Pen


PEN 32 : लेख २ : दीपस्तंभ

वाचकहो,
नमस्कार ! जवळपास तीन महिन्यांनी स्व-लिखित कांहीतरी आपणांसोबत शेअर करत आहे. दरम्यानच्या काळात एक उपक्रम म्हणून इतर लेखक-कवयित्रींच्या ज्या कथा, लेख, कविता सादर केले ते आवडले असतील अशी आशा करण्यास हरकत नाही कारण, "व्हिव्ह्ज" चा आकडा दिवसेंदिवस वाढतानाच दिसत आहे. आपण सारे आपला मौल्यवान वेळ देवून "पेन" वाचत आहात, हेच माझ्यासाठी आणि माझ्या टिमसाठी महत्वाचे आहे. आजच्या पेनमध्ये मी एक लेख सादर करत आहे, जो मी माझे गुरू श्री. आर. वाय. चिकोडी (सर) यांच्यावर नुकत्याच प्रकाशित झालेल्या पुस्तकासाठी लिहीला होता. "लिंग्विस्टीक" विषयातील भारतातील पहिल्या कांही स्थानात आदराने घेतले जाणारे नाव म्हणजे, चिकोडी सर ! माझ्या आयुष्यात सरांचे स्थान खूप महत्वाचे आहे, हे लेख वाचल्यावर लक्षात येईलच. पुस्तक प्रकाशनानंतरही बर्‍याच प्रतिष्ठीत लोकांनी सदरचा लेख आवडल्याचं, फोन करून, मेसेज करून आवर्जून कळवलं. म्हणूनच माझ्या आवडत्या गुरूविषयीच्या आठवणी या लेखाव्दारे आपणांसमोर सादर करत आहे.
-अनुप

॥ दीपस्तंभ ॥

-       अनुप जत्राटकर

(पटकथा-लेखक / दिग्दर्शक)

 

            लहानपणापासून हत्तीची एक गोष्ट ऐकली होती. कांही आंधळे रस्त्याने जात असताना वाटेत त्यांना हत्ती आहे असे कळते. हत्तीला अनुभवण्याची इच्छा त्यांना उत्पन्न होते. त्यांच्यापैकी एकानेही हत्ती कधी पाहिला नव्हता, जे शक्यच नव्हते आणि स्पर्शाने अनुभवलाही नव्हता. त्यांनी हत्तीला स्पर्श करायला सुरूवात केली आणि त्यांच्या हाताला जे अवयव लागले त्यालाच त्यांनी हत्ती समजले ! ही गोष्ट नक्कीच आपणां सर्वांना माहित असणार. इथे या गोष्टीचा संबंध काय ? आहे ! आपली सगळ्यांची या आंधळ्यांप्रमाणेच अवस्था आहे. खर्‍या अर्थाने “गुरू” कोण ? कोणाला “गुरू” म्हणावे ? या प्रश्नाच्या शोधात असताना आपल्या हाताला जे मिळते त्यालाच आपण गुरू समजण्याची चूक करतो आणि आंधळेपणाने विश्वास ठेवतो. श्री. काळे सरांनी रस्त्यात गाठून आदरणीय चिकोडी सरांबद्दल लिहीण्यास सांगितलं, अगदी त्या क्षणापासून माझ्या मनात या सार्‍या गोष्टींविषयी विचार सुरू झाला.

            २००२ साली बी.ए. ला इंग्रजी ऑप्शनल विषय निवडून प्रवेश घेतला त्यावेळी इंग्रजीविषयी उत्सुकता तर होतीच पण अभ्यासक्रम पाहून छातीही दडपून गेली होती. कोण असणार इंग्रजी शिकवायला ? असा वर्गातून सूर उमटत असतानाच वर्गात यलो टी-शर्ट, ब्यू जीन्स, हातात पुस्तक, चॉक आणि डस्टर घेवून एका उत्साही, उमद्या आणि पन्नाशीतल्या “तरुण” शिक्षकांची एन्ट्री झाली. त्यांचा रुबाब आणि करडी नजर पाहून वर्गात जवळजवळ स्मशाण-शांतता पसरली. त्या “तरुण” शिक्षकानं बेंचवर पुस्तक, चॉक, डस्टर ठेवलं आणि चेहर्‍यावर आपुलकीचं स्मित घेवून नेहमीच्या पॉझ-स्माईल शैलीत सार्‍या वर्गावरून नजर फिरवली आणि आपल्या फोनेटिक लहेजात प्रसन्नपणे म्हणाले, Welcome. तो शब्द आजही...आत्ता याक्षणीही माझ्या कानात तेवढाच ताजा आणि सुस्पष्टपणे घुमत आहे.

श्री. आर.वाय. चिकोडी सर. सरांबद्दल काय आणि किती बोलावं ? वैयक्तिकपणे जर सरांबद्दल बोलत राहिलो तर कदाचित या विशेषांकातील पानं या एकाच लेखानं भरून जावीत ! बी.ए. पासून एम.ए. पर्यंत शिक्षण घेत असताना सरांची खूप वेगवेगळी रूपं पहायला मिळाली. अगदी सुरूवातीला एक इंग्रजीचा वाकबगार शिक्षक म्हणून, त्यानंतर माझ्या करिअरची बाजू घेत मला सपोर्ट करत असताना एक पितृतुल्य व्यक्तिमत्व म्हणून, जेंव्हा पहिल्यांदा सरांकडे एका लघुपटाची ऑफर घेवून गेलो तेंव्हा एक निरागस विद्यार्थी म्हणून, ३-४ लघुपट-माहितीपटांमधून काम करत असताना सपोर्टीव्ह कलिग म्हणून आणि नंतर जेंव्हा एकदा चालताना, खांद्यावर हात टाकून म्हणाले होते, “अरे, तू माझा विद्यार्थी नाहीस...! आपण मित्र आहोत आता !” तेंव्हा जाणवलेला आणि मिळालेला मैत्रीपूर्ण विश्वास ! कधी कधी आश्चर्य वाटतं, एकाच व्यक्तीला इतके कांगोरे कसे काय बुवा असू शकतात ? आणि मग, निर्माता कुणी असेलच तर त्याच्या निर्मीतीवरही हेवा वाटल्याशिवाय रहात नाही !  सरांचा मला पर्सनली आलेला अनुभव मला इथं शेअर करणं जास्त आवडेल कारण, ज्या पातळ्यांवर मी त्यांना अनुभवलंय...अनुभवतोय इतकं क्वचितच कुणी अनुभवलं असेल ! सरांसोबतचे कांही प्रसंग यानिमीत्ताने आठवताहेत, ज्यांनी माझ्या मनावर अमीट छाप उमटविला आहे.

फेब्रुवारी २००३. इंग्रजी विभागाचा गेट-टू-गेदर कार्यक्रम जिमखान्यात होणार होता. लिखाणाचा किडा लहानपणापासून असल्यानं अशीच एक इंग्रजी कविता लिहून ती सादर करावयाची ठरवली होती. आदले दिवशी चिकोडी सरांना वाचायला दिली होती. दुसरे दिवशी ८ वाजता पोहोचलो. सरांनी सकाळी भेटायला बोलावले होते. मी स्टाफरूममध्ये गेलो आणि तिथं गेल्यावर गाड्यावर यायला सांगितल्याचा निरोप मिळाला. बोदले मावशींच्या गाड्यावर गेलो. तिथं चिकोडी सर इतर कांही शिक्षकांसोबत चहा घेत होते. त्यांचं लक्ष जाताच त्यांनी मोठ्यानं हाक मारून जवळ बोलावलं आणि पाठीवर हात ठेवत कौतुकानं सर्वांना उद्देशून म्हणाले, I’m really proud of my student ! He has written a very good poem  in English !! I doubted for a moment that, has he really written it !!?? Well done. सरांच्या अनपेक्षित शब्दांनी मोहरून जायला झालं, पण कांही क्षणच ! तिथेच असलेले एक शिक्षक लगेच माझ्याकडे पहात म्हणाले, “इतकंच याचं इंग्रजी चांगलं असतं तर, १२ वी सायन्स का नापास झाला असता ?” मी १२ वी शास्त्र नापास झालो असलो तरी इंग्रजी हे कारण मात्र नक्कीच नव्हतं आणि इतर कोणतीही माझ्याबद्दलची माहिती नसताना चार-चौघात असं बोललं गेल्यानं मला आणि बहुतेक सरांनाही खूप वाईट वाटलं होतं. कार्यक्रम सुरू व्हायच्या अगोदर चिकोडी सर, मला जिमखान्याच्या मागे घेवून गेले आणि म्हणाले, “लोकांची तोंडं आपण बंद नाही करू शकत ! लोकं शंभर तोंडांनी बोलणार. लक्षात ठेव, ज्यांना कांहीच जमत नाही ते बोलतात, आपल्याला त्यांच्यापैकी एक व्हायचं नाहीये. खूप मोठा पल्ला गाठायचाय तुला. कोण काय बोलतंय यापेक्षा तुझं काम काय म्हणतंय यावर फोकस कर. उद्या तुझ्या नजरेला नजर देताना त्यांचं मन खायला हवं लक्षात ठेव ! बोलून उत्तर देण्यापेक्षा तुझ्या कामाने त्यांना त्यांची उत्तरं मिळू देत !!” कॉलेज-जीवनात ही चार वाक्यं माझा दृष्टिकोण बदलायला पुरेशी होती.

            साधारण याचवेळी माझं, चित्रपटांना आपलं कार्यक्षेत्र बनवायचं नक्की झालं होतं. त्यासाठी अगदी तेंव्हापासूनच माझे प्रयत्न सुरू होते. बी.ए. भाग ३ ला असताना मी माझी पहिली शॉर्ट-फिल्म बनवली, “शिकार”. याच दरम्यान असाच एक दुसरा किस्सा घडला. माझा लघुपट प्रदर्शित होण्यागोदर निपाणीतील एका युवकाचा एक मराठी चित्रपट आला होता जो दुर्दैवाने पश्चिम महाराष्ट्र वगळता फारसा कुठेच चालला नाही आणि पैसा वसूल न झाल्यानं त्या युवकाचं फार मोठं नुकसान झालं ! आणि मीही जेंव्हा याच क्षेत्रात जायचा निर्णय घेतला होता तेंव्हा सहाजिकच घरच्यांच्या मनात भीति होती ! पहिली फिल्म रिलीज झाली आणि कांहीच दिवसांनी चिकोडी सर आणि इतर कांही लोकं, शिक्षक वगैरे गप्पा मारत असताना माझा आणि लघुपटाचा विषय निघाला आणि बोलण्याच्या ओघात एक सर म्हणाले, “एन.डी.चं नशीब कसलं आहे कुणास ठाऊक...हे धाकटं पोरगं काय त्याला नीट जगू देत नाही...! पिक्चर करून आणतंय बगा बापाला डबघाईला !” त्याच दिवशी चिकोडी सरांनी फोन करून मला चिकोडीला त्यांच्या घरी बोलावून घेतलं. भेटण्याचं प्रयोजन न सांगता ‘येवून जा’ म्हणाले. सरांनी बोलावलंय म्हंटल्यावर मी संध्याकाळी लगेच सरांना भेटायला गेलो. कुणाचं नाव न घेता सरांनी वरचा किस्सा सांगितला आणि म्हणाले, “बाळ, शिक्षक ढीगानं आहेत. तूही शिक्षक होवू शकतोस. आयुष्यभर शेक्स्पिअर शिकवणार, कुणाच्या तरी लिखाणावर पी.एच.डी. करणार आणि एक दिवस रिटायर्ड होणार ! दुसरा पण मार्ग आहे, असं कांहीतरी लिखाण किंवा काम कर जेणेकरून भविष्यात लोकं तुझ्यावर पी.एच.डी. करतील. त्रास होईल, टोमणे खावे लागतील पण डबक्यातल्या बेडकांमध्ये मोठेपणा मिरवण्यापेक्षा समुद्रात उडी घेवून स्वत:ला सिध्द कर. आणखी एक, आता तू करिअर करायचंस तर फिल्ममधेच...तुझ्याकडं ते स्किल आहे..! तू खर्‍या अर्थानं माझा विद्यार्थी असशील तर तू त्यातच करिअर करून नाव मिळवशील !” माझ्या व्यावसायिक करिअरला दिशा देणारं वाक्य, आजही मला पुढे जाण्यासाठी प्रेरणा देत असतं.

            एम.ए. पूर्ण करून व्यावसायिक अभ्यास करण्याकरिता मुंबई विद्यापीठातील जेमिनी स्कूलला `Diploma in Film & Television Direction’ साठी प्रवेश घेतला. या दीड वर्षांच्या काळात निदान महिन्यातून एकदा सरांचा फोन यायचा किंवा मी करायचो. जेंव्हा माझी फायनल परीक्षा झाली आणि रिझल्ट आला, ३०० पैकी ३०० गुण मिळवून विद्यापीठातून प्रथम क्रमांकानं उत्तीर्ण झाल्याचं समजलं. त्याक्षणाला सर्वात पहिला फोन जर कुणाला केला असेल तर, तो चिकोडी सरांना. सरांना रिझल्ट सांगितला. Very good ! एवढाच त्यांचा रिप्लाय आला. कांही क्षण पॉझ घेवून म्हणाले, “डोक्यात हवा जावू देवू नको. कागदावरच्या आकड्यांना कांही अर्थ नसतो. आयुष्याच्या मार्कशीटमध्ये किती गुण मिळतात, हे सर्वात महत्वाचं आणि त्यासाठी अजून खूप कष्ट करायचेत तुला. आलास की भेट.” फोन कट. कांही क्षणांसाठी का असेना पण माझ्या डोक्यात जी हवा गेली होती ती आपोआप निघून गेली. त्यानंतर तितक्याच थंडपणे घरी फोन लावून रिझल्ट सांगितल्याचं स्पष्ट आठवतंय !

           याच दरम्यान मुंबईमध्ये मित्रासोबत पार्टनरशीपमध्ये ऑफीस सुरू केलं आणि कामं घ्यायला सुरूवात केली. कोल्हापूरातही ऑफीस काढलं. लघुपट आणि माहितीपटांची काम मिळू लागली आणि या टप्प्यावर सरांसोबत कलिग म्हणून काम करायला सुरूवात केली. Epiphany of Galileo, पंचगंगा, Happy Independence, W, समर, At least, क्षितीज, दक्षिण काशी:द सिटी ऑफ रेस्लिंग यासारख्या लघुपट आणि माहितीपटांसाठी सरांनी पटकथालेखन, व्हाईस-ओव्हर, डबिंग स्क्रिप्ट यासारखी कामं हातासरशी वेगळी केली. शिक्षकीपेशातून येवूनही ‘स्वत: म्हणेल तेच खरं’ न म्हणता अगदी विद्यार्थ्याप्रमाणं सगळ्या गोष्टी पहायचे. नाटकाची स्क्रिप्ट, फिल्मची स्क्रिप्ट यांचा फॉरमॅट वेगवेगळा असतो पाहून, “भारीये हे !” असं म्हणणारे सर, डबिंग प्रोसेस पाहून ३-४ तास कोपर्‍यात बसून डॉ. शरद भुताडियांचं डबिंग पाहून विस्मयीत होणारे आणि स्वत: माईकसमोर उभं राहिल्यावर, “तुला वाटत नाही तोवर रिटेक द्यायला तयार आहे !” असं म्हणून प्रोत्साहन देणारे आणि नुकतंच सुरू केलेल्या रेकॉर्डींग स्टुडिओला भेट द्यायला आल्यानंतर, “रिटायर्ड माणसांना कांही कामं असली तर सांगत चला सर !” असं म्हणून हसत चेष्टा करणारे सर ! स्टुडिओच्या ओपनिंगनंतर निघताना दारात थांबून नजरेत नजर रोखून म्हणाले, It just a beginning ! I know, one day you will shine like a star ! It’s my dream actually...!”

आणखीन एक किस्सा जो माझ्या स्मरणात कोरला गेला आहे. असे बरेच आहेत पण ज्यांनी मला पुढे जायला प्रोत्साहन दिलं आणि इतरांनाही देतील, असा एक किस्सा. लघुपट, माहितीपट, मराठी चित्रपटांसाठी पटकथालेखन असं सारं करून जेंव्हा ‘बी-प्लस’ मिळवायचा विचार करून तिसर्‍यांदा आणि “शेवटचंच” असं स्वत:ला बजावून ईम्प्रूव्हमेंटचा फॉर्म भरला आणि सरांना जावून भेटलो. सरांनी शंकास्पदपणे पाहिलं आणि म्हणाले, “काय रे बाबा, शिक्षक-बिक्षक व्हायचा विचार नाही ना ?” त्यांना पटवून दिलं की फक्त ‘बी प्लस’साठी सारा खटाटोप करतोय. तेंव्हा मात्र सरांनी पुढचे कांही दिवस माझी शिकवणी घेवून एम.ए.च्या पूर्ण अभ्यासक्रमाची उजळणी घेतली आणि एम.ए.ला ‘बी-प्लस’ मिळाल्यावर स्वत:हून घरी बोलावून तोंड गोड करणारे चिकोडी सर ! अशा शिक्षकांचं महत्व तेंव्हाच कळतं जेंव्हा, इतर आपलेच शिक्षक, “त्याला खरंच बी-प्लस मिळालाय ? का खोटं बोलतोय ते बघा...! त्याचे मार्कलिस्ट तुम्ही स्वत: पाहिले का ?” असा अविश्वास दाखवतात आणि येईल-जाईल त्याच्याकडे स्वत:च्या तत्वांना मूठमाती देत, गॉसिपींग करण्यात धन्यता मानतात !

या कांही मोजक्या प्रसंगांनी मला चिकोडी सर पर्यायाने `खरा गुरू काय असतो ? हे समजले. खरा गुरू तो नसतो जो फक्त पाठ्य-पुस्तक शिकविण्यात समाधान मानतो. विद्यार्थी बाहेर पडले की ‘संपला विषय’ म्हणून विसरून जात नाहीत तर, चिकोडी सरांसारखे मोजके शिक्षक पाठ्यपुस्तकांपलिकडे जावून आयुष्यरूपी अभ्यासक्रम शिकण्यास प्रवृत्त करतात, शिक्षक-विद्यार्थी नात्याला काळानुसार “मोल्ड” करतात आणि सामोरे जातात. आदरणीय श्री. आर.वाय.चिकोडी (सर) हे असंच एक नाव ज्यांनी, शिक्षण क्षेत्राच्या तारांगणात ध्रुवाप्रमाणं आपलं अढळ स्थान निर्माण केलं आहे आणि वाट चुकणार्‍या हरेकाला दिशा दाखवण्याचं काम चोख पार पाडत आहे ! म्हणूनच आपसूक लिहील्या गेलेल्या कांही ओळी चिकोडी सरांना अर्पण...

अंधाराला चिरून उगवणार्‍या, सुर्यासम तू...

वाट चुकल्या हरेकाला, ध्रुवासम तू...!

हात सुटल्या एकाकी, हरेकाचा सखा तू...

सर्वसामान्य सर्वांमधला, तरी सर्वांहून वेगळा तू...!!

नियतीलाही झुकविणारा, स्वैर-साहसी योध्दा तू...

विषाचेही घोट रिचवून, ठाम उभा दिपस्तंभ तू !!!

 

०-०-०-०-०


 
Pen Image

Pen Index