्युटीफूल मॅनर....आपल्या चुकांचं किंवा निर्णयांचं समर्थन देणं !

 

तात्पर्य,

या तीनही फेजमध्ये एकदम घुसून मी माझ्या वर्तनाची पाठराखण तर केलीच शिवाय त्यांच्या आरोपांचं जोरदार खंडणही केलं !

व्वा...भले शाब्बास !! हे बाकी बेश्ट जमतं आपल्याला...समोरच्याच्या विचारांचं, मतांचं खंडण करणं...

उगीच नाही !

 

कसाबसा डोळा उघडलाच...

महत्प्रयासानंच म्हणा ना...!

छताकडं बघून सणसणीत शिवीच हासडली...इथं उल्लेख नाही करू शकत म्हणून !

अंगावरचं पांघरूण काढताना नजर उगाच छताकडं गेली,

पंखा फिरत होता...आणखी कांहीतरी माझ्या चाणाक्ष नजरेला जाणवलं...!

आईच्च्या गावात !

क्षणभर थरारलोच...उडालोच म्हणा ना....

मी बघतोय, त्यावर विश्वासच बसेना...

पंख्यावर एक हडळ बसली होती...

हातात मेणबत्ती...केस सोडलेले...पांढरी साडी...नाकी-डोळा छान होती...मेकऽप माफक आनि ब्रॅंडेड असावा ! उगाच नाही...रात्री पण एवढी छान दिसत होती...!

बघून हसली आणि अचानक भसाड्या आवाजात, “गुमनाम है कोई” म्हणत माझ्या छाताडावर उडी मारून बसली....

पहिल्यांदा ओरडलोच...भीतिने ? छे..छे..आता ही बया दाणकन आदळल्यावर माझ्या छाताडाचा बुकनाच होणार, या विचारानं ! पण छे हो...वजनच जाणवलं नाही कांही !

तुम्हाला सांगतो...या हल्लीच्या पोरी....! डाएटींगच्या नावाखाली उगाच हाडं दाखवायची !

झापतोच तिला म्हणत, उठून बसणार तोच, परत दारावर थाप ऐकू आली...

मी छाताडाकडं पाहिलं...बाबो....ती हडळच होती...गायब झाली ना राव...

आता मात्र छातीत धस्स झालं...

३३ कोटींपैकी कुणाचं नाव घ्यावं तेच कळंना...ऐनवेळंला एक पण नाव आठवेना...गोंधळ उडाला...

याचं नाव घ्यावं तर हा नाराज...त्याचं घ्यावं तर तो नाराज...! आता आली का पंचाईत...

  

थरथरत जमिनीवर पाय ठेवला...

फरशी एवढी गार आजवर कधीच लागली नव्हती !

मी दाराकडं बघितलं आणि डोक्यातून एक कळ सणकन छाताडात गेली...

लहानपणीची एक गोष्ट आठवली...पुन्हा नव्यानं...

मी तिसरी चौथीत असेन तेंव्हाची...त्यालाही २०-२२ वर्षं झाली असतील...

तेंव्हा फारशी वर्दळ नसायची...घरं लांब लांब होती...शाळाही लांब होती...टी.व्ही. नव्हता...

“इयं आकाशवाणी...संप्रतीवार्ता: श्रुयंताम...” या संस्कृत बातम्यांनी जाग यायची आणि

विविधभारतीवरची जुनी गाणी ऐकत आईच्या कुशीत रात्र !

एकदा सकाळी शाळेत गेलो, मित्रांची घाबरून चर्चा सुरू होती...

रात्री हडळ येवून दारावर थाप मारते आणि कन्नडमध्ये विचारते...

“बरली ?”

म्हणजे...येवू काय ?

जर दार उघडलं तर ती सोबत घेवून जाते !

 

नंतरचे बरेच दिवस माझ्या गावात घबराटीचं...दहशतीचं वातावरणं होतं.

चौका-चौकात, गल्ली-बोळात दबक्या आवाजात चर्चा सुरू होत्या...

यावर पर्याय काय काढायचा ? यावर काथ्याकूट सुरू होता !

या दिवसात रात्री-बेरात्री आलेल्या पाहुण्यांची मात्र प्रचंड गोची झाली राव ! जो तो शिव्या देत निघून गेला...

अखेर एक दिवस शाळेत गेल्यावर मित्रांच्या टोळक्यात, त्यांच्या वडिल-आजोबांनी काढलेला आणि गावाच्या सर्वानुमते घेतलेला ठराव आणि पर्याय ऐकायला मिळाला...

रात्री दारावर थाप वाजली आणि “बरली ?” कुणी विचारलं तर...

“नाळेबा” म्हणायचं !

तिची मज्जा करायची...परत दुसरे रात्री आली तर पुन्हा “नाळेबा” म्हणायचं...!

मग कुणीतरी शहाणा म्हणाला, फसवायचच आहे ना...मग दारावर सरळ लिहूनच टाकू ना,

“नाळेबा”

प्रश्नच मिटला !

ज्या त्या घरावर “नाळेबा” अर्थात “उद्या ये...” दिसू लागलं...

इतकंच कशाला, मीही माझ्या नास्तिक घरच्यांच्या मागे लागून जबरदस्तीनं लिहायला लावलं !

लहानपणी शिकलेला कन्नडचा तेवढाच काय तो शब्द...नाळेबा !

 

जवळ-जवळ विस्मृतीतच गेली होती गोष्ट...पण काल झोप लागली...

आणि काल अचानक रात्री-अपरात्री...

मध्यरात्रच असावी बहुतेक !

अं..., हो मध्यरात्र...किंवा कदाचित ब्रम्ह-प्रहर असावा ! कारण शक्यतो, त्याचवेळी मी गाढ झोपेत असतो !

मला आठवतंय तेंव्हापासून, मी मनाशी खूणगाठ बांधून ठेवली होती,

मध्यरात्रीपासून भूप कानावर पडेस्तोवर दारावर थाप पडू दे...

दार ठकठकू दे किंवा कुणी धडकू दे,

दार उघडणे नाही !

मनाशी खूणगाठ नक्की केली होती...

स्वत:शीच वायदा केला होता !

आणि काल अचानक रात्री-अपरात्री...

दारावर थाप ऐकू आली !

 

धडधडत्या हृदयानं मी दाराशी गेलो...

दार उघडण्याचे कष्ट न घेता...

कोण आहे ? हे विचारायचं सौजन्य न दाखवता...

काय काम आहे ? कशासाठी आलाय ? याची फिकीर न बाळगता...

नेमकं काय बाहेर आहे...बॅडलक की संधी ? प्रेम की पश्च्याताप ? वियोग की नातं ? दु:ख की सुख ? यातना की परमानंद ? याचा विचारही न करता...

निव्वळ भीतिपोटी...आपसूक माझ्या तोंडून शब्द बाहेर पडला...

“नाळेबा”

 

-अनुप

 

COGNIZANCE: All written creative material is the solemn property of “An Anup Jatratkar Multi-Media Production”. If anyone wanted to use it for his/her own personal purpose (i.e. short film, projects, blogs, articles, scripts, FB posts etc.) then, have to take proper permission from, Mr. Anup Jatratkar. If it will be found that, anyone involved in such activities without prior permission, then, we are able to take certain charge on him/her. 

Pen Image

Pen Index