Pen


PEN 29-2 : इतर १ : दीर्घकथा १ : दोष कुणाचा ? : प्रकरण तीन : आलोक जत्राटकर

“...अनूला भेटण्यासाठी आता एकच पर्याय होता.  तो म्हणजे - आत्महत्या आणि त्यासाठी मी एका दिवशी रंकाळयावरही गेलो.  ताई, जग काय वाटेल ते बोलते याचा प्रत्यय मला त्या दिवशी आला.  'भ्याड लोक आत्महत्या करतात' हे सर्वसामान्यांत प्रचलित वाक्य साफ खोटं, चुकीचं असल्याचं मला दिसलं.  आत्महत्या करण्यासाठी प्रबळ साहस, कमालीचा निर्धार, मनाचा खंभीरपणा आणि जगातील सर्व पाश सोडण्याची तीव्र इच्छाशक्ती असावी लागते.  पण या शेवटच्या एकाच गोष्टीत मी अयशस्वी ठरलो.  ताई, त्यावेळी माझ्या मनात फक्त तुझा विचार आला, फक्त तुझा.  'ज्या ताईने आपल्यासाठी इतके काही केले, तिला आपल्या मृत्युमुळे काय वाटेल, तिची काय अवस्था होईल?'  या आणि या एकाच विचाराने मला परत फिरण्यास भाग पाडले.  नंतर ताई, तुझ्या प्रोत्साहनाने मी मिरजेला गेलो.  तिथे मात्र केवळ अभ्यास करायचं ठरवलं.  तुझं आणि पप्पाचं स्वप्न मला पूर्ण करायचं होतं.  इंजिनिअर होऊन !  दु:ख विसरण्यासाठी मी स्वत:ला अभ्यासात दडवून घेतलं.  मित्रही फारसे जोडले नाहीत.  नाही म्हणायला रुम पार्टनरशीच जास्त मैत्री होती.  त्याला एकदा माझ्या पाकिटातला अनुचा फोटो दाखवला होता.  बाकी काहीच बोललो नव्हतो. 

            एक दिवस मी अभ्यास करत असतानाच पार्टनर धावत पळत खोलीत शिरला.  तो फारच धापत होता.  मी त्याला पाणी दिले आणि जरा शांत व्हायला सांगितले.  तो अतिशय उत्तेजित झाला होता.  म्हणाला, 'शहाण्या, तुझी फोटोतली सुंदरी, तिथे कैंटीनमध्ये मजा करत्येय आणि तू इकडे अभ्यास? वा, वा...!! कशी जमायची जोडी?'

            मला त्याचा फारच राग आला, म्हणालो, 'दीपक, पुन्हा असली फालतू चेष्टा करायच्या भानगडीत पडू नको.  मला खपणार नाही.यावर तो म्हणाला, 'वा रे  वा ! तुमची स्वप्नसंदुरी आम्ही पाहिल्याचा एवढा राग?' मग मी शांतपणे त्याला विचारंल, 'खरंच पाहिलंस तिला? कशी दिसते?' पार्टनर हसत म्हणाला, 'अगदी फोटोतल्यासारखी!कधीही चेष्टा करणारा पार्टनर असं म्हणतोय.  त्यात तथ्य असणारच की काहीतरी.  त्याबरोबर मी झटकन उठून कपडे चढविले आणि पार्टनरबरोबर कॅन्टीनमध्ये गेलो.  तिथे एका टेबलापाशी पाच मुलींचा ग्रुप बसला होता.  त्यांच्यात अनू बसली होती.  तिच्यासमोरचेच एक टेबल पकडून मी बसलो.  अनु आणि इथं? अस मला प्रश्न पडला.  पण माझे डोळे कधी धोका खाणारे नव्हते.  ती हास्यविनोदात रंगली होती.  पण तिच्यात काहीतरी फरक वाटत होता.  हो, तिने तिची हेअर स्टाईल बदलली होती.  पूर्वीचे लांबसडक केस कापून रबरबँड लावून पाठीवर मोकळेच सोडले होते.  तसेच, ती बरीचशी बारीक झाली होती.  रंगही किंचित फिका पडला होता.  महत्वाचं म्हणजे डॉक्टरचा पांढरा कोट आणि स्टेथॅस्कोप, या दोन वस्तू तिच्या जवळ होत्या.  म्हणजे अनू मेडिकल ट्रेनिंग घेत होती.  तर, पण मग तिच्या आईने मला खोटं पत्र का घालावंया मागचा त्यांचा हेतू काय त्या दिवशी किती काकुळतीने त्यांनी मला अनूच्या खुशीसाठी राजी केले होते.  मला काहीचं समजेना वाटलं उटून सरळ जावं नि तिलाच विचारावं, पण मैत्रिणींसमोर योग्य वाटलं नसतं अनूनेही किती प्रेम केलं माझ्यावर, किती काळजी घेत होतो मी तिची.  सर्व सर्व काही आठवलं.  मी तिला आठवत होतो की नव्हतो हे कळायला मार्ग नव्हता.

            मी विचार करत असतानाच त्यांचा ग्रुप तिथून उठला.  एक मुलगी काऊंटरवर बील भरत असताना अनूने एखाद्या तिऱ्हाईताकडे पाहतात तसेच माझ्याकडे पाहिले आणि मैत्रिणींबरोबर निघून गेली.  मला अतिशय संताप आला.  मात्र त्या दिवसापासून माझी अस्वस्थता वाढली होती.

            दीपकने धावाधाव करुन तिच्याबद्दलची सर्व माहिती मला प्राप्त करुन दिली.  एक म्हणजे, ती अनू नव्हतीच.  पुन्हा माझ्या मनात अपराधीत्वाची भावना वाढली.  तिच्यासंबंधी आईसंबंधी मी नको तो विचार केला होता.  काय अधिकार होता मला दोघींनीही किती नि:स्वार्थपणे मला आपला मानला होता.  छे छे  !!

            अनूसारखी दिसणारी ती मुलगी होती, दिव्या अगरवाल.  तिचे वडिल इथल्या हॉटेल व्यवसायाचे प्रमुख सूत्रधार मानले जात होते.  मेडिकलच्या फर्स्ट इयरला ती होती. मी मात्र तिच्यात अनूला शोधण्याचा प्रयत्न करीत होतो.  मी तिचा पत्ता प्राप्त केला आणि धाडस करुन एक निवावी पत्र तिला पाठवले.  त्यात माझ्या प्रेमाचा स्पष्ट उल्लेख केला.  तसेच तिला केस वाढवून त्यांची वेणी घालण्याची विनंती केली.  अनूला दिव्याच्या रुपात प्राप्त करण्याच्या खटपटीला इथूनच सुरुवात झाली.  पण योग्य परिणाम साधला गेला.  चार महिन्यातच दिव्याचे केस मानेपासून पाठीपर्यंत वाढले आणि ती वेणी घालू लागली.  जणू माझी अनूच जशी नंतर धाडसाने माझे नांव, पत्ता घालून एक पत्र पाठवले.  काही दिवसांत तिला मीच पत्रलेखक असल्याचे समजले कारण जेव्हा मी तिच्यासमोरुन जात असे तेव्हा ती माझ्याकडे पहात असे.  पण तरीही तिने काहीच प्रतिसाद दिला नाही.  मी वारंवार तिला पत्रे पाठविली आणि माझ्या प्रेमाचा पुनरुच्चार केला.  परिणाम मात्र उलटाच दिसून आला.  ती तेव्हापासून मला पाहिले की बिथरल्याप्रमाणे वागू लागली.  माझ्या सावलीलाही घाबरु लागली.  वास्तविक मी तिला कधीही धमकावयाचा किंवा भिती दाखवण्याचा प्रयत्न केला नव्हता.  पण मला ती हवी होती.  अनूचे प्रायश्चित मला करायचे होते.  त्यासाठी मी दिव्याचा हव्यास धरला होता.  अजून मी तिच्याशी एकदाही बोललो नव्हतो.  संधीच मिळत नव्हती.

            कदाचित तिला क्लासमधली मुले छेडत असावीत.  पण यामागे माझा हात असल्याचा तिला संशय आला म्हणून तिने एका विश्वासू माणसाला मला धमकी देण्यास पाठवले.  मला त्याचा स्वभाव अजिबात आवडला नाही.  त्यामुळे मी त्याला स्पष्ट बोललो, तिची इच्छा नसेल तर मी माघार घेतो पण आजपर्यंत मी तिला एकदाही त्रास दिलेला नाही.'

एखादा मनुष्य आपल्या प्रिय व्यक्तीला त्रास होण्यासारखे कधीतरी वागेल का प्रेम तर एकमेकांची सुखदु:खे वाटून घेण्यासाठी असते.  त्याला स्वार्थाचा लवलेशही नसतो. 

            ताई जेव्हा अनू गुजराथला गेली होती.  तेव्हा मी तिच्यासाठी काही कविता केल्या होत्या.  ती आल्यावर ऐकवण्यासाठी ! पण दुर्दैवाने ती आता कधीच येणार नव्हती.  माझ्या तिच्याबद्दलच्या सर्व फिलिंग्ज या कवितांत मी व्यक्त केल्या होत्या.  या कविता मी दिव्याला देण्याचे ठरवले.  आणि तिच्या एका मैत्रिणीमार्फत तिच्यापर्यंत पोचवल्या. त्या मैत्रिणीकडून दिल्याने मला भेटायला येण्यासाठी निरोप पाठवला.  'काय बोलेल? कशी वागेल? विचारांचे मनान काहूर माजले.  त्याच अवस्थेत तिला भेटायला गेलो.  मला पाहून म्हणाली, 'तुमच्याबद्दल मला कोणतेही आकर्षण नाही.  प्लीज, इथून पुढे मला त्रास देवू नका.असे म्हणून ती मला कवितांचे कागद परत करु लागली.  पण मी माझा राग आवरुन तिला बोललो, 'या मी तुझ्यासाठी केल्या आहेत.  त्यांचे वाट्टेल ते कर.अशाप्रकारे माझी दिव्याशी पहिली बोलणी झाली.  त्यावेळी मला वाटले 'हीच ती अनू का? की जिने मला तिच्या प्रेमाचा स्वीकार करण्यास भाग पाडले.पण यात बिचाऱ्या दिव्याचा काय दोष होतातिला मी आवडत नसेल तर मी का अट्‌टाहास धरावामीच अनू आणि दिव्या या दोन भिन्न स्वभावाच्या व्यक्तींची सरमिसळ करीत होतो.  हा माझाच दोष होता ना!  पण तो जात का नव्हता? का ? याचे उत्तर मलाही ठाऊक नव्हते.

            त्यावर्षी परीक्षेत जेमतेमच पास झालो.  मग मात्र दिव्याचा विचारही करण्याचे ठरविले.  अनूच्या आठवणींबरोबर स्वत: संपायचे मात्र इतरांना अजिबात दु:खी करायचे नाही, असंच ठरवलं.  त्याप्रमाणे दिव्याशी असणारे सर्व संबंध मी तोडले जे प्रत्यक्षात अस्तित्वातच नव्हते.  पण दिव्याला मात्र याची कल्पना आली नसावी.

            रक्षाबंधनाचा आदला दिवस ! दुसऱ्या दिवशी ताईकडे जायचे या विचाराने मन आनंदाच्या डोहात तरंगत होते.  एका मुलींच्या ग्रुपला पास करुन पुढे गेलो.  त्यांच्यात दिव्या असेल, हा विचारही माझ्या मनाला शिवला नाही.  मी माझ्या तंद्रीतच होतो.  तोच मागून 'महेश, एक मिनिट!' अशी हाक ऐकू आली. थांबून मागे पाहिले तर दिव्याच मला बोलावत होती, 'महेश, मी तुम्हाला उद्या राखी बांधणार आहे, दोन वाजता 'सिंगार हॉटेल' मध्ये या, नाहीतर मला तुमच्या हॉस्टेलवर यावं लागेल.तिचे हे अनपेक्षित उद्गार ऐकून मी काहीच बोललो नाही.  वितळवलेल्या लोखंडाचा तप्तरस कानात ओतावा तसे ते शब्द माझ्या कानावर पडले.  मी धडपडलो.  डोळयासमोर अंधारी आली.  त्याच अवस्थेत रुमवर गेलो आणि धाडकन कॉटवर अंग झोकून दिले.  अतिशय जडपणा जाणवत होता.  मघाचा ताईकडे जाण्याचा आनंद कुठल्या कुठे गेला.  मन विषण्ण झाले.  पुन्हा विचारात गुंग झालो.  काय करावे तेच उमजेना.  वेगळीच भीती मनात घर करुन राहिली होती.  काय होईल उद्या जिला मी माझ्या प्रियतम् अशा अनूचा अधिकार देणार होतो, ती माझ्या ताईच्या अधिकारावर अतिक्रमण करु पहात होती.  मला दिव्याचा तिरस्कार वाटू लागला.  जर ती मला भाऊ मानून राखी बांधणार होती तर ती तेव्हाच का बोलली नाही जेव्हा मी तिला माझ्या नावाने पहिले प्रेमपत्र पाठवले; तेव्हा का बोलली नाही जेव्हा तिला मी कविता दिल्या.  तेव्हा योग्य ती वेळ होती.  मी तिला समजून घेतले असते.  पण आता फार उशीर झाला होता.

            शेवटी ठरविले उद्या जर दिव्याने राखी बांधली तर बांधून घ्यायची, मग वाट्टेल ते होवो ! दीपकनेही जड मनाने तोच सल्ला दिला, म्हणाला, 'मित्रा, तुझे आता फायनल इअर आहे.  पुन्हा भेटाल भेटाल.  जाताना एकमेकांबद्दल काहीही कटू मनात राहू नये. जा मित्रा, घे बांधून राखी!  तुझ्या मनाच्या सहनशक्तीला माझेही बळ लाभू दे.मी धन्य झालो - कुठे हा मित्र आणि कुठे.....

            ताई मी जेव्हा तिच्याकडून राखी बांधून घेत होता, तेव्हा तिच्या चेहऱ्यावर कोणतातरी आसुरी आनंद ओसंडून वाहतोय की काय असेच मला भासत होते.  असं वाटत होतं की, आजूबाजूचे सर्वजण माझ्याकडे कुत्सितपणे पाहतायत.  ताई, तुझ्याकडून राखी बांधून घेताना जे समाधान लाभते ते तर मला लाभले नाहीच.  उलट मनाची उद्विग्नता वाढली.  वाटलं, 'अरे, ही मुलगी उद्या डॉक्टर होईल.  त्यासाठी पेशंटचं मानसशास्त्र समजून घेता यायला हवं.  पण ती जिथं माझं हदय जाणू शकली नाही तिथं इतरांचं काय पैसा मिळेल हो भरपूर पण मन: शांतीचं काय ?'  ते काही होवो इथून पुढे आपण आणि आपलं काम बस्स पप्पा आणि ताई यांना समाधानी ठेवण्यासाठीच आपलं आयुष्य वेचायचं.  मग वाट्टेल तो त्रास का सोसावा लागेना !

            मला कळून चुकलं की माझ्या अशा मन:स्थितीमध्ये मी कोणाही मुलीला सुख देऊ शकणार नाही.  तिच्याशी मनाने एकरुप होणं मला जमणारच नाही.  जीवनाचे सार्थक का केवळ लग्न करण्यातच आहे ते तर आपल्या प्रियजनांना प्रेम देण्यात आणि सुख देण्यात आहे.

            ताई, आज मी स्वत:च्या पायावर उभा राहून पैसा मिळवतोय.  दोन चार मुलींनी स्वत: मला प्रपोज् केले पण मी त्यांना स्पष्टच नकार दिला.

            म्हणून म्हणतोय ताई, याबाबतीत मला तू समजून घे.  माझ्या लग्नाचा विषय डोक्यातून काढून टाक.  मला तुमच्या समाधानातच सुख मानू द्या. आज तुला सर्व सांगितल्यांन मनावरचं ओझं कमी होऊन अगदी हलकं वाटतंय.'

 

(क्रमश:)

 

COGNIZANCE: All written creative material is the solemn property of “An Anup Jatratkar Multi-Media Production”. If anyone wanted to use it for his/her own personal purpose (i.e. short film, projects, blogs, articles, scripts, FB posts etc.) then, have to take proper permission from, Mr. Anup Jatratkar. If it will be found that, anyone involved in such activities without prior permission, then, we are able to take certain charge on him/her.  

Pen Image

Pen Index