Pen


PEN 27 : तिसरं पान

बघता-बघता हेही वर्ष सरलं ! येणार्‍या वर्षाचं स्वागत म्हणून आनंदोत्सव साजरा करावा की या वर्षी बरंच करायचं राहून गेलं असं वाटून दु:ख वाटावं, हा दर ३१ डिसेंबरला उडणारा घोळ आज नव्याने पुन्हा मनावर स्वार झाला आहे. म्हणूनच हा सिंहावलोकनाचा घाट ! या वर्षभरात मनाजोग्या मोजक्या पण समाधानकारक गोष्टी घडल्या. पहिली, बर्‍याच दिवसांपासून सुरू असणारे वेबसाईटचे प्लॅनिंग, फायनली आकारास आले. दुसरी, वेबसाईट इंटर-रिएक्टिव्ह असावी हा माझा हट्ट “पेन” म्हणून पूर्ण करणारी “अविट” ही वेब-डिझाईन संस्था, ज्यांच्यामुळेच केवळ अगदीच कमी दिवसात (निव्वळ ४ महिन्यात) पेनला २०० फॉलोअर्सचा टप्पा गाठता आला. या सगळ्यात आपणा सर्वांचे मोलाचे योगदान आहेच ! माझ्या प्रत्येक लिखाणाला आपण जो प्रतिसाद देता, आवडलं तर कौतुकाचे मेसेजीस, नाही आवडलं तर, हे जरा असं असतं तर मजा आली असती वगैरेचे मेसेज मला पुढच्यावेळी काय लिहायचं ? हा प्रश्न उभा करतात आणि खर्‍या अर्थानं मला नव-नवीन कथा, कल्पना स्फुरण्यास मदत करतात. दोनवेळचे अनुभव मात्र मला माझ्यासाठी सर्वात भन्नाट होते. एक, पहिली दीर्घकथा “रहस्य” सुरू असताना आलेल्या प्रतिक्रीया. आपल्यापैकी बरेच पुढे काय घडणार ? असं विचारायचे. कांहीजण अंदाज बांधायचे. एक आवर्जून उल्लेख करावी अशी व्यक्ती, अभिनेत्री हरिप्रिया शिरसीकर ! “मक्तुब” या लघुपटासाठी आम्ही एकत्र काम केलं होतं. वयानं १५-१६ वर्षांची पण विचार, अभ्यासानं एक पाऊल पुढंच असणारी. तिच्या कित्येक प्रश्नांना-शंकांना उत्तर देताना माझीच गाळण उडते. या प्रियाने तर प्रत्येक भाग तिच्या भाषेत मांडून त्यात उल्लेखलेल्या सायंटिफिक गोष्टींची माहिती आणि शहानिशा करून, पुढच्या भागात काय घडणार याचा अंदाज मांडून दर सोमवारी मला पाठवायची. हा तिचा रुटीनचा भाग होवून गेला होता. “रहस्य” संपल्यानंतर भेटून, मेलनी किंवा मेसेजेसनी दिलेला अभिप्राय विसरता न येणेच होय ! त्यापैकी पवन सोनाळकर (निपाणी), लेखिका चैताली गाणू (अलिबाग), अविटचे सर्वेसर्वा अभिजीत जगदाळे (कोल्हापूर), प्रा. विद्या पाटील (चंदगड) यांचा विशेष उल्लेख करणे अपरिहार्यच आहे, कारण, प्रत्येक भागानंतर अर्धा-अर्धा तास फोन करून चर्चा करून, जे समजले किंवा जे समजले नाही ते विचारण्यास विसरत नसत.

            दुसरा आलेला अनुभव, “रक्षक” या दीर्घकथेसाठीचा होता. पहिल्या दोन भागानंतर अक्षरश: माझा मेसेज बॉक्स भरून जायचा पण जेंव्हा मी ती कथा अचानक थांबवली तेंव्हा मात्र वाचकांच्या प्रेमपूर्वक दिलेल्या शिव्या, नाराजी यांनीही मेल-बॉक्स भरून गेला. कित्येकांनी तर, ‘आम्ही शेअर करणार नाही पण आम्हांला कथा पाठवा’ म्हणून मेसेज केले. आपल्या सर्वांच्या या आपुलकीचा मी ऋणी आहे आणि माफीही मागतो कारण, मी कुणालाच “रक्षक” चे भाग पाठवले नाहीत. यानिमीत्ताने, रक्षक मध्येच थांबवावी लागल्याने आपणा सर्वांचीच माफी मागतो !

            तिसरी जी मनाजोगी घटना घडली ती म्हणजे, स्वत:चा पोस्ट-प्रोडक्शन स्टुडिओ सुरू करावयाचे बर्‍याच वर्षांपासूनचे स्वप्न सत्यात उतरले. या अगोदर स्वत:च्या “ए.जे.एम.पी.” या प्रॉडक्शन हाऊसखाली लघुपट, माहितीपट, जाहिरात, कॉर्पोरेट फिल्म्स करायचो मात्र पोस्टच्या कामांसाठी कोल्हापूर, मुंबईशिवाय पर्याय नसायचा मात्र आता कोल्हापूर, मुंबईत मिळणार्‍या सुविधा निपाणीतील स्वत:च्या, “प्रियदर्शन स्टुडिओ” मधे मिळणे आणि मिळवून देणे शक्य झाले आहे. सर्व प्रकारचं एडिटिंग, रेकॉर्डींग, मिक्सिंग, कराओके रेकॉर्डींग, व्हाईस-ओव्हर, डबिंग, ओ.एस.टी., व्हि.एफ.एक्स., एनिमॅटिक्स, साऊंड डिझायनिंग आणि इंजिनिअरींग, टू डी/ थ्री डी एनिमेशन, आणि सर्व “स्क्रिप्ट टू स्क्रिन सुविधा” एका छताखाली सर्वांसाठी कमी किमतीत उपलब्ध करून देणे सहज शक्य झाले आहे. यासाठी मागचे जवळ-जवळ ८ महिने सारी कामे थांबवून निपाणीतच ठाण मांडून बसावे लागले होते. पण असे असताना दर रविवारी टाकाव्या लागणार्‍या “पेन” मुळेच माझ्यातील लेखक जिवंत होता, असे म्हंटले तर वावगे ठरणार नाही.  

             नुकतीच पेनमध्ये टाकलेल्या “कंकाली” या लघुकथेचा किस्साही असाच अफलातून. स्टुडिओचे बांधकाम सुरू असताना, बिहारी सुतार सतत यू-ट्युबवर गाणी ऐकायचा आणि त्याच्या हाताखाली काम करणार्‍यांना नुसत्या ऑर्डरी सोडायचा. “खिलवा ला दे बे...”, “वो खुजलीवाला लगावा दे बे...” दोन महिने बांधकाम सुरू असताना ऑफिसचे वातावरणच बिहारमय झाले होते. आम्हीही एकमेकांसोबत तसेच बोलायला लागलो होतो. त्याची गाणी ऐकून त्याला विचारलं आणि त्यातून कंकालीबद्दल माहिती मिळाली. त्यानंतर पुढचे कांही दिवस कंकाली आणि त्यांच्या आयुष्याबद्दलची माहिती घेतली, गोळा केली. या कंकालींनी खूप अस्वस्थ केलं. याच अस्वस्थतेत कथा लिहीली पण आत कुठेतरी कलाकार म्हणून असलेली आग शांत बसू देत नव्हती. कथा झाली तरी अस्वस्थता जाईना. अशाच एका बैठकीत “कंकाली” नावाची एकांकिका लिहून मनातील भावनेला वाट करून दिली आणि अनायसे जाहिर झालेल्या बेळगांवमधील एकांकिका लेखन स्पर्धेत पाठवून दिली. (याच स्पर्धेत गतवर्षी “निष्पर्ण पिंपळाच्या छायेत” ला पुरस्कार मिळाला होता.) आणि वाचनासाठी आणि कांही सजेशन्स, करेक्शन्स असतील तर कळायला ती कथा लेखिका चैताली गाणू यांना पाठवून दिली. या एकांकिकेत फक्त स्त्री पात्रेच आहेत आणि तिच्याशी चर्चा करताना माझा विचार बोलून दाखवला की, “आपण निव्वळ महिला सबलीकरणावर बोलतो पण करत कांहीच नाही. माझा विचार आहे की, मंचावर आणि मंचामागे फक्त मुलींनी काम करावे. म्हणजे सर्व विभाग आणि अभिनय त्यांनीच सांभाळावा.” ही कल्पना त्यांनी उचलून धरली आणि “कंकाली” च्या दिग्दर्शनाची आणि मुंबई इथं शो करण्याची जबाबदारी उचलली. पेनमुळे मला जे शुभचिंतक आणि मित्र-मैत्रिणी मिळाले, त्यापैकी याही एक !

            मागचे वर्ष तर सरले. आता नव्याने नव्या “स्व” शोधाची तयारी. वाचकहो, पेनमधून नाविन्य देण्याचा मी प्रयत्न करेन आणि तो कंटाळवाणा किंवा निरस होणार नाही, याची काळजी घेईन. यंदाच्या वर्षात कदाचित आपणाला माझा पहिला मराठी चित्रपट पहायला मिळेल, अशी आशा आहे. चित्रपटाबरोबरच माझा सर्वात महत्वाकांक्षी लघुपट “ओफेलिया” हा या वर्षात आपल्या भेटीला येईल, अशी अपेक्षा. लिहीण्यासारखं बरंच आहे. पण मोह आवरून आपली रजा घेवू ईच्छितो.

            मित्रांनो, मैत्रिणींनो, आज रविवार आणि वर्षाचा शेवटचा दिवस यामुळे आजच्या लेखाचा घाट. पण उद्यापासून, हो...उद्या सोमवार असला तरी, नववर्षानिमीत्त्य सुरूवात म्हणून एक नवीन दीर्घकथा उद्याच्या सोमवारी आणि नंतर दर रविवारी प्रसिध्द केली जाईल. आणखी एक, १ जानेवारी २०१८ रोजी सकाळी १० वाजता नव्या रूपातील वेबसाईट आपल्या सर्वांसाठी खुली होईल आणि त्यानंतर नवीन कथा प्रसिध्द केली जाईल. याचवेळी कंपनीचा नवीन "ट्रेडमार्क" रजिस्ट्रेशन मिळालेला लोगोही पहिल्या पानावर सादर केला जाईल. इथून पुढे हाच लोगो "टी.एम." आणि "आर." मार्क्सखाली पहावयास मिळेल. कथा आणि वेबच्या नवीन रूपातील अभिप्रायाच्या प्रतिक्षेत. आपणा सर्वांचे प्रेम, पाठींबा असेच रहावे, ही अपेक्षा.

            आपणा सर्वाना नवीन वर्षाच्या मन:पूर्वक लाख लाख शुभेच्छा !!!

 

-       ­­अनुप जत्राटकर आणि टिम

Pen Image

Pen Index