Pen


“कंकाली” एकांकिकेच्या यशाच्या निमीत्ताने

प्रिय वाचकहो,

            कांही दिवसांपूर्वी “कंकाली” नावाची लघुकथा “पेन” या सदरात प्रसिध्द केली होती आणि त्यानंतरही सदरची कथा डोक्यातून आणि मनातून जाता जात नव्हती. या विषयामुळे मनात प्रचंड अस्वस्थता होती आणि याच अस्वस्थतेतून “कंकाली” नावाची एकांकिका लिहीली गेली आणि योगायोगाने ज्या दिवशी लिहून संपली त्या दिवशी “कॅपिटल वन, बेळगांव” आयोजित “आखिल भारतीय एकांकिका लेखन स्पर्धे”ची फॉर्म भरण्याची शेवटची तारिख होती. मित्र एस.के. च्या आग्रहाला बळी पडून बळेबळेच, माझ्यासाठी स्पर्धेचा फॉर्म भरण्यापेक्षा तुमकूर डोसा खुणावत असल्यानं, बेळगांव गाठले.

            जवळपास महिना उलटला होता. मी विसरूनही गेलो होतो. गेले कांही दिवस एका प्रोजेक्टमध्ये गुंतल्यानं फोन वगैरे बंद करून एकांतवासात होतो. काल रात्री झोपण्यापूर्वी फोन ऑन केले आणि अभिनंदन करणारे मेसेजीस येवून पडू लागले. सुरूवातीला विश्वास बसला नाही मात्र सकाळी पेपरमधून आलेल्या बातमीतून समजले की, अखिल भारतीय एकांकिका लेखन स्पर्धेत ‘कंकाली’ ला प्रथम क्रमांकाचं पारितोषिक जाहीर झाले आहे. गेल्या वर्षी याच स्पर्धेत, “निष्पर्ण पिंपळाच्या छायेत” या एकांकिकेसही पुरस्कार मिळाला होता. येत्या २१ जानेवारीस बेळगांव इथे पुरस्कार वितरण संपन्न होत आहे. त्याची बातमी २२ तारखेस “न्यूज” या मेनूमधे वाचावयास मिळेलच !

            वाचकहो, माझ्या या लिखाणातील यशात आपला सर्वांचाही वाटा आहे, हे मान्यच करावे लागेल कारण, आपण दिलेल्या प्रोत्साहनामुळेच मी लिहू शकतोय म्हणूनच आपणा सर्वांचे मनापासून आभार ! लवकरच आपणा सर्वांसोबत “कंकाली” शेअर करेन.

पुन्हा एकदा शतश: आभार !!!

-आपला मित्र,

अनुप जत्राटकर  

Pen Image

Pen Index