Pen


PEN 29-7 : इतर १ : दीर्घकथा १ : दोष कुणाचा ? : प्रकरण आठ : आलोक जत्राटकर

 

त्या दिवशी महेश सकाळपासून उत्साही वाटत होता.  त्याला तसं पाहून मलाही बरं वाटत होतं.  महेशनं मला जवळ बोलावून सांगितलं,

'मी आज डॉ.जाधवांना बोलावलंय म्हणून सांग.  शक्य तितक्या लवकर आले तर बरं होईल.हे डॉ.जाधव म्हणजे आमच्या कंपनीचे खाजगी सल्लागार होते.  मी त्यांच्याशी फोनवरुन संपर्क साधला आणि ताबडतोब हॉस्पिटलमध्ये यायला सांगितलं.

            थोडया वेळातच जाधव आपल्या ब्रीफकेससह दवाखान्यात आले.  वकील लोकं जिथं जातीत तिथं आपली ब्रीफकेस सोबत नेतातच,  हे माझं पर्सनल ऑब्झर्वेशन आहे.

महेशनं हसून त्यांच स्वागत केलं.  जाधवांनी तब्येतीची वगैरे चौकशी केली मग म्हणाले,

'आज सकाळी-सकाळीच साहेबांनी आठवण काढली.  काही विशेष?'

'वकीलसाहेब मी माझं मृत्युपत्र तयार करावं म्हणतो.

'पण महेश याची आताच काही गरज आहे कायू वील बी ऑल राईट हे बघ तुला काहीही झालेलं नाही.  हे मृत्युपत्राचं काय मध्येच काढलंय?' मी विचारलं.

'हे बघ लक्ष्या, आज सुदैवानं हातपाय आणि डोक्यावर निभावलं म्हणून आज मी इथं आहे.  दुर्दैवानं माझ्या जीवाचं काही बरं-वाईट झालं असतं तर?'

'पण आता तू ठीक आहेस नां?'

'आता ठीक आहे रे!  पण उद्या काही असंच घडलं तर मला कोणतीही रिस्क स्वीकारायची नाही.'

एखादा अपघात मनुष्याला किती खोलवर विचारात बुडवतो, याचंच साक्षात उदाहरण मी पहात होतो.  आणि मी त्याला तसं करण्यापासून परावृत्तही करु शकणार नव्हतो.

अखेर माधवांनी महेशच्या इच्छेनुसार त्याचं मृत्युपत्रं तयार केलं.  आपल्या संपत्तीची उत्तराधिकारी म्हणून त्यानं प्रीतीचं नांव लिहीलं.  तसेच, अमितचे उच्चशिक्षण पूर्ण होईपर्यंत कंपनीचा कार्यभार मी सांभाळायचा आणि अमितच्या शिक्षणानंतर पन्नास टक्के भागीदारीत कंपनी सांभाळायची.  असं हे थोडक्यात मृत्युपत्र होतं.  पण महेशनं माझ्यावर इतका विश्वास टाकावा.  यानं मी गहिवरलो.  प्रीतीवरचं त्याचं प्रेमही स्पष्टच झालं होतं.

महेशनं माझ्याकडून आणि माधवांकडून असं वचन घेतलं की, त्याच्या मृत्युपर्यंत आम्ही दोघांनीही याविषयी एक शब्दही बाहेर पडू द्यायचा नाही.  आणखी एक रहस्य मी माझ्या पोटात दडवलं.

आता महेश लवकरच बरा होऊन घरी येईल.  या आनंदात आम्ही सर्वजण होतो.  त्याच्या प्रकृतीत किरकोळ चढउतार होत असले तरी 'त्यान काही घाबरण्यासारखं नाही' असं डॉक्टरांचं म्हणणं होतं.  अधूनमधून त्याच्या डोक्यात भयंकर कळा येतात असं तो सांगायचा.  त्या थोडयाच वेळात येऊन जाणाऱ्या कळांनी तो घामेघूम व्हायचा.  डॉक्टरनी चेकअप केलं होतं पण अजून रिपोर्ट आला नव्हता. 

 एक दिवस महेश तापानं अतिशय फणफणला डॉक्टरांच्या ट्रीटमेंटला तो प्रतिसादही देईना.  आणि त्याच दिवशी त्याचा रिपोर्ट आला.  वरील सर्व लक्षणे ही 'ब्रेन-फेव्हर'ची होती.  डॉक्टर्स त्यांच्या परीने आटोकाट प्रयत्न करीत होते.  ठराविक कालावधीनं या आजाराची तीव्रता कमी होते, असं डॉक्टरांचं मत होतं.  पण तरीही आताचा महेशला होणारा त्रास मला पाहवत नव्हता.  एका आजारातून बरा होतोय तोवर हा दुसरा जणू त्याची वाटंच पहात होता.  म्हणजे त्या अपघातात महेशच्या डोक्यावर झालेला आघात हा अतिशय गंभीर होता.  बाहेरची जखम बरी होत आली असली तरी आतली जखम अजून बरी झाली नव्हती.

या सर्व प्रकारामुळे प्रीती फारच ढासळत चालली होती.  तिची फारच ओढाताण चालली होती.  मी जरी संगीताला तिच्या आणि ताईंच्या सोबतीला, मुलांची काळजी घ्यायला ठेवले होते, तरी त्यांच्या मनोवेदना ती काही कमी करु शकणार नव्हती.

पुन्हा एक दिवस सकाळी महेशला हुशारी वाटू लागली.  एव्हाना त्याच्या हातापायाची प्लॅस्टर्स काढण्यात आली होती.  उठून तो फ्रेश झाला.  आणि आज त्यानं प्रथमच दवाखान्याच्या आवारात फिरण्याची इच्छा प्रकट केली.  मी डॉक्टरांच्या परवानगीने त्याला घेऊन बाहेर आलो.  त्यानं लांबूनच प्रीतीला येताना पाहिलं, म्हणाला,

'प्रीतीनं म्हटलेला शब्द खरा केला.  शी वेटेड फॉर मी लौंग टाईम! आता मात्र मी तिला यापुढं काही त्रास पडू देणार नाही.  तिनं माझ्यासाठी जितका त्रास सोसलाय त्याची भरपाई किंवा परतफेड म्हणून मला तिला भरभरुन सुख द्यायचंय.

मीही त्याला पाठिंबा दिला.  तेवढयात प्रीती जवळ आली.  महेशला दरवाजात पाहून तिला बरं वाटलं.  तरीही तिनं हट्टानं त्याला बाहेर पडू देता आधार देत त्याच्या कॉटवर आणून झोपवलं.  महेश अगदी थोडंच जरी चालला असला तरी त्याचं श्रम त्याच्या शरीराला जाणवत होतं.  त्याच्या कपाळावर घर्भबिंदू जमा झाले होते.  ते प्रीतीनं तिच्या पदरानं टिपले.  महेश तिला म्हणाला,

'प्रीती, तुझ्या हातचं जेवण घेऊन फार दिवस झालेत.  आज तू माझ्यासाठी जेवण करुन घेऊन ये.  आणि घरी गेलीस की ताईला इकडं पाठव.  मला तिच्याशीही बोलायचंय.'

'ठीक आहे,' म्हणून प्रीती आनंदानं घरी परतली. 

प्रीती गेल्यावर मी एकटक महेशच्या चेहऱ्याकडं पहात राहिलो.  मला त्याच्याशी झालेली पहिली भेट आठवली.  अजूनही तो तसाच किरकोळ होता, आता अशक्तपणामुळे बिछान्यावर उठून दिसत नव्हता.  त्याच्या चेहऱ्यावर तसाच शांत भाव होता पण हास्य मात्र विरले होते.  अद्यापही त्याचा ताप चढउतार करीत होता.  पण तरीही तो माझ्याकडं बघून हसू लागला, म्हणाला,

'काय पाहतोस एवढं माझ्याकडं!'

'तुझ्या चेहऱ्यावरचा हा शांत भाव मनात साठवून ठेवतोय.'

'लक्ष्या, एक वचन दे.त्याच्या बदललेल्या स्वरामुळं मला क्षणभर भीती वाटली.  तो पुढे बोलू लागला, 'मला तुझ्याबद्दल खात्री आहे कारण माझ्या जवळचा तू एकमेव मित्र आहेस.  तू माझ्या प्रीतीची, मुलांची, ताईची सर्वांची काळजी घे.  तुला आठवतं तू जेव्हा माझ्या खोलीत राहण्यासाठी आला होतास...'

'हो, आणि तू मला 'माफ करा' म्हटल्यावर मी मूर्खासारखा परत जाताना तू केवढया मोठयाने हसला होतास.मी महेशला सांगितलं, कारण मला आठवायची गरजच नव्हती. 

त्याच्या सोबतचा प्रत्येक क्षण माझ्या मनात अजून ताजातवाना होता.  या प्रसंगाची आठवण होऊन महेश पुन्हा तसाच हसला, खळखळून हसता हसता त्याला ठसक्याची उबळ आली.  मी डॉक्टरांना बोलावण्यासाठी उठणार तोच माझा हात त्यानं गच्च धरला, ठसका आवरुन धरत तो म्हणाला,

'लक्ष्या, कुणीतरी आठवण काढली की ठसका लागतो म्हणतात.  अनू तर आठवण काढीत नसेल ना रेकी दिव्या? छे!  ती काय आठवण काढणारखोऱ्यानं पैसा ओढण्यात गुंतली असेल.

दिव्याचं नाव काढताच माझ्या मनात एक बारीकशी कळ उठली.  पण मी तिला चेहऱ्यावर येऊ दिलं नाही.  महेश बोलतंच होता,

'मित्रा आजही मला अनूची आठवण येतेय रे ! फार वर्षे झाली तिला भेटून.एवढया बोलण्यामुळं महेशला जोराची धाप लागली होती.  तितक्यात ताईही तिथं आल्या.  त्यांनी महेशची ती अवस्था पाहिली.  तो फारच दमलेला दिसू लागला होता, ताई त्याच्याजवळ आल्या, त्यांना पाहून महेश म्हणाला,

'आलीस ताई, मला तुझ्याशी खूप बोलायचंय! ताई मी तुझ्या मांडीवर डोकं ठेवतो.'

'महेश आता तू तोंडातून एक शब्दही काढता शांतपणे पड.  आपण नंतर सावकाश बोलत बसू.असं म्हणून त्याच्याजवळ बसल्या.  मी महेशचं मस्तक उलूनन त्यांच्या मांडीवर ठेवलं.  त्याचा माधा अगदी भाजत होता.  तार्‌इंच्या मांडीवर डोकं ठेवताच महेशला डोक्यात एक कळ आली, 'आई गं' असं म्हणून तो बेशुध्द पडला.  मी डॉक्टरना बोलावलं.  त्यांनी महेशला एक इंजेक्शन दिलं.

महेश कोमात गेला होता.  त्याच्या ओठांची हालचाल मला जाणवली, मी लक्ष देऊन ऐकू लागलो, तो काहीतरी असंबंध्द बडबडत होता.

'अरे... ताई इतक्या...घाईत कुठे जातेय?.....आणि तिच्या .....तिच्या हातात काय आहे ते?.... हो ..... राखी आहे तर... लक्ष्याला बांधणार वाटतं...मलाही बांध बरं....अरे पण...ही दुसरी कोण येतेय?....आणि .....ताईच्या हातातल्या....राखीला का ओढतेय?.....अरेच्या ही दिव्याच की! ....पण दोघींच्या भांडणात.....राखी मात्र तुटली.....दोघी कशा पडल्या बघा....तुटलेल्या राखीतून....ही कोण आली?.....सोबत दोन....छोटी छोटी मुलं पण आहेत.....ही ती प्रीती....जिच्यातून....मूर्तीमंत प्रीतीचा झराच वाहतोय....पण....पण मला अनू कुठे दिसत नाही....अगं लबाडे.....इतक्या लांब ......क्षितिजावर उभी आहेस होय....पण मी.....मी तुला पकडणारच.....अगं जरा हळू पळ ना.....बघ मला किती धाप लागीय ते.....ए.... आता मात्र पुरे हे चेष्टा....मी इथं बसतो....तू माझ्याजवळ आलीस....तरच मी....तुझ्यासोबत येईन.....हां आता कशी आलीस.....आता आपण जाऊ या.....चल....बाय....ताई....दिव्या....प्रीती....छोटया बाळांनो.....बाय.....माझ्या मित्रा......परत आलो......तर....तुझी भेट....घेईनच....बाय!'

महेशची मान ताईंच्या मांडीवर कलंडली.  मी पळत डॉक्टरांकडे गेलो.  डॉक्टरनी सांगितलं सर्व काही आटोपलंच आहे.  आपल्या प्रेमळ ताईच्या कुशीत महेश विसावला होता.  याच हातांनी त्याला आधार दिला होता.  नवीन आश आकांक्षा दिल्या होत्या.  त्याचं सारं बालपण त्याच हातात गेलं होतं आणि आज प्राणही त्याच हातावर गेला होता.  ताईचीही शुध्द हरपली होती.

भूतकाळ झरझर माझ्या डोळयासमोरुन सरकू लागला.  वस्तुस्थिती स्वीकारायला माझं मन तयार होत नव्हतं.  माझ्या हातापायातलं अवसान संपलं.  मी मटकन् तिथेच बसलो.  माझ्या विषयी कोणतीही अधिक माहिती नसताना इतकी माया का लावलीस मलाअसं एक दिवस सोडून जाण्यासाठी.  काय अधिकार होता तुला माझ्या आयुष्यात एक मोठं स्थित्यंतर घडवण्याचा कारखान्यातल्या नोकरापासून एक

बिल्डर बनवण्याचा.  अरे, सगळं दुसऱ्यांनाच दिलंस.  स्वत:साठी काहीच घेतलं नाहीस.  ज्यांनी तुला ठोकरलं.  त्यांच्यासाठीसुध्दा तुझ्या तोंडून कधी वाईट शब्द आला नाही असं तुझं हे व्यक्तित्व खरोखरीच महान !'

विचार करता करता मी ताईंकडे पाहिलं.  त्यांची मुद्रा भावना विहीन शांत दिसत होती.  मी त्यांना शुध्दीवर आणण्याचा प्रयत्न करु लागलो.

ताई शुध्दीवर आल्या.  महत्प्रयासानं त्यांनी स्वत:ला सावरलं होतं.  त्यांचा तो दृढनिर्धार पाहून मला मात्र रडूच कोसळलं.  लहान मुलासारखा मी ओक्साबोक्शी रडू लागलो.  ताई माझ्या पाठीवरुन हात फिरवू लागल्या.  त्या हातांची भाषा काही बोलताही मला समजत होती.  पण महेश आता आमच्यात राहिला नाही हे मात्र मन मानायला तयार नव्हतं.  ताईंनीही आपल्या अश्रूंना वाट करुन दिली.  नंतर त्या जड पावलांनी हॉस्पिटलच्या दाराकडे चालू लागल्या.  घरी जाऊन त्यांना प्रीतीची आणि तिच्या मुलांची समजूत घालायची होती.  देवा, ताईंना याक्षणी माझ्याही अंगातलं बळ प्राप्त होऊ दे.  प्रीतीला ही बातमी समजल्यावर तिची काय अवस्था होईलयाची मी कल्पनाच करु शकत नव्हतो.  मला मात्र ताई आता दमल्यासारख्या, थकल्यासारख्या वाटू लागल्या.  त्यांचा या क्षणीचा संयम एखाद्या देवीतच असू शकेल.

ताई खोलीतून बाहेर निघून गेल्या. त्यानंतर बराच वेळ त्याचा हात हातात घेवून मी वेड्यासारखा रडत होतो. राहून राहून मघाचे बोलणे आठवत होते,

“लक्ष्या...तुला आठवतोय आपण दोघांनी एक अलिखित करार केला होता...?” तो सांगत होता

“हो...आणि एकदा तू जेवण करायला नकार दिल्यावर रागारागाने जावून मी १०० रुपयांच्या बॉंडवर आपला करार लिहून त्यावर अरेरावीने तुझ्या सह्या घेतल्या होत्या...” मी

“अगदी लहान मुलांसारखा वागायचास कधी कधी ! मित्रा, असाच निरागस रहा...” तो हसत पुढे म्हणाला, “कुठं आहे तो करार..?”

“तो कागद नेहमी मी माझ्या बॅगेत घेवून फिरतो. तू कधी शब्द फिरवशील, याचा नेम नाही..” मी हसत म्हणालो. तोही प्रसन्नपणे हसला होता.

            त्याच्या हसण्याचा आवाज माझ्या कानात भरून राहिला होता. मी गडबडीने उठून माझ्या बॅगेकडे गेलो आणि त्यातून तो कराराचा कागद बाहेर काढला. त्या कागदावरच्या शेवटच्या करारावर नजर गेली आणि डोळ्यातून एक थेंब त्याच शेवटच्या करारावर ओघळला.

“१०. तू आयुष्यभर माझी साथ देशील.”

मला कांहीच सुचेनासं झालं. समोरचा कागद धुरकट दिसू लागला. माझ्या मित्रानं आज करार मोडला होता. मला एकटं पाडून, हात सोडून माझ्या डोळ्यासमोर निघून गेला होता. मी वळून महेशकडं पाहिलं. त्याचं ते पहिल्या भेटीतलं माझ्यावरचं हसू पुन्हा कानात घुमू लागलं. त्याच्यावरची नजर न हलवताच मी तो कराराचा कागद फाडू लागलो. आता त्या कराराला कांहीच अर्थ राहिला नव्हता. कागद फाडतच  खिडकीच्या दिशेनं गेलो आणि खिडकी उघडून त्या कराराचे कपटे वार्‍यात सोडून दिले. अजूनही त्याच्या हसण्याचा आवाज माझ्या कानात भरून राहिला होता आणि, जसे ते कपटे दूरवर जातील तसा तो आवाज वाढत निघाला होता...

 

(समाप्त)

 

COGNIZANCE: All written creative material is the solemn property of “An Anup Jatratkar Multi-Media Production”. If anyone wanted to use it for his/her own personal purpose (i.e. short film, projects, blogs, articles, scripts, FB posts etc.) then, have to take proper permission from, Mr. Anup Jatratkar. If it will be found that, anyone involved in such activities without prior permission, then, we are able to take certain charge on him/her.  

Pen Image

Pen Index