Pen


वार्तालाप

स्वप्नं !

प्रत्येकाचीच कांही ना कांही स्वप्नं असतात, आणि ती असायलाच हवीत ! स्वप्नांच्या जीवावरच तर माणूस आजचा क्षण आणि त्या क्षणातील संकटांशी दोन हात करत असतो. समजा आपल्या प्रत्येकाच्या नजरेतील स्वप्नांनाच जर हद्दपार केलं तर काय होईल ? जगणं खरंच अवघड होवून जाईल ना ?

वाचकहो, आता तुम्ही म्हणाल..आज काय असा हा बडबडतोय ? लेका, मागच्या आठवड्यात कथा नाही टाकलीस ! का ? ते सांग पहिले आणि आजची कथा कुठाय ? याचंही उत्तर दे !

हो, त्याचसाठीचा हा घाट.

मित्र आणि मैत्रिणींनो, गेल्या १२ वर्षांपासून एक स्वप्न पाहिलेलं. बर्‍याचजणांनी त्याचं हसं केलं...आजही माझ्या माघारी हसं होतंच म्हणा ! पण त्या एकाच स्वप्नासाठी मी माझ्या कित्येक आवडत्या गोष्टी, छंद, मित्र-मैत्रिणी, जीवाभावाच्या व्यक्ती सार्‍यांचा रोष पत्करून तर कधी काहींनी माझ्याच पदरात त्यागाची घातलेली भिक सांभाळत आणि तीच सल मनात धगधगत ठेवून मी इथवर प्रवास केला आहे. या प्रवासात बरेच जण मागे पडले, काहींनी हात सोडले तर काहींना मी स्वत:हून हात सोडायला भाग पाडले कारण कुणालाच आशेत गुंतवून ठेवायचे नको होते ! आणि आज १२ वर्षांनंतर मी माझ्या स्वप्नाला समोर पहात असताना त्यापासून माघार घेणे म्हणजे ऐनवेळी नांगी टाकल्यासारखेच !

वाचकहो,याच स्वप्नाचा पाठपुरावा करताना रात्रीचाही दिवस होतो आहे. गेले आठ दिवस तर मी आणि टिम त्या कामात इतके गुरफटून गेलो होतो की, मोबाईल-नेट-जेवण-झोप याचेही भान कुणाला नव्हते. त्यामुळेच मागील आठवड्यातील कथा टाकणे शक्यच झाले नाही. त्यानंतर घरात बसून ठरवूनच “व्हॉट द फ...” ही दीर्घकथा एका दमात लिहून पूर्ण केली आणि लिहील्यावर लक्षात आले, ए४ साईझची २३० पानं कथा लिहीली गेलीये. एकूण २९ प्रकरणं लिहीली गेली आणि त्यानंतर मग कुठे समाधानकारक सारा गुंता सोडवण्यात यश आलं. आता जर पूर्ण कथा ब्लॉगवर टाकायची म्हंटलं तर जवळ-जवळ ७ महिन्यांचा कालावधी लागेल म्हणून मग, पुढच्या एकाच प्रकरणात याचा सारांश तयार करून तो टाकायचा म्हणून तो सारांशही तयार केला ! पण...

पण, त्याच स्वप्नाच्या कामामुळे तो सारांश कदाचित या आठवड्यात टाकणे शक्य होईल असे वाटत नाही. कारण, लिहीलेला ड्राफ्ट ऑफीसमध्ये आहे आणि मी बाहेर ! जेंव्हा जाणे होईल तेंव्हा नक्कीच तो ड्राफ्ट टाकला जाईल !

आता तुम्ही विचाराल, असे कोणते स्वप्न ? या उत्तरासाठी तुम्हांला जुलैची वाट पहावी लागेल ! आपल्यापैकी कांहीजणांनी “पेन” न टाकल्याबद्दल आपला रोष प्रकट केला आहे. त्या सर्वांची आणि आपली माफी मागतो आणि आजचा वार्तालापास इथेच पूर्णविराम देतो.

आपला,

-अनुप  

Pen Image

Pen Index