डोळे
उघडलेल्या क्षणापासून,
हाता-पायांत
जीव आलेल्या दिवसापासून आणि,
सोहम ची जाणीव
झाल्यापासून ते आजतागायत...
अंधार जळताना,
जाळताना आणि त्यावरच चरितार्थ चालविणार्या,
हरेकाला तो
ओळखत होता.
कांहींचा तो
सखा होता, कांहींचा सगा होता आणि काहींसाठी सोगा होता !
अंधार जळला
होता तेंव्हा,
प्रकाशही
आपसूकच जळला होता कारण,
दोघेही
एकमेकाशिवाय अधुरे, अपुरे आणि पांगळेच होते !
आणि
पांगळ्यांना मिळणारी वागणूक ‘त्याला’ चांगलीच माहित होती.
माहिती असूनही
हर वेळेस शांत रहाणं आणि मिळणार्या पोळीसाठी टिमकी वाजवणं,
यावरच तर
त्याचं अस्तित्व आणि त्याचं सो कॉल्ड कोहमचं उत्तर दडलं होतं.
चूक तशी
त्याची नाहीच कारण पहिल्या वेळेसेच जर त्याला अद्दल घडली असती तर,
दुसर्या खेपी
त्यानं असं धारिष्ठ्यंच केलं नसतं, हे मात्र अगदी सत्य होतं.
जेंव्हा,
सांगून-समजावूनही त्यानं ते लाल सफरचंद तोडलं होतं आणि,
त्याच्यासह
मादीलाही चाखायला भाग पाडलं होतं, तेंव्हाच-
त्याला ढकलून
देण्याऐवजी, त्याचं मुस्काट फोडलं असतं, तर-
तर कदाचित, हर
वेळेस, “पॅराडाईज लॉस्ट” होवून तो नेहमीप्रमाणे “रिगेन” होणारच,
या भ्रमात आणि
ग ची बाधा न होता,
“झक” मारत
राहिला असता आणि नाईलाजाने का असेना,
त्याला मादीला
आणि त्याच्यासह इतरांनाही मांडीला मांडी लावून पंक्तिला बसायला शिकला असता !
चूक कोणाची ?
हा मुद्दाच तसा गौण !
मूळात “जनावर”
या लायकीपेक्षा जास्त “माणूस” म्हणून मिळालेली किंमत त्याला पचनी पडत नसावी.
आणि म्हणूनच
वेळ मिळेल तेंव्हा, मूड असेल तसा,
तो या
कुशीवरून त्या कुशीवर...
या हौदावरून
त्या हौदावर आणि...
या काठीवरून
त्या काठीवर !
काठीवरच्या
कापडाचा रंग कोणताही असो, ते आहे एक कापडच...
कापसापासून
बनलेले !
जरा शहाण्या “माणसांनी” लिहीलेली काव्य, गीतं, आचरणमूल्य,
कपाळी लावून
वाचतो आणि सर्वांनी वेगवेगळ्या भाषेत सांगितलेलं एकच वाक्य अभिमानानं सांगतो,
“आत्मा नश्वर
आहे. तो एकातून दुसर्यात जातो !”
मग, मला सांग...
आज जो तू काठी
आणि त्यावरचा रंग मिरवतोस, तोच तुझ्या आत्म्याचा असेल ना ? आणि मग दुसर्या वेळी,
तू मेल्यावर तो दुसर्या काठीवरच्या दुसर्या
किंवा तिसर्या काठीवरच्या चौथ्याच रंगात जाणार नाही कशावरून ?
जर,
तू-मी-तो-ते कधी ना कधी सगळ्याच रंगांमधून-योनीमधून जन्माला येवून पुन्हा याच
मातीत मरत असतील तर,
मला सांग,
शरीराला कापड म्हणतो ना आपण ? मग या कापडाला, काठीला, रंगाला आणि आत्म्याला अर्थच
काय उरतो ?
कधी काळी तूही
याच प्रोसेस मधून गेला असशील ना ?
मित्रा, जिथं
तुझा-माझा आत्माच तुझा-तुझ्या किंवा माझा-माझ्या रंगाचा राहिला नाही तिथं तुझ्या-माझ्या
नाशवंत शरीराची काय कथा ?
कधी तू-मी या
सार्या पल्याड “माणूस” म्हणून हरेकाला पाहशील-पाहणार आहोत ?
जेंव्हा
पाहशील-पाहेन, तेंव्हा मला-तुला जाणवेल,
अरे “रिगेन”
नाहीये हा...
आपण तर इथेच
आहोत ! “लॉस्ट” म्हणून जे सांगितलं, ती तर कवी-कल्पना होती !
खरंच अवघड आहे
का ? आपला चष्मा काढून आजूबाजूला, निसर्गाकडं पहाणं ?
खरंच अवघड आहे
का, रंगाच्या आतील निव्वळ कापडाकडं पहाणं ?
अशीच वाटणी
करायची झाली तर सारी धरती-अवकाश-विश्व यांचीही विभागणी करावी लागेल मग !
आणि त्याला
पश्च्याताप झाल्याशिवाय वाटणार नाही...
“साला, याला
तेंव्हाच कानसुलात लगावली असती तर हा प्राणी माझ्याच खांद्यावर बसून माझ्याच कानात
मुतला नसता !”
असो, आज आपण
त्यालाही हरेक रंगात-काठीत आणि माणूस म्हणून कधीकाळी ओळखल्या जाणार्या आजच्या
कलयुगातील प्राण्यात वाटून टाकलं आहे !
ही खरी
विटंबना नाही का ?
ज्यांन
निर्माण केलं, त्यालाच वाटून टाकलं !
पुन्हा एकदा "बिग बॅंग" होणार,
पण याखेपी तो “त्याची”
निर्मीती नसणार...
ती आपली
निर्मीती असणार ! आणि कित्येकांना मगरमिठीत घेवून पश्च्यातापाच्या आगीत कित्येक
अंधार्या रात्रीत जाळून टाकणार आहे जोवर...
जोवर पुन्हा एकदा,
फड जाळून नव्या मशागतीयोग्य जमीन होणार नाही तोवर !
आणि तोवर,
अंधार जळत
रहाणार...
जाळत
रहाणार...
आणि दाट होत
रहाणार...
प्रकाशाला
आपल्या कवेत घेवून !
-
अनुप
COGNIZANCE: All written creative material is the solemn property of “An Anup
Jatratkar Multi-Media Production”. If anyone wanted to use it for his/her own
personal purpose (i.e. short film, projects, blogs, articles, scripts, FB posts
etc.) then, have to take proper permission from, Mr. Anup Jatratkar. If it will
be found that, anyone involved in such activities without prior permission,
then, we are able to take certain charge on him/her.