घड्याळात रात्रीचे ११ वाजून
गेले होते. सोहम वैतागून पेशंटसाठी असलेल्या कन्सल्टिंग सोफ्यावर पडला होता. खरं
तर आज साराच विचका झाला होता. मित्राच्या वाढदिवसाला जाण्याचा प्लान होता. पब,
बिअर, डान्स, गॉसिपिंग असा सारा तामझाम होता शिवाय सोबत कांही रशियन मुलींना बर्थ-डे
बॉयनं इन्व्हाईट केलं होतं आणि खरं तर सर्वांच्या एक्साईटमेंटचं ते खरं कारण होतं.
साधारण ८ च्या आसपास सोहम आपलं कन्सल्टिंग क्लिनीक बंद करत असतानाच त्याच्या
ऑफीसचा फोन घणघणला. सुरूवातीला दुर्लक्ष करून तो लॉक करून वळला. फोन बंद झाला आणि
पुन्हा सुरू झाला. पायर्या उतरून गाडीजवळ जावूपर्यंत ३-४ वेळा असं झालं शेवटी
त्याच्यातील मानसोपचारतद्न्यानं “रशियन” विचारांवर मात केली आणि “कांहीतरी खूपच
महत्वाचं असेल !” असा विचार करून तो झटझट आत आला. तो येवून फोन उचलणार इतक्यात फोन
बंद झाला. डेस्कजवळ पुढंची १० मिनीटं थांबून तो वैतागला आणि जाण्यासाठी वळणार तोच
पुन्हा रिंग वाजली. त्यानं गडबडीनं फोन उचलला,
“हॅलो...”
पुढचे कांही क्षण शांतता आणि
मग एका मुलगीच्या मुसमुसण्याचा आणि धापण्याचा आवाज.
“हॅलो, एम आय स्पिकींग विथ
डॉ. सोहम ?”- त्या आवाजानं घाबरत किंबहुना कापर्या-थरथरत्या आवाजात विचारलं.
“एस ! डॉ. सोहम हि ऽ ऽ र.
हाऊ कॅन आय हेल्प यू ?”
“डॉक्टर...माझ्यावर कुणीच
विश्वास ठेवत नाहीये...सगळे मला वेडी झालीयेस म्हणताहेत...! आय नीड युवर
हेल्प...प्लिज डॉक्टर...हेल्प मी आऊट !”-तो आवाज रडत, विनवणी करत म्हणाला.
“शुअरली आय वील हेल्प यू
आऊट. कम टूमॉरो एट १० ए.एम. शार्प !”
“डॉक्टर, आपण आज भेटलं तर
नाही का चालणार ?”
“हे बघा...क्लिनीक बंद करून
मी निघालोच होतो...एका कार्यक्रमाला जायचं आहे मला ! उद्या सकाळी नीट भेटून
सविस्तर बोलू...तुम्ही काळजी नका करू !”
“डॉक्टर, जर मी तुम्हाला
सांगितलं आज कदाचित माझा किंवा दुसर्याचा माझ्यामुळे खून होवू शकतो, तरिही तुम्ही
मला मदत करू शकणार नाही ?”
तिच्या वाक्यानं सोहम
चक्रावला, “हे बघा, असं कांही असेल तर, मी सल्ला देईन की, तुम्ही तातडीनं पोलिसात
कंप्लेंट करा !”
“डॉक्टर सोहम, तुम्ही तुमची
जबाबदारी झटकू पहाताय का ? तुम्हाला जर शक्य नसेल तर तसं स्पष्ट सांगा पण दुसर्या
कुणाला भेटण्याचा सल्ला देवू नका कारण, मला तुमच्यावर सर्वात जास्त विश्वास आहे !”
सोहम मनातून चरफडला होता.
त्याला काय बोलावं सुचेना आणि नेमकं हेच त्या समोरच्या स्त्री-आवाजानं ताडलं.
“तुमची शांतता म्हणजे, होकार
समजू ना ? ओ.के. थॅंक्यू डॉक्टर...वेट फॉर मी प्लिज...आय एम कमिंटू टू युवर
क्लिनिक !”
सोहमच्या उत्तराची वाट न
पहाताच तिनं फोन ठेवून दिला.
“व्हॉट द फ...! ह्या बायका
स्वत:ला हवं तसं वागवतात पुरूषांना...त्यांच्या सोयीनं अर्थ घेतात समोरच्याच्या
मौनाचा !”-सोहम फोन ठेवताना स्वत:शीच मोठ्याने म्हणाला आणि हेच कारण होतं कियाराला
नकार देण्याचं !
*****
कियाराच्या आयुष्यात गेल्या दोन आठवड्यांपासून जे कांही
सुरू होतं ते एखाद्या चित्रपटाला शोभेल असं होतं. रात्रीचे दोन वाजून गेले होते.
कियारा धक्का बसल्याप्रमाणं शून्यात हरवून भर रस्त्यात उभी होती. पोलिसांचं
गस्तीपथक जात असताना त्यांनी तिला तिच्या तंद्रीतून जागं करून घरी जाण्यास
सांगितलं होतं. कियारा घरी जायला निघाली खरी पण तिची पावलं आपसूक मिथिलेशच्या
घराच्या दिशेने निघाली.
मिथिलेश. कियाराचा शाळेपासूनचा मित्र. अभ्यासात हुशात.
वक्तृत्व स्पर्धा-वादविवाद स्पर्धा, प्रश्नमंजुषा स्पर्धा यांच्यात सतत बक्षिसं
मिळवणारा. शालेय जीवनात कियाराच्या डिटेक्टिव्हगिरीला जर कुणी साथ आणि प्रोत्साहन
दिलं असेल तर तो मिथिलेश होता ! तो सतत तिची बडबड, निरीक्षणं ऐकून घ्यायचा. तिला
अभ्यासात मदत करायचा. खरं तर तेंव्हापासूनच मिथिलेशला कियारा आवडायची पण त्यानं
तसं कधी तिला संगितलं नाही. १० वीनंतर दोघांनी आपापल्या आवडीनुसार प्रवेश घेतला
मात्र आठवड्यातून दोघांची एकदा भेट ठरलेली असायची. या दोघांना जोडणारी आणखी एक
गोष्ट म्हणजे, दोघांनाही कोड लॅंग्वेज हा प्रकार भयानक आवडायचा. कित्येक कोड
लॅंग्वेजीस असूनही दोघांनाही “क्वर्टी कोड लॅंग्वेज” (Qwerty Code) विशेष आवडायची ! आज जेंव्हा तिनं सोशल मिडीयावर
सोहमच्या फोटोखाली मिथिलेश (MITHILESH) हे नाव पाहिलं ते क्वर्टी
कोड मध्येच (DOZIOSTLI) लिहीलेलं होतं, म्हणूनच
कियाराला धक्का बसला होता !
१२ वी नंतर मिथिलेश शिक्षणासाठी दिल्लीला निघून गेला पण
त्यानंतरही दोघांचा संपर्क होताच ! दोघेही एकमेकांना क्वर्टी भाषेत मेल करायचे.
त्याच्या शेवटच्या मेलमध्ये त्यानं, “O SGCT X AONKQ”
(I LOVE U KIYARA) असं स्पष्टपणे तिला सांगून टाकलं होतं. कियाराला धक्का बसला होता आणि ते
स्वाभाविकही होतं कारण तिनं सर्वात चांगला-जवळचा मित्र, या चष्म्यातूनच त्याला
पाहिलं होतं. मधे बरीच वर्षं निघून गेली आणि अचानक सहा महिन्यांपूर्वी बातमी आली
ती म्हणजे, मिथिलेशच्या खूनाची ! तपासांती अपरात्री भटकणार्या टोळक्याने
पैशांसाठी मिथिलेशला मारहाण केली होती आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला होता.
कियाराला ही बातमी कळली तेंव्हा खूपच अस्वस्थ झाली होती ती ! मिथिलेशचं कुणासोबत
वैर असण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता त्यामुळे दिल्ली पोलिसांच्या रिपोर्टवर
विश्वास ठेवण्याशिवाय पर्याय नव्हता. कियारा हळू हळू सारं विसरून गेली, मिथिलेशलाही
! आणि अचानक सहा महिन्यांनंतर मिथिलेश असा तिच्या आयुष्यात येईल, असा कियाराने कधी
स्वप्नातही विचार केला नसेल.
कियारा मिथिलेशच्या दारासमोर पोहोचली तेंव्हा पहाटेचे ३.३०
वाजले होते. त्या घरात त्याचे आई-बाबा रहायचे. ती बराच वेळ त्या घराकडे पहात उभी
राहिली आणि मग मागे फिरली. कियारा घरी पोहोचली तेंव्हा ५ वाजले होते. तिचे
आई-वडिल, भाऊ सारे काळजीत पडले होते. हॉलमध्ये बसून होते. कियाराला दारात आलेलं
पहाताच आई तिच्याकडं धावली. कियाराची अवस्था बघून बाबांच्या अंगावर काटा आला. केस
विस्कटलेले. डोळ्य़ातलं काजळ विस्कटलेल. कपडे घाण झालेले. आई तिला आत घेवून आली आणि
तिला सोफ्यावर बसवलं. सारे डोळे विस्फारून तिच्याकडं पहात होते.
“आई, प्लिज जरा मला सोहमचा
फोटो दाखवशील ?”
“किया बाळा...काय चालवलंयेस
तू !? का नकार पचवू शकत नाहीयेस तू ? सोड तो विषय !”
“प्रश्न नकाराचा नाहीये आई !
प्लिज आत्ता मला कांही विचारू नका...फक्त आत्ता मला तू त्याचा फोटो
दाखव...प्लिज...ईट्स अ रिक्वेस्ट !”
आईनं बाबांकडं पाहिलं.
त्यांनीही “दाखव” म्हणून खुणावलं. उसासा टाकून आई उठली आणि आत निघून गेली. तोवर
कैलाश तिच्यासाठी पाणी घेवून आला.
“दिदी...पाणी घे !”
कियारा पाणी पिवून मागे डोकं
टेकून बसली होती तोच तिच्यासमोर आईनं एक फोटो धरला. कियारा वैतागली,
“आई प्लिज यार...मला आत्ता
कुठल्याही नवीन स्थळाचा विचार करायचा नाहीये ! मी तुला सोहमचा फोटो दाखव म्हणून
सांगितलं...नव्या स्थळाचा नाही !”
“किया, तू काय वेडी झालीयेस
का ? मी तुला आत्ता अशावेळी नव्या स्थळाचा फोटो का दाखवेन ? हा सोहमचाच फोटो
आहे...नीट बघ !”-आई
कियाराने तिच्या हातातून
फोटो हिसकावून घेतला. हा फोटो तो नव्हताच, जो तिनं त्या दिवशी पाहिला होता !
“आई खोटं का बोलतीये !?”
मियारानं शंकेनं तिच्याकडं पाहिलं.
“कियारा...ट्रस्ट मी...हा
तोच फोटो आहे !” तिच्या मनातलं कळल्याप्रमाणं आली बोलली. कियारा गडबडीनं उठली आणि
आपल्या खोलीत जावून लॅपटॉप सुरू केला. फेसबुक प्रोफाईल ओपन करून तिनं मिथिलेशचा
प्रोफाईल ओपन केला आणि तिला दुसरा जोरदार धक्का बसला, तो म्हणजे ते प्रोफाईल
मिथिलेशचे नव्हतेच ! तिथे सोहमचाच फोटो होता, जो आत्ताच आईने दाखवला होता आणि
प्रोफाईलवर “सोहम”चेच नाव होते ! कियाराचं डोकं गरगरू लागलं.
“हा प्रोफाईल सोहमचाच होता..आहे,
मग मिथिलेश मध्येच आला कुठून !?” तिनं स्वत:ला प्रश्न विचारला. कियारा फोटो हातात
घेवून तो बारकाईनं पाहू लागली आणि अचानक तिच्या लक्षात एक गोष्ट आली, ती म्हणजे,
सोहमच्या फोटो मागे “क्वर्टी” भाषेत एक संदेश लिहीला होता. कियाराचे डोळे
विस्फारले. तिनं नजर प्रोफाईलकडं वळवली. तिथंही क्वर्टीमध्येच त्यानं आपलं नाव
लिहीलं होतं ! क्वर्टी हा त्या तिघांमधला समान धागा होता !
कियाराला तिच्या मनाचे खेळ कळत नव्हते. काय खरं ? काय खोटं
? यांचा तिच्याच मनात घोळ उडू लागला होता. क्वर्टी पाहून तिच्या मनाला स्टिम्युलस
मिळाला होता आणि ती तेच पाहू लागली होती जे तिचं मन तिला दाखवू पहात होतं !
कियाराचा स्वत:वरचा ताबा सुटला आणि त्या भयाण शांततेत मोठ्याने किंचाळून कियारा
बेशुध्द पडली !
(क्रमश:)
COGNIZANCE: All written
creative material is the solemn property of “An Anup Jatratkar Multi-Media
Production”. If anyone wanted to use it for his/her own personal purpose (i.e.
short film, projects, blogs, articles, scripts, FB posts etc.) then, have to
take proper permission from, Mr. Anup Jatratkar. If it will be found that, anyone
involved in such activities without prior permission, then, we are able to take
certain charge on him/her.