Pen


PEN 34-1 :दीर्घकथा २ : What The F****…!!!

प्रकरण २

 

            दुसरे दिवशी कियारा लवकर आवरून ऑफीसला जाण्यासाठी निघाली. कधी एकदा पायलला भेटून रात्रीचा किस्सा सांगते असं होवून गेलं होतं. इतकी उतावीळ कियारा आजवर कधीच झाली नव्हती. रात्रीपासून कांही केल्या सोहमचा फोटो कियाराच्या नजरेसमोरून हलत नव्हता. कियाराच्या स्वभावाच्या विपरित सार्‍या भावना बंड केल्याप्रमाणे विचित्र आणि अगदीच तर्‍हेवाईकपणे वागत होत्या. आपल्याच तंद्रीत कियारा अपेक्षेपेक्षा जास्तच लवकर ऑफीसच्या आवारात पोहोचली. चौकशीअंती पायल फिल्डवर गेल्याचं कळलं.

            काल मध्यरात्री एका तरुणानं आत्महत्या केली होती आणि त्या घटनेची चौकशी करण्याचे आदेश हेड-क्वार्टरकडून पायलला देण्यात आले होते. पोलिसांसोबत घटनास्थळी पायल याच कामगिरीवर दाखल झाली होती. कांही मिनीटातच कियाराही तिथं पोहोचली होती. सुरूवातीला तिला तिथं पाहून पायलला धक्काच बसला. कारण, कियारा दुसर्‍याच्या कामाच्या ठिकाणी वरून आदेश आल्याशिवाय कधीच जात नव्हती. कियाराला पाहून सार्‍यांनीच आदराने सॅल्यूट केला. तिथलं वातावरण फारच भयानक होतं. विशीतला तरुण मुलगा एका वृध्द जोडप्याच्या घरी, वरच्या मजल्यावर पेईंग गेस्ट म्हणून रहायचा. वैद्यकिय विद्यालयात तो शिकायचा. गळ्याच्या खालचा पोटापर्यंतचा भाग जळून गेला होता. कियाराची नजर त्याच्यावर स्थिरावली.

“एसिड प्यायलाय..” पायलनं माहिती पुरवली.

कियाराच्या कपाळावर आठ्या जमा झाल्या. ती आजूबाजूला अस्वस्थ होवून पाहू लागली. भिंतीवर पॉझिटीव्ह थिंकींगचे थॉट चार्ट लावले होते. विविध डायग्राम्स चिकटवल्या होत्या. टेबलवर जर्नल उघडे ठेवले होते. कियारा त्या जर्नलच्याजवळ जावून पाहू लागली. त्या दिवसाची तारीख लिहीली होती. बहुतेक तो त्याच्या होमवर्क करत असावा. कपड्यांची बॅग नीट आवरून ठेवली होती. पुस्तकं नीट रचून ठेवली होती. एका कोपर्‍यातल्या टेबलवर त्याला मिळालेले पुरस्कार रचून ठेवले होते. त्याच्या बाजूला बॅडमिंटनचा सेट होता. त्याच सेटच्या खाली कसलातरी कागद ठेवला होता. कियारा त्याच्याजवळ जावून पाहू लागली. पुढच्या आठवड्यातली इंदौरची तिकीट होती. कियारानं पायलकडं प्रश्नार्थकपणे पाहिलं.

“बॅडमिंटन खेळायचा. पुढच्या आठवड्यात इंदौरला होणार्‍या इंटर युनिव्हर्सिटी बॅडमिंटन चॅम्पियनशिपसाठी जाणार होता.”

कियारानं मान डोलावली.

“याच्या अंगावर कांही खुणा ? आय मीन झटापटीच्या ?”

“नाही मॅडम. त्याच्या शरीरावर कसल्याच झटापटीच्या खुणा नाहीत !”-बाजूला उभ्या पोलिसाने तिला माहिती पुरवली.

तोंडाला रुमाल लावून ती त्या मृतदेहाच्या जवळ जावून निरखून पाहू लागली. त्या तरुणाच्या टेबलखाली, खेळताना घालतात तसला रिस्ट-बॅण्ड होता. पण तो खूपच जुनाट आणि तणावरहित लांबुडका झाला होता. टॆबलवर दोन पेले ठेवले होते. खोलीत शंकास्पद वाटावे असे कांहीच नव्हते. कियारा पहात असतानाच बाहेरून कुणाच्यातरी रडण्याचा आवाज ऐकू येवू लागला.

“याचे आई-वडिल आहेत. मघाशीच पोहोचलेत. बीडवरून आलेत. वरूण नाव याचं. दोन दिवसांनी गावी येतो म्हणून त्यानं सांगितलं होतं फोन करून आणि तिकडूनच तो इंदौरला जाणार होता. पण अचानक त्याच्या आत्महत्या करण्यानं तेही हादरून गेले आहेत.”-पायल

“आत्महत्या नाहीये ही पयू...ईट्स कोल्ड ब्लडेड मर्डर !”- कियारा सार्‍यांवरून नजर फिरवत म्हणाली.

“काय !? कसं शक्य आहे किया ?”

 “जो मुलगा आत्महत्या करणार आहे, तो त्याचं जर्नल पूर्ण का करत असेल ? उत्सुकता आणि उताविळपणामुळे, आत्महत्याच करायची होती तर इंदौरचं तिकीट नजरेसमोरच का लटकवून ठेवलं असेल ? ज्यानं इतके पुरस्कार मिळवलेत, ज्याचं एक्च्युअली स्वप्न आहे बॅडमिंटन खेळणं तो अचानकच, तेच स्वप्न समोर असताना आत्महत्या का करेल ? डस्टबिनमध्ये बीडची आगावू बुक केलेलं तिकीट पडलं आहे, ज्यावरची तारीख काल सकाळची तारीख दाखवत आहे, आत्महत्या करायचीच होती तर सकाळी जावून बुकींग का करून येईल. टेबलखालचा रिस्ट-बॅंड एका ब्रॅंडेड कंपणीचा आहे. आणि तरिही तो इतका लूज का पडला असावा ? कारण तो बॅंड त्याच्या दोन्ही हातांना अडकवण्यासाठी वापरला होता आणि हे होत असताना वरूण सुटण्यासाठी धडपडत होता म्हणूनच त्याचा शेप बदललाय. वरूण एकटाच रहात असताना दोन ग्लास तो का वापरेल ? आणि ग्लासवरील चिकट ओघळावरून, कुणीतरी रम पिलीये...”-कियारा ग्लास उचलून तो नाकाला लावते, “सॉरी ब्रॅंडी पिलीये. जर त्याला एसिडच प्यायचं होतं तर तो ब्रॅंडी का प्यायला असेल ? बर ठिक आहे, असं समजू, धीर येण्यासाठी प्यायला असेल ! मग अशावेळी गटागटा बाटली तोंडाला लावून तो ती रिचवून टाकेल की दोन पेले घेवून दोन्ही पेले भरून सावकाश घोट घेत....”-कियारा गुडघ्यावर बसते आणि मुंग्याच्या रांगेकडे बघते. ती पुढे पुढे सरकू लागते. भिंतीजवळ पडलेला शेवचा तुकडा उचलत,

“...पाय पसरून, निवांत बसून शेव खात दोन्ही पेल्यातली ब्रॅंडी रिचवून, बाटलीची विल्हेवाट लावून मग एसिड हातात घेवून ते पिवून टाकेल, असं नाही वाटत मला !”

सारे डोळे विस्फारून कियाराकडं पहात होते.

“मग मॅडम कोण केलं असेल ?”-एक पोलिस अतिशय निरागसपणे आणि उत्सुकतेनं विचारून गेला.

कियाराचा जळजळीत कटाक्ष त्याची सारी उत्सुकता नाहीशी करायला पुरेसा होता.

“ते आता तुम्हाला शोधून काढायचंय, नाही का?”-कियारा

            सार्‍या औपचारिकता पूर्ण करून पायल कियारासोबत निघाली. कियाराच्या डोक्यातून “तो” अजूनही जात नव्हता.

“कसलं भारी यार किया...एक नंबर”-पायल कौतुकानं म्हणाली.

“पण बोलून बसले ना, त्याचं काय करू ?”

“अगं म्हणून तर कळालं ना !”-पायल

“काय कळालं पयू..?”-कियारा

“अगं असं काय करतीयेस ? आत्ताच्या केसबद्दल बोलतीये...”-पायल

“ते होय ! त्यात काय एवढं..डोळे उघडे ठेवून पाहिलं तर सगळं नीट दिसतं..! अगं पण माझा तो मुद्दाच नाहीये ! मी कशाला आले होते आणि कशात अडकून पडले...!!”-कियारा वैतागून म्हणाली.

“किया, काय झालंय..?”

कियारानं गाडी एका टपरीजवळ घेतली आणि चहाचे घोट घेत घेत रात्रीपासूनची कहाणी कथन केली.

“डोन्ट टेल मी किया, तुला तो इतका आवडलाय ?”

“ते माहित नाही पण कालपासून अस्वस्थ वाटतंय मला. सुचत नाहीये, काय करावं !”-कियारा

“अगं मग सांगून टाक ना घरी...”-पायल

“आमच्या कैलूला तेच हवं असेल...फिदीफिदी दात काढून हसेल आणि सगळ्या नातेवाईकांना फोन लावून सांगत सुटेल. तुला सांगते, ह्या आमच्या कैलाशला ना एकदा बुकलून काढणारेय...”-कियारा

“अगं हो...हो...! भाऊये तो तुझा...तेही सख्खा !!”-पायल

“म्हणूनच बुकलणारेय ! नालायक, चिडवायची एक संधी नाही सोडत !”-कियारा चहाचा घोट घेत. कांही क्षण विचार करते.

“पयू, काय वाटतं तुला ? मी त्याला होकार द्यावा ?”

 “तुला पटणार असेल तर सांगू का ? नाहीतर उगाच माझ्यावर तुझी चिडचिड नकोय...”

“नाही गं चिडणार...”

“उगाच वैतागू नको हं...”

“सांग ना कोंबड्ये...कशाला भाव खातीयेस !”

“किया, तुला जर तो खरंच आवडला असेल तर, त्याला भेट, ओळख करून घे आणि सरळ होकार देवून रिकामी हो...उगाच ईगो ईश्यू नको करत बसू..”

“फोटोत तरी बरा दिसतो यार...व्यवसाय पण चांगला...डिफर्न्ट आहे फक्त जरा स्वभाव आणि माणूस कळला ना की बरं होईल..”

कियारा बोलत असतानाच ब्रॅंचमधून आलेल्या फोननं दोघी भानावर आल्या. बराच वेळ झाला होता. दोघी गडबडीनं निघाल्या.

            दिवसभर कियाराच्या मनात सोहमचाच विचार सुरू होता. घरच्यांना कियाराचा होकार कळल्यावर किती मोठा धक्का बसेल, याचा विचार करून कियारा अचानकच मधेच स्माईल करायची आणि स्वत:शीच लाजायची. आज सार्‍यांनाच तिच्याकडं पाहून आश्चर्याचा धक्का बसत होता. ऑफीसमध्ये नेहमी गंभीर असणार्‍या कियाराच्या चेहर्‍यावर आज सतत स्माईल होतं. अनेकांनी खोदून खोदून विचारायचा प्रयत्नही केला पण व्यर्थ !

            कियारा संध्याकाळी जरा लवकरच घरी आली.बाबाही नुकतेच घरी आले होते. चहा घेता-घेताच कियाराने सोहम पसंत असल्याचं सांगितलं. चहा घशात अडकून बाबांना ठसक्याची जोराची उबळ आली. कियारा लाजत होती आणि हळूच लाजत तिनं आईकडं नजर टाकली. आईचा चेहरा उतरला होता. कांहीच कळायच्या आत आईनं तोंडाला पदर लावला आणि रडायला सुरूवात केली. बाबाही गंभीर झाले होते. कियाराला कांहीच कळेना.

“आई...आई...काय झालंय ? न रडता नीट सांगशील का ? ”

मोठ्या मुश्किलीनं आईनं स्वत:ला सावरत कियाराकडं कटाक्ष टाकला, “तुलाही आत्ताच होकार द्यायचा होता !?”

“व्हॉट दज ईट मीन ? नीट सांग आई...”

आईला थोपवत बाबाच मधे पडले, “किया बाळा, सोहमनं नकार कळवलाय !”

कियाराच्या भुवया ऊंचावल्या गेल्या. क्षणभर, आपण ऐकलं ते खरं आहे का ?, यावर विश्वास बसेना.

“आर यू किडींग मी ?”

“ऑफकोर्स नॉट डिअर..”

“आय कान्ट बिलीव्ह ईट !”-कियारा रागानं उठली आणि तरातरा घराच्या बाहेर निघून गेली.

एक कालची रात्र आणि आजची ही रात्र !

            रात्री बर्‍याच वेळाने कियारा घरी परतली आणि कांहीच न खाता झोपी गेली. खरंतर झोप येता तेत नव्हती. या कुशीवरून त्या कुशीवर वळण्यातच रात सरली. बहुतेक घड्याळाच्या काट्यांनाही मणा-मणाचं ओझ झालं असावं, कियाराच्या दु:खानं ! म्हणूनच साले गोगलगाईला लाजवेल इतक्या मंद गतीने चालत होते !

            एक-दोन दिवसांपर्यंत असं चालेल आणि नंतर सारंच नीट, सुरळीत, पूर्वपदावर येईल असं सार्‍यांनाच वाटत होतं पण दिवसागणिक कियारा अजूनच जास्त विचित्र वागू लागली होती. क्षुल्लक गोष्टींवर चिडायची, कुठल्याही क्षणी सोहमला आठवून शिव्या घालयची मग, समोर कुणी का असेना ! सुरूवातीला सार्‍यांनीच गंमतीनं हे घेतलं पण नंतर-नंतर मात्र सारेच गांभीर्यानं या प्रकरणाकडं पाहू लागले. इतकं मनाला लागण्यासारखं काय होतं कुणास ठाऊक पण एक गोष्ट मात्र सगळ्यांनाच समजत होती ती म्हणजे, मनाला लागण्यासारखं नक्कीच कांहीतरी होतं ! कियारा हे सारं कळत नव्हतं अशातला अजिबातच भाग नव्हता. तिलाही कळत नव्हतं आपण असं का वागतोय ? यातच भरीस भर म्हणून की काय, नुकतच तिला खूप मोठ्या अपमानाला सामोरं जाव लागलं होतं. कांही आठवड्यांपूर्वी झालेल्या वरूण

 नामक तरुणाच्या प्रकरणात भावनेच्या भरात कियाराने चुकीचे क्लू दिले होते. कोणत्याही प्रकारची केस स्टडी न करता आणि विशेषत: स्वत:ची केस नसताना स्वत:ची निरीक्षणं सांगण्याची गरजच काय होती ? अशाप्रकारची कानौघडणी केल्यानंतर कारणे दाखवा नोटीसही तिला बजावण्यात आली होती.

            वरुणनं एका मुलगीसाठी आत्महत्या केली होती, हे तपासाअंती स्पष्ट झालं होतं आणि त्याच्या आदले दिवशी मित्रासोबत आपण स्टेट लेवलला खेळायला जाणार म्हणून सेलिब्रेशन म्हणून ब्रॅंडी घेतली होती. त्या दिवशीचा उतावळेपणा आणि फाजील आत्मविश्वास कियाराला नडला होता. तिच्या मनाला ही गोष्ट फार लागली होती पण, तरिही सोहमचा विचार कांही केल्या तिच्या मनातून जात नव्हता ! एके रात्री विचार करत कियारा टेरेसवर बसली होती. हल्ली ती फारशी कुणासोबतच बोलत नव्हती. गप्प-गप्प असायची. नेहमी स्वत:च्याच विचारात गुंतलेली असायची. कुणी हाक मारली तर दचकायची. हे सोहम प्रकरण तिच्या अंगाशी येईल की काय अशी स्थिती निर्माण झाली होती. अशाच विमनस्क अवस्थेत शून्यात पहात बसलेली असताना अचानक तिच्या मनात एक विचार आला आणि उत्तेजीत होवून ती धाडधाड जीना उतरून आपल्या रूमच्या दिशेने पळाली. चार्जींगला लावलेला आपला स्मार्ट फोन तिनं उचलून आपल्या हातात घेतला आणि पुन्हा पळत टेरेसवर आली. जरावेळ दम खावून ती भिंतीला टेकून खाली बसली. तिच्या चेहर्‍यावर विचित्र स्मित होतं आणि नजरेत विकृती-ऑबसेशन दिसत होतं.

            कियारानं आपलं फेसबुक अकाऊंट ओपन केलं. इतक्या वर्षांच्या अनुभवानंतर ती एक गोष्ट शिकली होती, ती म्हणजे आजच्या सोशल मिडीयाच्या जगात कोणतीच गोष्ट रहस्य किंवा गुपित ठेवू शकत नाही किंवा रहात नाही. अकाऊंट ओपन झाल्यावर डाव्या बाजूच्या ग्रे स्पेअसमध्ये तिनं राईट क्लिक केलं. एक दायलॉग बॉक्स ओपन झाला आणि तिनं “व्ह्यू पेज सोर्स” या ऑप्शनवर क्लिक केलं. त्यानंतर स्क्रिनवर असंख्य कोडींग असलेले पेज ओपन झाले. कियारानं कंट्रोल एफ दाबलं आणि कर्सर आपोआप एका ठिकाणी जावून थांबला. कियारानं “इनिशिअल चाट” ऑप्शन शोधून त्याच्या समोरचे आकडे पाहू लागली. ते आकडे अर्थात “युजर्स आय.डी.” होते. ज्यांनी ज्यांनी कियाराच्या फेसबुक प्रोफाईलला जावून तिचं प्रोफाईल तिच्या नकळत पाहिलं होतं त्या सार्‍यांचे ते युजर आय.डी. होते. कांही वेगळे नंबर होते पण एक नंबर ठराविक वेळाने रिपीट झाला होता. ति तिनं कॉपी केला आणि आपल्या होम-पेजवर जावून “सर्च बॉक्स”मध्ये तो आकडा टाकला आणि आश्चर्य कांही क्षणात तो नंबर जावून तिथं एका व्यक्तीचं नाव आणि त्याचं प्रोफाईल दिसू लागलं. सुरूवातीला उत्सुकनें पहाणार्‍या कियाराच्या कपाळावर आठ्या उमटल्या आणि मग त्याची जागा पहिल्यांदा प्रश्नार्थक मुद्रेने मग आश्चर्याने आणि सर्वात शेवटी भीतिने घेतली. समोर दिसणारा फोटो सोहमचाच होता मात्र त्याखाली नाव होते, “मिथिलेश”. कियारासाठी हा खूप मोठा धक्का होता कारण मिथिलेश हा कियाराचा कॉलेजमधला मित्र होता आणि ज्याचा सहा महिन्यांपूर्वी खून झाला होता. कियारानं परत-परत पाहिलं. प्रत्येक आय.डी. क्रॉस चेक केला. तो मिथिलेशचाच होता आणि सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे, त्यानं कियाराच्या प्रोफाईलला व्हिजीट केलेला टाईम स्पॅन मागच्या महिन्याभरात सर्वाधिक होता !

            जे होतं ते कियाराच्या कल्पनेपलिकडचं होतं. कांहीतरी चुकत होतं...कांहीतरी हातातून निसटत होतं...कांहीतरी मनात पोकळी निर्माण करत होतं...कांहीतरी होतं, जे कियाराच्या कल्पनेपलिकडचं होतं आणि आता ते वर-वरच प्रकरण नक्कीच राहिलं नव्हतं ! कियाराचा चेहरा पांढरा फट्टक पडला होता. नजरेत भीति होती. घामानं पूर्ण भिजली होती. तोंडावर हात ठेवून किंचाळी फुटू न देण्याचा ती केविलवाणा प्रयत्न करत होती !

 

-अनुप

(क्रमश:)       

 

 

            COGNIZANCE: All written creative material is the solemn property of “An Anup Jatratkar Multi-Media Production”. If anyone wanted to use it for his/her own personal purpose (i.e. short film, projects, blogs, articles, scripts, FB posts etc.) then, have to take proper permission from, Mr. Anup Jatratkar. If it will be found that, anyone involved in such activities without prior permission, then, we are able to take certain charge on him/her.  

Pen Image

Pen Index