Pen


PEN 29-6 : इतर १ : दीर्घकथा १ : दोष कुणाचा ? : प्रकरण सात : आलोक जत्राटकर

महेशच्या आयुष्यात स्त्रिया तरी होत्याच कुठेहोत्या त्या ताई, प्रीती, अनुराधा आणि दिव्या.  हो असली तर ही दिव्याच असणार होती.  पण तिला महेशची माफी माघण्याची वेळ का यावी ?   तिनं स्वत:च्या मनानंच त्याला नकार देऊन ठोकारलं होतं.मी तिला पुढं होऊन विचारलं, 'तु...तुम्ही दिव्या अगरवाल तर नव्हेत.'

'हो, मीच ती!माझ्या चेहऱ्यावर तिरस्काराची हलकीशी छटा उमटली.  पण तीही दिव्याच्या नजरेतून सुटली नाही.  ती विषादानेच मला म्हणाली, 'ज्याअर्थी तुमच्या चेहऱ्यावर माझ्याबद्दल तिरस्कार दिसतोय त्याअर्थी महेशनं तुम्हाला त्याच्या दृष्टीकोनातून माझी प्रतिमा तुमच्यासमोर उभी केली असणार आणि तुमच्या दृष्टीने मीही तशीच असणार.  पण वस्तुस्थिती तशी नाहीय.  या प्रकरणाची दुसरी बाजू मी अजून कोणासमोरही मांडलेली नाही.  कारण तसं मला कोणी भेटलंच नाही.  आज आता तुम्हाला एक बाजू माहितंच आहे.  त्यामुळे माझी बाजू ऐकून तुम्हीच काय तो न्याय द्या.'

माझं डोकंच सरकलं, 'माझ्या मित्राचं आयुष्य बरबाद करुन वर माझ्याकडेच न्याय मागताना हिला काहीच कसं वाटत नसावं.मी तिला म्हटलं, 'अशी काय बाजू मांडणार आहात तुम्ही?   महेशचं सारं जीवन फ्रस्टेड करुन टाकलंत.  आज ही त्याची जी स्थिती झालीय त्याला तुम्हीच कारणीभूत आहात.  केवळ तुम्ही.'

'पण त्यावेळी माझी काय अवस्था होती.  तुम्हाला ठाऊक आहे? नाही.  म्हणूनच तुम्हाला मी जे सांगत्येय ते इच्छा नसतानाही ऐकून घ्यावंच लागेल.एव्हाना मी सुध्दा भानावर आलो.  एका परस्त्रीशी बोलतो आहोत याची मला जाणीव झाली.  मित्रप्रेमामुळे मी अंध बनलो होतो.  मी तिला परवानगी दिली, 'ठीक आहे.  असं काय घडलं की तुम्ही महेशला ठोकरलंत?'

'मला परवानगी दिल्याबद्दल थैंक्यू तुम्हाला माझी पार्श्वभूमी सांगते म्हणजे एकूण सर्व परिस्थिती तुमच्या ध्यानी येईल.'

मी तशी एका श्रीमंत कुटुंबातीलच वडिलांची सांगली-मिरज भागात पाच हॉटेल्स् आहेत.  आणखीही वाढवतायत.  ते तसे अतिशय विक्षिप्त आणि तापट आहेत.  मी सहा वर्षांची असताना आईचं आणि त्यांचं भांडण झालं.  इतकं विकोपाला गेलं की अखेर त्यांनी डायव्होर्स घेतला.  ते भांडण का झालं हे मला समजलं नाही पण मी डॅडींकडे रहावं अशी कोर्ट ऑर्डर होती.  आईनं जाताना मला प्रेमानं जवळ घेऊन पप्पी घेतली आणि सांगितलं, 'बेटा, मी काय सांगत्येय ते लक्षपूर्वक ऐक अन् लक्षात ठेव.  आता जरी तुला माझं म्हणणं समजलं नाही तरी नंतर कळून येईल.  तुझे डॅडी तुला सर्व सुखं देतील.  पण ती पिंजऱ्यातल्या पोपटाला दिल्याप्रमाणे असतील.  तू नेहमी डॅडींच्या कक्षेबाहेर राहून स्वत:चं विश्व तयार कर.  त्यात मन रमव.  तेव्हाच तुला आयुष्याचा खरा आनंद प्राप्त होईल.  पण याचा अर्थ असा नाही की डॅडीनी सांगितलेलं काहीच ऐकायचं नाही.  ते जे सांगतील ते त्यांच्या दृष्टीने तुझ्या भल्याचंच असेल.  त्यांनी सांगितलेल्या गोष्टीवर पूर्ण विचार करुन मगच तू योग्य ते पाऊल टाकायला हवंस.  त्यांनाही तुझ्याशिवाय कोणीच नाही.  शक्य तेवढी त्यांची काळजी घे.  आता मी तुझ्यापासून दूर जात्येय कदाचित परत कधीच येणार नाही.  तेव्हा माझं एवढं बोलणं तू लक्षात ठेवावंस.  असंच मला वाटतंय.  बाय् बेटी!खरंच किती विचारी होती माझी आई पण तिनं डॅडीपासून दूर जाण्याचा कठोर निर्णय का घ्यावा हेच मला समजत नव्हतं.  नंतर आजपर्यंत मला आई कधीच भेटली नाही, मला ती हवी असूनसुध्दा !

आईनं म्हटल्याप्रमाणं डॅडी मला कशाचीही कमतरता भासू देत नव्हते.  कपडालत्ता, खेळणी, सर्व काही मागेल तेव्हा.  पण हे सर्व घराच्या चार भिंतींच्या आतच.  बाहेर गेले तर त्यांच्यासोबतच कारमधून.  माझ्या मित्र-मैत्रिणींना बागेत वगैरे खेळताना बघून मला खूप दु:ख व्हायचं, हेवा वाटायचा.  मी डॅडींना तसं सांगितलंही.  त्यांच्या तोंडून 'नाही' असं ऐकल्यावर मात्र पुढं बोलायचं धाडस काही मला होत नसायचं.

अशाच दडपणाच्या वातावरणात माझं शिक्षण सुरु होतं.  मैत्रिणी झाल्या होत्या.  पण त्या केवळ शाळेपुरत्या मर्यादित होत्या.  शाळा सुटायच्या वेळेला डॅडी गाडी घेऊन यायचे किंवा ड्रायव्हरला पाठवायचे.  एकदा ड्रायव्हर आला असताना त्याला चुकवून मी मैत्रिणींबरोबर खेळत राहिले.  त्यावेळी मला अतिशय आनंद मिळाला.  पण अखेर त्यानं मला पकडलंच आणि अक्षरश: फरफटत नेऊन गाडीत टाकलं.  जेव्हा घरी आले, तेव्हा ड्रायव्हरनं डॅडींना सर्वकाही सांगितलं.  डॅडींनी त्यादिवशी मला एकच जोरदार मुस्काटात भडकावली.  मी कळवळून कोलमडून पडले.  पण डॅडी माझ्याकडं पाहताच निघून गेले, जाताना म्हणाले, 'असला तुझा फाजील लाड पुरवायला मी तुझी आई नाही, बाप आहे, समजलीस.  असा आगाऊपणा परत केलास तर याद राख.त्यानंतर मात्र मी डॅडी सांगतील तेच करु लागले.  जणू ते माझ्या अंगवळणीच पडलं.  सेल्फ डिसिजन मी घेऊच शकत नव्हते.  प्रत्येक निर्णयासाठी डॅडींचीच परवानगी घेत असे.  आता मला आईच्या बोलण्यातलं सत्य कळत होतं.  पण वळत नव्हतं.  मी खरोखरचं सोन्याच्या पिंजऱ्यातली कैदी बनले होते आणि इच्छा असूनही त्याच्याबाहेर पडण्याचा मार्ग शोधण्याची माझी हिंमत होत नव्हती.  मी फार दुबळी बनले होते.

माझ्या भीतीत भर घालणारी आणखी एक अशीच खबर मला पुढे समजली.  ती अशी की मी लहान असताना एका स्मगलिंगच्या केसमध्ये माझ्या डॅडींचं नांव होतं.  अशा अनेक प्रकारात त्यांचा हात असल्याचं बोलं जायचं.  त्यामुळं लोक त्यांना घाबरुनच असायचे.  पण पुराव्याअभावी कोणी त्यांच्या केसालाही धक्का लावू शकत नव्हते.  याच कारणावरुन आईचं आणि डॅडींच भांडण झालेलं होतं.  हे एेकून तर डॅडींबद्दल मनात अतिशय भीती निर्माण झाली.  पण मी त्यांना काहीच बोलू शकत नव्हते.

अशा वातावरणात माझं मेडिकल कॉलेजचं पहिलं वर्ष सुरु झालं.  घर तसं अगदी कॉलेजजवळच होतं.  त्यामुळं मी चालतच जायला लागले.  पण डॅडींनी माझ्या नकळत त्यांची माणसं माझ्यावर नजर ठेवायला पेरुन ठेवली होती.  आई-सारखाच बंडखोरपणा अगदी सुप्तपणे माझ्यात लपलाय याची डॅडींना जाणीव झाली असावी.

            एक दिवस मला कॉलेजवर एक पत्र मिळालं, माझं नांव असलेलं.  मी वाचलं, पाठवणाऱ्यानं त्यात त्यांच नाव लिहीलं नव्हतं, पण त्या पत्रात त्यानं त्याचं माझ्यावर खूप प्रेम असल्याचं म्हटलं होतं.  आणि एक वेगळीच विनंती केली होती, ती अशी की मी मानेपर्यंत कापलेले केस वाढवून त्यांची वेणी घालावी.

             प्रेम! या शब्दालाच मी पारखी झाली होते, ज्या दिवशी आई मला सोडून गेली होती.  डॅडींनी तर शब्दाचा वेगळाच अर्थ लावला होता.  'मुलीला आपल्या धाकात ठेवणं हेच प्रेम' अशीच त्यांची धारणा असावी. माझ्या सोबत शिकणाऱ्या मुलांना मी कसल्या बापाची मुलगी आहे हे ठाऊक असल्याने ते माझ्याकडे पहायचंही टाळत.  जाणो तिनं आपल्या बापाला सांगितलं तरअशी त्यांना भीती वाटत असावी.  अशा परिस्थितीत त्या पत्रलेखकाच्या धाडसाचं मला कौतुक वाटलं आणि त्याची ती किरकोळ इच्छा मी पूर्ण करायचं ठरवलं. मी केस वाढवून त्यांची वेणी घालू लागले.  त्यामुळे मी पूर्वीपेक्षाही सुंदर किंवा आकर्षक दिसत्येय अशी माझी मलाच जाणीव झाली.

            आणि त्याचं दुसरं पत्रही मला कॉलेजवर मिळालं.  त्यात त्यानं मी त्याच्या इच्छेला मान दिल्याबद्दल आभार मानले होते.  या पत्रात त्यानं आपली माहिती कळवली होती.  त्याचं नाव महेश पाटील होतं.  सिव्हील इंजिनिअरींगच्या थर्ड इयरला होता तो.  नंतर एका मैत्रिणीमार्फत तो राहतो कोठे वगैरे किरकोळ माहिती मी गोळा केली.  तो हॉस्टेलवरच रहायचा.  मी नंतर एकदा त्याला पाहिलं.  माझ्या मैत्रिणीनंच मला तो दाखवला.  अगदीच भरदार शरीरयष्टीचा नसला तरी आकर्षक मात्र होता तो.  तसेच, चेहऱ्यावर काही वेगळेच असे तेज असावेसे वाटत होते.  मला तो आवडला.  'का बरं मी त्याला होकार देऊ नये?'  मनातच मी विचार करीत होते.  आणि दररोज काही ना काही कारणाने त्याच्या समोरुन जाऊन त्याला डोळे भरुन पहायची.  तोही तितक्याच उतावीळपणे माझ्याकडे पहायचा.  पण मला त्याच्याशी बोलायचं मात्र धाडस होत नव्हतं डॅडींना समजलं तर....?

            माझी ही भीती केवळ पोकळ नव्हती. कारण डॅडींना यापूर्वीच त्यांच्या माणसांकडून सर्व माहिती समजली होती, पण त्यांची, कदाचित माझ्याकडूनच सर्व प्रकार समजावा, अशी इच्छा असावी.

            यानंतरही महेशची मला पत्र यायची.  त्यात त्यानं त्याच्या प्रेमाचा पुनरुच्चार केला होता.  मी ती सर्व पत्रं माझ्या ड्रॉवरमध्ये जपून ठेवली होती.  एक दिवस मी कॉलेजमधून घरी आले तर समोरच डॅडी ती पत्रे हातात घेऊन उभी होते, ती पाहताच माझ्या काळजाचा ठोका चुकला.  माझ्या डोळयातून घळाघळा पाणी वाहू लागलं, 'सॉरी डॅडी' एवढंच मी कसंबसं बोलून तडक माझ्या खोलीत गेले.  मला अतिशय वाईट वाटलं, पण मी काय करु शकत होते?

            तेवढयात डॅडींनी त्यांच्या एका नोकराला बोलावून सांगितलं, 'हया पाटलाकडं जा आणि काय म्हणतो ते जरा विचारुन ये.'

            माझ्या छातीत जोरजोरात धडधडू लागलं.  आता हे लोक महेशचं काय करणार होते कोण जाणेमाझ्यामुळंच तो या संकटात सापडला होता.  पण महेशने या लोकांना आपल्या चतुराईनं परत पाठवलं होतं.  म्हणे 'तिला आवडत नसेल तर कधीही तिच्या वाटेला जाणार नाही.पण मला तर तो आवडत होताच.

            नंतर एकदा कॉलेजमध्ये माझी मैत्रिण पळत आली, तिनं माझ्या हातात एक कागद दिला 'महेशनं दिलाय' असं म्हणाली.  मी तो उघडून पाहिला तर त्यावर एकापेक्षा एक अशा सुंदर कविता होत्या.  महेशने त्या माझ्यासाठी केल्या होत्या.  माझा आनंद गगनात मावेना.  पण लगेच मी ताळयावर आले.  माझ्या अवतीभवती डॅडींची माणसं असतात याची मला जाणीव झाली.  मी कोणताही धोका पत्करायला तयार नव्हते.  मी मैत्रिणीकडूनच महेशला बोलावणं पाठवलं.  तो येईपर्यंत मी त्याने पाठवला होता,  त्याच प्रकारच्या कागदावर माझ्या त्याच्याबद्दलच्या भावना, त्याच्या माझ्या मार्गातील अडथळे याचं थोडक्यात वर्णन केलं होतं.  तेवढयात तो आला.  क्षणभर मला काय करावं कळेना.  पण पुढच्याच क्षणी मी सावध होऊन त्याला म्हटलं, 'मला तुमच्याबद्दल कोणतंही आकर्षण नाही.  मला इथून पुढं त्रास देऊ नका.आणि मी माझ्या हातातला 'तो' कागद त्याला देऊ केला.  पण त्यानंही तितक्याच जोरात उत्तर दिलं, 'या कविता मी तुझ्यासाठी केल्यात.  त्याचं वाटेल ते कर.एवढं बोलून तो निघूनच गेला.  माझ्या हातची एक संधी गेली होती.  आम्ही दोघांनी जास्त वेळ एकत्र थांबणंही धोक्याचंच होतं, पण त्याचं रागावणंही स्वाभाविकच होतं.  असं त्याचे नि माझं पहिलं बोलणं.

            त्यानंतर मात्र महेश कधीच माझ्यासमोर आला नाही.  मी लांब दिसले की तो मला चुकवून जायचा.  मला फार वाईट वाटायचं.  पण इलाज नव्हता.  त्याच्या आठवणींत मी होरपळत होते.  आमच्या दोघांमध्ये गैरसमजाची मोठी दरीच होती.  ती मिटवण्याची संधीच महेश मला देत नव्हता.  ते वर्ष तसंच संपलं.  मी सेकंड इयरला आणि महेश लास्ट इयरला गेला.

            रक्षाबंधनाच्या आदल्या दिवशी सकाळी डॅडींनी मला हाक मारली आणि सांगितलं, 'आज त्या पाटलाच्या काटर्याला सांग की तू उद्या त्याला राखी बांधणार आहेस म्हणून! आपल्या 'सिंगार' मध्येच बोलंव नाहीतर तूच त्याच्या हॉस्टेलवर येशील असंही सांग.'

            'डॅडी', माझ्या तोंडून अस्फुट किंकाळीच बाहेर पडली.  आजवर मी सर्व सहन केलं होतं पण हे माझ्या सहनशक्तीबाहेरचं होतं. 'डॅडी', तुम्ही काही केलंत तरी चालेल पण मी महेशला राखी बांधणार नाही.  मी.. मी..माझं प्रेम आहे त्याच्यावर.  तुम्ही माझा जीव घेतला तरी चालेल पण मी हे काम करणार नाही.  मला ते कदापि जमणार नाही.आज असं कोणतं बळ अंगात संचारलं होतं कोण जोण, पण डॅडींसमोर तोंडातून 'ब्र'ही काढणाऱ्या मला हे असहय होऊन त्यांच्यावरचा रागच माझ्या तोंडून बाहेर पडत होता.  पण डॅडी मात्र हसत उभे होते, म्हणाले, 'बेटा, तुला काय वाटलं, मी माझ्या पोटच्या पोरीला मारीन.  छे! जर तू त्याला राखी बांधली नाहीस तर मात्र आपल्या प्राणाला मुकावं लागेल - तुला नव्हे - त्या पाटलाला.  तुझं प्रेम आहे ना त्याच्यावर.  मग त्याच्या जीवनमरणाचा प्रश्न मी आता तुझ्याच हातात सोपवतोय.  काय करायचं ते बघ.माझ्या वडिलांची ती क्रुरता पाहून मी मनोमन घायाळ झाले.  पण त्यांनी माझ्या असहाय्यतेचा अचूक फायदा घेतला होता.  मला महेश तर हवा होता.  त्याच्यापेक्षा या क्षणाला त्याचा जीव मोलाचा होता.  मी त्याच्या जवळ जाऊन त्याला मारण्यापेक्षा, दूर राहून त्याचा जीवच वाचवावा.  मी लांब गेले तरी तो जीवंत आहे, हीच एक सुखाची भावना राहणार होती.  मग मी डॅडींना होकार दिला.  त्याला हॉटेलमध्ये बोलावून राखी बांधली.  माझ्याबद्दलच्या तिरस्काराची आणि भयानक दु:खाची छटा त्याच्या नजरेत दिसत होती.  माझ्या या वृत्तीनं तोही आज मला दुरावला होता.  पण त्याच्यासाठीच मला हे सगळं करावंच लागणार होतं.  त्यासाठी मी माझ्या प्रेमाला तिलांजली दिली होती.  मी महेशला हे सर्व सांगूही शकत नव्हते.

            त्यानंतर डॅडींनी मला आणि त्याला एकदाही भेटू दिले नाही.  इतकंच काय पण माझं कॉलेजही बंद केलं.  महेश बी.ई. होऊन तिथून निघून गेल्याचंही समजलं.  एका निष्पाप माणसाची मी अपराधी होते.  हीच भावना आजपर्यंत मला सतावतेय.

            डॅडींनी मग माझं लग्न ठाण्यातील एका राजकीय पुढाऱ्याच्या मुलाशी ठरवलं.  लग्न कसलं सौदाच तो ! सासऱ्यांनी माझ्या वडलानां निवडणुकीचं तिकीट मिळवून द्यायचं अन् मोबदल्यात माझ्या वडलांनी जावयाला फाइव्ह स्टार हॉटेल बांधण्यासाठी भांडवल पुरवायचं, असा तो सौदा होता.  अखेर माझं लग्न झालं.  अर्थातच सुनील शहाशी.  माझा नवरा अतिशय खुशालचेंडू आहे.  बापाच्या पैशवर मजा मारतोय आणि आता सासऱ्याच्या जीवावर हॉटेल बांधतोय.  मला या सर्वांचा फार तिटकारा आलाय.  आता तुम्हीच सांगा या सर्व बाबतीत माझा काय दोष आहेमी जे केलं त्यात काही गैर होतं काआता तुम्ही मला काही म्हणालात तरी चालेल.  माझ्या अपराधाबद्दल मला काहीही शिक्षा द्या.  मी ती आनंदानं भोगायला तयार आहे.'

            दिव्यानं तिचं बोलणं संपवलं.  मी अगदी शांत राहून तिचं बोलणं ऐकत होतो.  ती जे सांगत होती त्यात जराही काही खोटं नव्हतं असं तिचा चेहरा मला सांगत होता.  मनुष्य तोंडानं कितीही खोटं बोलत असला तरी चेहरा कधीच खोटं बोलत नाही.  एखाद्या मुरब्बी कलावंतालाच हे साध्य होतं.  दिव्याची बाजू ऐकून माझी स्थिती मात्र अगदी दोलायमान झाली.  काय निर्णय द्यावा हे मला उमजेना.  पण मन घट्ट करुन मी तिला सांगितलं.  'तुम्हाला प्रायश्चित्तच करायचंय ना !  तर मग मी सांगतो ते लक्षपूर्वक ऐका.  इथून पुढं तुम्ही कधीही महेशला भेटायचा प्रयत्न करु नका.  महत्प्रयासानं तो तुम्हाला विसरला आहे, नव्हे आम्ही त्याला भाग पाडलं आहे.  प्रीतीच्या प्रेमानं ते साध्य झालं आहे.  तो आता बरा झाला की प्रीतीशी लग्न करणार आहे.  तुम्ही पुन्हा त्याच्यासमोर गेलात तर जुन्या आठवणी त्याला अस्वस्थ करुन सोडतील.  प्लीज माझं एवढंच म्हणणे तुम्ही मान्य करा.  साईटवर देखील जास्त येत जाऊ नका.  बस्स ! तुमच्या महेशसाठी तुम्ही एवढंच करा.'

            'ठीक आहे, मी नाही भेटणार महेशला.  आणि आता बेळ निघुन गेल्यावर भेटून तरी काय उपयोग?'  बरं 'नाही-नाही' म्हणून मला बराच उशीर झाला.  मी येते.  महेशची काळजी घ्या.  घरी फोननं त्याच्याविषयी कळवत चला.  माझं मन लागणार नाही.  फक्त तो बरा व्हावा.  बाकी मला काही नको.  येते मी.'

            'थांबा, मीही कारपर्यंत तुम्हाला सोडायला येतो.असे म्हणून मीही दिव्याबरोबर चालू लागलो.  तोच दवाखान्याच दरवाजातून प्रीती माझ्यासाठी जेवण घेऊन येत होती.  संगीता मुलांजवळ होती ना !

            'हया मिसेस शहा' मी प्रीतीला त्यांची ओळख करुन दिली.  'आणि ही प्रीती, माझी वहिनी.  आपल्या महेशची होणारी पत्नी.यावर दिव्या प्रीतीजवळ गेली.  प्रेमानं तिच्या खांद्यावर तिनं हात ठेवला.  म्हणाली, 'स्वत:ची आबाळ होऊ देता महेशची काळजी घे.  तू खरोखरच भाग्यवान आहेस की तुला इतका चांगला पती मिळतोय.  तुमच्या भावी जीवनाला माझ्या शुभेच्छा ! येते मी.'

            आणि कारमध्ये बसून ती निघून गेली.  माझ्या मनात एक आदराचं स्थान मिळवून.  पण ज्याला हे खरं म्हणजे समजायला हवं होतं, त्याला मी हे कधीच कळू देणार नव्हतो.  आजचा हा प्रसंग माझ्या हृदयात अगदी खोलवर मी दफन करणार होतो.  काही झालं तरी त्याला बाहेर पडू देणार नव्हतो.  फक्त एवढंच बोलणार होतो की, 'फाइव्ह स्टार हॉटेलच्या मालकाची पत्नी महेशला पाहण्यासाठी आली होती !  बस्सं यापलिकडे दुसरं काहीच मला माहित नव्हतं.'

(क्रमश:)

 

COGNIZANCE: All written creative material is the solemn property of “An Anup Jatratkar Multi-Media Production”. If anyone wanted to use it for his/her own personal purpose (i.e. short film, projects, blogs, articles, scripts, FB posts etc.) then, have to take proper permission from, Mr. Anup Jatratkar. If it will be found that, anyone involved in such activities without prior permission, then, we are able to take certain charge on him/her.  

Pen Image

Pen Index