Pen


PEN 3 : लघुकथा १ : जोसेफिन

बरेच दिवसांत पटकथांव्यतिरिक्त कांहीच लिखाण झालं नव्हतं ! एखादी कथा, लघुकथा लिहून तर वर्षं लोटली असतील ! बर्‍याच वर्षांनी एक लघुकथा लिहीण्याचा योग आला...खरंतर हे एका वर्कशॉपचा भाग म्हणून लिहीलं गेलं होतं. प्रथमपुरूष लिखाण यावर मला माझ्या कांही विद्यार्थ्यांना लिहून दाखवायचं होतं. बसल्या-बसल्या लिहीलं...आणि, बर्‍याच दिवसांनी लघुकथा लिहील्याचं समाधान मिळालं ! हीच कथा "जोसेफिन" आपणांसोबत शेअर करत आहे...

सूचना : सदरच्या कथेतील पात्रे, कथा, कथानक काल्पनिक असून त्यांचा वास्तवावाशी दुरान्वयेही संबंध नाही, वाचकांनी ही गोष्ट लक्षात घ्यावी....

लघुकथा १ : जोसेफिन

 

मी तिला जोसेफिन म्हणायचो ! तिचं खरं नाव आजही मला माहित नाही आणि ते जाणून घेण्याची कधीच गरज भासली नाही. ती माझ्यासाठी माझी जोसेफिन होती, माझ्यासाठी हेच पुरेसं होतं. तसंही तिचं नाव दुसरं कांहीही असतं किंवा असलं तरी माझ्यावर त्याचा कसलाही परिणाम होणार नव्हता. कारण, माझ्या मनानं तिला जोसेफिन म्हणून कधीच स्विकारलं होतं. आज अशा अवेळी अचानक तिची आठवण व्हावी, याचं राहून राहून मलाच आश्चर्य वाटतंय. कदाचित आकाशात गर्दी केलेल्या वळवाच्या ढगांचा हा डाव असावा. भर दुपारी काळोखून आल्यावर मी खिडकीतून बाहेर पाहिलं. वर आकाशात आणि समोर क्षितीजावर काळ्या ढगांनी गर्दी केली होती. एका अनामिक गार वार्‍याच्या झुळुकीनं आपला डाव बरोबर साधला ! ती झुळुक माझ्या चेहर्‍यावर येवून आदळली आणि कसला तरी परिचयाचा वास नाकाला जाणवला ! तो वास नक्कीच कांदा-भजीचा किंवा आलं घालून उकळल्या जाणार्‍या चहाच्या आदणाचा नव्हता, हे नक्की ! कसला वास होता तो ? कुठेतरी घेतला होता वास तो ? बराच वेळ विचार केल्यावर त्या ढगांमध्ये जोसेफिनचा चेहरा दिसू लागला. येस्स ! ती जवळून गेली की असाच गोड वास यायचा तिच्या परफ्यूमचा ! मी खिडकीतून खाली वाकून पाहू लागलो. समोरच्या रस्त्यावर जोसेफिन कुठे दिसते का ते शोधू लागलो. मला माहित होतं...हा निव्वळ मनाचा खेळ आहे, तरिही मनाच्या अनिर्बंध विचारांवर आपल्याला कुठे नियंत्रण ठेवता येतं ? स्वत:शीच हसून, डोळे घट्ट मिटून मी तो गोड वास ऊरात भरून घेवू लागलो ! आणि गंमत म्हणजे, प्रत्येक श्वासाबरोबर जोसेफिनही माझ्या नसानसात भिनू लागली...

मुंबई. लोकल. बेस्ट. हे तिनही शब्द स्वत:मध्येच एक पूर्ण वाक्य किंवा विश्व आहेत म्हंटलं तर ते वावगं ठरू नये ! आणि याची खातरजमा मला मुंबईत गेल्यावर दुसर्‍याच क्षणाला झाली. अनेक कामगारांना, चाकरमान्यांना, चरितार्थाताच्या शोधात आलेल्या निर्वासितांना जसं ही मायानगरी सामावून घेते, तितक्याच सहजतेनं शिक्षणासाठी आलेल्या मलाही तिनं आपलंसं करून घेतलं. मीही मुंबईच्या प्रेमात पडलो. सुरूवातीला कुतूहल म्हणून, मग मजा म्हणून आणि मग रुटीनचा भाग म्हणून इथली गर्दी, घाम, इतरत्र कुठेही न जाणवणारा विचित्र घामाचा वास, वडा-पाव, गटारीकडेला असणारी भैयाची पुरी-भाजीची गाडी आणि जेवणानंतरची दोन केळी रोजच्या जगण्याचा अविभाज्य भाग बनून गेली होती. या सार्‍याची सवय करून घेतल्याशिवाय पर्याय नाही, असा लाडीक दम मुंबापुरीनेच दिला होता ! प्रयत्न करूनही तिने या सवयीपासून मला लांब जावू दिलं नाही आणि घरापासून लांब राहणार्‍या मला एकटं तर अजिबातच सोडलं नाही ! घरच्या आठवणीने कधी बेजार झालोच तर ही मुंबापुरी मला कुशीत घ्यायची, लोकलच्या पार्श्वसंगीतावर, गोंगाटाच्या चालीवर आणि खाडीवरून धावणार्‍या ऊबदार हवेच्या झोक्यावर एकांताचं अंगाई गीत म्हणून मला निजवायची ! मुंबापुरी...माझी मुंबापुरी !!

पण...! हा पण खूप विचित्र असतो...तसाच तो आत्ताही नकळतपणे विचित्रपणासाठी वापरला आहे. मुंबईत येवून दोन महिने झाले होते. नव्याचे दोन महिने संपले होते. या मायानगरीजवळ मला नवं दाखवण्यासारखं आता कांहीच उरलं नव्हतं. किंवा मलाच कशाचंच नाविन्य, अप्रूप वाटायचं बंद झालं होतं. नाईलाजानंच मुंबापुरीनं माझ्यातून इंट्रेस्ट काढून टाकला, अशी मी माझ्या मनाची समजूत करून घेतली होती.

अशीच एक कंटाळवाणी मे महिन्याची संध्याकाळ. कॉलेज संपल्यावर नेहमीप्रमाणे मित्रांसोबत नागौरी चहा घेवून ओर्के मिल, अंधेरी (इ.) बस-थांब्यावर बसची वाट पहात होतो. अचानक आकाशात ढगांनी गर्दी केली आणि कांही समजायच्या आत वळीव पडू लागला. मुंबईची एक मजा आहे, पाऊस पडला की पहिला विचार मुंबईतील लोकांच्या मनात काय येतो माहितीये ? “बापरे...आता स्टेशनपर्यंत चालत जावं लागेल की काय ! तिथंही सुरळीत असलं तर ठिक नाहीतर ट्रॅकवरून ठाण्यापर्यंत (जर सेंट्रल लाईनवरचा कुणी असेल तर !) चालत जाण्याशिवाय पर्याय नाही !”, अशाच अर्थाची एक-दोन वाक्यं कानावर आली आणि मीही मनाची तयारी केली. अर्थात नंतरच्या काळात अंधेरीपासून ठाण्यापर्यंत चालत ट्रॅकवरून जाण्याची माझ्यावरही एकदा वेळ आली होती. असो.

सारी गर्दी त्या तुटपुंज्या थांब्याखाली येवून उभी राहिली. पायातून एका कुत्र्यानेही आपली जागा घेतली होती. गटारीचं पाणी हळू हळू पायाखालून वाहू लागलं तसं ते कुत्रं वैतागून उठलं आणि समोरच्या बांधकाम सुरू असलेल्या साईटच्या दिशेनं पळालं. मघापासून बराच वेळ त्याचं निरीक्षण करणारा मी अचानक कसल्या तरी गोड वासानं भानावर आलो. माझ्या बाजूचा माझा मित्रही त्याच्या राजस्थानी लहेजात मला डिवचून विचारत होता, “कितनी मस्त गंध है बे ! कहां से आ रही है ?” बहुतांशी तिथली “मॅनली” गर्दी त्याच वासाचा शोध घेत होती. कांही क्षणानंतर माझ्या मित्रानं मला डिवचलं आणि “मागे बघ” म्हणून खुणावलं. मी मागे पाहिलं आणि नकळत माझ्या तोंडातून “जोसेफिन ?” असं बाहेर पडलं. ओढणीने हातावरचं पाणी टिपून घेणार्‍या त्या सावळ्या पण गोड तरुणीनं कपाळावर आठ्या घालून माझ्याकडं पाहिलं. तिच्या चेहर्‍यावर मोठ्ठच्या मोठ्ठं प्रश्नचिन्ह होतं. “एकस्क्यूज मी ?” तिनं मला प्रतिप्रश्न केला. तिच्या बाजूची एक महिलाही उगाचच आठ्या घालून, खाऊ का गिळू अशा नजरेनं माझ्याकडं पहात होती. “सो सॉरी !” दिलगिरी व्यक्त करून मी समोर पाहू लागलो.

मी समोर पहात होतो पण मला तिच्याशिवाय इतर कांहीच दिसत नव्हतं. निळ्या-हिरव्या कॉंबिनेशनचा तो चुडीदार, खांद्यावर तपकिरी रंगाची पर्स,मोकळे सोडलेले केस, कानात रिंग्ज, पाण्याने गालावर चिकटलेली बट, निळ्या-हिरव्या कॉंबिनेशनचीच ओढणी, डाव्या हातातील ब्रेसलेट, उजव्या हातातील घड्याळ, हातावरचं पाणी टिपून घेणारी आणि आठ्या घालून “एक्स्क्यूज मी ?” म्हणून नजर रोखून विचारणारी...जोसेफिन ! मी स्वत:शीच हसलो. तिचा तो सावळा पण आत्मविश्वासू चेहरा, तीक्ष्ण नजर का कुणास ठाऊक मला जोसेफिनचीच आठवण करून देत होत्या !

माझ्या एका मित्राला इटालियन फिल्म्स पहायची खूप आवड होती. जेंव्हा कधी कॉलेजला सुट्टी असेल तेंव्हा तो त्याच्या रूमवर इटालियन फिल्म्स पहायला बोलवायचा. अशाच एका इटालियन फिल्ममधील एक स्त्री पात्र होतं...जोसेफिन ! नवर्‍यानं सोडलेली, जगाकडून हेटाळली गेलेली एक आशावादी, आत्मविश्वासू स्त्री, हार न मानता आपला २ वर्षांच्या चिमुरडीच्या उज्ज्वल भवितव्यासाठी धडपडणारी...जोसेफिन ! तसं पहाता, तिची या तरुणीला पाहून आठवण होण्याचा कांहीच प्रश्न नव्हता पण तरि, आजही मी त्या प्रश्नाचं उत्तर देवू शकत नाही की, तिला पाहून जोसेफिन म्हणून मी तिला का हाक मारली ? ते सारं इतक्या क्षणात घडलं की, आजूबाजूच्या, ती महिला सोडून, इतर कुणालाही कसलीच कल्पना आली नाही !

इतर वेळी बेस्टच्या उशीरा येण्याबद्दल दुषणं देणारा मी, आज अजूनही बराच वेळ वाट पहात उभं रहाण्यासाठी तयार होतो. पण, नेमकं कधी नव्हे ते बेस्ट अगदीच वेळेत आलेली पाहून माझा तसा हिरमोडच झाला. पण समाधान एक होतं की, तीही त्याच बसमध्ये चढली. त्या दिवशी बसमध्ये घामाचा वास असेलही, गर्दी कदाचित असेलही पण...त्या दिवसाइतका सुखद प्रवास आजवर या मुंबापुरीत मी अनुभवला नव्हता. त्या १० मिनीटाच्या प्रवासाचं वर्णन करायचं म्हंटलं तर कदाचित माझ्या हातून दुसर्‍या “मेघदूत” सम काव्याची निर्मीती होवू नये, म्हणून आणि म्हणूनच केवळ मी माझा हात आखडता घेत आहे. तात्पर्य, त्या वेळचे महत्व आणि गांभीर्य लक्षात यावं !

कांजूरमार्गला मी बसमधून उतरलो आणि अपेक्षेनं दाराकडं नजर फिरवली मात्र, यावेळी माझा अपेक्षाभंग झाला. अपेक्षाभंग नेमका असतो कसा, हे बारावी नापास होवूनही न कळलेल्या मला, यावेळी मात्र ते बरोबर समजलं होतं आणि त्याची वेदना आत मनात खोलवर गेली होती ! बस सुटत असताना मी गडबडीनं सार्‍या खिडक्यांवरून नजर फिरवू लागलो. जी नजर मला अपेक्षित होती, ती कुठेच दिसत नव्हती. बस निघून जावू लागली तसा माझ्या हृदयाने, जे आजवर फक्त मी जिवंत रहावं म्हणून धडधडतं, असं समजायचो, ते चक्क अस्वस्थतेनं धडधडत होतं ! आणि अचानक माझ्या नजरेला कांहीतरी जाणवलं...जे

 जाणवलं ते खूप भयानक अर्थात ही खूप गोड भयानकता होती, बसमागच्या खिडकीतून दोन डोळे माझ्याकडं पहात होते. ती नजर ओळखण्यासाठी मला फारसे कष्ट पडले नाहीत मात्र, त्याचक्षणी भीतिने पोटात खड्डा मात्र पडला होता !

त्या दिवशी खूप कमी वेळात चित्र-विचित्र भावना एकाच वेळी अनुभवल्या होत्या. भावनांचीही तारांबळ उडली असेल तेंव्हा ! म्हणून सगळीच मिसळ झाली...भावनांची मिसळ !! त्या रात्रीची गोड शिरशिरी मी पुढच्या अनेक रात्री रवंथ केल्यासारख्या अनुभवत होतो. तो क्षण मी एकाच रात्रीत लाखोवेळा जगलो असेन, पण तरिही मनाचं समाधान होत नव्हतं ! दुसरे दिवशी सकाळी कॉलेजमध्ये अजिबात लक्ष लागत नव्हतं. मला आठवतंय, त्या रात्री आणि दुसरे दिवशी दुपारी मी अजिबातच जेवलो नव्हतो ! त्या दिवशी मी शिक्षकांच्या शिव्याही खाल्ल्याचं स्पष्ट आठवतंय मला !

कॉलेज सुटलं. नागौरी चहा. बस-स्टॉप. असं दैनंदिन उरकून मी आलेल्या बस मधे चढलो. बराच वेळ वाट पाहूनही ती...जोसेफिन दिसली नव्हती. स्वत:वरच चरफडत मी बसमध्ये जावून बसलो. “ते एक सुंदर स्वप्न होतं !” असं समजून विसरून जायचं पक्क करून मी, माझ्या बॅगेतील सिडने शेल्डनचं “टेल मी युवर ड्रिम्स” पुस्तक काढलं आणि वाचू लागलो. अचानक सुरू झालेल्या बसनं करकचून ब्रेक दाबला. समोरच्या बारवर डोकं आपटता आपटता बचावलो. “आता कोण मधे कडमडलं ?” असं म्हणून हळू आवाजात सणसणीत शिवी हासडून समोर पाहिलं आणि रुटिनचा भाग म्हणून धडधडणार्‍या हृदयानं अचानक उसळी मारायला सुरूवात केली. समोरच्या दारातून ती, जोसेफिन, आत येत होती. ती आत येवून उभी राहिली आणि आमच्या दोघांची नजरा-नजर झाली आणि दोघांच्याही मनात माजलेला कल्लोळ स्पष्ट ओळखू येत होता. सर्वात महत्वाचा मुद्दा हा होता की, ओळख दाखवावी की नको ? हीच अडचण दोघांनीही ओळखली आणि आम्ही दोघांनीही अगदीच समंजसपणे आपापली नजर फिरवून घेतली. मी उगाच त्या काळ्या छापील रंगावरून नजर फिरवू लागलो. समोरचं कांहीच मेंदूत घुसत नव्हतं. मनात कांहीतरी वेगळंच सुरू होतं !

“वाशी” तिचा आवाज कानावर आला. “अच्छा, म्हणजे ही वाशीला रहाते तर !” माझ्या मनाने हिशोब घातला. आपण उठून तिला जागा द्यावी का ? असाही विचार मनात आला. पण ते बरोबर दिसलं नसतं. ती उभीये आणि आपण बसलोय, असा उगाच अपराधीपणाचा विचार मनात डोकावू लागला. मी उठलो आणि बाजूला उभ्या एका इसमाला बसायला जागा दिली. बॅग समोर अडकवली आणि बसच्या खांबाला एका हाताचा विळखा घालून उगाच वाचत उभा असल्याचा अभिनय करू लागलो. हो...अभिनयच होता तो त्यावेळी ! कारण, तिच्या पर्फ्यूमचा तो गोड वास नाकाला जाणवत होता, त्यामुळं बाकीचं सारंच व्यर्थ होतं ! मी उभं राहिल्यावर तिरकं पाहून, नजर फिरवून तिनं केलेलं स्मित मीही माझ्या तिरक्या नजरेनं पाहून घेतलं होतं आणि तंद्री लागायला एवढं कारण पुरेसं होतं !

गर्दी वाढत होती. वैतागून कंडक्टर माझ्याकडे पाहून ओरडला, “अय हिरो...पुढं सरक ना...गर्दी दिसत नाही का ?” पुढं सरकनं माझ्या जीवावर आलं होतं. कंडक्टरच्या वाक्यानं चवताळलेलं एक पोरगं मला पुढं ढकलू लागलं. आणि...आणि पुढच्या क्षणी मी जोसेफिनच्या बाजूला उभा होतो. मला आठवतंय, त्यावेळी आम्ही दोघांनीही एकदमच दीर्घ श्वास घेतला होता, दोघंही अवघडून गेलो होतो. आता आणखी अभिनय करण्यात अर्थ नाही, असं स्वत:ला समजावून मी सिडने शेल्डनची मनातल्या मनात माफी मागून ते पुस्तक बॅगेत सरकवून दिलं. आम्ही दोघंही एकमेकाकडं पहायचं टाळत होतो. हा प्रवास संपूच नये असं वाटत असतानाच, “कांजूर...उतरा” म्हणून त्याक्षणीचा व्हिलन कंडक्टर ओरडला.

 नाईलाजानं, जड अंत:करणानं मनातल्या मनात जोसेफिनचा निरोप घेवून बसमधून उतरलो आणि उगाच डिडिएलजे मधल्या शाहरूखच्या स्टाईलमध्ये खाली उभा राहून मनातल्या मनात “पलट..पलट” म्हणून सुरूवातील ओरडू आणि मग बोंबलू लागलो. कांहीच उपयोग झाला नाही ! आणि त्याक्षणापासून डिडिएलजे माझी सर्वात नावडती फिल्म बनली ! नको ते सिध्दांत दाखवून आमच्यासारख्या तरुणांचा मनोभंग करणं, म्हणजे काय !!

त्यानंतर जवळ जवळ रोजच आमची संध्याकाळच्या बसच्या वेळेत भेट होवू लागली. सुरूवातीला एकमेकाला पाहून बावरून जाणारे आम्ही नंतर समोर आल्यावर एकमेकाला स्माईल देवू लागलो. अभिवादन म्हणून मान डोलावू लागलो. पण अजूनही आम्हांला एकमेकाची नावं माहित नव्हती.

माझी फायनल एक्साम सुरू व्हायला २ आठवडे होते आणि तयारीसाठी सुट्टी देण्यात आली होती. सुट्टी अगोदरचा तो शेवटचा दिवस. प्रॅक्टिकल सब्मिशन, एक्साम शेड्यूल घेवून निघायला वेळ झाला होता. त्या दिवशी मित्रांसोबत चहाला जाण्याचं टाळलं कारण, कांहीही होवू दे...मला त्या दिवशी तिच्यासोबत बोलायचं होतं, सुट्टीला जाण्यागोदर निदान एकदा. भले मग मला तिच्यासोबत वाशीला जावं लागलं असतं तरी हरकत नव्हती ! माहित नव्हतं का पण, त्या दिवशी हुरहूर लागून राहिली होती. सगळ्यांना टांग देत गडबडीनं बस-स्टॉपजवळ आलो. ५२३ दिंडोशी-वाशी ही माझी नेहमीची बस येवून उभी होती. लोकं आत चढत होती. मी पळत तिथे गेलो. जोसेफिन गाडीत चढत होती. चढता-चढता ती माझ्याकडं पाहून हसली. ती आत गेली. मी गर्दीच्या तोंडाशी जावून आत चढण्यासाठी धडपडू लागलो. त्या दिवशी खूप गर्दी होती, नेहमीपेक्षा जास्त. मी खिडकीतून जोसेफिनला शोधू लागलो. चार नंबरच्या खिडकीत माझी नजर थांबली. ती मला हात करत होती. मी मानेन “काय ?” म्हणून विचारलं. तिचा आवाज माझ्यापर्यंत पोहोचत नव्हता. मी खिडकीखाली जावून “काय म्हणालीस ?” म्हणून विचारलं. “गर्दी खूपये. मी जागा पकडलीये. चढ गाडीत !”, ती म्हणाली.

आज कांहीतरी खास घडत होतं. दोन-अडीच महिन्यात कधीच न बोललेले आम्ही दोघं आज स्वत:हून एकमेकांशी बोलत होतो. तिनं चक्कं माझ्यासाठी जागा पकडली होती ! आज सारं माझ्या मनासारखं घडत होतं. कांहीही होवो आज तिच्याशी बोलायचं, तिला स्पष्टपणे सांगायचं हे मनाशी पक्क केलं आणि दाराशी जावून आत घुसण्यासाठी चढाओढ करू लागलो. लोकं भांडत होती, वादावादी सुरू होती. आणि अचानक वैतागलेल्या कंडक्टरनं बेल मारली. गाडी सुरू झाली. मी असहायपणे तिच्याकडे पहात होतो. तिच्याही नजरेत मी त्याक्षणी अगतिकता पाहू शकत होतो. तिचे डोळे नेहमीपेक्षा खूप बोलत होते आज ! माहित नाही, तिच्या नजरेत पाणी होतं की, मला भास झाला ! पण एक नक्की त्या दिवशी आम्हां दोघांनाही एकमेकांशी बोलायचं होतं. काय ? माहित नाही ! बराच वेळ आम्ही एकमेकाकडे पहात होतो. गाडी सिप्झच्या वळणाड गेली आणि बराच वेळ मोठ्या मुश्किलीनं अडवलेला पाण्याचा टपोरा थेंब मी रुमालानं टिपून घेतला. मित्रांना फोन केला. सारे नागौरी चहाच्या टपरीवर होते. पुन्हा टपरीवर गेलो. त्या दिवशी बराच वेळ मी एकटाच त्या बस-स्टॉपवर बसून होतो. ८ च्या सुमारास नाईलाजाने उठलो आणि घराकडे परतलो.

दोन आठवड्यांच्या सुट्टीनंतर गावाहून पुन्हा मुंबईला परतलो. पहिला पेपर दिला आणि बस-स्टॉपवर आलो. बराच वेळ वाट पाहिली. जोसेफिन दिसली नाही. दुसरा पेपर झाला...तिसरा झाला...मग चौथा...पाचवा...आठवा....! जोसेफिन पुन्हा कधीच दिसली नाही...!! आजही जेंव्हा कधी मुंबईला जाणं होतं तेंव्हा मी ६ वाजता ओर्के मिल स्टॉपवर असतो आणि ५२३ ची वाट पहातो....! गर्दी होती तशीच असते...तो केळीवाला, सँडविचवाला, सब-वे, ते कुत्रं, ५२३, तो स्टॉप सारं तेच-तसंच असतं ...मीही कधी कधी असतो पण...पण नसते ती, जोसेफिन !

 दरवर्षीचा वळीव मला जोसेफिनची आठवण करून देतो ! जोसेफिन...       

Pen Image

Pen Index