Pen


कांही ओळी मनातल्या : ५ : माझी मुंबई !

वाचकहो,
गेल्या आठवड्यात वैयक्तिक कामानिमीत्त मुंबईला जवळ-जवळ २ वर्षांनी जाणं झालं. मुंबईची ओढ जशी इतरांना असते, तशीच मलाही होती, आहे. या मुंबापुरीने खूप गोष्टी शिकवल्या, शिकवत आहे. माझा शिक्षणाचा काळ. इथले मित्र-सहकारी-अनुभव खूप काम्ही दिलं मुंबापुरीनं ! एखाद्या प्रेयसीची जागा असावी ना मनात, खोलवर जपून ठेवलेली...फक्त तिच्यासाठीची स्पेशल जागा, तशीच या मुंबईसाठी माझ्या मनात मी जपून ठेवली आहे एक सुरक्षित जागा ! मात्र यंदा खूप वेगळी दिसली मला माझी मुंबई. माझं वय वाढल्यामुळं असेल कदाचित पण यावेळी मुंबई मला स्वप्नाळू नाही वाटली, ती दाहत होती, टोचत होती, आर्त टाहो फोडून कांहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होती ! तिचा आर्त टाहो जसा ऐकू आला तसा मांडण्याचा हा एक प्रयत्न, तुम्हांलाही कदाचित अस्वस्थ करून जाईल आणि नाही भावला तर मग मी तिचा टाहो पोहोचवण्यात कमी पडलो, असं म्हणावं लागेल !
-अनुप


माझी मुंबई...

कष्टकर्‍या हातांची, हातावरल्या पोटांची...

चक्रं जोडलेल्या पायांची, पायाला बांधलेल्या वेळेची...

चाकरमान्याची, मण्याच्या चाकरांची...

कोळ्यांची, भर उन्हात सूट-बूट घालणार्‍या इंग्रजाळलेल्या औलादींची...

हिरव्या-निळ्या-काळ्या ऊंचच ऊंच इमारतीमधून,

औत्सुकतेने डोळे मिचकावून वरळी सी-लिंक पाहणार्‍यांची...

त्याच किनार्‍यावरच्या वाळूत बसून सुकी-ओली भेळ खात,

पोरानं वाळूत बांधलेल्या किल्ल्याला कुंपण घालणार्‍याची...

गरीब-श्रीमंत, झोपडपट्टीतील, व्हिलामधील, हिलवरील...

गेट वे पासून कर्जत-कसारा-आसनगांव-पनवेल-डहाणू रोडपर्यंत सर्वांची...

लोकलमध्ये चौथ्या सीटवर बसूनही प्रसन्नपणे राजाच्या अविर्भावाने,

उभ्या गर्दीकडे पहाणार्‍याची...

त्याच गर्दीत वाट काढत भटकणार्‍या फेरीवाले, विक्रेते, भिकार्‍यांची...

डोळ्यात आभाळभर स्वप्नं घेवून उतरणार्‍या कित्येक रेल्वेच्या डब्यांची...

निराश होवून परतणार्‍या प्रसंगी बेवारस म्हणून लाथाडल्या गेलेल्या जीवांची...

सुख-दु:खांची, मदमस्त तारुण्याची, झिंग आणणार्‍या चंदेरी दुनियेची...

याची-त्याची-प्रत्येकाची...

गर्दीची, गर्दीतल्या प्रत्येकाची, प्रत्येकाच्या मनात हळूवार जागा मिळवणारी,

माझी मुंबई !

 

सर्वांना सामावून घेणारी मुंबई मात्र तशी कुणाचीच नाही !

कुंटणखान्यात नाईलाजाने शरीर विकायला थांबलेली रंडी आणि माझी मुंबई !

रोज सकाळी नटून-थटून उभी असते, माझी मुंबई...

दिवसभरचा अत्याचार, शरीराचा चोळा-मोळा...

संध्याकाळी रक्ताळलेली, भेसूर, केस विस्कटलेली, घामाने न्हालेली...

शरीरावरचे भेसूर व्रण, वासनेचे चावे-ओरबाडलेल्या नखांच्या खुणा...

फाटलेल्या पदराने सावरत दुखर्‍या जांघेनिशी विव्हळत पाय उचलत...

रक्ताच्या खुणा मागे सांडत निद्राधीन होणारी...

माझी मुंबई !

  

बकाल चेहरे, बकाल वस्त्या, बकाल झालेली स्वप्ने...

हगल्या-मुतल्या वासाने, बरबटलेल्या घामाने आणि,

वासनेने बरबटून गर्भ-श्रीमंतीच्या माजाने दरवळणार्‍या गटारी !

मोठ्याले स्काय-स्क्रेपर्स, कितीही अलिशान भासले तरी,

खाली उभारून पहाणार्‍या त्रयस्थाला अप्रूप नाही वाटत कारण,

त्याला तीही खुराड्यांप्रमाणेच वाटतात !

कित्येक गाणी-रडगाणी, भाईगिरी, गोळ्यांचे लिबलिबीत झालेले घाव...

बॉम्बस्फोटांनी निबर होवून जगणारा गाव आणि,

मुंबई स्पिरीटच्या नावाखाली दडपून टाकला जाणारा प्रत्येक भाव घेवून जगणारी...

माझी मुंबई !

 

अगणित धुराच्या नळकांड्यांनी छाताडाची चाळण होवूनही,

कर्करोगाच्या काळ्या टारने आभाळ दाटूनही,

खोकणार्‍या तिच्या भेसूर चेहर्‍याला दृष्ट लागू नये म्हणून सुरू असलेला अट्टहास !

सुशोभिकरण, मोठ-मोठाले पुतळे, समिंदर हटवून बांधल्या जाणार्‍या,

टोलेजंग बाजारपेठा आणि व्यापार !

सार्‍याचा भार उचलणार्‍या तिच्या धमण्या-शिरा उन्हा-तान्हात तडकून,

म्लान आडव्या पडून झेलताहेत कित्येक श्वासांचा कोंडमारा आणि

मेगाब्लॉकच्या नावाखाली “अजून थोडं...अजून थोडं” म्हणत,

दिला जातोय तिच्या प्रत्येक सबुरीचा बळी !

त्यांच्यामधूनच वाट काढत पळणारी कुत्री, उंदरं, घुशी आणि आधे-मधे कधीतरी,

बळी मागितल्याप्रमाणे आपसूक नाहीतर मतिहीन उडी घेणारे,

थुलथुलीत जीवांचे हाडा-मांसाचे गोळे !

सार्‍यांना पाठीवर घेवून, कधी पायदळी तर कधी डोईवर घेवून,

टिपं गाळत धावणारी...

माझी मुंबई !

 

भसाड्या-बेसूर-नाटकी भिकार्‍यांच्या थाळीत वाजणारी,

प्लॅटफॉर्मवरच्या आंधळ्या पावा वाजवणार्‍या म्हातार्‍याच्या आवाजाला टाळणारी,

सिग्नलवरच्या आशाळभूत नजरांनी काचेच्या आत डोकावून,

स्वत:च्याच अस्तित्वाचा-भविष्याचा वेध घेणारी...

“दहा रुपयात भारत” म्हणत पळणारी समस्त बेगुमानी लहानग्यांची जमात !

आणि या सार्‍यांपासून लांब,

आपला कशाशीही संबंध नसल्याप्रमाणे, ए.सी. विचारांत रममाण होवून,

पेज थ्री वर झळकणारी महामहिम औलाद !

जुनाट झाल्या नेकलेसचे अप्रूप न वाटता,

सागराचा हर मार सोसत मुकाट्याने सांच्याला अंधारात,

कित्येक चाळे, गप्पा, चर्चा, वाद्यांच्या लाटा अंगावर घेत पडून असते,

माझी मुंबई !

 

मुंबादेवी, सात बेटे, इंग्रज-फ्रेंच-पोर्तुगिज आणि शिवाजी

यांचं सोयरसुतक आहे कुणाला ?

इतिहास-भूगोल-नागरिकशास्त्र यांचा लोणच्याप्रमाणे वापराची,

प्रत्येकाला सवय झालेली !

इथे दूध “भैय्या” देतो अशा समजुतीत कित्येक पिढ्या धन्य झालेल्या,

वडा-पावला आयुष्य मानून जगणारी आणि गावाकडच्या मातीला,

नाकं मुरडणारी कित्येक अवदसा गावाकडच्या मातीतच येवून मिळाल्या,

पावसाळ्यात तुंबलेल्या गटारी, लोकल आणि इतरवेळी...

तुंबलेली मनं घेवून आतल्या-आत कुढत असते...

माझी मुंबई !   

 

याची-त्याची-प्रत्येकाची...

गर्दीची, गर्दीतल्या प्रत्येकाची, प्रत्येकाच्या मनात हळूवार जागा मिळवणारी,

माझी मुंबई !

 

-       अनुप

 

COGNIZANCE: All written creative material is the solemn property of “An Anup Jatratkar Multi-Media Production”. If anyone wanted to use it for his/her own personal purpose (i.e. short film, projects, blogs, articles, scripts, FB posts etc.) then, have to take proper permission from, Mr. Anup Jatratkar. If it will be found that, anyone involved in such activities without prior permission, then, we are able to take certain charge on him/her. 

Pen Image

Pen Index