Pen


PEN 26 : लघुकथा १० : भुक्कड

सारं जगच माझ्याभोवती फिरतंय की काय ? असं वाटून मला मळमळू लागलं होतं. खूप मागाहून लक्षात आलं, उपाशी पोटी भर दुपारी ढोसलेली बिअर आणि मुंबईच्या अव्वल खड्ड्यांमधून सुसाट धावणारी, उडणारी, उडवणारी ती टॅक्सी आणि टॅक्सीतील जुनाट कार-टेपमधून पिचक्या आवाजात गाणं म्हणणारा रफी या सगळ्यांचा परिपाक म्हणजे होणारी मळमळ ! सतत आवंढा दाटून येत होता. वाटत होतं, ओरडावं...रडावं...! डोकं गरगरायला, दुखायला लागलं होतं. काय होतंय, माझं मलाच कळत नव्हतं ! प्रेम केल्याची एवढी मोठी शिक्षा कसं काय बरं कोण देवू शकतं ? राहून राहून स्वत:लाच प्रश्न विचारत होतो. देवदास, मजनू, रांझा सारे भाऊबंदच असल्यासारखं मन त्यांच्या कडं ओढ घेवू लागलं होतं. ‘धोतरधारी’ शाहरूखमधे मी स्वत: दिसू लागलो होतो. एकदम मूडमध्ये शिरून, देवदास चुन्नीबाबूकडं जितक्या व्याकूळ...दर्दभर्‍या नजरेनं पाहिल, तितक्याच किंबहुना त्यापेक्षा काकणभर जास्त भावना डोळ्यात गोळा करून मी त्याक्षणीच्या माझ्या टॅक्सीवाल्याकडं पाहिलं. सिग्नलला थांबलेला माझा चुन्नीबाबू, “कितनी देर लाल रहेगा बे !” असं त्या सिग्नलला उद्देशून म्हणाला. तोंडातली माव्याची पिचकारी बाजूच्या खिडकीतून बाहेर टाकली आणि माझ्या दर्दभर्‍या नजरेची जराही दखल घेत न घेत दात विचकून हसला. त्याचे ते किळसवाणे लालबुंद दात पाहून तिच्या हातावरच्या मेंदीची आठवण झाली आणि त्याला सनसनीत ठोसा मारावा असं वाटत असतानाच अचानक माझ्या मनानं एक रिफ्लेक्स एक्शन केली आणि बाहेर उडी मारण्यासाठी ध्यानीमनी नसताना खाडकन टॅक्सीचा दरवाजा उघडला. त्याचवेळी बाहेरून मोठ्याने एक आवाज ऐकायला आला,

“ये ऽ ऽ ऽ भु ऽ ऽ क्क ऽ ऽ ड !”

दुसर्‍याच क्षणी एक स्कूटीवाली मुलगी त्या दाराला येवून धडकली होती. यावेळी मात्र माझ्या थोबाडावर स्मित घेवून कौतुकानं, खिल्ली उडवण्याच्या हेतूनं माझ्या चुन्नीबाबूकडं पाहिलं पण अरेरे ! यावेळी त्याच्या नजरेत मात्र माझ्यापेक्षा कितीतरी पट जास्त दर्द दिसत होता. घसा खाकरून दाराकडं पाहिलं. दार जरा कमी मोडायच्या घाईला आलं होतं. हॅंडल तुटून पायाशी लोळण घेत होतं. त्या कन्येच्या गाडीचा आरसा आपली जागा बदलून माझा चेहरा दाखवत होता. तिच्या खांद्यावरची पर्स उडून माझ्या गळ्यात पडली होती. तिच्या हेडलाईटच्या काचा तिथल्या बर्‍याच जणांच्या हेड जवळून गेल्या होत्या. माहोल अचानक गरम झाला होता. जो-तो खाऊ की गिळू या नजरेनं माझ्याकडं पाहू लागला होता. मघापासून डोक्यात घोंघावणारा आत्महत्येचा विचार, लोकांच्या मारहाणीतून वाचलो तर करू, असा विचार करून बाजूला झाला होता ! सिग्नल सुटला होता. लोकांच्या हॉर्न आणि आई-बहिणीच्या गजरानं भानावर आलो तेंव्हा सिग्नलवर टपून बसलेले पोलिसकाका कमरेवर हात ठेवून, एका हातात पावती घेवून दात विचकून हसत होते.

“भुक्कड, कळत नाही..असं अचानक दार उघडायचं नसतं ते ! नुकसान कोण तुझे तिर्थरूप भरून देणारेत का...?” ती कन्या स्कार्फ बाजूला करत म्हणाली.

“हे बघा...तुम्ही सर्कशीत काम करत असल्यासारख्या गाड्यांमधून कट मारत आलाय. चूक तुमची आहे...” मी सारवा-सारव करत म्हणालो.

“भाई, मेरा दरवज्जा तुटा है...! नुसकान कौन देगा बे...?” माझा चुन्नीबाबू माझ्यावरच डाफरत म्हणाला.

“अरे शांत व्हा ! या, बाजूला या. ओ ताई, गाडी साईडला घ्या. ओय बिहारी, साईड को लेओ गाडी..सुन्या नाई का ? लेओ म्हंटलं की लेओ...! ओय हिरो, चल ये बाजूला...”

त्यानंतर मात्र पुढचा अर्धा तास अपराध्यासारखा मी खाल मानेनं उभा होतो. पिलेली बिअर माझ्यावरच दया येवून पूर्ण उतरली होती. त्या कन्येच्या गाडीची नुकसान भरपाई, चुन्नीबाबूची नुकसान भरपाई आणि केस बाहेरच्या बाहेर मिटवल्यामुळे पोलिसकाकांना चहा-पाण्याला पैसे अशी साधारण ६-७ हजारला अक्कल घेतल्यानंतर घरापर्यंतचा प्रवास पायी करायचं ठरवून मी घरची वाट धरली.

             दिवस जात होते पण तिच्या आठवणी कांही जाता जात नव्हत्या. भूक उडून गेली होती. तहान लागली कि बिअर आठवायची. घरच्यांशी बोलायची इच्छा उरली नव्हती. सतत तिचा चेहरा नजरेसमोर फिरायचा. “मेरे यार की शादी है..” हे गाणं आठवून खूष रहायचा प्रयत्न करत होतो. ‘जब तक है जान’ मधली शाहरूखभावाची कविता,

“तेरी आंखों की नमकीन मस्तीयां...

तेरी हंसीं की बेपर्वा गुस्ताकियां...

तेरी जुल्फों की लहराती अंगडाईयां...

नही भूलूंगा मैं, जब तक है जान !

तेरा हाथ से हाथ छोडना...

तेरा सायों का रुख मोडना...

तेरा पलट के फिर ना देखना...

नहीं माफ करूंगा मैं, जब तक है जान !

बारीशों में बेधडक तेरे नाचने से...

बात-बात पे बेवजह तेरे रुठनेसे...

झुटी-छोटी तेरी बचकानी बदमाशीयों से...

मोहब्बत करूंगा मैं, जब तक है जान !

तेरे झुटे कस्में-वादों से...

तेरे जलते-सुलगते ख्वाबों से...

तेरी बेरहम दुवाओं से...

नफरत करूंगा मैं, जब तक है जान !”

ही तर राष्ट्रगीताप्रमाणं उठता-बसता म्हणत होतो. उगाचच बॅक-ग्राऊंड स्कोअर सुरू असल्याप्रमाणं एक्सप्रेशन्स देत होतो. चहाचा कप घेवून टेरेसवर बसत होतो. अंधारात खोलीत बसून पिक्चरसारखं दिव्यांची उघडझाप करत होतो. एके रात्री वडिलांनी ही दिव्यांची उघडझाप पाहिली आणि झाप-झाप झापलं ! तात्पर्य, माझं आणि माझ्या आजूबाजूचं वातावरणं एकदम फिल्मी झालं होतं. पण मला पर्वा नव्हती. आपलं प्रेम पण अमर करावं हा विचार बळावत चालला होता. जुनून चढला होता. याच हृदयभंगाच्या आजारात एक चुन्नीबाबू भेटलाच ! म्हणाला,

“देवा...प्रेम केलाईस तू...दे जगाला दाखवून...मार उडी...हूंदे चर्चा !”

झालं ! माझ्यातला देवदास, रांझा, मजनू आणि रोमिओ जागा झाला ! प्रेमरूपी समरांगणात बलिदान द्यायची हिच ती वेळ, असे कांहीबाही संवाद फेकून माझ्या मेंदूचा ताबा मिळवला !

            घोडबंदरला एक कन्स्ट्रक्शन साईट पाहून ठेवली. सकाळी लवकर उठून आई-बाबांच्या पाया पडून, घराला शेवटचं पाहून, भावनिक होवून...गाडीवरून हात फिरवून, खिशात सुसाईड नोट लिहून घरातून बाहेर पडलो. गाडीच न्यायचा विचार होता पण म्हंटलं, नंतर कोण चोरली तर बाबांच्या, मेल्यावर शिव्या नकोत ! धडधडत्या मनानं ट्रेनमधे चढलो. ठाण्याला उतरलो आणि शेअरींग रिक्षा करून घोडबंदरला आलो. हेरून ठेवलेल्या साईटच्या दिशेनं निघालो. वाटेत मस्त गरमा-गरम वडा-पावचा वास आला. विचार केला, मरायचंच आहे तर शेवटचा बॉम्बे वडा-पाव खावूनच मरू ! एक, दोन, तीन वडे रिचवून, तृप्तीचा ढेकर देवून समाधानाने साईटच्या पायर्‍या चढू लागलो. बापरे ! ८ व्या मजल्यावरच धाप भरला. कशाला एवढ्या मोठ्या अपार्टमेंट हव्यात कोण जाणे ! अजून ४ मजले !! शेवटचा मजला चढून वर आलो तेंव्हा जवळ-जवळ मरणाचा विचार मी बदलला होता. पाययार्डच्या सावलीत हुश्श करून बसलो आणि मागच्या बाजूला लावलेल्या तात्पुरत्या लिफ्टकडं नजर गेली. स्वत:ला शिवी हासडून, स्वत:च्याच आईचा उध्दार करून मी खाली नजर टाकली. लोकं मुंगीसारखी दिसत होती. मनात भीतिदायक विचार आला. समजा, एवढ्या वरनं पडून फक्त हात-पायच मोडले तर ? नाही...नाही...ते कांही नाही...एका फटक्यात जीव जायला हवा ! उद्या पेपरमधे फ्रंट-पेजवर फोटोसहीत बातमी येणार या विचारानं गुदगुल्या झाल्या आणि वाईटही वाटलं, उद्याचा पेपर पहायला मी जिवंत नसणार ! विचार सुरू असतानाच लिफ्ट सुरू झाल्याचा आवाज आला. बहुतेक कुणीतरी येत असणार. मी गडबडीनं उठलो. दीर्घ श्वास घेतला. खिशातली नोट पडू नये म्हणून त्यावर रुमाल ठेवला. धीर करून कठड्याजवळ उभा राहिलो. खाली पाहून डोळे गरगरू लागले होते. डोळे गच्च बंद करून कठड्यावर पाय ठेवला आणि त्याचवेळी एक हाक ऐकू आली,

“ये ऽ ऽ ऽ भु ऽ ऽ क्क ऽ ऽ ड ऽ ऽ“

हाक ओळखीची वाटली. खाडकन डोळे उघडले आणि वळून पाहिलं. ती स्कूटीवाली कन्या माझ्याकडं डोळे वटारून पहात होती. ती तरातरा माझ्या दिशेनं चालत आली. ती जशी जवळ येईल तशी तिच्या कपाळावर आठ्या वाढू लागल्या. ती जवळ येवून उभी राहिली,

“एक मिनीट, तू तोच ना...सिग्नलवाला ?”

मी मान डोलावली.

“काय रे...माझ्या कुंडलीवरच येवून बसलायेस की काय ! त्या दिवशी तिथं आणि आज इथं माझ्या साईटवर ? जीवबिव द्यायला आला होतास काय ?”

“छे ! छे !!” उसन्या अवसानाने हसत म्हणालो.

“मग एकटाच इथं काय करतोयेस ? आणि घामनं चिप्प भिजलायेस ! काय भानगड काय ?”

“कुठं काय ! ऊन कित्तीये...सहज फिरायला आलो होतो...”

“इतक्या उन्हात...इतक्या वर !? पटण्यासारखं बोल ना...”

तिला काय उत्तर द्यावं कांहीच सुचत नव्हतं. घाम तर कधी नव्हे तो दरदरून फुटू लागला होता. खिशातून रुमाल काढून कपाळावरचा घाम पुसू लागलो पण तिचं लक्ष मात्र माझ्या पायाशी गेलं. ‘हि खाली काय पहात असावी ?’ म्हणून माझी नजर खाली वळवली आणि धक्काच बसला. माझ्या पायात माझीच सुसाईड नोट पडली होती. मी ती घेण्यागोदरच ती वाकली आणि घेवून वाचू लागली. वाचताना तिच्या चेहर्‍यावर हसू होतं. मधूनच तिरक्या नजरेनं पहायची आणि हसायची. नोट वाचून झाल्यावर मला न विचारताच ती नोट फाडून टाकत ती मोठ-मोठ्यानं हसू लागली.

“हसण्यासारखं कांहीच लिहीलं नव्हतं मी त्यात ! खूप गंभीर होतं ते...”

“आय नो, खूप गंभीर होतं....तुझ्यासाठी ! निदान या क्षणापुरतं !! म्हणजे, त्या दिवशीही दार उघडून उडी मारायची होती वाटतं !” ती हसली आणि कट्ट्याच्या दिशेनं जात म्हणाली,

“ये बस...इथं कट्ट्यावर...”

ती कट्ट्यावर बसली. तिच्या मागोमाग ओढल्यासारखा मीही तिच्या बाजूला बसलो.

“हेच लिहीलेलं आणखी कांही दिवसांनी वाचलं असतंस ना तर तुलाही हसायला आलं असतं ! प्रेमात जीव घ्यायचा नसतो...द्यायचा असतो वगैरे डायलॉग पिक्चरमध्येच चांगले वाटतात मित्रा ! असं नसतं रे खर्‍या आयुष्यात ! एखादी व्यक्ती आवडणं...तिचा सहवास, बोलणं, वागणं, आचरण आवडणं कांहीच गैर नाही.  प्रत्येक व्यक्ती ही स्वतंत्र असते. प्रत्येकाला स्वतंत्र व्यक्तीमत्व असतं आणि त्या प्रत्येक स्वतंत्र व्यक्तिमत्वाचा आपण व्यक्ती म्हणून आदरच करायला हवा, असं नाही का वाटायला हवं ! आपल्याला एका टप्प्यावर एक व्यक्ती आवडते. कालांतरानं लक्षात येतं, नाही बुवा मी या व्यक्तीसाठी किंवा ती माझ्यासाठी योग्य नाही तर, मूव्ह ऑन होण्यात काय हरकत आहे ? तितकं स्वातंत्र्य तर प्रत्येकालाच नको का ?”

“पण मी तिच्यावर खरं प्रेम केलं होतं !”

“मला सांग, खरं प्रेम म्हणजे काय ? आणि ते तू कोण ठरवणार ? मला तर तूझं प्रेम बेगडी आणि वरवरचं वाटतंय ! मला तुझ्यात आणि मुलींच्या अंगावर एसिड टाकणार्‍या मुलांमध्ये अजिबात फरक वाटत नाहीये ! एखादी व्यक्ती जवळ नसूनही तिची काळजी वाटणं, आपल्यामुळं तिच्यावर कोणतंही संकट, अडचण न येणं, अगदीच गरजेवेळी तिच्या हाकेला तिच्या बाजूला उभं असणं आणि इतकं सारं करूनही ते कुठंच शब्दात व्यक्त न करण्यात प्रेम असतं. खरं प्रेम संयमात असतं मित्रा ! सॉरी...खूप बोलतेय का मी ?”

मी खजील होवून खाली मान घालून बसलो होतो.

“नाही. तू बोलतेयेस ते कळतंय. वळत नाहीये...”

“वळवून घ्यायचं म्हंटलं तर सगळंच वळतं मित्रा...” ती हसत म्हणाली.

मी मान डोलावली. हसलो.

“मैत्रिणी...थॅंक्यू !”

            त्यानंतर बोलत दोघेही १२ मजले चालत खाली आलो. ती त्या प्रोजेक्टची असिस्टंट इंजिनिअर म्हणून काम करायची. खूप बरं वाटलं तिच्याशी बोलून. खर्‍या अर्थानं तिच्या रूपात चुन्नीबाबू भेटला म्हणायला हरकत नाही ! चुन्नीबाबू..?! अरे नाव काय हिचं ?

“अगं नाव काय तुझं ? इतका वेळ बोलतोय पण, आपण नावही नाही विचारलं एकमेकांना !”

“काय फरक पडतो ? आपण हक्काने एकमेकांना मित्र आणि मैत्रिणी म्हणून हाक मारलीच ना ? उगाच नावाच्या आणि अडनावाच्या चौकटीत नकोच अडकवूया आपण आपल्या मैत्रीला ! व्हॉट से ?”

“चांगली कल्पनाये ! अगं, मग पण कोणत्या नावाने हाक मारणार आपण एकमेकांना ?”

ती विचार करू लागली. एव्हाना आम्ही खाली पोहोचलो होतो.

“तू मला ना, मैत्रिणी म्हणूनच बोलव...आणि तुला मी..? अं...??? काय बोलावू...???”

मी हसलो.

“तू ना मला...भुक्कड म्हणूनच बोलव !”

तीही गोड हसली.

“चालेल...डन !”

एकमेकांचा निरोप घेवून, पुन्हा भेटण्याचा वायदा वगैरे न करता मी निघालो. ती तिच्या साईटवरच्या तात्पुरत्या उभ्या केलेल्या केबिनच्या दिशेने निघाली. मीही शांतपणे, मळभ दूर झाल्यागत निघालो आणि अचानक तिची हाक ऐकू आली...

“ये ऽ ऽ भु ऽ क्क ऽ ड ऽ ऽ हाऊ अबाऊट कॉफी ?”

 

-       अनुप

 

COGNIZANCE: All written creative material is the solemn property of “An Anup Jatratkar Multi-Media Production”. If anyone wanted to use it for his/her own personal purpose (i.e. short film, projects, blogs, articles, scripts, FB posts etc.) then, have to take proper permission from, Mr. Anup Jatratkar. If it will be found that, anyone involved in such activities without prior permission, then, we are able to take certain charge on him/her. 

Pen Image

Pen Index