Pen


PEN 30 :रसकाव्य १ : इतर १ : हरिप्रिया शिरसीकर

पार्श्चभूमी : हरिप्रिया शिरसीकर ही सध्या ११ वी शास्त्र वर्गात शिकणारी मुलगी. अतिशय कमी वयात अभिनय क्षेत्रात मुसंडी मारून स्वत:ला सिध्द करून दाखवणारी एक धडपडी मुलगी. क्राईम डायरी (मराठी मालिका, ई टी.व्ही.), अचेतन (लघुपट), नवस काळभैरवाचा (मराठी चित्रपट २००६), एक गाव (मराठी चित्रपट २०१३) यासारख्या प्रोजेक्ट्समधून स्वत:ची ओळख निर्माण करणारी मुलगी ! २०१६ मध्ये, “मक्तुब” या लघुपटाच्या निमीत्ताने माझी आणि तिची ओळख झाली. कितीही अवघड एक्सप्रेशन्स द्या किंवा संवाद द्या, वन टेक शॉट देणारी ही मुलगी पाहून सेटवरील आम्ही सगळेचजण आचंबित झालो होतो. चित्रीकरणावेळी प्रिया ९वी वर्गात शिकत होती. यावेळी तिने लिहीलेल्या कांही कविता ऐकवल्या होत्या. याच कविता सदरच्या “पेन” मधून आपल्यासमोर ठेवत आहे. वयाच्या मानाने तिच्यातील समज आपल्यालाही विचार करायला लावते. वाचकहो, मला अपेक्षा आहे, आपल्यालाही त्या नक्कीच आवडतील.

-       अनुप

 

 

(1)

अनोळखी वाटा, अनोळखी दिशा
नव्यानेच नाते सांगताहेत आताशा ...

भूतकाळातील शेकडो भळभळणा-या जखमा
आपसुकच शांत होताहेत आताशा ...

पुराण्या आठवांच्या, सुकलेल्या वेली
अश्रुच उमलवताहेत आताशा ...

न सुटलेली, तीच सोपी कोडी
सहजच सुटताहेत आताशा ...

त्रासदायक एकटेपणाचे अनुभवही
खास सोबती बनताहेत आताशा...

(2)

शब्द माझे तुझे मिळुनी गीत आपुले गाऊया,
हेच सुवर्ण शब्द प्रेमखुण बनवुया...

माझ्या पुस्तकातली पाने तुझी असंख्य आपण वाचली,
एकुण एक अक्षरे आपली मनःपटलावर कोरली...

बाराखडी अक्षराची लहानपणीच पाठ केली होती,
नव्हते कळले तेव्हा तवसाठीच त्याची उजळणी घडली होती...

एका सुंदर कवितेप्रमाणे सहज आयुष्य आपले सजते
परि एका टप्प्यावर शब्दांपलिकडे जाऊन ठेपते...

 

  

(3)

आत्ता कुठे माझं त्यांच्या आयुष्यातील अस्तित्व समजु लागलंय मला,
हेच बाके प्रसंग जगणं शिकवताहेत मला ...

इतरांच्यात आपला आनंद शोधण्यासाठी मी संत बिलकुल नाही,
उगीच कुणालाही डोक्यावर घेण्यासारखं निरर्थक काही नाही...

कशाला आपला अमूल्य वेळ कुणासाठी वाया जाऊ द्यायचा ?
त्यांचा फायदा ते बघणार, हकनाक आपल्या का स्वाभिमानाचा बळी द्यायचा?

जगाकडे बघण्याचा आपला दृष्टीकोन लाख चांगला असेल,
त्यांनाही तसेच दिसेल जसे त्यांची नजर चित्र रेखाटत असेल...

त्यांच्या नाण्याची दुसरी बाजू हल्लीच मला कळली,
त्याच बरोबर ह्यासर्वातून माझ्या स्वत्वाची किंमतही कळली ...

 

(4)

अनेक लोक आणि त्यांचे अनेक मुखवटे दिसतात,
तरीही भारी माणसंही भारीच असतात ...
डीअरमनाशी असलेलं साटं-लोटं हर दिन गढतच जातं,
उलगडलेलं स्वतःचं व्यक्तिमत्व आधिक मोहात पाडतं ...
पापण्याही अपु-या पडतात दिवा स्वप्न पाहताना,
किती गंमत वाटते ना स्वतःवरच खळखळून हसताना..
स्वतःची कंपनीआवडु लागणं अद्भुतच वाटतं,
मग भाड़ में जाए दुनियावाटणं सहाजिकच असतं...
इतरांकडून दुर्लक्षित होण्यापेक्षा स्वतःला ओळखणं ही एक साधना असते,
मग कुणाचीच नाही गरज; स्वतःशी नाते अतूट बनते ...

 

  

(5)

दुःखी स्वरांच्या आठवांचा हिंदोळा परि खुप सुखाचा;     
दुःख ही भासे सुखासम
मज अर्थ न उमगे कशाचा ....
कातरवेळी नसे रवी 
की भास तयाच्या अस्ताचा;
अस्तही ही भासे नव उदयासम 
मज अर्थ न उमगे कशाचा ....
राहु दयावे गुढ तयांस
की व्हावा उलगडा सा-याचा
प्रश्नच भासे उकलासम 
मज अर्थ न उमगे कशाचा .....
अर्थही असतो निरर्थक कधीतरी
किंवा लपलेला अर्थ निरर्थकाचा
लपाछुपीचे राज्य बदलतच राहते;
मज अर्थ न उमगे कशाचा ....
शोध संपत नाही नव्याचा
सोबत काळाची हुलकावणी नवी;
पण प्रत्येक क्षणच नवजिज्ञासेचा
मज अर्थ न उमगे कशाचा ...

 

(6)

फुलपाखरासारखी दिसायला सुरेख तर पकडायला अवघड, अशी अद्भुत मोहीनी 

म्हणजे मैत्री ....

कट्टा गँग, रॉकस्टार गृप, स्विटगर्लस् अशी ढासु नावं 

म्हणजे मैत्री ....

तिच्यासाठी बर्फाचा गोळा तर दुसरीसाठी कैरीची फोड

म्हणजे मैत्री ....

तिने सोडलेली रिबीन तर हीने फोडलेला चष्मा 

म्हणजे मैत्री ....

तुझ्यासाठीच पाठवलंय गं आईने, चल बिनधास्त असा दिलदारपणा

म्हणजे मैत्री ....

तुला ताप आलाय? टकले इथं का आलीस मग? पहिला घरी चल, असे हक्काचे कडक बाेल 

म्हणजे मैत्री ....

 पडुदेत गं कमी मार्क्स, पुढच्यावेळी ठासुन पहिल्या येऊ, अशी उबदार काढलेली समजुत 

म्हणजे मैत्री ....

तुझा होणारा नवरा बिचारा चाळणीत पाणी घेऊन जीव दिल, असा अगाऊपणा 

म्हणजे मैत्री ....

मला करमतच नाही गं नालायके तुझ्याशिवाय; आत्ताच्या आत्ता इकडे ये, अशी मैत्रिणींमधली ओढ 

म्हणजे मैत्री ....

व्यक्तिपरत्त्वे बदलणारी तरीही सगळ्यांसाठी जीव की प्राण असणारी एकमेव गोष्ट

म्हणजे मैत्री ....

जिथं काहीच न सांगता सग्गळं काही खुप आधीच पोहचलेलं असतं अशी जुळलेली मनं 

म्हणजे फक्त फक्त मैत्री ...

 

(7)

कुणान सांगावे

कुणी न एेकावे;

स्वतःचे काव्य स्वतः गावे ...

खुप गर्दी बाजुला

पण आपलं कोणी वाटत नाही

सखा केवळ एकटेपणा;

त्या व्यतिरिक्त वाली नाही ...

फसव्या असतात वाटा

काही दिशाही असतात अनोळखी

सर्वजण त्याला मोहित होती

कोणास नसेल पारखी ...

नाही कधीच वाटत आनंद

नुसत्या एका घोळक्यात

खरी गंमत तर वाटते

गर्दीतल्याए कटेपणात ...

Negativity पेक्षा Positivity सत्यअसते

आवडत नसली (दिखाऊ) माणसांची गर्दी

तरी, चांगुलपणाची वर्दळ मानवते ..

नसेल कुणाचेही सख्य जरी

तरी सर्व काही सहजच वाटते

प्रेेरणास्थाने असतात अनेक

पण एकटेपणाचीच साथ ऊबदार वाटते ...

नको दिशा

नको वाटा 

हवी केवळ ध्येय प्राप्ति मला

पाहु, तेव्हा तरी जोडीदार मिळतो का एकटेपणाला ...

 

(8)

चांदण्या रात्री अमावस्येलाही मी चंद्र पाहिला होता

कळायला जरा उशीर झाला 

की तो निव्वळ आभास होता।

अमावस्येत चंद्र पाहण्याची

हिम्मत मी केली होती,

त्यामुळे पौर्णिमेची हौस अमावस्येतच भागली होती।

भास अाभासाचा खेळ सारा; खेळण्यातच खरी मज्जा आहे

गुलाबाच्या फुलापेक्षा पारिजातकाचा मोह अधिक आहे।

एक दिवस तोच पारिजातक 

माझ्या अंगणी बहरावा

आमावस्येतला आभासी चंद्रमा

-या आकाशीही ऊगवावा। 

ऊगवल्यानंतर मात्र

त्या चंद्रमाचा अस्त कधी न व्हावा,

पारिजातकच कायम 

गुलाबापेक्षा अनमोल राहावा।

 

 

(9)

नसावं माणसानं इतकही हळवं की ज्यामुळे येईल रडु;
आपण स्व प्रयत्नानेच विसरायच्या आठवणी ज्या असतील कडु...
काय करणार, यामुळे वाईट तर खुपच वाटतं
अन् अश्रुंचं बांधही त्वरित फुटतं...
आहे का भावनिक असणं हा एक गुन्हा???
पण मायेने का होईना आईलाही फुटतोच ना पान्हा??? 
भावनांना बांध घालणं खुप्पच कठीण असतं
बिचारं माझं मन किती जणांचं एेकुन घेत राहतं...

आज हिच्यामुळे वाईट वाटलं, काल तिच्यामुळे सटकलं
या सगळ्यात मनाला विचारायचंच राहिलं, की त्याला काय वाटलं...
कळत नाही निर्णय मनाने घ्यावेत की बुद्धीने
वारंवार वाटतं यशस्वी होईन त्यांच्या समन्वयाने...
त्यापेक्षा जगाला बदलण्याची सुरुवात स्वतःपासुन करु या
अतिशयोक्ती न बाळगता प्रत्येक भावनेचा आदर करु या...

 

(10)

या जगात आपलं असं कुणीच नसतं;

एकटयाने येऊन एकटयानेच जायचं असतं...

सर्वजण स्वार्थीपणात बुडालेले असतात

एकमेकांची पर्वा करणारे जगाच्यामते मुर्खापेक्षा कमी नसतात...

कधी कधी स्वार्थापुरतंही आपलंम्हणायलाही कोण धजावत नसतं

कारण स्वार्थासाठी जीवही घेण्यात त्यांच्या पुज्य पिताश्रींचं कुठं काय जात असतं!!! 

असेनही कदाचित मी Negative बाजु पाहणारी

पण तिच बाजु असते व्यक्तिचं सत्य दर्शवणारी...

माणसं ती असतात जी निःस्वार्थीपणे आपुलकीने वागवतात;

अाणि माणुसकीही प्रत्येकाला हवी तितकी वाटतात...

सध्या माणसं आणि माणुसकी कशाशी खातात हेही ज्ञात नसतं

कारण प्रत्येकाचं जीवन माणुसकीची व्याख्या बनवण्यातच खर्च होत असतं...

तो दिवस दूर नाही ज्या दिवशी मानवता, नाती हीच गरज आणि मानवाचा अविभाज्य भाग बनेल

आणि समृद्धीने नटलेला माझा भारत देश मानवता, आपुलकीने नटेल ...

 

 

(11)

खुप झालं सतत
तिच्या नजरेत हरवणं
खुप झालं सतत
तिच्यासाठी स्वतःला सावरणं ...

तिच्या उमब-यात
उभारणंही थांबवायचंय
तिच्या भोवताली घुटमळणं
आता टाळायचंय ...

मनात ठेवलेलं तिचं चाफ्याचं फुल
तिनेच तर गंगार्पण केलं
माझं मोरपिससुद्धा मग मी
कायमचं अडगळीत फेकलं ...

जाणिवा, व्यथा, आठवणी
सारं काही उबग आणतंय
पण हे लाङावलेलं मन
तिच्याचकडे धाव घेतंय ...

त्याची समजुत घालायला तरी
परतून येशील ???
त्याच सुर्यास्तामध्ये पुन्हा नव्याने
मला प्रतिसाद देशील ???

-       हरिप्रिया शिरसीकर

 

Pen Image

Pen Index