Pen


PEN 29-1 : प्रकरण दोन : इतर १ : दीर्घकथा १ : दोष कुणाचा ? : आलोक जत्राटकर

(Dear Friends, you can click on "NEWS" menu to read the news regarding One Act play writing competition, where "Kankali" own best one act play award)



प्रकरण दोन : इतर १ 

दीर्घकथा १ : दोष कुणाचा ? 

आलोक जत्राटकर



रक्षाबंधनाचा दिवस. मला माझ्या चुलत बहिणीकडून राख्या आल्या असल्यामुळं मी तसा आनंदातच होतो.  पण महेश मात्र अत्यंत उदास होता.  बहिणीच्या आठवणीने तो व्याकुळ झाला होता.  मला त्याची ती उदासिनता पाहवत नव्हती.  स्वयंपाकाची पाळी आज माझी असल्यानं मी तयारी करत होतो.  बाहेरुन बेलचा आवाज आला.  महेशनं नाईलाजानंच दार उघडलं.  आणि जवळ जवळ ओरडलाच, 'ताई, तू इकडे कशी काय?' 

त्याच्या त्या आनंदाच्या ओरडण्याने मी बाहेर आलो.  पाहतो तर दारात साधारण पस्तिशीची स्त्री उभी होती.  अन् तिच्या गळयात पडून लहान बाळासारखा महेश रडत होता.  ती त्याच्या पाठीवरुन हात फिरवित होती.  शेवटी त्याला शांत करुन ती त्याच्यासोबत आत आली.  महेशचा आनंद चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता.  ताई त्याला म्हणाल्या,

'मयू, काय रे ही काय दशा करुन घेतलीसआणि असा लहानासारखा रडू नकोस.  जा तोंड धुवून ये बघू.तो गेला, तोवर मी ताईंना माझा परिचय दिला.  महेश तोंड पुसत बाहेर आला.  त्याने भावोजी भाच्यांची चौकशी केली.  मी तोवर आतमध्ये निरांजन वगैरे घेवून ओवाळण्याची तयारी केली.  ताईंनी माझी खूपच स्तुती केली. 

            आम्हा दोघांनाही ताईंनी ओवाळले.  राख्या बांधल्या, मला आनंद झालाच पण महेशच्या चेहऱ्यावर आज वेगळंच समाधान दिसत होतं.  जणू गेल्या पाच वर्षात तो या समाधानापासून दूर होता.

ताई महेशला म्हणाल्या,

'गाढवा, इतक्या वर्षात नुसती पत्रेच पाठवलीस भेटायल म्हणून कधी आला नाहीस.  शेवटी पप्पांनी मला, इकडे यायला सांगितले.  केलं की नाही सरप्राइज? जा पहिल्यांदा बाजारातून काही तरी गोड घेवून ये आणि तुमच्या स्वयंपाकाच कायजेवलात की नाही आजून?' 

महेश माझ्याकडे पाहून म्हणाला,

'आज साहेब जेवण करणार आहेत.  ते जेव्हा वाढतील तेव्हाच आमचे जेवण!

यावर ताईने स्वत:च स्वयंपाक करण्याचा निर्णय घेतला.  त्या स्वयंपाक खोलीत आल्या.  महेश काहीतरी आणायला म्हणून गेला. 

मी ताईंना स्वयंपाकखोलीत मदत करु लागलो.  आमची श्रम विभागणी ऐकून त्यांना कौतुक वाटले.  ताईंनी मला त्यांची कथा सांगितली की, त्या पाच वर्षाचे असताना महेशच्या आई-वडीलांनी त्यांना अनाथालयातून दत्तक घेतले होते.  त्यानंतर पाच वर्षांनी महेशचा जन्म झाला.  पण त्याची आई वारली.  पण वडिलांची ताईवरची माया थोडीही कमी झाली नव्हती.  त्यांनी खंबीरपणे दोघांचा सांभाळ केला.  महेशलाही ताईशिवाय क्षणभरही करमत नसे. मी ताईंना महेशचा लग्न करण्याच्या निर्णयाबद्दल सांगितले तेव्हा ताई म्हणाल्या,

'अरे रक्षाबंधनाच्या निमित्ताने जरी आले असले तरी मी त्याच कामगिरीवर आले आहे.  बरं, ती प्रीती देशमुख मुलगी इथे आली होती का?'

'होय, एकदा आली होती.  त्यानंतर काही आलेली नाही.

‘तिची ढीगभर पत्र घरी आली आहेत.  तिला हा बाहेर शिकत असल्याचं माहितच नव्हतं.  ती तशी खुपच चांगली मुलगी आहे.  आमच्या शेजारीच रहायची, तिच्या आईसोबत, वडील नाहीत बिचारीचे.  पण मयू तिच्याबद्दल कधी बोलतो का रे? ताईने विचारले.

'तिच्याच काय पण इतर कोणत्याही मुलीबद्दल तो काही बोलत नाही.मी काही बोललो तर माझ्यावरच चिडतो.  तुम्हीच त्याची गाडी जरा रुळावर आणा.इतक्यात बेल वाजली आणि तो विषय तिथेच संपला.

          फारच दिवसांनी इतके चवदार जेवण जेवून आम्ही सर्वजण समाधानाने बाहेर आलो.  अगदी नकळतपणे महेशने ताईच्या हेतूसाठी वाट करुन दिली. तो म्हणाला,

'ताई मघाशी गडबडीत ओवाळून घेतले, ओवाळणी म्हणून तुला काय हवं ते माग.

यावर ताई म्हणाल्या,

'मयू, आता दिलेला शब्द फिरवायचा नाही.  मला ओवाळणी म्हणून तू प्रीतीला माझी भावजय म्हणून घरात आण.  ती खरोखरच चांगली मुलगी आहे.  आवडण्यासारखं असं तिच्यात काही नाही.  पण तुझी जर काही वेगळी पसंद असेल तर संकोचता सांग कारण, शेवटी तुलाच तिच्याबरोबर आयुष्य काढायचे आहे.

'अगदी बरोबर ताई, अहो याचा असा हा ब्रम्हचर्याचा पण! त्यामुळे ब्रम्हचर्याचा मित्र म्हणून मुली माझ्याकडेही पहात नाहीत.'

मी ताईंनी अपेक्षेने महेशकडे पाहिले.  त्याच्या चेहऱ्यावर त्या दिवशीचेच भाव उमटले होते.  पण त्यात क्रोधापेक्षाही अधिकतर दु:खाचेच भाव होते.  कोणीतरी खपली पडलेली जखम नखाने रक्ताळावी तशा व्याकुळ वेदना त्याच्या डोळयात तरळल्या.  तसले भाव महेशच्या चेहऱ्यावर पहायची सवय नसल्याने ते सहन होऊन माझी नजर खाली वळली आणि मटकन् खुर्चीत बसलो.  ताईसुध्दा महेशच्या चेहऱ्यावरचे विषण्ण भाव निरखीत होत्या.  त्यांनाही हे पूर्णपणे अनपेक्षित होते.  तरीही मोठया धीराने त्या पुढे झाल्या.  त्याच्या खांद्यावर हात ठेवला.  त्या हातांनीच त्याला लहानपणापासून आधार दिला होता, सावरले होते.  त्यांच्यातील विश्वास त्याला दिलासा देत होता.  त्या उद्गारल्या,

'मयू, तुझ्या चेहऱ्यावर जे दु:ख उमटलेलं आहे, ते तुझ्या दृष्टीने अतिशय भयंकर असेच असावे.  अन्यथा माझा छकुला इतका दुबळा केव्हापासून झाला की साध्या दु:खाने खचून जावा.  माझ्या हातची माया इतकी असहाय्य नव्हती. तुला माझ्या ममतेची शपथ आहे.  आज तुला मन मोकळे केलेच पाहिजे.  त्यामुळे तुझ्या मनालाही स्वस्थता वाटेल.'

त्या आश्वासक शब्दांनी महेशला धीर आला,

'ताई, ज्या गोष्टीची भीती होती.  ज्या भीतीपोटी मी तुला भेटलो नाही.  तीच आज तू माझ्यासमोर मूर्तीमंत साकार केलीस.  प्रीतीबदल बोलायचं तर ती खरोखर एक गुणी आणि कोणालाही आकर्षित करणाऱ्यां व्यक्तिमत्त्वाची मुलगी आहे.  पण मला वेगळीच भीती जाणवते आहे.  पण आज मी तुझ्यापासून काही लपवणार नाही, सर्व काही सांगणार आहे.  मग भले तू मला काही म्हणावेस लहानपणापासून तूच एक अशी आहेस की जिने नेहमी मला समजून घेतले.  बाबा नोकरीत सतत बाहेर असायचे.  त्यांच्याहीपेक्षा मला तुझाच जास्त लळा लागला.  एक आईदेखील आपल्या मुलासाठी यापेक्षा अधिक काही करत असेल असं मला वाटत नाही. ताई, तुला आठवतं, कोल्हापूरात आपल्या अपार्टमेंट समोरच्या 'वनविहार' अपार्टमेंटमध्ये आठवले रहात होते.'

'हो, तू बारावीला असताना त्यांची बदली गुजराथला झाली.  त्यांची अनुराधा आणि तू एकत्र खेळायचास लहानपणापासून.  मीही लहानपणी तुम्हाला कधीकधी नवरा-बायको म्हणून चिडवायची.  अस्सा कांही चिडायचास की बस्स मग माझी हसता हसता पुरेवाट व्हायची.'

'बरोबर ताई, अनुराधा माझी एक जीवलग मैत्रीण होती.  तिचा स्वभावही खूपच मोकळा होता.  खूपच गोड मुलगी होती ती.  ती वारंवार आजारी असायची, का ते मला माहित नव्हतं! मी मग तिला तिच्या अभ्यासात मदत करायचो.  ताई तिने अकरावीत माझ्यावर प्रेम असल्याचं सांगितलं होतं.  पहा माझं ते वय नव्हतं की मी लगेच होकार द्यावा.  मी तुला काहीच बोललो नाही.  पण फार विचार करुन मी त्यांच्या घरी गेलो आणि तिच्या आईला सर्वकाही सांगितलं.  तिच्या आईला काहीसा धक्का नसल्याचं मला जाणवलं.  पण त्यांनी मला जे काही सांगितलं त्यावर माझा विश्वास बसेना.  पायाखालची जमीन सरकल्याचा भास झाला.  त्या मला काकुळतीने म्हणाल्या,

'महेश, आजवर आम्ही आमच्या मुलीची काळजी करत होतो.  तिला सुखी ठेवण्यसाठी आम्ही खूप कष्ट घेतलेत.  आजपासून तूही त्यात सहभागी हो.  अनूचे हदय प्रमाणापेक्षा कमकुवत आहे.  याहून पुढे जाऊन सांगायचं म्हणजे डॉक्टरनी तिची जास्तीत जास्त दोन वर्षे गॅरंटी दिली आहे.  आम्ही प्रयत्नांची शर्थ करतोस, पण व्यर्थ ! तूही तिला धक्का लागेल असे काही वर्तन करु नको.  तिला सतत खूश ठेवण्याचा प्रयत्न कर.  आम्ही तिला किंवा तुला काही बोलणार नाही.  मी तिच्या पप्पांनाही हे सांगेन.  तू इथपर्यंत मला सांगायला आलास यातच मला तुझ्याबद्दल खात्री झाली आहे.  पण प्लीज अनूला याची जरासुध्दा कल्पना देऊ नकोस.  एवढं माझ्यासाठी कर.'

अनूसाठी मग मी काय वाटेल ते करण्याची तयारी ठेवली.  तिच्या मनाला दुखावेल असे काहीही करण्याचे ठरवले.  बारावीच्या अभ्यासाला मग दोघांनी मिळूनच सुरवात केली.  तेव्हाच तिच्या वडिलांची गुजराथला बदली झाल्याचे कळले.  माझ्यापासून दूर जाताना ती फार दु:खी झाली.  माझ्यासाठी मनाला सारखी रुखरुख लागून राहिली.  ही तिच्याबद्दलची सहानुभूती होती की प्रेम हे माझं मलाच समजत नव्हतं.'

खोलीत काही काळ शांतता पसरली.  त्या शांततेचा भंग करीत ताईच म्हणाल्या,

'अरेरे ! पण तू एवढयाच कारणासाठी इतका दु:खी झालायस.  नुसता पत्ता दे.  मी आणि तुझे भावोजी लवकरच गुजराथला संपर्क साधू.'

यावर एक दीर्घ उसासा टाकून महेशने बोलायला सुरुवात केली,

'ताई, हेच एक कारण असतं तर मलाही तुझ्यापेक्षा जास्त आनंद झाला असता, पण गुजराथला गेल्यावर, हवा बदलल्यामुळे अनू दोन तीन महिन्यातच आजारी पडली आणि आई वडिलांच्या प्रयत्नांना काहीही दाद देता ती निघून गेली... मला एकटा सोडून ! माझ्या बारावीच्या अभ्यासावर परिणाम होऊ नये म्हणून तिच्या आईंनी मला काहीच कळविले नव्हते.  पण परीक्षा संपताच मला त्यांनी पत्राने तसे कळवले.  मला काय करावे कळेना.  काही सुचेनासे झाले.  आयुष्यात प्रथमच मी दीर्घ खचलो.  एक मोठी पोकळी निर्माण झाल्याचा भास झाला, कधीही भरुन निघणारी पोकळी तेव्हा प्रेम म्हणजे काय असावे याचा मला अंदाज आला.  एखादी व्यक्ती समोर नसतानाही तिला आपले सर्वस्व मानून तिच्यासाठी त्याग करण्याचा नि:स्वार्थी विचार म्हणजेच प्रेम हे मला जाणवले.  पण ताई, तेव्हापासून का कोणास ठाऊकतेव्हा पासून एक अपराधीपणाची भावना मनात घर करुन राहिली.  अनूचा मृत्यु माझ्यामुळेच झाला असे मला वाटू लागले.  जर मी तिच्याजवळ असतो तर ती मला सोडून जाऊच शकली नसती, नव्हे मी जाऊच दिले नसते. अनूला भेटण्यासाठी आता एकच पर्याय होता.  तो म्हणजे आत्महत्या....”

 

(क्रमश:)

 

COGNIZANCE: All written creative material is the solemn property of “An Anup Jatratkar Multi-Media Production”. If anyone wanted to use it for his/her own personal purpose (i.e. short film, projects, blogs, articles, scripts, FB posts etc.) then, have to take proper permission from, Mr. Anup Jatratkar. If it will be found that, anyone involved in such activities without prior permission, then, we are able to take certain charge on him/her.  

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

Pen Image

Pen Index