Pen


PEN 31 : इतर ३ : कांही मनातले : जयश्री देसाई

वाचकहो,
आजच्या पेनमधे ज्यांनी आपले विचार मांडले आहेत, त्या जयश्री देसाई, यांनी पत्रकारितेच्या जगात आपल्या कामाचा ठसा उमटविला आहे. "मधुरांगण, सकाळ" च्या कोऑर्डीनेटर म्हणूनही कार्यरत होत्या. अनेक भाषण स्पर्धांमधून त्यांनी स्वत:ची ओळख निर्माण केली आहे.मला आशा आहे, त्यांचे अनुभव-कथन तुम्हाला नक्कीच आवडेल.
-अनुप
 

नमस्कार ,
सर्व प्रथम आज गुढीपाडव्याच्या सर्वाना मनपूर्वक शुभेच्छा . हे आणि येणारं प्रत्येक वर्ष सर्वाना सुख समृद्धी सह समाधानाचे जावो ही सदिच्छा .. 
                       बऱ्याच दिवसात काही लिहिलंच नाही . म्हणूनच आजच्या दिवशी पुन्हा नव्याने लिहायला सुरुवात करते आहे . कुणाला काही तत्वज्ञान वगैरे शिकविण्याइतकी मी मोठी मुळीच नाही पण माझ्या सुदैवाने काही परोपकारी लोकांचा सहवास लाभतो आहे . त्या लोकांबद्दल लिहिण्याची खूप इच्छा होते आहे . 
                    रवि शिंदे .....  बेळगावच्या चर्मकार समाजातील एक वरिष्ठ व्यक्तिमत्त्व . शिक्षण १० वी ... आणि अभ्यास एखाद्या पी एच डी झालेल्या माणसालाही नसेल इतका . त्यांची ओळख एका प्रकरणातून झाली . गडमुडशिंगीत चर्मकार समाजातील एक मुलगी ११वी त शिकते आहे . तिचं नाव जाणीवपूर्वक घेत नाही . अभ्यासात हुशार ,कविता करते आणि कलाकुसर ही  शिकते आहे . घराची परिस्थिती तशी हलाखीचीच त्यामुळे दहावीनंतर शिक्षणालाच विरोध होता . पण उमेश सुतार यांच्या सहकार्याने विवेकानंद महाविद्यालयात तिने कला शाखेत प्रवेश घेतला . पण घरच्यांनी तिच्या भावनिकतेचा फायदा घेत चंदगड मधील राजगोळी गावातील एका पाहुण्या मुळाशी तिचं लग्न ठरवलं ,इच्छा नसतानाही आई-वडील आणि कौटुंबिक स्वास्थ्यासाठी तिने लग्नाला होकार दिला . दोन महिन्यापूर्वी त्या मुलाशी तिचा साखरपुडा झाला . तिच्या सुदैवाने तिच्या चुलत भावाला मुलाची पार्श्वभूमी समजली . त्याक्षणी त्याने तिच्या वडिलांना तो व्यसनी तर आहेच पण व्यभिचारी ही आहे ही हकीकत सांगितली . मुलीच्या वडिलांनी लग्नाला नकार दिला आणि तिला बेळगावला तिच्या गावी पाठवलं . अत्यंत चलाखीने या प्रकरणाचा निकाल लावूया म्हणून मुलाकडच्या लोकांनी मुलीच्या काकांना तिला घेऊन यायला सांगितले . ते लोक इथे आल्यानंतर या लोकांनी त्यांना अक्षरशः धमकवायला सुरुवात केली . सुदैवाने त्यादिवशी उमेश भैय्या तिच्या घरी गेला होता .हे सगळं बघता  त्याने तिला तिथून बाहेर काढायचं ठरवलं आणि बऱ्याच चर्चेनंतर मुलीला  आणि तिच्या चुलत भाऊ व काकांना बेळगावला पाठवलं चर्चेत सतत तिच्या चुलत भावाच्या तोंडून रवी दादा सगळं बघून घेतील असं ऐकलं होतं . दुसऱ्या दिवशी भैय्याने मला फोन केला आणि आज माझ्यासोबत येशील का काही ठिकाणी असं विचारलं मी ही हो म्हणाले . सगळ्यात आधी भैय्या विवेकानंद महाविद्यालयात गेला दुसऱ्या दिवसापासून तिची परीक्षा होती तिला थोडी सवलत देण्याची विनंती केली . सर्व प्राध्यापकांनी सहकार्य केले .मग आम्ही दोघे कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मा इंद्रजित देशमुख सरांकडे गेलोत . भैय्याचं आणि त्यांचं आधीच बोलणं झालं होतं . त्यांनी फक्त "माझ्याकडून काय मदत हवी?" असं विचारलं . भैय्या म्हणाला" तिच्या पुढच्या शिक्षणाची व्यवस्था कशी करता येईल एवढं बघायचं आहे ". तात्काळ देशमुख सरांनी रयत शिक्षण संस्थेच्या एका महाविद्यालयातील संबंधित व्यक्तींना फोन केला आणि बारावीनंतर पदवीपर्यंतच्या शिक्षणाची व्यवस्था झाली असं सांगितलं . देशमुख सरांच्या एवढ्या सहकार्याने आम्ही दोघेही सुखावलो होतो . पुढे काही लोकांना भेटायचं होतं ते भेटण्यातही काही अर्थ नव्हता कारण संपुर्ण प्रश्नाचं निराकरण च इथे झालं होतं . देशमुख सरांचे धन्यवाद मानून आम्ही जिल्हा परिषदेच्या  कँटीन मध्ये आलोत  पोळीभाजी खात असताना आमची चर्चा झाली आणि अचानक बेळगाव मध्ये ती सुरक्षित आहे का ? या प्रश्नाने आम्ही लगेच बेळगावला जायचा निर्णय घेतला आणि पंधराव्या मिनिटाला आम्ही कोल्हापूर सोडलं . तेव्हा सव्वा दोन वाजले होते . बरोबर साडेचार वाजता आम्ही बेळगाव मध्ये पोहचलो . मुलीच्या चुलत भावाला फोन केला . त्यांच्या दुकानात गेलो . आणि रवी शिंदेंना भेटूयात असं सांगितलं . त्यांनी लगेच रवी शिंदेंना कॉल केला पण त्यांच्या पायाला काहीशी दुखापत झाल्याने ते दवाखान्यात आहेत घरी परतायला थोडा वेळ लागेल असा निरोप मिळाला . साधारण ७ वाजता ते भेटतील असा निरोप आला . म्हणून आम्ही मुलीला भेटायला गेलोत . तिथे रवी शिंदेंबद्दल बरीच माहिती मिळाली . बेळगाव ,चंदगड आणि गोवा भागातील चर्मकार समाज त्यांना खूप मानतो . आजपर्यंत अशी अनेक प्रकरण त्यांनी कायद्याच्या चौकटीत राहून सोडवली आहेत . आणि त्यांनी दिलेला कोणताच निर्णय आजपर्यंत चुकीचा ठरला नाही वगैरे... हे सगळं ऐकल्यावर तर त्यांना भेटण्याची उत्सुकता आणखी वाढली . बरोबर सात वाजता त्यांना भेटायला आम्ही भाग्यनगर मध्ये त्यांच्या घरी गेलो . खाली बेसमेंट ला त्यांचं कार्यालय आहे असं  अमित दादा म्हणाले आम्ही सगळे तिथे गेलोत . मला वाटलं इतका मोठा माणूस आहे म्हणजे कार्यालय ही तसंच असेल आणि थोडाफार का असेना अहंकार असेलच . पण त्यांच्या कार्यालयाचा दरवाजा उघडला  आणि तिथल्या शांततेनेच सुखावले . आतमध्ये गेल्याक्षणी गोड हसत त्यांनी आमचं स्वागत केलं . अत्यंत आदराने आमची विचारपूस केली . 
त्यांचा तो सन्मान पाहून आम्ही दोघेही चकित झालो होतो . मग आमच्या चर्चेला सुरुवात झाली . मुलीच्या संपूर्ण सुरक्षिततेची आणि पुढच्या संपूर्ण खर्चाची जबाबदारी माझी राहील तुम्ही निर्धास्त राहा असं सांगताना त्यांचं इंग्लिश भाषेवरचं प्रभुत्व विशेष भावलं . आणि बोलता बोलता त्यांच्या कामाची माहिती मिळाली . जर्मनी ,नेपाळ ,ऑस्ट्रेलिया या देशातल्या काही कंपन्यांसोबत ते काम करतात असं कळालं . त्यांची स्वतःची traidersoffrers नावाची website आहे .हे ऐकल्यावर  उत्सुकता आणखीच ताणली गेली आणि न राहवून भैय्याने विचारलंच " सर तुमचं शिक्षण काय " त्यांनी" १० वी " असं सांगितल्यावर आम्ही अवाकच झालोत . केवळ दहावी झालेली असताना आज हा माणूस आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करतो आहे .लाखोंनी पैसा असूनही आपल्या समाजातील सर्वांच्या विकासासाठी धडपडतो आहे . प्रचंड व्यस्त असूनही कुणी मदतीला बोलावल्यावर तात्काळ धावतो आहे . गेली काही वर्ष दर मंगळवारी चर्मकार समाजतल्या सर्व विद्यार्थ्यांना एकत्रित भेटून त्यांच्या गरजा लिहून घेऊन आपल्या मुलीकरवी सर्वांच्या घरापर्यंत ते पोहचवत आहेत . आणि इतकं करूनही आमच्यासारख्या अनोळखी लोकांसमोर केवळ कोल्हापूर ते बेळगाव अंतर पार करून गेलोत म्हणून आभार मानतो आहे . काय म्हणावं यांना ? अहंकार आजूबाजूला सुद्धा नाही यांच्या . म्हणूनच एक सकारात्मक ऊर्जा भरून राहिली आहे त्यांच्या आजूबाजूला . 
          रवी शिंदेंसारखी अशी मूठभर चांगली माणसे जरी एकत्र आली तरी आपण शांती आणि समभावाच्या अत्युच्च स्तरावर पोहचू हे नक्की . 
                आज नवीन वर्षाच्या सुरुवातीला अहंकार सोडण्याचा जरी संकल्प केला तरी आजचा दिवस सार्थकी लागला हे नक्की . 
शेवटी उमेश भैय्याच्या शब्दांत इतकंच 
                        जरी एक अश्रू पुसायास आला 
                        तरी जन्म काहीसा कामास आला . 

- जयश्री देसाई
Pen Image

Pen Index