Pen


PEN 34-3 : दीर्घकथा २ : What The F****…!!! : प्रकरण ४

समुद्राच्या लाटा जोरजोराने किनार्‍यावर येवून आदळत होत्या. भर समुद्रात ती एक छोटेखानी स्वत:चं बेट तयार करू पहात होती..हो, स्वत:चं ! जिथं तिला हवं तसं रहाता येणार होतं. कुणीच तिला जाब विचारणारं असणार नव्हतं. ते तिचं जग होतं...ते तिचं विश्व होतं ! अचानक तिचं लक्ष दूरवर फेसाळत उधाणलेल्या सागराच्या अगदी पार त्या टोकाला गेलं. क्षितीजावर बारीकशी, अस्पष्ट रेघ ठळक होत जाताना दिसत होती. बराच वेळ ती ताटकळत, पायाखालून निसटणार्‍या वाळूत, स्वत:च्या विश्वात पाय घट्ट रोवून क्षितीजावर नजर रोखून पहात उभी होती. ऊफाळलेल्या दर्यातही नेटाने पुढे येणारी ती नौका होती आणि शिडाच्या अगदी टोकाला असणार्‍या वाहकाच्या जागेवर डोळ्याला दुर्बिण लावून आणि ती तिच्यावर रोखूनच एक तरुण ऐटीत उभा होता. नौका तिच्या दिशेने जसजशी जवळ येत होती तसतशी तिच्या ऊरात धडधड वाढत होती. बघता-बघता तो नौकेचा ठिपका हा मोठा होत गेला की त्या नौकेच्या निव्वळ सावलीनेच छाती दडपून जावी ! त्या ऐटदार, रुबाबदार तरुणानं वरून खाली झुकून तिच्यावर एक नजर टाकली आणि तोंडाला गुंडाळलेला कपडा बाजूला केला. त्या तरुणीचे डोळे पांढरे फट्टक पडले. भुवया विस्फारल्या गेल्या. चेहर्‍यावरचे सारे भाव मुर्छित झाले. काळीज उसळी मारून नाहीतर, छातीचा पिंजरा तोडून बाहेर येवून पडते की काय अशी अवस्था झाली होती. तो तरुण जाड दोरखंडाच्या उभ्या शिडीवरून तिच्यावरची नजर जराही न हटवता सावकाश खाली उतरत होता ! तिने ओरडण्यासाठी तोंड उघडले पण त्याक्षणी तोंडाच्या बोळक्यात जीभच नाही की काय असा भास तिला होत होता. घसा कोरडा झाला होता...पण तो नेमका भीतिने कोरडा झाला होता की तिने स्वत:च भर समुद्रात उभ्या केलेल्या स्वत:च्या बेटावर आदळणारे खारे पाणी तोंडात जावून ? हे मात्र कळायला वाव नव्हता ! ती पळण्यासाठी वळणार इतक्यात तिच्या लक्षात आलं की तिच्याच बेटावर ती कैद होवून गेली होती. हाता-पायात भरभक्कम साखळदंड आवळले गेले होते. तिचं बेट...जग..विश्व...तिच्याच अंगलट येवू पहात होतं. सुटण्यासाठी ती हरेक प्रयत्न करत होती. तिच्या बुबुळांची हालचाल तीव्र आणि तीक्ष्ण झाली होती. मदतीसाठी आजूबाजूला पहाणार्‍या तिच्या शोधक नजरेनं त्या जहाजाचं नाव पाहीलं. लहान मुलाने लिहील्याप्रमाणं चुकीच्या स्पेलिंगमध्ये कांहीतरी लिहीलं होतं. ती डोळ्य़ांना ताण देवून जहाजाचं स्पेलिंग मोठ्याने वाचू लागली. TXHIGKOQ. “तहिजक्कू”. जापनीज किंवा रशियन शब्द असावा म्हणून ती आपल्या बुध्दीला ताण देवू लागली. त्याचा अर्थ शोधण्यासाठी जोर देवू लागली. पण व्यर्थ ! तो तरुण तिच्याजवळ आला. ती थरथरू लागली. त्यानं आपले ओठ तिच्या कानाजवळ नेले आणि तिच्या कानात पुटपुटला,

EUPHORIA

तिच्या डोक्यात लख्खकन प्रकाश पडला. तिनं आपली मान त्या जहाजाच्या नावाच्या दिशेनं वळवली. आत्ता तिला त्या नावाचा उलघडा झाला.

‘त्या जहाजाचे नाव “क्वर्टी कोड” मधे लिहीले होते तर ! पण क्वर्टीमधे लिहीण्याची काय गरज ? पण याला कसे माहित ? का नाही ! यानेच तर मला शिकवली ही भाषा ! पण हा इथे कसा ? हा तर मेला होता...खून झाला होता याचा...याला तर मीच मारला होता !’-ती स्वत:शी बोलत होती, ‘आता हा मला जिवंत सोडणार नाही...बदला घ्यायला आलाय तर हा !’

“मिथिलेश...मिथिलेश...आय एम सॉरी...रिअली सॉरी ! चूक झाली माझ्याकडून...प्लिज फर्गिव्ह मी...” ती त्याच्याशी बोलत असतानाच तो वळला. त्याच्या पाठीत तिनंच खुपसलेला चाकू अजूनही होता तसाच होता. अजूनही त्यावरचे आणि ओघळणारे रक्त ताजे होते. जोर लावून त्यानं आपल्या पाठीतून तो चाकू बाहेर काढला आणि आपल्या हातात तो सावरत तिच्या दिशेनं वळला. तिच्या नरड्याभोवती तिच्याच श्वासाचा फास आवळला गेला होता. तिच्याच बेटावर ती आज संपून जाणार होती. मिथिलेश एक एक पाऊल उचलत तिच्या दिशेने सरकत होता. ती मात्र हतबल होवून स्वत:च्याच साखळदंडात गुरफटून गेली होती. आता सुटका नव्हती. ज्याची सुरूवात तिनं केली होती त्याचा शेवट आज हा असा होणार होता ! तो तिच्या अगदी जवळ पोहोचला, इतका की त्याचा श्वास तिच्या चेहर्‍याला जाणवू लागला होता. हो तो श्वास अगदी तसाच उष्ण आणि हवाहवासा होता, जसा तो त्यांच्या पहिल्या प्रणयावेळी तिला जाणवला होता ! आत्ताही या क्षणीही तिची छाती तशीच भावनावेगाने धपापत होती. एकाचवेळी दोन भावना ती अनुभवू लागली होती ! कोणती भावना खरी ? त्याला परावृत्त करण्याच्या हेतूने तिने आपले अधीर ओठ त्याच्या ओठांच्या जवळ नेले पण तोवर फार उशीर झाला होता...मिथिलेशच्या हातातील चाकूने आपला निशाणा साधला होता. तिनं भयकंपित होवून एकवार आपल्या पोटाच्या दिशेनं पाहिलं. त्याच्या हातातील चाकू तिच्या पोटाच्या आरपार झाला होता. मिथिलेश तिच्याकडे दात विचकून हसत उभा होता आणि मृत्यूच्या भयाने विरघळणार्‍या तिच्या तोंडातून किंचाळी बाहेर पडली,

“मि ऽ ऽ ऽ थि ऽ ऽ ऽ ले ऽ ऽ ऽ श ऽ ऽ ऽ”

            शगुफ्ता किंचाळत उठून बसली. तिचं सर्वांग घामानं भिजलं होतं. क्षणभर आपण कुठे आहोत ?, हेच तिला उमगत नव्हतं. तिला सावरायला बराच वेळ गेला.

“कॉफी घ्या...बरं वाटेल !”-तिच्या समोर कॉफी धरत कुणीतरी म्हणालं.

कोण बोलतंय, हेच सुरूवातीला तिला कळलं नव्हतं. कॉफी मग हातात घेवून, गरमा-गरम कॉफीचा घोट घेवून तिला जरा बरं वाटलं आणि तिच्या सार्‍या विचारांचा गुंता नाहीसा झाला.

“थॅंक्यू डॉक्टर सोहम !”

सोहमनं स्मित केलं आणि तिच्यासमोरच्या खुर्चीत तो आपल्या हातातील कॉफी मग सावरत बसला. तिच्यावरची नजर न हटवता तो कॉफीचे घोट घेवू लागला. शगुफ्ताच्या चेहर्‍यावरील भीतिचे भाव हळूहळू कमी होवू लागले होते. तिला हुशारी वाटू लागली होती.

“खूपच इंट्रेस्टिंग आहे हे सारं !”

“तुमच्यासाठी कदाचित असेल हे सारं इंट्रेस्टिंग पण, माझ्यासाठी खूपच भयानक आहे हे !”

“हं...खरंय तुमचं ! हा मिथिलेश कोण ? त्याचा खून वगैरे काय प्रकरण आहे ?”

“माझ्यावर विश्वास ठेवा, मला खरंच माहित नाही पण जेंव्हा जेंव्हा मी त्या तरुणाला माझ्या स्वप्नात पहाते, तेंव्हा तेंव्हा माझ्या तोंडून ‘मिथिलेश’ हेच नाव बाहेर पडतं !”

“तुमच्या व्यक्तिगत आयुष्यातील एखादा मित्र त्याच्यासारखा दिसतो का ?”

“डॉक्टर, माझा जन्म पारसी कुटुंबातला आहे त्यामुळे साहजिकच माझी मैत्री पारसी मुला-मुलींसोबत आहे...आय मीन त्याची सरासरी जास्त आहे आणि त्यांच्यापैकी कुणाचाच चेहरा त्याच्या चेहरेपट्टीशी जुळत नाही !”

“काल तुम्ही फोनवर म्हणत होतात, तुमच्या हातून एखादा खून होईल म्हणून ! याचा काय अर्थ ?”

“डॉक्टरसाहेब, कुणालाच माझं बोलणं पटत नाही आणि तुम्हांलाही कितपत पटेल माहित नाही पण ट्रस्ट मी, मला मीच माझ्यासमोर वावरताना दिसते...इतरांशी बोलताना दिसते ! कधी कधी मलाच कळत नाही...समोर दिसतंय तो भास की माझं अस्तित्व हाच भास !”

 

*****

 

            हेड ऑफीसच्या इन्क्वायरी रूममध्ये पायल बसली होती. आजवर ती समोरच्या खुर्चीत बसलेली असायची आणि आत्ता ती जिथे बसली होती तिथे आरोपी बसलेले असायचे ! नक्की काय सुरूये हे पायलला कळायला कांहीच मार्ग नव्हता. बराच वेळ ती एकटीच बसून होती. एक मात्र तिला माहित होतं की आजूबाजूच्या काचांमागून कितीतरी डोळे तिच्यावर रोखले गेले असणार. ती शांतपणे बसून होती. तिला ज्या आरोपाखाली चौकशीला आणण्यात आलं होतं, त्या प्रकरणाच्या चौकशीतून त्यांच्या हाताला कांहीच लागणार नव्हतं, हे तिलाही माहित होतं. तिची असलीच तर एक चूक होती, ती म्हणजे-शगुफ्ता तिची बालमैत्रिण होती ! एक ना एक दिवस हे प्रकरण शगुफ्ताच्या अंगलट येणार हे पायललाही माहित होतं. कितीतरी वेळा पायलनं शगुफ्ताला सरेंडर करण्यासाठीही सुचवलं होतं पण, झाल्या प्रकरणाचा एवढा मानसिक धक्का तिला बसला होता की, आपण मिथिलेशचा भावनेच्या भरात खून केलाय हेही ती विसरून गेली होती ! आणि अगदीच अभावितपणे हे मिथिलेश प्रकरण डिवचलं जाईल हे तिच्याही ध्यानीमनी नव्हतं ! खरं तर ह्या प्रकरणात तसा कुणालाच इंट्रेस्ट नव्हता पण, पायलची जीवाभावाची मैत्रिण कियारा हिनंच हे प्रकरण पुन्हा उकरून काढलं होतं. दोन मैत्रिणींच्या कचाट्यात पायल अडकून गेली होती. एका मैत्रिणीचा प्रियकर दुसर्‍या मैत्रिणीचा जीवलग मित्र निघावा, यापेक्षा वाईट दु:स्वप्न ते काय असावं ! मनात चाललेले विचार चेहर्‍यावर दाखवू न देण्याचा पायल अटोकाट प्रयत्न करत होती कारण काचेबाहेरील एकाही नजरेला तिला निमीत्त द्यायचं नव्हतं !

   

 

-अनुप

(क्रमश:)      

 

 

            COGNIZANCE: All written creative material is the solemn property of “An Anup Jatratkar Multi-Media Production”. If anyone wanted to use it for his/her own personal purpose (i.e. short film, projects, blogs, articles, scripts, FB posts etc.) then, have to take proper permission from, Mr. Anup Jatratkar. If it will be found that, anyone involved in such activities without prior permission, then, we are able to take certain charge on him/her. 

 

Pen Image

Pen Index