Pen


PEN 33 : लघुकथा ११ : सोंग्या : अनुप जत्राटकर

कडुसं पडाय लागल्यालं. पाटणेफाट्यास्नं नागनवाडीला घेवूनशान जाणारी डिगडिगबी कवाचान पॅंव पॅव हून वरडाय लागल्याली. भरम्या ढोलगरवाडीच्या वाटंला डोळं बारीक करूनशान बगत हुबा हुता.

“अय पोरा, येतेस का जावू ?” आपल्या ढोलगरी भाषेत आवाजात कडवटपणा आनत त्यो डिगडिगवाला म्हणाला. भरम्यासमूर परयाव नवता. त्यो वळला खरंपण त्येची नजर अजूनबी ढोलगरवाडीच्या वाटंलाच खोळांबल्याली. भरम्या डिगडिगीच्या मागच्या दांड्यावं हुबा र्‍हायला. पाय घट्ट ठेवलं अन हाताला टप्पावरचा गंजका लोकंडी राड लागला, त्यो पकडून, मानंला वळवून मागं र्‍हायल्याली नजर अन चित्त आवरूनशान घिवू लागला. गाडी नागनवाडीच्या रस्त्याला लागली. गावाकडची त्वांडं शेतावरनं परतत हुतीत, बंगल्यातली त्वांडं वाडल्यालं वजन कमी करायला घोळप्या-घोळप्यानं मुंगीच्या पावलानं फुडं सरकत हुतीत. परकर-पोलक्यातल्या बारक्या पोरी डोईवर ह्यो मोट्टा भारा घिवून लगबगीनं घराकडं चालल्याल्या. वळनावळनावर मंडळांच्या बोर्डाखाली हुबी चायनीजची लाल रंगाची टपरी जोशात हुतं अन बाजूला केळी, मक्कं, काकड्या इकणारी येळ घालवायला त्या चायनीजच्या वासाबरूबर हळूच वाळूक, मक्कं, केळी त्वांडात सारत हुतीत. डिगडिग नेमकी अशाच एका चायनीज गाड्याजवळ एकाला उतरायला थांबली. भरम्याच्या नजरंला ती लांबुडकी शेव पडली. त्येच्या त्वांडाला पानी सुटलं. त्येची लई दिसाची विच्चा हुती, कवातर त्या समुरच्या पोरांवानी ऐटदार हुबं र्‍हाऊन तांबड्या डिशातनं, काटेरी चमच्यानं ती लांबुडकी शेव खायाची. भरम्या ईचारात आसतानाच एका जोराच्या गचक्यानं भानावर आला. गाडी नागनवाडीच्या साळंजवळ आल्याली. साळा कवाच सुटल्यानं त्या ऊंचवट्यावरची साळा सांत हुती. एकाद दुसरं पोरगं रस्त्यानं दगडं मारत, पाय घासत, पिशवी गळ्यात आडकून डब्यावर काटीनं ताल धरून बडवत निगाल्यालं. होळी झाल्यापास्नं समदीकडं असंच ज्यो-त्यो पोरगा-पोरगी बडीवताना दिसत हुता.

“सोंगं जवळ यली काय !?” डिगडिगीतल्या एकानं भाईर नजर फिरवत ईचारलं.

“होळीहून किती दिसांनं हाईत ?”-दुसरा

“चार..”-तिसरा

“म्हंजी, चारा दिसावं घाटावरची रंगपचमी, त्येच्यानंतर पाचा दिसानं सोंगं अन त्येच्या दुसर्‍या दिशी आपली रंगपचमी अस्तीया !”-दुसरा

“ईट आणत्यात ही सोंगं ! कवा इकदा मिरवणूक व्हवून जागरण सपून जातीया अस्स व्हवून जातंया...”-पाचवा

“त्येच्या नंतर काय ईचारू नगा, फुडचं दोन दिस ह्या पोरांची रंगपचमी काय सपूशी नाय. सोंग्यानंतर दोन दिस गपचूप घरात बसूचं...”-पयला वैतागून म्हण्ला.

भाईर हुब्या भरम्याला हसू आलं. त्येन्ला कुटं म्हायती हुतं यंदाचा एक सोंग्या गाडीला भाईर लटकत हुबा हाय त्ये ! भरम्यानं हलूच मान खाली करून बोलणार्‍या समद्यांची त्वांडं बगून घितली. का तर, समजा ह्येंच्यापकी कुनी सोंग्यादिशी दिसलाच तर गाटून मोट्टी रक्कम उकलायची !

“खिती मागूस बरं ?” भरम्या हिसूब करू लागला. लईयेळ वजाबाक्या, बेरजा मारून वैतागून आपल्या डोचक्याला झेपणारीच रक्कम मागाची, असा ईचार करून परतेकी ५ रुप्पेवर भरम्या समाधानी जाला.

            नागनवाडी फाट्याव डिगडिग थांबली. भरम्यानं उडी मारली अन समूर जावून खिशातलं १० रुप्पे काडून डरायवरच्या हातव ठिवलं.

“का रं, भरम्या..तुज्या बाची गाडी चुकली न्हवं ! गेलाय कुटं...?”-डरायवर

“चपला ईकूस गेलाय, ढोलगरवाडीला...”

“कसं दिलंस पायताण ?”-डिगडिगीतनं एकानं ईचारलं.

“२०० रुप्पे”

“टोन्नग्या ! २०० रुप्प ?! काय खावूच हाय का ते ?!!”

“काम तर बगूस एकदा...! एक जोड व्हवूस ८ दिस जावूस...”

 “१०० रुप्पेला दितोस का बोल, ४ जोड घेईतो म्हणनास..”

भरम्यानं रागानं त्येच्याकडं पायलं अन काय न बोलता वळला.

“का उद्दाम असूस बे बोचा...”

भरम्याच्या कानावं त्येचं ह्ये वाक्य गेलं. रागानं बगत त्येनं मनात ईचार किला,

“घावूंदेच सोंग्या दिशी...न्हाई मोजून १० रुप्पे घिवूस, तर नावाचा भरमू नसूस...”

भरमू वळला अन पुन्यांदा एकवार त्येनं ढोलगरवाडीकडनं येणार्‍या वाटंकडं नजर सारली. त्येचा हिरमोड जाला हुता. भरमूच्या बानं त्येला सांगितल्यालं,

“ईताना तुज्यासाटी सोंग्याची कापडं घिवून ईतो..”

हून आज कवानाई ते आज भरमू बाची एवरी वाट बगत हुता.

            भरमू घराजवळ पोचला तवा समदीकडं लाईटी लागल्याल्या. घरात बी लाईट सुरू झाल्याली. दारात बाचं पायताण बगून भरमूला धक्का बसला. त्यो लगबगीनं घरात गिला. बा अंगावं गोधडी घिवून निजल्याला. आई बाजूला बसून बाचं पाय दाबत हुती. बाच्या अंगात हुडहुडी हुती. आई त्येच्याकडं पाऊन चिडली अन वराडली,

“कुटं उलतला हुतास येवडा येळ ?”

भरमू आत ईऊन आईजवळ बसला अन काय न बोलता खिसातनं ६०० रुप्पे काडून तिच्या हातात दिलं.

“तीन जोड न्हेल्तं...तिनी ईकलं...”

आईच्या नदरतनं पाणी टपाकलं. तिनं चटदिशी नदरला पदूर लावला. बानं बी ऐकलं असावं का हून तर, बाला फुटल्याला हुंदका त्येंच्या कानावं आला. भरमू तसा ११ वर्साचा पण पोराला समज चांगली हुती. बाच्या हुंदक्यावर त्येनं आपली नदर बाच्या कोपर्‍यातल्या सामानावर फिरीवली. बोचकं हुतं तसंच हुतं. एक बी पायताण ईकलं गिलं नवतं. भरमू फुडं जाला अन बाला हाताचा ईलका घालत म्हण्ला,

“बा नगोय मला सोंग्यासाटनं कापडं...तू नगो कालजी करूस ! आत्तापरयंत कवाच नाई जावूस सोंग्याला..आणकी एक वरीस नाई जावूस तर काय फरक नाई पडूस...!”

बानं त्वांडावरची गोधडी काडली न्हाई पर त्येचं अंग हलाय लागलं हुतं. बा रडत हुता. आईलाबी पोराचं सानपन बगून र्‍हाईवलं नाई, तीबी रडाय लागली अन एका हातानं भरमूला कुरवाळाय लागली.

            फुडचं ५-६ दिस भरमूच ४-५ पायताणं घिवून ईकायला जायचा अन ईताना रोक रुप्पे घिवून याचा. येणारा रुप्पा बाच्या औशीदाला न पाण्याच्या बाटल्यांला सपायचा. आता परयंत ४ बाटल्या पाणी चडीवलं हुतं. बानं तयार किलीली पायताणं सपत आल्याली. आता पुन्यांदा चामडं वडाय, बाबळीची साल अन हिरड्यानं धुवाय, वाळवाय, घोटाय अन मग कापाय लागणार हुतं. काय कराचं हे समदं भरमूला म्हाईत हुतं मातूर हे समदं करनं त्येच्या एकट्याच्या तबियतीची गोश्ट नवती. डागटरनं फुडचं अजून ८ दिस तरी बाला काम करायचं न्हाई हून सांगितल्यालं. पायताण ईकून आलेले रुप्पे तर हुते. फुडच्या आट दिसाचा घोर नवता पर, भरमूला एकच रुकरुक लागून र्‍हायल्याली...३ दिसावर सोंगं आल्याली ! पोरानं म्हणल्यालं पर ११ वरसाचं पोर ते, कितीबी न्हाई म्हणलं तरी वड खाणारच ! आई-बाला त्येची वड कळत हुती पर आज घडीला एक एक रुप्पा लई मोटा हुता. भरमूलाबी अडचण कलत हुती, हूनच त्यो गप हुता.

            म्होरच्याच दिशी, ताम्बडं फुटायला मुन्ना कसाई दारात हजर.

“आये न्हई...चामडा वडने ? भरमू चलूस संगे..! हिसोब बादमें देखूस चाचा...भिजवातो भरमू संगट”

भरमू मुन्नाच्या फटफटीवर बसला अन निगाला. त्येची पयलीच येल कसाईखान्यात जावाची. कसाईखान्याच्या भाईरच फटफटी लावून दोगंबी आत शिरली. रगताच्या पाटानं अन वासानं भरमूला वकारी आली. ठिक-ठिकाणी आतड्याच्या तारा पडल्याला, चरबीचं पांदरं गोळं पडल्यालं अन त्यावर कावलं, कुत्री गब्बर हूनशान ताव माराल्ती. भरमूचं डोकं भिरभिराय लागलं अन तवाच त्येच्या बाचं बोलणं त्येला आटिवलं,

 “प्वोरा, हे काम हाय, पणजाच्या पणजापास्नं चालत आल्यालं ! तू तेच कराव असं न्हाई पर लगशात ठिव, कामाची लाज वाटून धंदा बदलणार अश्शील तर तुज्यासारका बेईमान तूच पर जर सोतासाटी, कुटुंबासाटी, समाजासाटी मोटा सायेब हुनार अश्शील तर तुजासारका तूच ! काम कोंचंबी कर लेकरा, जे काम प्वोटाची खळगी भरतं, बायका-प्वोरांच्या अंगावं कापडं, खायाला दोन येळंच अन्न दितं त्येची लाज कवाच बाळगायची न्हाई !!”  

भरमू सांत जाला. मुन्नाच्या मागनं चित्त थार्‍यावर ठिवून मोट्या धीरानं निगाला. मुन्नानं समद्या कसायांकडनं घिवून बैलांची कातडी घिवून ठिवल्याली. समदी कातडी बांदून ती एका टमटममदी घालून मुन्नानं सोताकडचं रुप्पे दिवून भरमूला पाटवून दिलं. टमटमपास्न दारापरयंत चामडं आणूस्तवर भरमूचा बाक निगाला. अन त्येला आपल्या बापाच्या घामाची बी किम्मत कलाली.

            बाचा ऊर भरून पावत हुता. भरमूला काय बी कलू न देताच बानं जवा जवा भरमू भाईर असलं तवा तवा, त्येच्यासाटी चामड्याची सोंग्यासाटनं कापडं करायला सुरू किलं हुतं. सोंग्यासाटनं कडकलकशीमी सारकं कमरंखाली हुब्या पट्ट्यांचा पायघोळ, चामड्याचा बारका चाबूक अन डोक्याला चामड्याचा पट्टा करू लागला हुता. सोंग्याचा दिस उजाडला. भरमू सकाळ ठावणंच गायब हुता. आई-बानं हाका मारल्या, लई शोदलं पर कुटंच पत्ता नवता. लई येळानं भरमू आला तवा त्येचा चेरा सुजल्याला, डोलं लाल जाल्यालं. त्येचा आवतार बगून आईनं लगबगीनं म्होरं व्हवून त्येला कवटाललं. बानं उकलून ठिवल्याला चा पुन्यांदा गरम करून आनून म्होरं ठिवला. चा अन बटर खाऊन भरमू पायताण बांदून घिवू लागला तवा बा त्येच्या मागं त्येनं तयार किल्याली सोंगी कापडं घिऊन हुबा र्‍हायला. खाल मानंनं भरमू वलला तवा त्येची नजर पयल्यांदा बावर अन मग त्येच्या हातातल्या कापडांव गिली. लई येल भरमू तसाच डोलं फाडून त्येच्या हाताकडं बगत हुता. भरमू बाला कायच बोलला नाई नुगता बगत हुबा हुता अन आता आपूपच त्येच्या नदरतनं पानी वगळाय लागलं हुतं. बा म्होरं जाला अन डोचक्याला चामड्याचा पट्टा बांदला. भरमू मटकन खाली बसला अन बाच्या पायाला ईलखा घालून रडू लागला. कुणालाच काय बोलाचं ते सुचत नवतं. लई येलानं आईनं त्येला उटीवलं, सावरलं अन कापडं बदलून याला सांगितलं.

            भरमू कापडं बदलून भाईर आला. कमरंला चामड्याचा पायघोल, हातात चाबूक, डोचक्याला पट्टा. बानं फुडं व्हवून अंगाला राक फासली. आईनं तयार किलील्या माला, त्येच्या गल्यात घातल्या. त्येला बगून कानशिलावर बोटं मोडून कानामागं काजलाचा तिट लावून, त्येच्या कपालाचा मुका घितला. खूष झाल्याला गडी दोगांच्याबी पाया पडून घरातनं भाईर पडला. नागनवाडीफाट्याव ईवून डिगडिगीची वाट बगाय लागला. लई येलानं डिगडीग आली तसा त्यो त्यात चडला. त्यो चडल्यापास्नं समदी लोकं त्येच्याकडं वलून-वलून हसत हुतीत. सुरवातीला त्येला वाटलं लोकं कवतीकानं बगत अन हसत असतीली पर हलू हलू त्येच्यावं चेष्टा बी सुरू जाली. कवा एकदा चंदगड ईतं अन कवा ईकदा उतरतो असं भरमूला व्हवून गिलं हुतं. चंदगड स्टॅण्ड आलं तसा भरमू दाणकन उडी मारून पसार जाला. बाजारपेटेत बारक्या-मोट्या मुला-मुलींची ही गर्दी जाली हुती. ज्यो-त्यो टोळक्या टोळक्यानं फिरत हुता. कुणी ढोल बडवत हुता कोण पिपाण्या, बासर्‍या वाजवत हुता. पोरान्ली लई सोंग वटवली हुती. कुणी बी वळकून येत नवता. एका परीस एक सोंग सुरू हुती. हरेकजण दुकानात जावून, गाडीवाल्यांना अडवून रुप्पे घेत हुता. टोळक्यांला बगून लोकं बी घाबरून रुप्पे देत हुती. भरमू त्ये समदं बगून बावरून गिला. आता एकट्यानं रुप्पे मागायचे म्हनल्यावं त्येच्या जीवावर आलं हुतं. वैतागल्याली लोकं त्येला एकट्याला दुकानाच्या दारात तर हुबं करून घितील का न्हाई, ह्योच परस्न हुता.

            भीत भीत भरमू सोंग्यांमदन वाट काडाय लागला. हरेक सोंगी त्येला वलून वलून बगत हुता. समद्यांना पार करून भरमू समद्यांच्या म्होरं पोचला आणि दुकानात जावून रुप्पे मागू लागला. ह्येला एकट्याला दारात बगून कोन बी ह्येची दकल घिना. दुकानात धा धा मिन्टं थांबून बी कोन रुप्पे दिना. दिलंच तर एक रुप्पाच्यावं कोन हातात ठिवंना. येणारी जाणारी सोंगी त्येची अवस्ता बगून त्येच्यावं हसून म्होर निगून जात हुतीत. भरमूला सरमल्यागत वाटत हुतं. त्येच्या डोल्यात पाणी येवाय लागलं हुतं. दुपार हून गिली हुती. टोलकी गाड्यावं भजी-पाव, वडा-पाव खात हुतीत. भरमूनं आपल्या हातातल्या रुप्प्यांवर नदर टाकली. हातात ४ रुप्पे हुते. डोल्यातला एक पान्याचा थेंब हातावं पडला. समदं धुरकट दिसाय लागलं.

“अय सोंग्या, माज्या दाराम्होरनं उट...”

एक कडक आवाज भरमूच्या कानावं पडला.

“मालक, पाणी मिलल का प्याला...”

“टोन्नग्या ! भिक ते भिक मागनार अन वर तुमच्या खान्या-पिन्याची बी येवस्था आमीच करायची काय भडव्या..! चल नीग....”

भरमू तसाच बसून र्‍हायला. पायाला ऊनाचं चटकं बसत हुततं. भुक लागल्याली. डोल्याम्होरं अंदारी याल्ती. सावलीतनं उटाय नगो वाटाल्तं. त्येला काय कलायच्या आतच त्या मालकानं म्होर हुत त्येच्या दंडाला धरून उटीवलं अन रस्त्याच्या दिसेनं ढकलून दिलं. भरमूचा तोल गिला अन फरशी नसलिल्या गतारीत भरमू पडला. समद्या बाजारपेठंत हशा पिकला. ज्यो-त्यो टाल्या दिवून बगाय लागला. लई खिशातनं मोबिल भाईर आलं अन त्येची चित्रं घिवू लागले. भरमू रडाय लागला. हाता-पायाला खरचाटलं हुतं. रगात याल्तं. अंग, कापडं काळं-घाण झाल्तं. कुणीच म्होर आलं न्हाई. भरमू सोताला सावरत कसा बसा उटला अन गटरीच्या वर आला. भायेर यून बसला अन हमसू लागला. लोकं हसत त्येच्या भवती गोळा झाली अन त्येच्यासमूर रुप्प्यांचा पाऊस पडाय लागला. धा, ईस, पन्नास, संबर, तीनसे !

            भरमूला सारंच धुसर दिसत हुतं. पडाल्यात ते रुप्पे का टपोरं पाण्याचं थेंब तेच कलत नवतं. गर्दी पांगाय लागली. नदरंतलं पाणी आटल्याव त्येनं एकवार त्या रुप्प्यांवरनं नदर फिरीवली अन त्येंच्यावं पाय दिवून त्यो निगून जायाय लागला. त्यो रुप्पं न घिताच चालल्यालं बगून बाकीची सोंगी खात्यालं तितंच टाकून त्या रुप्प्यांकडं धावली अन एकमेकाबरूबर हाणामारी कराय लागली. बाजूच्या नळाखाली भरमू बसला अन अंग धुवाय लागला. जरा येळानं भरमू उटला. सोंग्यांच्यात आपापसात बाचाबाची सुरू व्हती. स्टॅण्डजवळच्या एका वळकीच्या दुकानात गेला. तितं त्येनं एक बोचकं ठिवायला दिलं हुतं. त्ये घितलं अन एका डिगडीगीसमोर हुबं र्‍हाऊन ईचारलं,

“पाटणेफाटा ?”

“हां...बस..”

भरमू बसला आणि बोचकं सोडून एक एक पायताण पुसू लागला...    

 

-अनुप

 

वाचकहो,

गेल्या दोन महिन्यांपासून स्वत:च्या स्टुडिओच्या मार्केटिंगसाठी बेळगांव, आजरा, चंदगड, गडहिंग्लज, शिरोळ, धारवाड, हुबळी या परिसरात सातत्यानं फिरणं होत होतं. बरोबर ३ आठवड्यांपूर्वी चंदगड तालुक्यातील एका ठिकाणी एका मिटींगसाठी गेलो असताना तिथं “सोंगं” सुरू होती आणि वरची घटना माझ्या नजरेसमोर घडली. ही घटना कांही केल्या मनातून जात नव्हती. शब्दबध्द करतानाही बर्‍याचदा फॉर्मचाही घोळ झाला पण माझ्यासाठी फॉर्मपेक्षा ती भयानकता मांडणं खूप महत्वाचं होतं ! काय आहोत आपण ? खरंच माणूस म्हणून घेण्याची लायकी तरी आहे का आपली ? आपण खरंच सुधारतो आहोत की पुन्हा आपल्याला दारिद्र्याचे, पशूत्वाचे डोहाळे लागले आहेत ? हेच उमगायला मार्ग नाही. एकूणच सगळेच सुधारणावादी मूर्ख होते की काय किंबहुना आहेतच ! असाच सूर उमटताना दिसू लागला आहे. “जुना काळ खूप छान होता हो !!!” असं म्हणताना त्याच्या जोडीला आपोआप येणारी भयानकता आजच्या तरुण पिढीला का दिसत नाहीये ? हेच कळत नाहीये. मी एवढी पुस्तकं वाचली, तेवढी वाचली अशा फुशारक्या मारणारी तरुणाईची एक जमात फोफावताना दिसत आहे मात्र किती वाचलं त्यापेक्षा काय वाचलं, कसं वाचलं, काय घेतलं ? हे महत्वाचं नाही का ? शिवाजीराजांबद्दल बोलताना पोवाडे, “नाटकं”, भाषणं यांच्यामधून माहित झालेल्या इतिहासाऐवजी किती जणांनी त्यांचा खरा इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न केला ? त्यांच्या ३८४ किल्ल्यांपैकी किती किल्ल्यांना भेटी दिल्या ? तिथला इतिहास झापडं काढून किती जणांनी समजून घेण्याचा प्रयत्न केला ? अशी कितीतरी महान नेत्यांची, सुधारकांची नावं देता येतील. ज्यांनी आपली सारी हयात सर्वांना समान वागणूक, न्याय मिळावी म्हणून समाजासाठी समर्पित केली, त्यांनाच आज आपण हद्दपार करू पहात आहोत.

वाचकहो, याच वेगानं आपण जर स्वत:चं डोकं न वापरता, दुसर्‍यांच्या डोक्यांनी जगू लागलो तर येत्या नजीकच्या काळात आपणच एकमेकांची डोकी फोडून मरून जावूत, हेच आजच्या भारताचं जळजळीत आणि भयावह सत्य आहे ! वेळ हातात आहे, एकमेकांचे हात-पाय कलम करण्याच्या विचारांपेक्षा एकमेकांचे हातात हात मिळवूनच आपण आपल्या देशाला महासत्ता बनवू शकतो याचा विचार आपण सर्व तरुण पिढीनं करणं अत्यंत निकडीचं आहे. भारत महान होताच, आहेच पण याच भारताचे महानपण टिकवायचे असेल तर निव्वळ दुसर्‍यांच्या पायांवर डोकं गहाण ठेवणारे साक्षर होण्यापेक्षा खर्‍या अर्थाने सुशिक्षित होवूया, ही नम्र विनंती !

 

COGNIZANCE: All written creative material is the solemn property of “An Anup Jatratkar Multi-Media Production”. If anyone wanted to use it for his/her own personal purpose (i.e. short film, projects, blogs, articles, scripts, FB posts etc.) then, have to take proper permission from, Mr. Anup Jatratkar. If it will be found that, anyone involved in such activities without prior permission, then, we are able to take certain charge on him/her. 

Pen Image

Pen Index