Pen


PEN 29-5 : इतर १ : दीर्घकथा १ : दोष कुणाचा ? : लेखक-आलोक जत्राटकर प्रकरण सहा

'मुल्ला, तुम्ही बांधकाम सुरु ठेवा.  मी पण लगेचच तिकडं यायला निघतोय.  मी येईपर्यंत तुम्ही हॉस्पीटलमध्येच थांबा.मी फोन ठेवला.

            पुढं काय करावं? हा विचार मला सतावू लागला.  आता लगेच तार्‌इंना, प्रीतीला काही सांगण्यात काही अर्थ नव्हता.  प्रत्यक्ष मी त्याला पाहेपर्यंत तसं करणं हिताचं होतं.  नाही तर सर्वजण विनाकारण काळजीत पडतील. 

            मी पटकन् घरी आलो.  संगीताला परिस्थिती थोडक्यात विशद केली.  तिला नंतर प्रीतीकडे जाऊन सर्व सांगायला सांगितलं.  मी घरी फोन करीनंच असंही सांगितलं.

            .     .    .    .    .

 

            संध्याकाळी मी ठाण्याच्या हॉस्पीटलमध्ये पोचलो.  तिथे मुल्ला माझी वाटच पहात होता.  त्यानं सांगितलं की ऑपरेशन जरी केलं गेलं असलं तरी महेश अजून शुध्दीवर आला नव्हता.  एक हात, एक पाय फ्रॅक्चर झाला होता.  डोक्याला जोरात मार बसला होता.  रक्तस्त्राव झाल्याने त्याला रक्ताची बाटली जोडण्या आली होती.

            महेशला आय.सी.यु.मध्ये ठेवण्यात आले होते.  तिथे मी गेलो.  त्याचा तो किरकोळ देह मोठमोठया बैंडेजमध्ये गुंडाळून कॉटवर निपचित पडला होता.  कृत्रिम ऑक्सिजनचा पुरवठाही त्याला करण्यात येत होता.

            नंतर मी जाऊन डॉ.इंगळेंची भेट घेतली.  त्यांनीच मोठी रिस्क स्वीकारुन महेशचे ऑपरेशन केलेलं होते.  मी त्यांना माझा परिचय दिला आणि त्यांचे अगदी मनापासून आभार मानले.  मग डॉक्टर मला म्हणाले, 'मि.सुर्यवंशी, अहो कामगारांनी त्यांना इथे दाखल करण्यात थोडा जरी उशीर केला असता तर मात्र मी पेशंटची गॅरंटी देवू शकलो नसतो, नव्हे मी ही केस घेतलीच नसती.  पण डॉक्टरला पेशंटला वाचवण्याबद्दल एक टक्का जरी शक्यता वाटली तरी त्याने तिचा फायदा करुन घ्यायलाच हवा.  मि.पाटील यांच्याबाबत मला ती शक्यता जाणवली म्हणूनच मी तिचा पुरेपुर लाभ उठवला.  परिणाम तुमच्यासमोर आहे.'

'पण डॉक्टर, आता महेश अगदी धोक्याबाहेर आहे ना? म्हणजे काळजी करण्यासारखं तसं काही....'

'वेल्, तुम्ही एकदम तसंही म्हणू शकत नाही.  कारण त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झालेली आहे.  ती बरी होईपर्यंततरी त्यांच्या मनावर कोणताही ताण येऊ द्यायचा नाही.'

'डॉक्टर, एक विचारलं तर रागावणार नाही ना तुम्ही?'

'विचारा, अवश्य विचारा.'

'समजा, डॉक्टर उद्या मी महेशला पुण्यात नेऊन एखाद्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले तर चालणार नाही का? कारण तिथे त्याचे सर्व नातेवाईक आणि मित्रमंडळी असल्याने त्याची देखभाल आम्हाला व्यवस्थित करता येईल.  बरोबर ना!मी विचारलं.

'मि.सुर्यवंशी, सध्या पेशंट बेशुध्दावस्थेत आहे.  उद्या पहाटेपर्यंत तो जर शुध्दीवर आला तर त्याचे चेकअप करुन मी काय तो निर्णय देईन, चालेल ना?'

'होय डॉक्टर, थैंक यू!  मी आता घरी फोन करुन कळवतो.'

'ओ.के. गुड नाईट !'

'गुड नाईट, डॉक्टर, जरुर लागली तर बोलवीन तुम्हाला.'

             मग मी तिथून महेशच्या घरीच फोन लावला.  सुदैवाने संगीता अजून तिथेच होती.  तिनेच फोन उचलला, मी तिला सर्व वृत्तांत सांगितला आणि काळजी करण्यासारखे काही नसल्याचे सांगितले.  एवढयात प्रीतीने तिच्या हातून फोन काढून घेतला आणि मला विचारलं, 'भावोजी, कशी आहे महेशची तब्येतत्याला फार नाही ना लागलेलं?'  तिच्या बोलण्यातला कापरा मला स्पष्ट जाणवत होता.  मी मग मुद्दामच तिला जास्त काही सांगता इतकंच बोललो,

'वैनी, तुम्ही पहिल्यांदा स्वत:ला सांभाळा, तुम्ही ताईंचीही समजूत घालून त्यांना धीर द्या.  इकडे महेश अजून शुध्दीवर जरी आला नसला तरी आता तो आऊट ऑफ डेंजर आहे.  त्यामुळे अजिबात काळजी करु नका.  उद्या सकाळी तो शुध्दीवर आला की मी डॉक्टरांना विचारुन त्याला घेऊन पुण्याला येईन.  मग तुमच्याच हॉस्पीटलमध्ये त्याला एडमिट करु.  आता शांपणे विश्रांती घ्या.  गुड नाईट !'

            मी जरी प्रीतीला धीर दिला असला तरी माझ्या मनात मात्र नाना बरेवाईट विचार येत होते.  हे मनही फार विचित्र असतं.  शत्रूचंही कधी अहित पाहणारं पण आपल्या आप्तांबद्दल मात्र नेहमी ते वाईटच विचार करत असतं.

            रात्री नर्स महेशचा रिपोर्ट न्यायला आली.  तिनं तिथंच माझी व्यवस्था केली, मीच तिला सांगितलं तसं ! नर्सनं मला जेवणाबद्दल विचारलं पण माझी भूक केव्हाच उडून गेली होती.  मी तिला 'नको' म्हणून सांगितलं आणि 'आवश्यकता वाटल्यास हाक मारा' असं म्हणून निघून गेली.  नंतर दर दोन तासांनी येऊन ती रक्ताची बाटली बदलणार होती. 

            ती रात्र माझ्या आयुष्यातली सर्वांत मोठी रात्र होती.  प्रत्येक क्षण अगदी धीम्या पावलांनी पुढं सरकत होता.  ही रात्र कधी संपणारच नाही कायअसं मला वाटू लागलं होतं.  माझी अस्वस्थता क्षणाक्षणाला वाढत होती.  छातीत धडधड जोरात होत होती.  महेशच्या करुणामयी चेहऱ्यावरुन नजर हटत नव्हती.  त्याच्या छातीचा भाता अगदी हळूवारपणे खालीवर होत होता.  रात्रभर मी तिथे जागतच होतो.  पहाटे कधीतरी मला डुलकी लागली.

            नंतर महेशच्या तोंडून 'पाणी पाणी' अशा अस्पष्ट आवाजाने मला जाग आली.  मी धावतच डॉक्टरांकडे गेलो. 

'डॉक्टर, महेश शुध्दीवर आलाय, चला लवकर.

डॉक्टरही लगबगीने माझ्याबरोबर आले.  त्यांनी त्याचे पूर्ण चेकअप् केले. 

'थैंक गॉड' !  आता हा अगदी धोक्याबाहेर आहे.  तरीही तुम्ही त्याची काळजी घ्याच.  कोणताही स्ट्रेन यांना जाणवू देवू नका.  तुम्ही म्हटल्याप्रमाणे यांना घेऊन पुण्याला जाऊ शकता.

 

नंतर मी डिस्चार्ज घेतला.  डॉक्टरांचे पुन्हा एकदा आभार मानले.  माझ्या मित्राला मृत्युच्या दाढेतून त्यांनी वाचवलं होतं.  हॉस्पिटलच्या म्ब्युलन्समध्ये मग महेशला घालून मी पुण्याचा रस्ता धरला.  अजूनही तो गुंगीतच होता.  त्याला 'ससून' मध्ये दाखल करायचं होतं.

.     .    .    .    .

 

            आता महेश तसा नॉर्मल झाला होता.  डोक्याची जखम तशी भरत आलेली होती.  त्याला इथं दाखल केल्यापासून प्रीती त्याच्याजवळून जराही हलली नव्हती आणि ते स्वाभाविकच होतं.  तिचं त्याच्यावरचं प्रेम पाहून मी खरोखरच गहिवरलो.  महेशसुध्दा तिला आपली सेवा करताना पहात होता.  त्यालासुध्दा,

'आपण हिला किती त्रास दिला होता, पण तरीही तिचं आपल्यावरचं प्रेम जराही कमी झालेलं नाही'

हे असं वाटून अपराधीपणा वाटत होता.  तो मला तसं बोललाही पण,

'झालं गेलं, गंगेला मिळालं, आता तू भविष्याकडे बघ.असं मी त्याला म्हटलं होतं.  त्यानंही मला होकार दिला.

            महेशला बरं वाटू लागलं तेव्हा प्रीती किंवा ताईंना मी त्याच्याजवळ बसवून ऑफिसमध्ये जायचो आणि तिथल्या कारभारात लक्ष घालायचो कारण महेशनेच काही झालं तरी दिलेल्या मुदतीमध्ये आपलं काम पूर्ण झालं पाहिजे असं मला बजावलं होतं.

            एकदा मी ऑफिसमध्ये काम करत बसलो होतो.  तेव्हा फोन घणघणला.  मी रिसिव्हर उचलून कानाला लावला,

'हॅलो, मी महेश पाटलांचा मॅनेजर बोलतोय.'

'मी ठाण्याहून सुनिल शहा बोलतोय.'

हा सुनिल शहा म्हणजे त्या फाईव्ह स्टार हॉटेलचा मालक होता. 

'मी मुंबईला असल्यानं मला काही माहित नव्हतं, पण आज सकाळी आल्यावर माझ्या बायकोने मला घडलेली हकीकत सांगितली.  ऐकून वाईट वाटलं.  आता साहेबांची तब्येत ठीक आहे नापूर्ण विश्रांती घ्यायला सांगा.'

'आता साहेब ठीक आहेत.  तरीही डॉक्टरनी अजून निदान एक महिनातरी विश्रांती घ्यायला सांगितलंय.  आम्ही कबूल केल्याप्रमाणेच तुमचं काम दिलेल्या मुदतीत पूर्ण करु.  तिथं मुल्ला असले तरी मी अधूनमधून येत जाईनंच.  तुम्ही निश्चिंत रहा.असं म्हणून मी फोन ठेवला.  या बडया लोकांना माणसापेक्षा आपलं कामच जास्त महत्वाचं वाटतं म्हणून मी सुध्दा त्याच्याशी व्यावहारिक भाषेतच बोललो.

            आणि माझ्या डोक्यासमोर तो दिवस दिसू लागला, ज्या दिवशी मी महेशला ठाण्याहून पुण्याला आणून एडमिट केले होते.  ताईंना आणि प्रीतीला वेळेतच घरी पोहचवून मी महेशजवळ आलो.  अद्यापही तो बेशुध्दच होता.  भर दुपारची वेळ होती.  इतक्यात नर्स आली, म्हणाली,

'कुणीतरी मिसेस शहा नामक स्त्री बाहेर आलीय.  मी तिला पेशंटला भेटण्याची परवानगी नसल्याचं सांगितलं तरीही मग तिनं तुम्हाला भेटायला बोलावलंय’

मी तिला वेटिंगरुममध्ये आलो.  तिथं साधारण मध्यम वयाची स्त्री बसली होती.  रंग गव्हाळ होता.

 'नमस्कार, मी 'अनुराधा कन्स्ट्रक्शन कंपनी' चा मॅनेजर, लक्ष्मण सुर्यवंशी.  आपण?'

'मी सुनिल शहांची पत्नी.  ‘त्या’ फाइव्ह स्टार हॉटेलचे ते मालक आहेत.  सध्या ते कामानिमित्त मुंबईला गेलेत.  मला रात्री या दुर्घटनेबद्दल समजलं.  आज सकाळी मी 'पाटील हॉस्पिटल' मध्ये जाऊन विचारलं तर तुम्ही साहेबांना इकडं घेऊन आल्याचं समजलं.  म्हणून मी इकडे आले.  कसे आहेत आता ते? डॉक्टर काय म्हणतात?'

'अजूनतरी साहेब शुध्दीवर आलेले नाहीत आणि डॉक्टरही त्यांच्या दृष्टीने शक्त ते सर्व प्रयत्न करीत आहेत.

'प्लीज, मी त्यांना एकदा पहाते कारण ते शुध्दीवर येईपर्यंत मी इथे थांबू शकत नाही.  घरी काही सांगता मी बाहेर आलेय.  सर्वजण काळजीत असतील.'

'ओ.के., चला.असं म्हणून मी तिला दुरुनच त्याला पाहू दिलं.  ती त्याच्याकडे पहातच राहिली.  पाहता-पाहता तिच्या डोळयात अश्रू उभे राहिले अन् खळकन् तिच्या गालावरुन खाली ओंघळले.  मला काही कळायला मार्ग नव्हता. कारण एखाद्या अनोळखी माणसाला आजारी पाहून आपल्याला दु:ख होते.  पण डोळयात पाणी नक्कीच उभे रहात नाही.  बऱ्याच वेळाने ती जेव्हा मागे वळून जायला निघाली, तेव्हा मी तिला माझ्याबरोबर पाच मिनिटांसाठी वेटिंग रुममध्ये यायला सांगितलं.  मी तिला म्हटलं,

'मिसेस शहा, जरा तुम्हाला वाईट वाटणार नसेल तर एक विचारु?'

'हो, विचारा.'

'तुम्ही मघाशी आमच्या साहेबांना पाहिलंत.  पण त्यांना बघताना तुमच्या डोळयात पाणी का आलं, सांगता?'

'हो, काही जुन्या पण कटू आठवणी मनात जागृत झाल्या.  तुमचे साहेब आणि माझ्या कॉलेज जीवनातील एका वेगळया व्यक्तिमत्वाच्या मनुष्याच्या चेहऱ्यात बरंच साम्य आहे, त्याचीच मला तीव्रतेने आठवण झालीय.  बाय वे तुमच्या साहेबांचे नांव सांगाल?'

'महेश पाटील.'

नांव ऐकून मिसेस शहांना एकदम रडूच कोसळलं.  त्या स्वत:शीच बोलू लागल्या. 

'काय हे महेश, मी तुला पूर्वी कुठंकुठं नाही शोधलं.  मला तुझी माफी मागायची होती.  पण ती संधी तू मला मिळूच दिली नाहीस आणि आज दिसलास तोही या अवस्थेत? काय ते माझं दुर्देव!

मग तिनंच स्वत:ला सावरलं.  माझ्या मनात तिच्याबद्दल अनेक विचार आले. 

'हिनं, महेशची माफी मागावी, असा काय गुन्हा केला असेल?

(क्रमश:)

 

COGNIZANCE: All written creative material is the solemn property of “An Anup Jatratkar Multi-Media Production”. If anyone wanted to use it for his/her own personal purpose (i.e. short film, projects, blogs, articles, scripts, FB posts etc.) then, have to take proper permission from, Mr. Anup Jatratkar. If it will be found that, anyone involved in such activities without prior permission, then, we are able to take certain charge on him/her.  

Pen Image

Pen Index