Pen


PEN 38 : सूचक कथा १

तो धावत होता...वेड्यासारखा,

वार्‍यासारखा आणि मदमस्त होवून,

बेलगाम...येणार्‍या प्रत्येकाला पायदळी घेवू पाहणार्‍या,

मस्तावलेल्या हत्तीसारखा !

 

त्याला या अवस्थेत कुणी पाहिलं असतं तर कदाचित,

सार्‍यांनी स्वत:लाच वेडा ठरवत त्याला ठार वेडा ठरवून,

आपला काढता पाय घेतला असता किंवा कदाचित,

त्याची गचांडी धरून, गांडीवर लाथा हाणत आणून फेकला असता...

कैदखाण्यात, अंधारकोठडीत किंवा पागलखाण्यात !

 

केस पिंजारलेले !

डोळे, कित्येक शतकं न झोपल्यानं,

सुर्याच्या लालसर आगीशी स्पर्धा करणारे !

गळ्यात मोत्यांच्या माळांऐवजी आतला निव्वळ सुती धागा घेवून,

मिरवणारी कधी काळची निधडी छाती !

ज्या बाहूंचे स्फुरण पाहून कधीकाळी शत्रूची फे-फे उडायची,

त्याच बाहूंवरची रक्ताळून, फाटून लोंबणारी चामडी !

अंगावर कुठेतरीच रेशमी वस्त्राचे “अवशेष” शिल्लक रहावेत,

असे वाटणारे आणि सांगावे लागणारे रेशमी तलम कपडे !

मोजड्या तर कधीच फाटून गेलेल्या...

रक्ताळून गोठून आणि आता बधीर होवून गेलेला पाय !

ज्या तलवारींना त्याच्या तळहातांचा विळखा पडल्यानं भारावून जाणं व्हायचं,

त्याच तलवारींना त्याचे बोथट-निस्तेज झालेले तळहात टोचू लागले होते !

 

भयावह कित्येक अंधार्‍या काळोख्या राती त्यानं,

तडफेनं पाहिल्या होत्या !

कित्येक नंग्या अमानवी “मानवी” विकृती त्यानं सहज पेलल्या होत्या !

कित्येकांचा कर्दनकाळ राजा, आज आपल्याच सवयीला बांधून गेला होता !

सवयीचा गुलाम बनून गेला होता !

 

कसं शक्य आहे ?

का नाही ??

राजा...चक्रवर्ती सम्राट असला तरी तरी तो माणूसच !

माणसाला सवय अगदी कशाचीही लागते, अगदी सहज !

व्यसन !?

अंहं !

सवय !

फरक का दोन्हीत ?

शक्यतो, व्यसन हा स्वत:चा चॉईस असतो !

आणि मग सवय ?

सवय लागते किंवा होते !

 

भल्ले शाब्बास...पकडलं शब्दात भाऊ तुम्हांला !

व्यसनाचंही तसंच नाही का ! एकतर लागते किंवा होते !!

आता बोला...अडकलात !

अडकलो ?

मग मी व्यसनी झालोय ?

अरे ये...तू त्या राजाबद्दल बोलतोयेस ना ? तुझा काय संबंध मधेच !?

अरे हो...विसरलोच !

नाही, तरिही त्या राजाकडे जाण्यागोदर हा शब्द खेळ सोडवता येतो का ते बघू...

त्या गोष्टीपेक्षा याच्यात मजा वाटतीये...

भो.... !!! तुझ्या मजेसाठी चाललंय का हे सारं !?

हा मी निघालो...गोष्ट सांगणार नसशील तर मी हा निघालो !

 

अरेच्चा ! तुला कसं कळालं ?

काय ?

त्याचा संवाद तू कसा काय म्हणालास !?

कसला संवाद ?

चांडाळा...वेताळा...कलियुगातही माझा पिच्छा सोडत नाहीयेस !

तूच आहेस...तू गेला नाहीस...तू जिवंत आहेस...प्रत्येकात !

प्रत्येक माणसात लपून छळ चालवलाहेस तू...प्रत्येकाचा !

प्रत्येकाला भुलवतोस...गोष्टीत रमवतोस आणि साल्या शेवटी प्रश्नांच्या गुंत्यात टाकून,

बुडाला पाय लावून पसार होतोस !

काय बरळतोयेस ? वेड-बिड लागलंय का ?

होय...मलाही वेड लागलंय...त्या राजाप्रमाणं !

कोण राजा ?

 

निच ! हरामखोर ! नतद्रश्त्या !

मी राजा विक्रमादित्य आणि त्या वेताळाबद्दल बोलतोय !

शतकानुशतकं गोष्टी सांगून...मनाला भुरळ पाडून...

त्या वेताळानं राजाला नकळत का असेना पण सवय लावली...

गोष्टींची...गोष्टींच्या जगात रममाण होण्याची !

वेताळ आयुष्यात येण्यागोदर नीटच सुरू होतं की त्याचं !

कधी समाजकार्य म्हणून, तर कधी चला ओलख झालीचये म्हणून...

तर कधी पर्याय नाही म्हणून तर कधी गरज म्हणून...

तोही त्याच्यासोबत भावनिक पातळीवर जोडला गेलाच की !

 

कसं काय बुवा ?

माणसाला कुणाचीही सवय लागू शकते !

चार दिवस माणूस ज्या हॉटेलात रहातो...

कांही दिवस ज्या प्राण्यासोबत...कुत्र्यासोबत रहातो...

ज्या वहानावरून फिरतो...

त्या सार्‍याची माणसाला लागतेच की सवय !

इथे तर कित्येक शतकांपासूनचा दोघांचा संबंध !

दोघांचीही ती दिनचर्याच बनून गेलेली !

भावनिक पातळीवर दोघंही एकमेकासोबत जोडली गेलेली !

 

राजाचा हेतू शुध्द...वेताळ मात्र आतल्या गाठीचा !

म्हणून तर वेताळ झालेला !

त्याला पक्कं माहित होतं...

गरजेपुरतं राजाचा कसा वापर करून घ्यायचा ?

आपल्याला कुठं जायचं आहे ? काय मिळवायचं आहे !

मग, मला सांग ? वेताळाला जर एवढीच अक्कल होती, समज होती...

तर मग राजाच्या पाठकुळीवर झोके घेवून त्यानं स्वत:चा तरी वेळ का दवडला असता !?

तो केंव्हाच निघून गेला असता ना ?

 

अरे तेच तर...

असं कसं शक्य आहे ?

त्याला मिळालीही असेल संधी पण दरवेळी प्रयत्न फसला असेल तर ?

मग आत्ताच कशी बरं संधी मिळाली !?

कारण तो मुर्ख राजा...

अरे काय बोलतोये ? मुर्ख म्हणतोयेस !?

भावना दुखावल्या जातील !

डोकं ठिकाणावर ठेवूनच बोलतोय...

तो मुर्ख होता कारण तो विश्वास ठेवून बेसावध राहिला !

अचानक एक रात्र...

“राजा मी निघालो पुढच्या प्रवासाला...तू तुझं आयुष्य जसं होतं तसं खुशालपणे...

सुखाने, आनंदाने जग ! हा मी निघालो...माझा नाईलाज आहे !”

आणि त्याच्या तळतळाटाचा, मनस्तापाचा, त्राग्याचा विचार न करता...

तो नाहिसा झाला !

 

चूक राजाची होती मित्रा ! त्यानं सवय करून घेतली...

वेताळ हुशार होता, प्रॅक्टिकल होता ! त्याला बरोब्बर माहित होतं,

कुठं शेपूट घालून डाव उलटवून पळ काढायचा ते !

बरोबर आहे तुझं...

चूक राजाचीच होती...आहे आणि राहील !

  

म्हणून तर,

सवय लागलेला राजा दर रात्री आजही भटकतोय...

शोधतोय...

जुन्या गोष्टींमध्ये रममाण होवून रात्र काढण्याचा प्रयत्न करतोय आणि

दिस उजाडताच...

राना-वनातून, झाडा-झुडपांतून चेहरा लपवत फिरतोय !

का ?

ये ऽ ऽ काय झालं ? तू इतका विकृत का हसतोयेस ?

कारण,

राजाला रात्रीचीही सवय झालेली !

 

-       अनुप

 

COGNIZANCE: All written creative material is the solemn property of “An Anup Jatratkar Multi-Media Production”. If anyone wanted to use it for his/her own personal purpose (i.e. short film, projects, blogs, articles, scripts, FB posts etc.) then, have to take proper permission from, Mr. Anup Jatratkar. If it will be found that, anyone involved in such activities without prior permission, then, we are able to take certain charge on him/her. 

Pen Image

Pen Index