Pen


चौथं पान

बहाने सोचे थे खूब बनाएंगे, होठों पे नकाबी हसीं खूब चढाएंगे ।

कलम उठायाही था हाथोंने मगर, जुर्रत ना कर सके आपसे ॥

 

वाचकहो नमस्कार,

खूप दिवसांनी...नव्हे, महिन्यांनी बोलतोय ! आपल्यापैकी बरेचजण नाराज आहेत याची मला कल्पना आहे, म्हणूनच आपकी नाराजगी सर-आंखोंपर ! नवीन वर्ष येव्हाना सुरू होवून पहिला महिना संपतही आलाय हो ! आणि मी महाभाग, आत्ता आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी लिहीता झालो आहे. मनापासून क्षमस्व: !!

मध्यंतरी खूपदा वाटलं लिहावं...बोलावं पण कांही व्यावसायिक आणि कांही वैयक्तिक कारणांमुळं शक्य नाही झालं. खरं तर कारणं देणं हे न शोभणारं पण नाईलाजास्तव हा घाट...

गेल्या वर्षीच्या “तिसर्‍या पाना”त मी आपल्याला कांही गोष्टींबद्दल शब्द दिला होता पण त्यापैकी एकही पूर्ण करण्यात म्हणावे तसे यश आले नाही, याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. यानिमीत्ताने का असेना, म्हंटलं, जरा मागे वळून पहावं आणि तुमच्याशी गप्पा माराव्यात !

वाचकहो, २०१३ पासून मी माझ्या एका ड्रिम प्रोजेक्टवर काम करत होतो...आहे ! गतवर्षी वाटलं तो पूर्ण होईल. पण कसं असतं ना, किनार्‍यावरून बसून विचार करणार्‍या प्रत्येकाला वाटतं, क्षितीज काय..ते तर आत्ता मिठीत घेईन ! मीही याला अपवाद नव्हतो. मार्च २०१८ मध्ये खर्‍या अर्थाने त्या प्रोजेक्टला सुरूवात केली मार्च २०१८ ते ऑगस्ट २०१८ या दरम्यान इतर कोणत्याच गोष्टींचा विचार न करता स्वत:ला झोकून देवून कामाला लागलो...! मी आणि माझी २२ जणांची टिम अक्षरश: अहोरात्र झटत होतो पण...

हा “पण” खूप चु... असतो ! या दरम्यान माझ्याकडून एक अक्षम्य चूक घडली आणि प्रोजेक्ट बंद पडला !! सप्टेंबर ते नोव्हेंबर खूप मानसिक त्रासाखाली गेले. हातून सार्‍या गोष्टी निसटत गेल्या, सारी गणितं बिघडत गेली ! स्वत:ला सावरायला दोन महिने घालवावे लागले. या सार्‍या प्रसंगातही माझी टिम, मित्र-मैत्रिणी, आई-बाबा, दादा-वहिनी माझ्या पाठीशी ठाम उभे राहिले. ११ ऑक्टोबर ला स्टुडिओला १ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमीत्ताने एक घरगुती कार्यक्रम आयोजित केला होता आणि कांहीच घडले नसताना भावाला मिठी मारून तासभर डोळ्यात साठलेल्या भावनांना वाट करून दिली होती. त्याक्षणी माझ्या घरच्यांची अवस्था आणि त्यानंतर त्यांनी दिलेलं बळ सारंच शब्दांपलिकडील !! म्हणतात ना, जे होतं ते चांगल्यासाठीच !

नोव्हेंबर चा शेवटचा आठवडा. सारी टिम अवसान गाळून बसली होती. निदान २०१८ मधे चांगल्या प्रोजेक्टला सुरूवात होईल अशी सार्‍यांची अपेक्षा होती, जी माझ्यामुळे फोल झाली होती. उघडपणे कुणीच बोलत नसला तरी मला जाणीव नक्कीच होती. २४ तारखेच्या रात्री सारे पुढे काय करायचे ते ठरवत होतो आणि याच दरम्यान टिमचा उत्साह टिकून रहावा म्हणून एक लघुपटाची कथा ऐकवली आणि म्हणालो, आत्ता आपल्या हातात कांही नाही तोवर एक लहान प्रोजेक्ट करून टाकूत, आपल्यालाही आत्मविश्वास मिळेल. कथा ऐकवली. सारे बराच वेळ शांत. पण ती शांतता अखेरची ठरली आणि त्या रात्री आमच्या सर्वांच्या स्वप्नांना नवीन उभारी मिळाली. जो आत्मविश्वास मी गमावला होता, तोच नव्याने गवसला ! कधी कधी ठेच लागणं खूप गरजेचं असतं, असं म्हणतात ते कांही खोटं नाही.

या सार्‍या धावपळीत तुम्हां सर्वांशी भेटणं, बोलणं मात्र कमी झालं...! असं असलं तरी तुमचं प्रेम कमी झालं नाही आणि म्हणूनच गुगलच्या “इंटर-रिएक्टिव्ह वेब साईट्स”मध्ये आपली..तुमची वेब-साईट पहिल्या दहात आली. याचं पूर्ण श्रेय तुम्हांसर्वांचं ! गेल्या वर्षभरात मी कोणताही “पेन” न टाकता वर्षभरातील फॉलोअर्सची संख्या ३,९३४ आणि एकूण संख्या ७,०००च्या जवळपास गेली आहे. आपले सर्वांचे मनापासून आभार !

गतवर्षी तुम्हांला प्रॉमिस केलेल्या बर्‍याच गोष्टी करायच्या राहून गेल्या. यंदा मात्र शब्द न देता त्या पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन, याची खात्री देतो. पुन्हा नव्या कामाने, वेडाने झपाटून टाकले आहे पण हे वेड, झपाटलेपण बालिश नाही...जसे गेल्या वर्षी होते तर, खूप प्रॅक्टिकल आणि संयत आहे आणि राहिल ! त्यामुळे दर रविवारी भेटणे शक्य जरी झाले नाही तरी अधे-मधे चक्कर टाकेनच म्हणा. तोवर, आपणांस खूप शुभेच्छा. नव वर्षात आपल्या मनोकामना पूर्ण होवोत...भरभराट होवो...शत्रूबद्दलही वाईट विचार आपल्या मनात न येवो...हीच प्रार्थना !

आपला,

अनुप जत्राटकर    

 

मला छंद जडला होता,

कागदाची नाव करून ती, पाण्यात सोडण्याचा.

अन स्वप्न, ती दूर क्षितीजापार गेल्याचा !

 

पण नेहमीच चकव्याप्रमाणं तडा देत...

ती नितळ पाण्यात विरघळून जायची.

 

माझ्याच छंदाला सरावलेला, मीच दुसरा..

माझ्याच शेजारी येऊन उभा रहातो.

हाती प्लॅस्टिकची नाव देत, ‘हो, स्वार’ म्हणतो.

 

धीर होऊन..मी ती नाव,

पुन्हा एकदा पाण्यात सोडतो.

अन अस्पष्ट होत जातो....

माझा मलाच...दूर क्षितीजापार जाताना...!

-अनुप

 

Pen Image

Pen Index