कंकाली
(संगीत एकांकिका)
कॅपिटल वन, बेळगांव आयोजित “अखिल
भारतीय एकांकिका लेखन स्पर्धा २०१८” मधील |
रंगमंच
व्यवस्था : हवेलीची
एक खोली. खोलीला लागून गॅलरीतील बैठकीची जागा. नक्षीदार कमानी आणि त्यांवर लावलेले
झिरमिरीत पडदे गुलाबी, लाल रंगाचे. कोपर्यात जुन्या काळातील मोठ्या काचेचे कंदील.
गॅलरीत गादी आणि तक्के ठेवले आहेत. तिथेच पेटी आणि तानपुरा आहे. दुसर्या बाजूला
धूप लावून ठेवला आहे. झुंबराची खालची बाजू दिसत आहे (ते लटकत आहे, याचा निव्वळ भास
व्हावा), गॅलरीत प्रसन्न रंगयोजना आणि आल्हाददायक प्रकाशयोजना, आतील खोलीत मंद आणि
डार्क प्रकाशयोजना ज्याच्यात लालसर झाक थोडी जास्त असेल. खोलीत कंदीलाशेजारी खुर्ची,
एक बैठक आणि समोर गादी-तक्के यांची योजना. बैठकीच्यामधे पानाचा पितळी डबा आणि
थूकदानी. कंदीलाच्या बाजूलाच नटराजाची मोठी मूर्ती आणि मक्केची प्रतिकृती आहे.
पात्रे : १.
सपना आपा (वय ४५-५०)
२. राधिका
(वय २५-२८)
३. स्त्री
अधिकारी (वय ३८-४०)
४. सपना
(तरुणपणीची सपना आपा, वय २२-२५)
५. कंकाली
(वय ३०-३५)
अंधार.
तानपुर्याचे सूर
कानावर पडू लागतात. कांही क्षण तो आवाज कानावर पडतो. त्या मागोमाग एका स्त्रीचा
आलाप आणि वाढत जाणारा सूर कानावर पडतो. गॅलरीतील प्रकाश हळू-हळू मोठा होत जातो.
४५-५० च्या दरम्यानची स्त्री गॅलरीत बसून, डोळे बंद करून रियाज करत आहे. ती
शास्त्रीय गायन करायला सुरूवात करते. सलवार-कमीज, अंगावर शाल, केस बांधलेले,
डोक्यावर ओढणी.
सपना आपा : भॅंवर
नैना, मूंदे रे...
भॅंवर नैना ।
सपने भी
सोये, अंगणा...
भॅंवर नैना...
मूंदे रे, भॅंवर नैना ।
बिरहा कि लत लागी रे...
बिरहा कि लत लागी रे !
सजन कभी आन मिलना...
भॅंवर नैना...
सजन कभी...आन मिलना,
भॅंवर नैना...मूंदे रे... भॅंवर
नैना !!
आपाचा रियाज
सुरू असताना बाजूच्या दारातून राधिका दबक्या पावलांनी खोलीत प्रवेश करते आणि गाण्याच्या
तालावर मान डोलावू लागते. डोळे मिटते. तल्लीन होते. आपाचा रियाज संपतो. ती डोळे
मिटूनच तानपुरा डोक्याला लावते, नमस्कार करते आणि डोळे उघडते. तिचं लक्ष राधिकावर
जातं.
सपना आपा : राधिका,
बेटा तू कधी आलीस ?
राधिका : (गडबडीनं
पुढं होते आणि तिला उठायला मदत करते-) आपा, तुझा आवाज
ऐकला आणि गॅस
बंद करून धावत आले ! कित्ती दिवसांनी गायलीस ही
बंदीश !
सपना आपा : (हसत
आत खोलीत येते आणि खुर्चीत बसते. तिला धाप लागला आहे.)
आज बरी सपना
आपाची तारिफ सुरू आहे ! काय, विशेष काय ? अं..??
राधिका : काय
हे आपा ! किती मनापासून बोलले मी !! तारिफ करायची पण सोय
नाही राहिली
आता !
सपना आपा : (तिचा
हात हातात घेत-) चेष्टा करतेय गं ! खूप दिवसांनी चेष्टा करायची
लहर आली.
इतकी प्रसन्न सकाळ मी कधी अनुभवली होती, तेच आठवत नाहीये
आता !
राधिका : खॉं
साहेब गेले त्या दिवशी सकाळीही तू अशीच रियाज करत होतीस...इतक्याच
प्रसन्नपणे
आणि अचानक मोहल्ल्यातून साद ऐकू आली...
सपना आपा : (गंभीर
होत, तिचा हात सोडत-) बोलतच थांबणारेस की, पोटा-पाण्याचंही कांही
पहाणार आहेस
! (राधिका वळते-) जुनैद कुठं गेलाय ?
राधिका : सीमाभागातल्या
जुन्या कलाकारांना मानधन देण्यासंदर्भात बैठक बोलावलीये,
जुनैद तुझ्यावतीनं
हजर रहायला गेलाय !
सपना आपा : आत्ता
पुळका आलाय यांना...सीमाभागातल्या कलाकारांचा ! एक से एक
कलाकार
कलेसाठी फना झाले...खानाबदोश झाले. आणि आत्ता जाग आली
सगळ्यांना !
किती देणार आहेत म्हणावं मानधन ? फुर्कत हमसफर परत येणार
आहेत का
तुमच्या हजार-बाराशेच्या भिकेने ? ही...ही असली भिक घेण्यापेक्षा
खुशीनं
महशरला सामोरी जाईन मी !
राधिका : (जवळ
जात-) आपा...काबू ! इतकी का संतापतीयेस ?
सपना आपा :
बेटी, हयात गेली गं माझी, कुणीच
दखल घेतली नाही...ना माझी ना इतरांची !
मोठ्या शहरात
गेले की, सीमाभागातले म्हणून एकतर मजाक करायचा किंवा
सतत कमीपणा
दाखवायचा ! (धाप लागतो-) काय कमी होती गं खॉं
साहेबांमध्ये
? एक से एक शागीर्द दिले त्यांनी ! मोठ्या शहरातली पोरं येवून
शिकून
गेली..मोठी झाली पण कुणी त्यांचा साधा उल्लेखही नाही केला...वळून
पहायची तर
दूरची बात !
राधिका : (उठते-)
आपा, तू चहा घेणार ? मस्त कडक बनवते, तुला आवडतो तसा...
बेटा !
(शून्यात पहात ‘चीज’ म्हणते-)
खौस-ओ-खुझा
बित गया,
बर्क भी
उर्यानी जलाकर बुझ गया ।
पर्वाझ अभी
तो किया था,
इमरोज
तखय्युल फुर्कत में इरूसु हो गया ॥
(स्वत:शीच
हसते-) आज सगळं कसं साफ साफ दिसतंय. शांत वाटतंय. रुह आणि
जिस्म वेगळे
वाटतच नाहीयेत आज ! मोजझा !!
अचानक
गॅलरीतून एका कंकालीचा (भोजपुरी भिकारीण, जी गाणी म्हणून भीक मागते) भसाडा आवाज,
पेटी दूरून ऐकू येवू लागते.
कंकाली : जिंदगी
गीत है, गीत ही प्रित है..
सॉंस बाकी
नहीं, जिंदगी जीत है !
कोई साथी ना
हो, कोई अपना ना हो...
सब छुट गये,
कोई सपना ना हो...
राही कोई ना हो, राह चलना
तो है..
जिंदगी गीत है, गीत ही
प्रित है...
सॉंस बाकी नहीं, जिंदगी
जीत है...!
आपा हळू हळू
उठते. अंगावरची शाल सावरते आणि गॅलरीच्या दिशेने जाते. आवाज हळू हळू जवळ येवू
लागतो. आपा निरखून-डोकावून पाहू लागते. आवाज पुन्हा दूर जावू लागतो. त्याचवेळी
मागून राधिका हातात चहाचा कप घेवून येते.
राधिका : (हाक
मारत-) आपा, चहा.
सपना आपा : (तिथूनच
वळून पहात विचारते-) राधिका बाळा, रोज या वेळेत ही
भिकारीण पेटी
वाजवत येते. कोण, आहे कोण ही ? कुठून आलीये ?
राधिका : (कप
घेवून गॅलरीत जाते-) जुनैद परवाच सांगत होता, या भोजपुरी स्त्रीया
रस्त्यावर-चौकात-गल्लीत
गाणी म्हणून पैसे गोळा करतात. उदरनिर्वाहाचं
साधन आहे ते
त्यांच्या. कंकाली म्हणतात त्यांना !
सपना आपा : (निराशतेने-)
कंकाली. गाणे गाकर भीक मॉंगनेवाले.
तिच्या आवाजात
दु:ख आहे. हताश झाल्यासारखी ती बैठकीवर बसते. राधिका तिच्या शेजारी बसते. आपा
तिच्या हातातून चहाचा कप घेते. तिच्या कपाळावर आठ्या आहेत.
सपना आपा : ईक
बात सांग मला बेटी, आज घडीला हिच्यात आणि माझ्यात फरक काय ?
राधिका : आपा
!! उगाच तुलना करू नको...(ती जायला उठते-)
सपना आपा : बिटीया,
हमेशा प्रश्नांना बगल देवून काय उपयोग ? अशाने ना प्रश्न थांबतात
ना त्यांची
उत्तरं मिळतात ! (चहाचा घोट घेते-)
राधिका : (थांबते.
वळते-) आपा, आज मी बगल देतीये कारण वर्षांनंतर आज सकाळी
मी तुला
प्रसन्नपणे रियाज करताना पहातीये...बोलताना ऐकतीये ! म्हणून
तुला दर्द
देणारे विषय काढायचेच नाहीयेत मला. कळलं ?
सपना आपा : (कौतुकाने-)
सयानी हो गयी हो ! आओ..बैठो पास हमारे...आ जायो...
(राधिका जवळ
जावून बसते. आपा तिच्या डोक्यावरून हात फिरवते-)
जेंव्हा
जेंव्हा तुला पहाते तेंव्हा तेंव्हा असं वाटतं,
कुणीतरी
माझ्यासमोर आईनाच धरलाय की काय ! अशीच होते मी कधीकाळी,
अल्लड, भोली,
सर्वांना जीव लावणारी, आत्मविश्वासानं भरलेली, कांहीतरी
करून
दाखवायचं म्हणून मॉं-बापाला सोडून...माझ्या मिरजेला सोडून या
परमुलुखात
आले आणि इथलीच होवून गेले...स्वत:ची, स्वत:च्या गावाची
ओळख विसरून
गेले ! अफसोस या गोष्टीचा नाही तर, ना जन्मभूमीनं आपलं
मानलं, ना
कर्मभूमीनं...! वर सीमाभागातले कलाकार म्हणून शिक्का ! एकतर
सहानुभूतीनं
किंवा चेष्टेनं !! पण कलाकार म्हणून कोणी बघणार नाही...!
राधिका : (दटावणीच्या
सुरात) आपा !
सपना आपा : (कानाला
हात लावत, हसत-) गुस्ताकी माफ हुजूर ! उमर झालीये बेटी...
जुन्या
तबकडीची पिन कधी कधी अडकते तशी अवस्था होते या वयात ! जा बेटा,
कामं पडली
असतील ना...उगाच माझ्यामुळे खोळांबा नको ! नाहीतर,
थोड्यावेळानं
मीच ओरडायची तुझ्यावर ! (हसते-)
राधिका : (हसते-)
आपा, जेवायला आज तुझ्या आवडीचा शीरा बनवते...काजू, मनुके
टाकून !
आपा मान
डोलावते. राधिका उठते आणि निघून जाते. आपा बाजूचा तानपुरा हातात घेते. कांही क्षण
नुसतं वाजवते आणि मग डोळे मिटून आलाप घेते.
सपना आपा : (आलाप)
कितीदा
नव्याने, पुराणे जगावे ?
कितीदा
पुराणे, नवे गीत गावे ?
कितीदा
जळावे, पुराण्या सुरांनी ?
कितीदा
उरावे, अपुर्या स्वरांनी ?
कितीदा
मनाचे, तराणे स्मरावे ?
कितीदा
पुराणे, नवे गीत गावे ?
आपा थांबते.
डोळे उघडते आणि गंभीर होते. अचानक तिच्या डोळ्यांतून पाणी येवू लागतं. चेहरा मात्र
तसाच कोरडा आहे.
सपना आपा : खॉंसाहेब,
तुम्ही असायला हवे होतात ! एका प्रश्नाची किती मोठी सजा दिलीत
तुम्ही ?
कायमचंच स्वत:पासून दूर केलंत मला !! इतका का अवघड सवाल केला
होता मी ?
अखेरच्या क्षणापर्यंत तोंड दाखवलं नाहीत मला आणि तुमच्या
वाड्याची
पायरी न ओलांडायची आजन्म शिक्षा सुनावलीत तुम्ही ! तुमच्या
इंतकालनंतर
मी त्याच वाड्याच्या गेटमध्ये दिवसभर थांबून रडले होते.
(थरथरत उठते
आणि गॅलरीत जावून एका दिशेने पाहू लागते.) आठवतंय
खॉंसाहेब,
तुम्ही हा वाडा मुद्दामहून मला घेवून दिला होतात...तुमचा रियाज
मला ऐकू यावा
आणि माझा तुम्हाला ! (वळते आणि आत खोलीत येते-)
शबाब वो कहर
था,
जो जुस्तजू
ना पाया, छलक गया ।
पयमाने क्या
करें कासिद ?
ईक कत्रा थी
रंजीश, खुल्द गया ॥
आज पण याद
आहे, मला तो पहिला दिवस...जेंव्हा मी मिरज सोडून या
बेळगावात..तुमच्या
शहरात आले होते...तुमची शागीर्द बनायला ! त्याच
वाड्याच्या
गेटमध्ये तासनतास उभी राहून, तुमची एक झलक पहाण्यासाठी
आणि एखादा
ख्याल, बंदीश, चीज कानावर पडावी म्हणून कानात प्राण आणून,
भर उन्हात उभी
असायची ! यादगार होते ते दिवस...
आपा बोलत
असतानाच कानावर अजाण पडते. आपा गंभीर होते. डोळे बंद करून कांहीतरी पुटपुटते आणि
लगबगीने दुसर्या बाजूने आत जावू लागते. आपा आत जाते आणि राधिका तिला हाक मारत
बाहेरच्या बाजूने येते.
राधिका : आपा
ऽ ऽ आपा ऽ ऽ ऽ (ती आजूबाजूला पहाते. आपा कुठेच नाहीये. ती मागे
वळते-) या
ना...! (एक महिला आत येते. खांद्यावर पर्स, हातात तगड, त्यावर
कागदांचा
बाड, डोळ्यांवर चष्मा-) या, बसा. आपा बहुतेक नमाज पठण
करायला
गेल्या असतील. येतीलच दहा मिनीटात. (ती बसते-) काय घेणार ?
स्त्री : नाही, कांही नाही.
राधिका : कांही
तरी घ्या.
स्त्री : नको, खरंच नको !
राधिका : (अवघडून
कांही क्षण थांबते आणि नंतर बोलू लागते-) काय काम होतं आपाकडे ?
सीमाभागातले
कलाकार आणि दुसरी कॅटॅगरी म्हणजे, बाहेरून येवून स्थायिक झालेले
कलाकार ! त्यासंदर्भात कलाकारांची यादी शासन
प्रतिनिधींनी तयार
केली आहे.
यादीतील कलाकारांची सर्व माहिती शासन दफ्तरी नोंद म्हणून
हवी आहे.
राधिका : पण
जुनैद तर त्या मानधनाच्या बैठकीसाठीच गेलाय !
स्त्री : गोळा केल्या जाणार्या माहितीवरूनच मानधनाची रक्कम ठरवली
जाणार आहे. त्यामुळं जितकी नीट माहिती सांगाल
तेवढा तुम्हालाच त्याचा फायदा होणार
आहे.
राधिका : मी
कांही मदत करू शकते का ?
स्त्री : हो, नक्कीच. सपना मॅडम...
राधिका : (वाक्य
तोडत-) आपा !
स्त्री : अं..?
राधिका : सगळे
त्यांना आपाच म्हणतात. सपना आपा.
स्त्री : (मान डोलावत-) सपना आपा येवूपर्यंत तुमच्याशी गप्पा मारायला
आवडेल
मला.
राधिका : विचारा,
तुम्हाला जे विचारायचं असेल ते. माझ्यापरिने मी तुमच्या प्रश्नांना
उत्तर
द्यायचा प्रयत्न करेन !
स्त्री : मला अगदी सुरूवातीपासून सपना आपाबद्दल ऐकायला आवडेल !
स्मित करते.
समोर वळते. शून्यात पाहू लागते. पार्श्वभूमीवर तानपुर्याचा आवाज आणि तरुण
स्त्रीचा आलाप ऐकू येवू लागतो.
रंगमंचावर अंधार पसरतो.
तानपुर्याचा
आवाज आणि आलाप वाढत जातो. पैंजणांचा आवाज ऐकू येवू लागतो. एक तरुणी मंचावर येते.
एक प्रकाशझोत तिच्यावर पडतो. ती एकटीच दिसत आहे. मागे सगळा अंधार. त्या अंधारात
बसलेली ती स्त्री आणि उभी राधिका अस्पष्ट दिसत आहे. पिवळा-गुलाबी सलवार कमीज,
डोक्यावर झिरमिरीत ओढणी, पायात पैंजण. ती उत्कटतेनं प्रवेश करते. अधिरतेनं
आजूबाजूला पहाते.
सपना : असं वाटतंय, आज सारा आसमॉं-जहॉं माझ्या पायाशी लोळण घेत आहे.
खूप
बरं वाटतंय.
अम्मी-अब्बा यांना सोडून आल्याचा गम तर आहेच पण मी माझ्या
खुदाला
भेटायला आले आहे. त्यांच्या पायाशी जन्नत शोधायला आले आहे. मला
माहित आहे,
इतना आसां असणार नाही, पण उम्मीद आहे ! आणि उम्मीद पर तो
दुनिया कायम
आहे. (खाली बसते आणि जमिनीला नमस्कार करते-) माझं भाग्य
मोठं म्हणून
या मातीला भेट देवू शकले, ज्या मातीत माझा खुदा जन्माला आला.
(माती
कपाळाला लावते-) मशिय्यत एवढीच आहे की,
रुसवाई करू नको !
मजिम-ए-ईश्क
आशना मिला दे,
ईखतिय्यार
मराजिम मयस्सर बना दे ।
रुहानियत
कायनात तुम्हारी,
हबाब उन्स का
लिहाज बना दे ॥
(उठते. मागे
वळून पहाते-) गॉंव तर बहुत मागे राहिला माझा. (स्वत:त रमत-)
लहानपणापासून
गाण्याची आवड होती मला. लहानपणी घरात सतत सुफी गाणी
सुरू असायची.
त्यामुळं गाणं ऐकायला, म्हणायला शिकले. मिरजेत माझे अब्बा
ब्यापार
करायचे. घरात गाणी म्हणायची ईजाजत असली तरी बाहेर, शाळेत
गाणी
म्हणायला त्यांचा ईन्कार असायचा. म्हणायचे, “लोग क्या कहेंगे ?”
मी त्यांना
समजवायचा प्रयत्न करायची पण, ते कुणाचंच ऐकून घ्यायला तयार
नव्हते. एकदा
अम्मी-अब्बासोबत बेळगावात आले. आणि उस्ताद हदात अली खॉं
साहेबांचा बंदीशीचा
कार्यक्रम ऐकला आणि तेंव्हाच ठरवलं, यांनाच
आपला ईलाही
बनाना है ! जितना मुझसे बन पडे, त्यांच्याबद्दल सारी माहिती
मिळवली.
आपावरचा लाईट
नाहीसा होतो आणि राधिकावरचा लाईट सुरू होतो. तिच्या व्यतिरिक्त कांही दिसत नाही.
राधिका : ईमाम
मोहल्ला, जुन्या बेळगावची शान होता. बडे-बडे खानदानी
लोक,
उमराव-सरदार, व्यापारी रोज संध्याकाळी गाण्याच्या मैफिली
ऐकण्यासाठी
येत असत. इथं कलेला मान असायचा. ज्याचा आवाज चांगला,
त्याला
दाद आणि पैसा मिळायचा. याच मोहल्ल्यात तीन-चार घराणी होती,
जी
पिढ्यानपिढ्या गायनाचा वारसा जपत आली होती. ज्यांना गाणं
शिकायची
मनापासून ईच्छा असायची ती मुलं-मुली, त्यांच्या आवडीनुसार
घराणी
निवडायची आणि जोवर गळा तयार होत नाही, तोवर तिथंच
राहून
गायनाचा सराव करायची. हळू-हळू दिस पालटू लागले. एक-एक घराणं
संपून
जावू लागलं. चित्रपटाच्या गाण्यांनी जोर धरला. चंदेरी पडद्याच्या
चकाचौंद
समोर ईमाम मोहल्ला फिका-फिका वाटू लागला जसा लालटेन फिका
वाटला
होता, जेंव्हा पहिल्यांदा गोर्या साहेबानं रस्त्यांवर आर्का लाईटी
लावल्या
होत्या ! (स्मित-) गोरा साहेब गेला तसा ईमाम मोहल्ल्याचा पार
चेहरा-मोहरा
बदलून गेला. सुस्मिता सेन मिस. युनिव्हर्स आणि ऐश्वर्या राय
झाली, निदान
अशी समजूत आमच्या ईमाम मोहल्ल्यानं करून घेतली होती.
खर्या
अर्थानं भारताचं प्रतिनिधित्व करणारा हा मोहल्ला जिथं हिंदू, मुस्लिम,
ईसाई, शीख
सगळ्या जाती-पातीची लोकं एकत्र गुण्या-गोविंदानं रहायची.
शहरात कुणीही
परगावचा माणूस नोकरीनिमीत्त शहरात आला तर तो आवर्जून
‘मोहल्ल्यात
एखादं मकान किरायानं मिळेल का ?’ म्हणून विचारत फिरायचा.
सगळ्यांना
आपुलकी वाटायची, प्रेम वाटायचं, आपलं-हक्काचं ठिकाण वाटायचा
हा ईमाम
मोहल्ला ! बघावं तेंव्हा चहल-पहल, चेष्टा-मस्करी, रोज सकाळी
नळावर न
चुकता ठरलेला दंगा, कोपर्यावरच्या सार्वजनिक संडासच्या रांगेतल्या
हाणामार्या,
फेरीवाल्यांचा गलका, केसावर आणि भंगारावर भांडी विकणार्या
बायकांचा
चिरका आवाज, गल्ली-बोळांतून आरडत-ओरडत शिव्या हाणत
पळणारी
उघडी-नागडी बारकी पोरं, चौकात गोणपाट अंथरूण वस्तार्याला
धार लावून हजामत
करता करता “उसकी मॉं का...” असं मोठ्यानं म्हणून
राजकारण्यांना
शिव्या घालणार्या न्हाव्याचा आवाज ही या वस्तीची कांही खास
वैशिष्ठ्य !
असाच आणखी एक आवाज होता...उस्ताद हदात अली खॉंसाहेबांचा
आणि सपना
आपाचा ! सगळ्यांना आपल्यात सामावून घेणार्या या मोहल्ल्यानं
आणि शहरानं मात्र
सपना आपाला आणि खॉं साहेबांना कधीच आपलं मानलं
नाही !
स्त्री : (तिच्या चेहर्यावर समोरून प्रकाश पडतो-) कारण ?
राधिका : (कुत्सित
हसते-) कारण ? कारण...ते “त्यांची” भाषा बोलत नव्हते ! कलाकाराला
भाषेचं बंधन
नसतं, असं फक्त चर्चासत्रांत आणि संमेलनातून म्हणायचं असतं !
(हसते. वळून
पुन्हा बोलायला सुरू करते-)
सपना आपा.
अफगाणी रक्ताची आणि सौंदर्याची खाण होती...एकेकाळी.
पाणीदार
तपकिरी डोळे, सरळ टोकदार नाक, सुरईदार मान, ऊंचापुरा आणि
कमनिय देह,
डोक्यावर नेहमी ओढणी, पायात पैंजण, गळ्यात गोडवा आणि
गाण्यावर
असीम भक्ती. गाण्यासाठी सगळं मागं सोडून आपा एकटी मिरजेहून
इथं बेळगावात
खॉंसाहेबांच्या घराण्यात सामील व्हायला आली. त्यांच्या
वाड्याच्या
जवळच एक बारकी खोली भाड्यानं घेवून ती तिथं राहू लागली.
सकाळी-संध्याकाळी
लोकांची धुणी-भांडी करायची आणि उरलेल्या वेळेत
खॉंसाहेबांच्या
दारात जावून एकदा भेट घेण्यासाठी चौकीदाराला विनवणी
करायची. याच
शहरानं तिला उमलताना, बहरताना, मोहरताना वखवखल्या
नजरेनं
पाहिलं होतं आणि आता गळून पडताना कुणी साधं ढुंकूनही पहाण्याचं कष्ट
घेत नव्हतं.
राधिकावरचा
झोत हळू-हळू कमी होतो आणि सपनावरचा झोत सुरू होतो.
To Be Cont..